बुद्धपूर्व इतिहास, भारताचा : भारताचा अगदी आरंभापासून ते गौतम बुद्धाच्या जन्मापर्यंतचा (इ. स. पू. सु. ६२३) इतिहासयेथे विवक्षित आहे. या काळाच्या इतिहासाचे मुख्य साधन पुराणांत नमूद केलेल्या परंपरा हे आहे. या परंपरा सूतांनी मुखोद्गत करून राखल्या होत्या. वैदिक काळातही इतिहासपुराण हा अध्ययनाचा विषय होता. हे उपनिषदातील (छांदोग्य उपनिषद् अ ७—खं. १) उल्लेखांवरून स्पष्ट होते. पुढे त्याची अनेक पुराणे होऊन त्यात वेळोवेळी भर पडत गेली. त्यांतील राजवंशावळी गुप्तकालापर्यंत (ख्रिस्तोत्तर चौथ्या शतकापर्यंत) आणल्या आहेत. पुराणांतील वृत्तांतांत अनेक ठिकाणी काल्पनिक भाग, परपस्पर विरोध, कालविपर्यास इ. दोष दिसत असले तरी त्यात विश्वसनीय भागही पुष्कळच आहे. विश्वसनीय म्हणण्याचे कारण असे की १८ पुराणांमध्ये जेथे जेथे हा विषय येतो, तेथे या इतिहासाची सामान्य रूपरेषा सारखीच दिसते. आद्य इतिहासाच्या ज्ञानाचे तेच एकमेव साधन असल्यामुळे त्याचा तारतम्याने उपयोग केला पाहिजे.
पुराणांतील वृत्तांत अगदी जगाच्या आरंभापासून सुरू होतो. ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवसाला व रात्रीला मिळून कल्प अशी संज्ञा आहे. त्या दिवसाचे चौदा भाग कल्पून त्यांपैकी प्रत्येक भागाला मन्वंतर म्हणतात [⟶ मनु]. वैवस्वत मनूच्या काळी सृष्टिप्रलय झाला होता. त्याचे वर्णन शतपथ ब्राह्मणात आले आहे. त्या प्रलयात केवळ एका मत्स्याच्या साहाय्याने मनू वाचला. तो पुढे भारतातील राजवंशाचा उत्पादक झाला. अशा प्रलयाच्या कथा भारताप्रमाणे हिब्रू आणि बॅबिलोनियन परंपरांतही प्रचलित होत्या. या प्रलयाचा काळ ख्रिस्तपूर्व ३१०२ हा असावा.
भारतीय परंपरेप्रमाणे प्रत्येक कल्पात कृत, त्रेता, द्वापर आणि कली अशी चार युगे असतात. भारतीय कृतयुगात राजांच्या चाळीस पिढ्या झाला होत्या आणि त्या युगाच्या शेवटी सगर राजा राज्य करीत होता. त्रेतायुगात २५ आणि द्वापरयुगात ३० पिढ्या झाल्या असून त्यांचा शेवट अनुक्रमे राम आणि कृष्ण यांच्या अवतारांच्या अखेरीस झाला. भारतीय युद्धाच्या अखेरीस कलियुग सुरू झाले. त्या युद्धाचा काळ सु. ख्रिस्तपूर्व १४०० हा आहे. [⟶ कुरुयुद्ध].
ख्रिस्तपूर्व ३१०२ ते १४०० ह्या सु. १७०० वर्षांच्या काळाचे डॉ. अ. द. पुसाळकरांनी खालीलप्रमाणे विभाग पाडले आहेत :-(१) मनु-वैवस्वताचा काळ (ख्रि. पू. ३१००—३०००)(२) ययाती काळ (ख्रि. पू. ३०००—२७५०)(३) मांधातृ काळ (ख्रि. पू. २७५०—२५५०)(४) परशुराम काळ (ख्रि. पू, २५५०—२३५०)(५) रामचंद्र काळ (ख्रि. पू. २३५०—१९५०)(६) कृष्ण काळ (ख्रि. पू. १९५०—१४००)(७) परीक्षित ते बार्हद्रथ वंशअखेर (ख्रि. पू. १४००—६००)
(१) मनुवैवस्वत काळ : मनुवैवस्वताच्या काळी महान जलप्रलय झाला होता. मनूने एक विशाल जहाज बनवून त्यात विविध वनस्पती वगैरे वस्तू घातल्या आणि ते जहाज एका विशाल मत्स्याच्या शिंगास बांधून उत्तर पर्वतावर नेले. प्रलयजल ओसरल्यावर तो त्यातून उतरला. त्या ठिकाणाला ‘मनोरवतरणम्’ असे नाव पडले. मनू हा सर्व मानवांचा आदिपुरुष. त्याला नऊ पुत्र होते. त्यांपैकी इक्ष्वाकू, शर्याती, नाभानेदिष्ठ व करूष या चौघांचे वंश पुढे विख्यात झाले. इक्ष्वाकूने अयोध्येस राज्य केले. त्याचा वंश तो सूर्यवंश. शर्यातीने आनर्त (उत्तर गुजरात) मध्ये अंमल बसविला. नाभानेदिष्ठाची राजधानी मगधात वैशाली येथे होती. करूषाने चेदी देश (रीवा प्रदेश) व्यापिला. मनूला इला ही कन्या झाली होती. तिला बुधापासून पुरूरवस हा पुत्र झाला. तो सोमवंशाचा मूळ पुरुष होय.
(२) ययाती काळ : पुरूरवसाच्या सोमवंशात आयू, नहुष, ययाती असे अनेक चक्रवर्ती राजे होऊन गेले. ययातीला देवयानीपासून यदू आणि तुर्वसू आणि शर्मिष्ठेपासून अनू, द्रुह्यू, पूरू इ. पाच पुत्र झाले. त्यांनी उत्तर भारताच्या विविध भागांत आपली राज्ये स्थापिली. पूरूने आपल्या पित्याप्रमाणे प्रयागजवळचे प्रतिष्ठान येथून राज्य केले. त्याच्या अंमलाखाली मध्य प्रदेश होता. यदूला चंबळा, बेटवा आणि केन या नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेश मिळाला. द्रुह्यूचे राज्य चंबळा-यमुना यांच्या पश्चिमेच्या प्रदेशावर पसरले. तुर्वसूला चेदी देशाचे आधिपत्य प्राप्त झाले आणि अनूला अन्तर्वेदीचा उत्तर भाग देण्यात आला. इक्ष्वाकूला शंभर पुत्र होते. ज्येष्ठ पुत्र विकुक्षी हा अयोध्येत गादीवर बसला. इतर पुत्रांपैकी निमीने विदेहात आणि दण्डकाने दक्षिणेत राज्य केले. दण्डकाने एका ब्राह्मण कन्येवर केलेल्या अत्याचारामुळे त्याचे राज्य उद्ध्वस्त होऊन त्याचे निर्जन अरण्यबनले. या सर्व राज्यांत या काळात काही राजे होऊन गेले.
