बुंदेलखंड : मध्य भारतातील इतिहासकालीन प्रदेश. पूर्वीच्या संयुक्त प्रांतातील यमुना व गंगा नद्यांच्या दक्षिणेस तो बाधेलखंडास मिळाला असून विंध्य प्रदेशाचा पश्चिम भाग व उत्तर प्रदेशातील दक्षिणेकडील जालवन, झांशी, हमीरपूर व बांदा हे जिल्हे त्यात समाविष्ट होत. क्षेत्रफळ २९,८११.८८४ चौ.किमी. लोकसंख्या सुमारे २५,००,००० (१९४१). हा प्रदेश डोंगररांगा व जंगलाने व्याप्त असून बेटवा, धसान व केन या नद्यांमुळे तो सुपीक झाला आहे. येथे प्राचीन काळापासून वावरणाऱ्या बुंदेला ठाकूर जातीच्या नावावरून या प्रदेशाला हे नाव प्राप्त झाले असावे. बुंदेला हा शब्द एका गाहरवाड राजपुताने केलेल्या आत्मयज्ञाच्या प्रयत्नाला अनुलक्षून प्रचारात आला, असे लोकरूढी सांगते. विंध्याचल तेथील विंध्यवासिनी देवीच्या समोरील यज्ञवेदीवर पडलेल्या त्याच्या रक्तबिंदू (बुंद) पासून त्याचा मुलगा उत्पन्न झाला, म्हणून त्याच्या वंशाने बुंदेला हे नाव धारण केले, अशी दंतकथा प्रचलित आहे. याशिवाय विंध्य वा बंदी (गुलाम मुलगी) या शब्दांपासून बुंदेला हा शब्द आला असावा, असे काहींचे म्हणणे आहे.

बुंदेलखंडाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि प्रागैतिहासिक काळापासून इथे मानवी वस्ती असल्याचे अनेक पुरातत्त्वीय अवशेष उपलब्ध झाले आहेत. गुप्त साम्राज्यानंतर राजपूत राजांच्या आधिपत्याखाली हा प्रदेश होता मात्र त्यांच्या प्राचीन वंशांसंबंधी फारशी माहिती ज्ञात नाही तथापि त्यांनी बांधलेली विजयानगरसारखी सरोवरे अद्यापि प्रसिद्ध आहेत. गाहरवाड वंशानंतर प्रतीहार (८००-११००) आणि चंदेल्ल (९००-१३१५) या वंशांनी या प्रदेशावर मध्ययुगात राज्य केले. त्यांच्या कोरीव लेखांतून तत्कालीन ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. चंदेल्लांनी बुंदेलखंडात असंख्य सुंदर मंदिरे बांधून खजुराहो-महोबासारख्या राजधान्यांची स्थापना केली आणि कालिंजर, खजुराहो, महोबा आणि अजयगड यांसारखे किल्ले संरक्षणदृष्ट्या मजबूत केले. [प्रतीहार घराणे चंदेल्ल घराणे]. चंदेल्लांच्या कारकीर्दीत ⇨ पृथ्वीराज चौहान (कार. ११७७-१२०६) व ⇨ कुत्बुद्दीन ऐबक (कार. १२०६-१०) यांनी बुंदेलखंडावर स्वाऱ्या करून चंदेल्लांचा पराभव केला. चंदेल्लांमुळे या प्रदेशास जेजाकमुक्ती असेही म्हटले जाते. मुसलमानांची या प्रदेशावर पंधराव्या शतकात अनेक आक्रमणे झाली व सोळाव्या शतकापासून तो मोगल सत्तेखाली गेला. सतराव्या-अठराव्या शतकांत चंपतराय याचा मुलगा⇨ छत्रसाल बुंदेले (कार. १६६९-१७३१) याने त्याच्या कामगिरीत मराठ्यांनी विशेषतः⇨ पहिल्या बाजीरावने बहुमोल साहाय्य केले. म्हणून त्याने आपल्या मृत्यूनंतर आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा मराठ्यांना द्यावा, असे सूचित केले, त्यामुळे मराठ्यांचे बुंदेलखंडात वर्चस्व वाढले. गोविंदपंत बुंदेले, नारो शंकर, राजे बहादूर, विठ्ठल शिवदेव विंचूरकर, समशेर बहादूर व त्याचे वंशज यांनी बुंदेलखंडात आपला जम बसविला. यात पहिल्या बाजीरावाचा नातू अली बहादूर याने बुंदेला सरदारांचा पाडाव करण्याचे प्रयत्न केले. त्याचे वंशज म्हणजे बांद्याचे वंशज होत. १७९० ते १८०२ पर्यंतच्या लढायांत मराठ्यांनी बराच प्रदेश पादाक्रांत केला. बुंदेलखंडाच्या व्यवस्थेसाठी पेशव्यांनी एका अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. १८०२ च्या वसई तहानुसार पेशव्यांनी बुंदेलखंडावरील ताबा ब्रिटिशांना दिला तथापि काही मराठी सरदारांनी ही अट अमान्य करून धुमाकूळ घातला पण समशेर अली बहादूरचा मुलगा बहादूरला ब्रिटिशांनी बांद्याचा नबाब करून हा संघर्ष मिटविला आणि बुंदेलखंडाचा कारभार आपल्या हाती घेतला. पुढे तो ब्रिटिश बुंदेलखंड म्हणून ओळखण्यात येऊ लागला. या प्रदेशातील काही संस्थानिकांचा एक गट करून ब्रिटिशांनी बुंदेलखंड एजन्सी स्थापन केली. भारत स्वतंत्र होईपर्यंत या प्रदेशातील झांशी वगैरे काही भाग वगळता उर्वरित मांडलिक संस्थाने अस्तित्वात होती. नंतर ती विद्यमान मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट करण्यात आली.

देशपांडे, सु. र.