(३) मांधातृ काळ : या काळात सूर्यवंशातील युवनाश्वाचा पुत्र मांधातू सर्वश्रेष्ठ चक्रवर्ती राजा होता. याने अनेक देश जिंकून आपले राज्य सर्व दिशांस वाढविले. याने अनेक यज्ञ करून गोदाने दिली. त्याला पुरुकुत्स, अंबरीष आणि मुचुकुंद असे तीन पुत्र होते. मांधातृनंतर पुरुकुत्स अयोध्येस राज्य करू लागला. मुचुकुंदाचे राज्य नर्मदेच्या काठी होते. ते पुढे हैहयांनी नष्ट केले.
सोमवंश : प्रतिष्ठान आणि कान्यकुब्ज येथील राज्ये मांधातृने जिंकून घेतली होती पण यदुवंशी हैहय माळव्यात प्रबळ झाले. त्यांची राजधानी माहिष्मती (महेश्वर) होती.
अनूचे वंशाजांनी पंजाब प्रदेश जिंकून तेथे आपली राज्ये स्थापिली. त्यांपैकी उशीनराचा पुत्र शिबी याची राजधानी मूलस्थान (मुलतान) येथे होती. सौवीरांनी सिंधमध्ये आपला अंमल बसविला. केकय हे झेलम आणि चिनाब या नद्यांमधील प्रदेशांवर राज्य करू लागले आणि मद्रक हे शाकल (सियालकोट) ही राजधानी करून लाहोर आणि जम्मू या प्रदेशांत प्रबळ झाले.
द्रुह्यूच्या वंशजांना मांधातृच्या स्वाऱ्यांमुळे वायव्य प्रांतातील गंधार प्रदेशापर्यंत हटावे लागले.
(४) परशुराम काळ : या काळात भृगू आणि हैहय यांचा कलह हीच मुख्य घटना झाली. भार्गव हे हैहयांचे पुरोहित होते. कृतवीर्याच्या पुत्रांनी छळल्यामुळे ते कान्यकुब्जास पळून गेले. भार्गवांपैकी ऋचीक हा अस्त्रविद्येत निपुण होता. त्याने कान्यकुब्जाच्या गाधिराजाची कन्या सत्यवती हिच्याशी विवाह केला. त्यांना जमदग्नी हा पुत्र झाला. कार्तवीर्य राजा त्याच्या आश्रमात आला, त्या वेळी जमदग्नीने त्याचे आतिथ्य कामधेनूच्या साहाय्याने केले. ते पाहून कार्तवीर्याने त्या धेनूविषयी मागणी घातली. जमदग्नीने नकार दिल्यावर कार्तवीर्य तिला बलात्काराने घेऊन गेला आणि त्याने जमदग्नीचा आश्रम उद्ध्वस्त केला. जमदग्नीचा पुत्र परशुराम याने कार्तवीर्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले. कार्तवीर्याच्या पुत्रांनी पशुरामाच्या अनुपस्थितीत जमदग्नीस ठार मारले. तेव्हा परशुरामाने त्यांची कत्तल केली. त्याने एकवीसवेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली, अशी कथा आहे. तिचा अर्थ असा दिसतो, की परशुरामाने उत्तर भारतातील वैशाली, विदेह, काशी, कान्यकुब्ज आणि अयोध्या येथील राजांचा संघ स्थापून त्यांच्या साह्याने माहिष्मतीच्या हैहयांचा निःपात केला. दुसरा अर्थ असाही दिसतो, की परशुरामाने एकवीस राजसत्तांशी लढाया केल्या किंवा एकवीसवेळा क्षत्रियांशी युद्धे करून ती जिंकली. नंतर त्याने या पापाच्या निष्कृतीकरिता सर्व पृथ्वी कश्यपाला दान दिली आणि स्वतःच्या निवासार्थ कोकण येथे लोकवस्ती केली. परशुरामाला राम आणि पांडव यांचाही समकालीन मानणाऱ्या कथा आहेत. त्यांत कालविपर्यासाचा महान दोष आहे.
या काळात हैहयांचे वर्चस्व होते. हैहय नृपती कृतवीर्य व त्याचा पुत्र सहस्रार्जुन यांनी अनूप देश जिंकून हैहयांची सत्ता वाढविली आणि माहिष्मती राजधानी केली. अर्जुनाला हजार बाहू होते आणि त्यांच्या योगे तो नर्मदा नदीचा प्रवाह अडवू शकत असे, अशी कथा आहे. तिचे तात्पर्य हे असावे की त्याची हजार वल्हे असलेली जहाजे होती आणि त्यांच्या योगे तो पश्चिमेच्या बंदरांतून परदेशांशी असलेला व्यापार आपल्या ताब्यात ठेवत असे.
सहस्रार्जुन हा विद्वान, न्यायी आणि दानशूर होता. त्याची पुराणादिकांत स्तुती केली आहे. भार्गवांशी त्याचे वर्तन मात्र अन्यायाचे होते आणि त्याबद्दल त्याला जबर किंमत द्यावी लागली.
हैहायांच्या वीतिहोत्र, शार्यात, भोज, अवन्ती व कुण्डिकेर अशा पाच शाखा होत्या. हैहयांची कान्यकुब्ज, कोसल, काशी इ. उत्तरेच्या प्रदेशांतील राज्ये जिंकली होती. कोसल, काशी इ. उत्तरेच्या प्रदेशांतील राज्ये जिंकली होती. कोसल देशचा राजा बाहू याला राज्य सोडून और्व ऋषीच्या आश्रमात आश्रय घ्यावा लागला. तेथे त्याचा पुत्र सगर हा जन्मला, हा पुढे सूर्यवंशातील विख्यात राजा झाला.
सोमवंशाच्या इतर शाखांनीही या काळात आपापल्या राज्यांचा विस्तार केला. यादव नृपती विदर्भ याने नर्मदेच्या दक्षिण दिशेचा प्रदेश जिंकून त्याला आपले नाव दिले. तो देश पुढे त्याचे पुत्र क्रथ व कैशिक यांमध्ये विभक्त झाला आणि नंतर त्याप्रदेशाला क्रथकैशिक हे नाव पडले.
पूर्वेकडच्या अनुवंशातील बली राजाच्या अंग, वंग, कलिंग, पुण्ड्र आणि सुह्म या पाच पुत्रांत पूर्वेकडचे देश विभागले गेले. अंगाचे राज्य भागलपूरच्या सभोवतालच्या प्रदेशावर होते. वंगाच्या ताब्यात डाक्का आणि चितगाँग हे प्रदेश होते. उत्तर बंगालवर पुण्ड्र आणि बरद्वान विभागावर सुह्म राज्य करीत होते. कलिंगाचा अंमल ओरिसावर होता. पुढे या राजांची नावे त्या त्या प्रदेशांना मिळाली.
कान्यकुब्जावर पुरुकुत्साचा वंशज गाधी राज्य करू लागला. त्याचा पुत्र विश्वामित्र याचा वसिष्ठाशी असलेला कलह वैदिक सूक्तांवरूनही दिसतो. त्याच्याविषयी विविध कथा प्रचलित आहेत. त्यांमध्ये कालविपर्यासाचा दोष स्पष्ट दिसतो.
काशी—येथे प्रतर्दन आणि वत्स राज्य करीत होते. वत्साने प्रयागजवळची कौशाम्बी जिंकून त्या प्रदेशाला आपले नाव दिले.
सूर्यवंश : या काळात अयोध्येस सत्यव्रत-त्रिशंकू, हरिश्चंद्र आणि सगर हे विख्यात सूर्यवंशी राजे होऊन गेले. त्रिशंकूला दुर्वर्तनामुळे त्याच्या पित्याने हद्दपार केले होते. अरण्यात असताना त्याने एका दुष्काळात तपश्चर्येला गेलेल्या विश्वामित्राच्या कुटुंबाला आश्रय दिला, म्हणून कृतज्ञतेने विश्वामित्राने त्याला अयोध्येच्या गादीवर बसविले. त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र हा आपल्या सत्यवादित्वाबद्दल प्रसिद्ध होता. त्याची परीक्षा पाहण्याकरिता विश्वामित्राने त्याला छळल्याची कथा प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्रानंतर सहाव्या पिढीतील सगर याला त्याच्या सावत्र मातेने विषप्रयोग केल्यामुळे तो विषयुक्त अवस्थेत जन्माला आला. म्हणून त्याला स-गर नाव पडले. और्व ऋषीने त्याला शस्त्रास्त्रांत प्रवीण केल्यावर त्याने हैहयांच्या प्रदेशावर स्वारी करून और्व वंशावर त्यांनी केलेल्या अत्याचारांचा सूड घेतला. सगराने स्वकालीन सर्व राजांना जिंकून चक्रवर्ती ही पदवी धारण केली.
वैशाली-येथील करंघमाचा पुत्र अवीक्षित. त्याचा मुलगा आवीक्षित मरुत्त राजा. याची गणना भारताच्या सोळा सार्वभौम राजांमध्ये होते. त्याने अनेक यज्ञ केले. त्यांतील सर्व भांडी सोन्याची असत. हा कामप्रचा पुत्र म्हणून याला कामप्री असेही म्हणत. याच्या यज्ञांत सर्व देव जातीने उपस्थित राहत, असे ऐतरेय ब्राह्मणात (८, २१) म्हटले आहे. तो मंत्र महाराष्ट्रात मंत्रपुष्पाच्या प्रसंगी म्हणण्यात येतो.
या काळातीस परशुराम आणि सगर यांच्या स्वाऱ्यांमुळे उत्तरेतील पौरव, कान्यकुब्ज, द्रुह्यू आणि अनुवंश यांची राज्ये नष्ट झाली. यांमुळे कदाचित परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केल्याची परंपरागत कथा प्रचलित झाली असावी.
(५) रामचंद्र काळ : सूर्यवंश—या काळात सगराचा नातू भगीरथ हा चक्रवर्ती सम्राट उदयास आला. त्याने कालवे खणून गंगेच्या प्रवाहाची दिशा बदलविली आणि तो भारतात आणला असे दिसते. म्हणून त्या नदीला भगीरथी हे नाव पडले.
भगीरथाचा चौथा वंशज ऋतुपर्ण. याचे नाव नल-दमयंती कथेत येते. त्याचा पुत्र सुदास (हा दाशराज्ञ युद्धात गाजलेल्या सुदासहून भिन्न होता). सुदासाचा पुत्र मित्रसह याने चुकीने वशिष्ठास नरमांस भोजनात घातल्यामुळे त्याने त्याला राक्षस होशील, असा शाप दिला. आपला अपराध नसताना आपणास शाप दिलेला पाहून मित्रसहाने वसिष्ठास शाप देण्याकरिता हातात उदक घेतले पण त्याच्या राणीने मध्यस्थी केल्यावर त्याने ते आपल्या पायावर टाकले. तेव्हा त्याचे पाय काळे झाले आणि त्याला कल्माषपाद असे नाव पडले. या सौदास मित्रसहाचा वेदकालीन सुदासशी घोटाळा होऊन पिजवनपुत्र सुदास याचा अविनयामुळे नाश झाला, अशी समजूत मनुस्मृतीत (७, ४१) प्रचलित झाली.
कल्माषपादाला अश्मक नावाचा पुत्र झाला. त्याने दक्षिणेत गोदावरीतीरी आपल्या नावे प्रदेश वसवून तेथे राज्य केले. त्याची राजधानी पौदन्य (बोधन) ही होती. त्याचा पुत्र मूलक यानेही आपल्या नावाने पुढे प्रसिद्ध झालेल्या प्रदेशावर राज्य केले. त्याची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) होती.
कल्माषपादानंतर सहा-सात पिढ्यांनी दिलीप नावाचा विख्यात राजा झाला. त्याच्या राजवटीचे सुंदर वर्णन कालिदासाने आपल्या रघुवंशाच्या आरंभी केले आहे. त्याचा पुत्र रघू त्याच्यापेक्षाही थोर निघाला. त्याने सर्व भारत जिंकल्यावर विश्वजित् यागकेला आणि त्यात आपली सर्व संपत्ती दान केली. पुढे त्याच्या नावाने या वंशाला रघुवंश असे नाव पडले. रघूचा पुत्र अज याने विदर्भ राज्यकन्या इंदुमतीशी विवाह केला. त्यांना दशरथ नावाचा पुत्र झाला. यानेही अनेक देशांवर स्वाऱ्या करून विजय मिळविले तथापि याला सभोवतालची राज्ये खालसा करता आली नसावी कारण त्याच्या राज्याच्या पूर्वेस विदेह व अंग, दक्षिणेस काशी आणि वत्स आणि पश्चिमेस उत्तर आणि दक्षिण पंचाल, तसेच मध्य देशात यादव ही राज्ये त्या काळी अस्तित्वात होती.
दशरथाला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा तीन राण्या होत्या. त्याने पुत्रकामेष्टि-यज्ञ केल्यावर कौसल्येस राम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे पुत्र झाले. विदेहात सीरध्वज जनक हा थोर तत्त्वज्ञ राजा राज्य करीत होता. त्याने सांकश्याचा राजा सुधन्वन् याला जिंकून तेथे आपला भाऊ कुशध्वज याची स्थापना केली. जनकाच्या सीता आणि उर्मिला या कन्यांचा विवाह अनुक्रमे उत्तर कोसल देशाच्या राम व लक्ष्मण यांच्याशी झाला आणि कुशध्वजाच्याकन्या मांडवी व श्रुतकीर्ती यांचा विवाह भरत व शत्रुघ्न यांच्याशी झाला. कैकेयीने रामाच्या यौवराज्याभिषेकाच्या प्रसंगी दशरथाने पूर्वी दिलेल्या वरांनी राम, सीता आणि लक्ष्मण यांना चौदा वर्षे वनवास व भरताला अयोध्येचे राज्य मागितले. तेव्हा पुत्रशोकाने दशरथाचा अंत झाला.
रामाने लक्ष्मण व सीता यांसह दंडकारण्यातील ऋषींच्या आश्रमांत दहा वर्षे घालवून नंतर दक्षिणेत अगस्त्याश्रमाजवळ पंचवटी येथे काही काळ वास्तव्य केले. तेथे त्याने ऋषींना त्रास देणाऱ्या अनेक राक्षसांचा संहार केला. तेथून रावणाने कपटाने सीतेचे हरण केल्यावर तिच्या शोधार्थ राम आणि लक्ष्मण दक्षिणेकडे गेले. पंपा सरोवर व ऋष्यमूक पर्वताजवळ त्यास सुग्रीव भेटला. त्याच्याशी मैत्री करून रामाने वालीला मारून सुग्रीवाला त्याच्या गादीवर बसविले. पुढे त्याने वानरांच्या साहाय्याने लंकेवर स्वारी केली आणि रावणाला युद्धात ठार करून बिभीषणाला त्याचे राज्य दिले. नंतर त्याने सीतेसह अयोध्येस परत येऊन दीर्घकाल राज्य केले.
लोकापवादास्तव टाकलेल्या सीतेला वाल्मीकीच्या आश्रमात कुश व लव असे दोन पुत्र झाले. रामाच्या आदर्श राज्यव्यवस्थेमुळे उत्कृष्ट कारभाराची निदर्शक रामराज्य हीसंज्ञा प्रचलित झाली. रामाच्या लोकोत्तर गुणांमुळे त्याला पुढे विष्णूचा अवतार मानण्यात आले.
निजधामास जाण्यापूर्वी रामाने आपल्या साम्राज्याची वाटणी स्वतःच्या आणि भावांच्या पुत्रांमध्ये केली. त्याने कुशाला दक्षिण कोसल (छत्तीसगढ) चे राज्य दिले पण नंतरकुशाने अयोध्येस आपली राजधानी नेली. लव कोसलच्या उत्तर भागावर राज्य करू लागला. त्याची राजधानी श्रावस्ती (सहेत-महेत) येथे होती. लक्ष्मणाच्या अंगद आणि चंद्रकेतू या पुत्रांना हिमालयाच्या पायथ्याशी दोन देश दिले. भरताच्या तक्ष आणि पुष्कर या पुत्रांनी वायव्य प्रांतात तक्षशिला आणि पुष्करवती (पुष्कलावती) ही नगरे स्थापून तेथे आपल्या राजधान्या केल्या. शत्रुघ्न याने लवण या यादव राजाचा निःपात केल्यावर मधुपुरी (मथुरा) येथे त्याच्या सुबाहुनामक पुत्राची राजधानी स्थापिली पण ही सर्व राज्ये नंतर थोड्याच काळाने नाहीशी झाली.
सोमवंश : पौरव-सगरानंतर काही पिढ्यांनी दुष्यन्त झाला. त्याच्या काळी पूरू आणि तुर्वश हे वंश एक झाले. कण्वाने जन्मापासून बाळगलेल्या विश्वामित्र-मेनका कन्या शकुंतला हिच्याशी त्याने गांधर्व विवाह केला. त्यांचा पुत्र भरत हा बालपणीही व्याघ्र-सिंहादी हिंस्र पशूंशी निर्भयपणे खेळत असे. म्हणून त्याला सर्वदमन असे नाव पडले. त्याने गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या काठी अनेक यज्ञ केले. तो चक्रवर्ती राजा होता. त्याच्या नावाने पौरव वंशाला आणि देशालाही भारत हे नाव पडले. त्याने आपली राजधानी प्रयागजवळच्या प्रतिष्ठानहून उत्तरेत नेली. त्या नगराला त्याच्या हस्तिनामक वंशजाच्या नावावरून हस्तिनापूर से नाव पडले. पुढे त्याच्या नील आणि बृहद्वसू या वंशजांनी अनुक्रमे उत्तर आणि दक्षिण पंचाल देशांवर राज्य केले.
यादव : विदर्भात भीमरथ राजा राज्य करीत होता. त्याने आपली कन्या दमयंती उत्तरेतील निषध देशाच्या नलराजास दिली.
याच काळात विदेहात लोमपाद राजा राज्य करीत होता. त्याने दशरथाची शांतानामक कन्या दत्तक घेतली होती. त्याचा पणतू चम्प याने अंगदेशाच्या मालिनी नगरीला आपले नाव (चम्पा) देऊन तेथे राज्य केले. जवळच्या काशी देशात अलर्क नावाचा विख्यात राजा होऊन गेला. त्याने अनेक राक्षसांना पराजित करून काशी येथे राज्य केले. प्राचीन काळच्या श्रेष्ठ राजांत त्याचीगणना होते.
(६) कृष्ण काळ : रामाच्या अभिषेकापासून द्वापर युगाला आरंभ होतो आणि भारतीय युद्धानंतर त्याचा शेवट होतो. या काळात पंचाल, पौरव आणि यादव हे तीन राजवंश मुख्य होते.
पंचाल : उत्तर पंचालात अहिच्छत्र (रामनगर) येथे द्रुपद राज्य करीत होता. त्याचा गुरुबंधू द्रोण याने आपल्या कौरव-पांडव शिष्यांकरवी द्रुपदाचा पराभव करविला. नंतर द्रोणाने द्रुपदाला दक्षिण पंचाल (राजधानी कांपिल्य) चे राज्य दिले. या अपमानाचा सूड घेण्याकरिता द्रुपदाने तपश्चर्या केली. तेव्हा त्याला द्रोणाचा संहारकर्ता धृष्टद्युम्न हा पुत्र आणि द्रौपदी ही कन्या झाली. द्रौपदी पांडवांची पत्नी झाली. धृष्टद्युम्न भारतीय युद्धानंतर अश्वत्थाम्याकडून मारला गेला.
या वंशात पुढे ब्रह्मदत्तनामक सुप्रसिद्ध राजा झाला. त्याने ऋग्वेद आणि अथर्ववेद यांचा क्रमपाठ केला. त्याचा मंत्री कण्डरिक यांने सामवेदाचा क्रमपाठ तयार केला.
पौरव : या वंशात कुरुनामक विख्यात राजा या काळात झाला. त्याच्या नावावरून हा वंश पुढे कौरव या नावाने प्रसिद्ध झाला. कुरुक्षेत्र आणि कुरुजांगल या प्रदेशांनाही याचीच नावे मिळाली. याने अनेक यज्ञ केल्यामुळे कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्ध पावले.
पुढे याच्या वंशात प्रतीपनामक प्रसिद्ध राजा होऊन गेला, त्याला देवापी, बाल्हीक आणि शंतनू असे तीन पुत्र होते. देवापी कुष्टरोगपीडित असल्यामुळे गादीवर बसण्यास अयोग्य ठरला आणि बाल्हीकाने आपला हक्क सोडला. म्हणून शंतनूला राज्य मिळाले. शंतनूने प्रथम गंगेशी विवाह केला. तिच्यापासून त्याला देवव्रत हा पुत्र झाला. आपल्या पित्याला सत्यवती या सुंदर घीरवरकन्येशी विवाह करता यावा, म्हणून देवव्रताने आमरण ब्रह्मचारी राहण्याची घोर प्रतिज्ञा केली. तिजवरून त्याला भीष्म असे नाव पडले.
शंतनूला सत्यवतीपासून चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे दोन पुत्र झाले. चित्रांगद गंधर्वांशी लढताना मारला गेला आणि विचित्रवीर्य तरुणपणीच निधन पावला. तेव्हा भीष्माने त्याच्या राण्यांच्या ठिकाणी पराशरपुत्र व्यासाच्या द्वारे नियोगपद्धतीने धृतराष्ट्र आणि पांडू हे पुत्र उत्पन्न करविले. विचित्रवीर्याचा पुत्र असा धृतराष्ट्राचा उल्लेख काठक संहितेत (१०,६) आला आहे. तो जन्मांध होता. म्हणून पांडूला राज्य मिळाले. धृतराष्ट्राला गंधार राजकन्या गांधारीपासून दुर्योधन, दुःशासन इ. शंभर पुत्र झाले. पांडूला यादवनृपती कुन्तिभोजाची दत्तक घेतलेली कन्या कुंती हिच्यापासून युद्धिष्ठिर, भीम आणि अर्जुन तसेच बाल्हीकनृपती शल्य याची बहीण माद्री हिच्यापासून नकुल आणि सहदेव असे पाच पुत्र झाले. पांडूने पूर्व दिशेस स्वाऱ्या करून दशार्ण, मिथिला, काशी, सुह्य इ. देशांच्या राज्यांवर विजय मिळविले पण मृगया करीत असता त्याने एका ऋषीला मारले, म्हणून तो तारुण्यातच मृत्यू पावला आणि त्याची धाकटी राणी माद्री त्याच्या बरोबर सती गेली. नंतर कुंती हस्तिनापुरास आली. तेव्हा धृतराष्ट्रास गादी मिळाली. त्याने युधिष्ठिरास यौवराज्यपद दिले. भीष्म राज्यकारभार पाहू लागला. त्यानंतर धृतराष्ट्राच्या पुत्रांचे कौरव आणि पांडूच्या पुत्रांचे पांडव हे नाव रूढ झाले.
कौरव-पांडवांना कृप आणि द्रोण यांनी धनुर्विद्येचे शिक्षण दिले. भीम आणि दुर्योधन हे गदायुद्धात निष्णात झाले. अर्जुन धनुर्विद्येत सर्वश्रेष्ठ होता. कुंतीने कन्यावस्थेत झालेला पुत्र कर्ण याला टाकून दिल्यावर अधिरथ नावाच्या सूताने त्याला वाढविले होते. त्याचा दुर्योधनाशी स्नेह जमल्यामुळे त्याचेही कौरव-पांडवांबरोबर धनुर्विद्येत शिक्षण झाले होते. तो त्या विद्येत निष्णात झाल्यावर अर्जुनाचा मत्सर करू लागला.
कौरव पांडवांचा द्वेष करीत. त्यांनी त्यांचा नाना प्रकारांनी घात करण्याचे प्रयत्न केले पण त्यातून सहीसलामत निसटून पांडव ब्राह्मण वेषाने काम्पिल्य नगरीत द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी हजर राहिले. अर्जुनाने मत्स्यवेध करून द्रौपदी मिळविली पण कुंतीच्या आज्ञेने तिचे पाचही पांडवांशी लग्न झाले.
नंतर धृतराष्ट्राने पांडवांना बोलावून त्यांना खांडवप्रस्थ हा ओसाड प्रदेश राजधानीकरिता दिला. तेथील नागांचा संहार करून पांडवांनी इंद्रप्रस्थ येथे आपली राजधानी केली. युधिष्ठिराने राजसूय यज्ञास आरंभ केला, तेव्हा त्याच्या चारही बंधूंनी चारी दिशांवर आक्रमण करून तेथील राजांचा पराभव केला आणि त्यांच्याकडून खंडणी घेतली. मगधाचा राजा जरासंध त्या वेळी अत्यंत बलाढ्यझाला होता. त्याला भीमाने मल्लयुद्धात ठार मारले. नंतर सर्व राजांस इंद्रप्रस्थास, बोलावून पांडवांनी राजसूय यज्ञाची समाप्ती केली. त्या प्रसंगी कृष्णाला अग्रपूजेचा मान देण्यास चेदिराजा शिशुपाल याने आक्षेप घेतला आणि तो कृष्णास अनेक दुरुतरे बोलला. तेव्हा कृष्णाने त्याला ठार केले.
पांडवांच्या ऐश्वर्याने मत्सरग्रस्त होऊन कौरवांनी त्यांना द्यूताचे आमंत्रण दिले. तत्कालीन क्षत्रियांच्यां आचारधर्मास अनुसरून युधिष्ठिरास ते स्वीकारावे लागले. आपला मामा शकुनी याच्या साहाय्याने कौरवांनी पांडवांना कपटाने जिंकले. नंतर पांडवास द्यूतातल्या पणाप्रमाणे बारा वर्षे वनवासात आणि एक वर्ष अज्ञातवासात काढावे लागले. द्रौपदीही त्यांच्याबरोबर होती. त्या सर्वांनी अज्ञातवासाचे वर्ष वेष पालटून मत्स्य देशाचा राजा विराट याच्या सेवेत विविध प्रकारची कामे करीत घालविले. नंतर अर्जुनपुत्र अभिमन्यू याचा विवाह विराटाची कन्या उत्तरा हिच्याशी झाला.
अज्ञातवासानंतर पांडवांना अर्धे राज्य देण्याचा प्रश्न उपस्थित झाला. त्याकरिता कृष्णाने स्वतः कौरवांकडे जाऊन शिष्टाई केली पण दुर्योधन सुईच्या अग्राइतकीही जमीन देण्यास राजी न झाल्याने कौरव-पांडवांचे युद्ध अटळ झाले. त्याचे वर्णन करण्यापूर्वी तत्कालीन प्रमुख राजवंशांची माहिती देणे आवश्यक आहे.
यादव : यादवनृपती भीम सात्वत याला भजमान, देवावृध, अन्धक आणि वृष्णी असे चार पुत्र झाले. त्यांपैकी शेवटच्या दोघांचे वंश पुढे विशेष प्रसिद्ध पावले. अन्धक मथुरेस राज्य करू लागला. त्याला भजमान आणि कुकुर असे दोन पुत्र झाले. कुकुराला मथुरेची गादी मिळाली. भजमानाचे वंशज जवळच्या प्रदेशावर राज्य करू लागले. त्यांना अन्घक असे नाव मिळाले. वृष्णीच्या वंशात सात्यकी आणि युयुधान हे पुढे भारतीय युद्धाच्या काळी प्रसिद्धीस आले.
कुकुराच्या वंशातील आहुकाला देवक, उग्रसेन इ. नऊ पुत्र झाले, देवकाची कन्या देवकी हिचा यादवांच्या दुसऱ्या शाखेतील वसुदेवाशी विवाह झाला. उग्रसेनाचा पुत्र कंस याने मथुरेची गादी बळकावून आपल्या पित्याला तसेच वसुदेव-देवकीला कारागृहात टाकले. त्याने देवकीच्या सात पुत्रांचीही जन्मल्याबरोबर हत्या केली पण आठवा पुत्र कृष्ण ह्याला गुप्तपणे गोकुळात पोहोचविण्यात आले. पुढे कृष्ण व त्याचा बंधू बलराम यांनी आपला विविध उपायांनी नाश करू पाहणाऱ्या जुलमी कंसाला ठार मारले. उग्रसेनाला गादीवर बसविले आणि आपल्या माता-पित्यांची कारागृहातून सुटका केली.
मगधचा राजा जरासंघ यांची कन्या कंसाला दिली होती. कंसवधाचा सूड घेण्याकरिता जरासंधाने मथुरेवर अनेकवार आक्रमणे केली. यादवांनी त्याचे हल्ले परतविले पण शेवटी त्यांनी सौराष्ट्रात द्वारका येथे स्थलांतर करून तेथे आपले राज्य स्थापिले. कृष्णाने पांडवांना विविध प्रसंगी बहुमोल साहाय्य केले. त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागल्यामुळे पांडवांना अनेक संकटांतून पार पडता आले. त्याने भारतीय युद्धात दुर्योधनाने मागितेलेली आपली सेना दिली पण अर्जुनाचे सारथ्य पतकरून त्याला विविध प्रसंगी साहाय्य केले. भारतीय युद्धाच्या आरंभी अर्जुनाचा मोह घालविण्याकरिता त्याने केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता हा हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा प्रमुख ग्रंथ झाला आहे.
कृष्णाने अभिमन्युपुत्र परीक्षित याला अश्वत्थाम्याच्या अस्त्रापासून वाचविले. पुढे त्याने युधिष्ठिराच्या अश्वमेध प्रसंगी साह्य केले. नंतर काही काळाने द्वारकेच्या यादवांत अंतःकलह उद्भवून त्यात त्या सर्वांचा नाश झाला. नंतर एका अरण्यात जाऊन कृष्ण ध्यानस्थ बसला असता दुरून एका व्याधाने त्याला हरिण समजून मारलेल्या बाणाने तो निजधामास गेला. कृष्णाच्या विविध नेत्रदीपक कामगिरीमुळे आणि त्याच्या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानामुळे त्याला सर्व भारतीयांच्या हृदयांत अत्यंत प्रेमपूर्ण आदराचे स्थान प्राप्त झाले आणि कालांतराने भगवान विष्णूच्या अवतारांत त्याची गणना झाली. कुंतीला विवाहापूर्वी झालेला पुत्र कर्ण याने कौरवांशी एकनिष्ठ राहून त्यांना साहाय्य केले. म्हणून दुर्योधनाने त्याला अंग देशाचे राजपद दिले. त्याला वृषसेनादी सहा पुत्र झाले होते पण कर्णाप्रमाणे ते सर्व भारतीय युद्धात मारले गेले.
सूर्यवंश : अयोध्येचे इक्ष्वाकुवंशी राजे या काळात चमकले नाहीत. कोसल देशाचा राजा हिरण्यनाभ याने जैमिनीपासून योगाचे ज्ञान प्राप्त करून घेतल्याचा उल्लेख आहे. भारतीय युद्धाच्या काळी अध्योध्येस बृहद्बल राजा राज्य करीत होता. त्याचा पराभव कर्णाने करून त्याला कौरवांचा मांडलिक बनविले होते. तो पुढे कौरवांच्या बाजूने भारतीय युद्धात लढला आणि मारला गेला.
भारतीय युद्ध किंवा ⇨ कुरुयुद्ध शिष्टाईस गेलेल्या कृष्णाचे न ऐकता दुर्योधनाने सुईच्या अग्रावर राहील इतकीही भूमी पांडवांना देण्याचे नाकारल्यावर कृष्णाने तेथेच (अमान्त) कार्त्तिक अमावास्येला युद्ध सुरू होईल अशी घोषणा केली.
त्यापूर्वीच दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजूच्या राजांना सैन्यासह येण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे कौरवांच्या बाजूने अकरा आणि पांडवांच्या बाजूने सात अक्षौहिणी सैन्य जमा झाले. कृष्णाने आपली सेना कौरवांस देऊन स्वतः अर्जुनाचे सारथ्य पतकरले होते. बलराम पुष्य नक्षत्री (कार्त्तिक कृ. ७) युद्ध सुरू व्हावयाच्या अगोदरच तीर्थयात्रेस निघून गेला होता.
प्रत्यक्ष युद्ध अठरा दिवस झाले पण ते एक दिवसाआड होत असे, असे प्रा. ग. वा. कवीश्वर यांनी दाखविले आहे. असे मानले तर महाभारतातील युद्धविषयक बहुतेक सर्व तिथ्या जमतात, असे ते म्हणतात.
कार्त्तिक अमावास्येला चित्र नक्षत्री युद्धाला आरंभ झाला. प्रथम कौरव सेनेचे आधिपत्य भीष्माकडे होते. पाडवांचा सेनापती धृष्टद्युम्न होता. युद्धाला आरंभ होण्यापूर्वी अर्जुनाला उपरती होऊन त्याने स्वजनांची हत्या करण्याचे नाकारले, तेव्हा कृष्णाने त्याला भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोगाचा उपदेश करून युद्धाला प्रवृत्त केले.
पहिले दहा दिवस भीष्माने कौरव सेनेचे अधिपत्य केले. दहाव्या दिवशी (प्रथम स्त्री असून नंतर पुरुषत्व पावलेल्या) शिखंडीच्या आडून बाण मारून अर्जुनाने भीष्माला घायाळ केले, तेव्हा तो रणांगणांवरच शरपंजरी पडला. नंतर द्रोणाला सेनाधिपत्याचा अभिषेक झाला. त्याने पुढे पाच दिवस युद्ध चालविले. तेराव्या दिवशी कौरव सेनेचा चक्रव्यूह भेदून आत शिरलेल्या अभिमन्यूला अनेक योध्यांनी घेरून ठार केले. नंतर जयद्रथाने त्याला लत्ताप्रहार केला. त्याचा सूड अर्जुनाने दुसऱ्याच दिवशी सूर्यास्तापूर्वी घेतला. त्या रात्री घटोत्कचाने कौरव सेनेत धुमाकूळ मांडला. तेव्हा कर्णाने इंद्रापासून मिळालेल्या शक्तीने त्याला ठार केले. युद्धाच्या पंधराव्या दिवशी द्रोणाने द्रुपद आणि विराट यांना मारले. त्याच दिवशी सायंकाळी अश्वत्थामा मेला, या चुकीच्या वार्तेने दुःखमग्न झालेल्या द्रोणाचा शिरच्छेद धृष्टद्युम्नाने केला नंतर कर्णाला कौरवांचा सेनापती नेमले. त्याने पुढे दोन दिवस युद्ध चालविले. या अवधीत भीमाने दुःशासनाची छाती फाडून आतील रक्त प्राशन केले आणि अशा रीतीने त्याने केलेल्या द्रौपदीच्या अपमानाचा सूड घेतला. युद्धाच्या सतराव्या दिवशी जमिनीत घुसलेले आपल्या रथाचे चाक वर काढीत असता कर्णाला अर्जुनाने ठार केले. नंतर शल्य कौरवांचा सेनापती झाला. युद्धाच्या अठराव्या दिवशी मध्यान्ही युधिष्ठिराने त्याचा वध केल्यावर कौरव सैन्याने रणांगणातून पळ काढला. दुर्योधनानेही एका तळ्यात जलस्तंभन विद्येने आश्रय घेतला. पांडवांनी त्याचा शोध लावल्यावर लागलीच दुसऱ्या दिवशी (पौष शु. ५, श्रवण नक्षत्री) भीमाने गदायुद्धात मांडी फोडून त्याला घायाळ केले. त्या वेळी ४२ दिवसांची तीर्थयात्रा संपवून बलराम तेथे आला होता. त्याने धर्मयुद्धाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भीमाची कानउघाडणी करून तेथून प्रयाण केले.
पांडवांनी ती रात्र शिबिरापासून दूर नदीच्या काठी घालविली. कौरवांपैकी अश्वत्थामा, कृप आणि कृतवर्मा हे तिघेच जिवंत राहिले. भीमाच्या गदाप्रहाराने घायाळ झालेल्या दुर्योधनाची गाठ घेऊन त्यांनी त्या रात्री पांडवांचा निःपात करण्याचा कट केला आणि पांडवसेनेतील अवशिष्ट राहिलेल्या सर्वांचा निर्घृणतेने खून केला. पाच पांडव, सात्यकी आणि द्रौपदी मात्र त्या शिबिरात नसल्यामुळे वाचले. नंतर लागलीच अश्वत्थमादिकांनी दुर्योधनाला त्या भीषण कत्तलीची वार्ता सांगितल्याने त्याने सुखाने प्राण सोडला.
या युद्धांत भारतीय राजांची एक पिढी नष्ट झाली. नंतर युधिष्ठिर हस्तिनापूरच्या गादीवर बसला. त्याने अश्वमेध यज्ञ केला. द्वारकेच्या यादवांचा अन्तःकलहाने नाश झाला आणि कृष्ण निजधामास गेला. तेव्हां अर्जुनाने यादवांच्या स्त्रियांस आणि यादव वंशाचा अवशिष्ट अंकुर वज्र यास हस्तिनापुरास आणले. पुढे युधिष्ठिराने त्याला मथुरेचा राजा केले.
नंतर लौकरच अर्जुनपौत्र परीक्षित याला गादीवर बसवून पांडव व द्रौपदी महाभिप्रयाणास निघाली. परीक्षितच्या कारकीर्दीपासून कलियुगाच्या वंशावळीस आरंभ होतो. काही वंशावळी परीक्षितानंतर चौथ्या पिढीतील अधिसीमकृष्णापासून सुरू होतात.
(७) परीक्षितपासून बार्हद्रथ वंशाअखेर: भारतीय युद्धानंतर सु. ९०० वर्षांच्या काळाचा इतिहास फारच त्रोटक रीतीने पुराणांत आला आहे. या काळाच्या अखेरीच्या इतिहासाचे आणखी एक साधन बौद्ध वाङ्मय हे आहे ते पुराणांपेक्षा जास्त विश्वसनीय वाटते पण त्यातील उल्लेख त्रोटक आहेत. तथापि जेव्हा पुराणातील विधानांशी त्यांचा विरोध येतो, तेव्हा त्यांचा पुरावा ग्राह्य धरण्यात येतो.
पौरव : अभिमन्युपुत्र परीक्षित याच्या अंमलाखाली सरस्वती ते गंगा नदीपर्यंतचा भाग होता. एकदा तो मृगया करीत असता वाट चुकून एका ऋषीच्या आश्रमात गेला. त्याने त्या ऋषीला माहिती विचारली पण त्याने मौनव्रत पाळत असल्यामुळे उत्तर दिले नाही. तेव्हां त्याने त्या ऋषीच्या गळ्यात एक मृत सर्प घालून प्रयाण केले. तेव्हा ऋषीने तुला सर्पदंशाने मृत्यू येईल असा शाप दिला. त्याप्रमाणे घडून आले. नंतर त्याचा पुत्र जनमेजय याने तक्षशिला येथे सर्पसत्र आरंभले. त्यांत हजारो सर्पांचा नाश झाल्यावर आस्तीक ऋषीच्या मध्यस्थीने ते समाप्त झाले, अशी कथा महाभारतात आली आहे. या कथेचे तात्पर्य असे दिसते की युधिष्ठिराच्या महाभिप्रयाणानंतर पौरवांची सत्ता दुर्बल झाल्याचे पाहून नाग लोकांनी हस्तिनापुरावर आक्रमण करून परिक्षिताला ठार मारले पण नंतर त्याचा पुत्र जनमेजय याने वायव्येकडील तक्षशिलेपर्यंतचा प्रदेश जिंकून नागांचा संहार केला. तक्षशिला येथे वैशंपायनाने जनमेजयाला आपला भारत ग्रंथ वाचून दाखविला.
जनमेजयाचा बंधू कक्षसेन याने इंद्रप्रस्थ येथे निराळे राज्य स्थापिलेहोते. त्याचा पुत्र अभिप्रतारिन् याने खांडव प्रदेशात यज्ञ केल्याचा उल्लेख पंचविंश ब्राह्मणात येतो. याचे वंशज अभप्रतारिण पुढे प्रबळ झाले.
जनमेजयाचा पुत्र शतानीक आणि त्याचा पौत्र अधिसीमकृष्ण यांनी हस्तिनापुरी राज्य केले. अधिसीमकृष्णाच्या कारकीर्दीत नैमिषारण्यातील द्वादशवार्षिक सत्रात सूताने शौनकाला महाभारत आणि पुराणे वाचून दाखविली, अशी परंपरागत कथा आहे.
अधिसीमकृष्णाचा पुत्र निचक्षु याच्या कारकीर्दीत अन्तर्वेदीत भयंकर पूर येऊन हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले. तेव्हा पौरवांना आपली राजधानी वत्स देशातील कौशाम्बी (प्रयागजवळचे कोसम) येथे हलावावी लागली. पुढे या वंशांतील शेवटचा राजा क्षेमकपर्यंत तेवीस पिढ्या झाल्या. त्यांमध्ये शतानीकाचा पुत्र उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. उज्जयिनीच्या प्रद्योताची कन्या वासवदत्ता आणि उदयन यांच्या प्रणयकथेवर अनेक संस्कृत नाटके रचली गेली आहेत.
कोसल: भारतीय युद्धात मारला गेलेला बृहद्बल याचा सहावा वंशज दिवाकर अधिसीमकृष्णाचा समकालीन होता. पुराणातील या राजांच्या वंशावळीत शाक्य, शुद्धोदन आणि सिद्धार्थ यांनाही गोवण्यात आले आहे पण ते चूक आहे. या काळात या वंशाची राजधानी अयोध्येजवळ साकेत आणि नंतर श्रावस्ती (सहेत-महेत) येथे होती. या राजांची काशीच्या राजांशी अनेकदा युद्धे झाली. शेवटी त्या दोन देशांचे एकीकरण झाले. या वंशातील विख्यात महाकोसल राजाने आपली कन्या कोसलदेवी मगधच्या बिंबिसार राजाला दिली होती. महाकोसलचा पुत्र प्रसेनजित हा गौतमबुद्धाचा समकालीन होता.
मगध: जरासंधपुत्र सहदेव हा भारतीय युद्धात पांडवांच्या बाजूने लढला होता. त्यानंतर त्याचा पुत्र सोमाधी गादीवर आला. त्याचा सहावा वंशज सेनजित. हा अधिसीमकृष्णाचा समकालीन होता. सोमाधीपासून एकविसाव्या पिढीतील रिपुंजय हा बार्हद्रथ वंशातील शेवटचा राजा होय. त्याला त्याच्या मंत्र्याने ठार मारल्यावर बिंबिसारने गादी बळकावली. त्याचा पुत्र अजातशत्रू हा गौतम बुद्धाचा समकालीन होता.
अवंती: भारतीय युद्धाच्या वेळी येथे विंद आणि अनुविंद हे राजे राज्य करीत होते. त्यानंतरचा या देशाचा इतिहास अनिश्चित आहे. गौतम बुद्धाच्या वेळी उज्जयिनी येथे प्रद्योत हा बलाढ्य राजा राज्य करीत होता. त्याच्या वासवदत्ता नामक कन्येने वत्स देशाचा राजा उदयन याच्याशी प्रेमविवाह केला होता.
यांशिवाय त्या काळी काशी, अंग, कलिंग, अश्मक इ. प्रदेशांत लहान लहान राज्ये होती. त्यांच्या राजांच्या वंशावळी पुराणांत दिल्या आहेत, पण इतर माहिती फारशी मिळत नाही.
संदर्भ: 1. Majumder, R. C. Ed. Vedic Age. Bombay, 1971.
2. Pafgiter, F. E. Ancient Indian Historical Tradition, Delhi, 1962.
मिराशी, वा. वि.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..