बीम्स, जॉन : (२१ जून १८३७ – २४ मे १९०२).ब्रिटिश भाषाशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म लंडनजवळील ग्रिनिच येथे झाला. सेंट जेम्स, पिकाडिली येथील रेव्हरंड टॉमस बीम्स यांचे ते सर्वात थोरले चिरंजीव. ’मर्चंट टेलर्स स्कूल’ येथे त्यांचे शिक्षण झाले. तिथे शिकत असतानाच त्यांची हिंदुस्थानातील सनदी सेवेत नेमणूक झाली. त्यांचे पुढील शिक्षण ’हेलेबरी कॉलेज’ येथे झाले (१८५६-५७). त्यावेळी त्यांना संस्कृतचे पारितोषिक आणि फार्सीचे पदक मिळाले.
१८५८ मध्ये त्यांचे भारतात आगमन झाले. सुरुवातीस मार्च १८५९ पासून १८६१ अखेरपर्यंत त्यांनी पंजाबमध्ये नोकरी केली व पुढे डिसेंबर १८६१ पासून ते निवृत्तिकाळापर्यंत (मार्च १८९३) बंगाल प्रांतात नोकरी केली. ते १८६७ मध्ये जिल्हाधिकारी व १८८१ मध्ये आयुक्त होते. दोनदा महसूल मंडळाचे सदस्यही होते. पंजाब, बंगाल व बिहार या प्रदेशांत नोकरी झाल्यामुळे बीम्स यांना हिंदी, पंजाबी, बंगाली व ओडिया या भाषांचे चांगले ज्ञान होते. त्या भाषा बोलणाऱ्या खेडुतांशी त्यांचा निकटचा संबंध आल्याने बोलीभाषेतील लकबींचा त्यांना परिचय झालेला होता.
बीम्स यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे अ कंपॅरेटिव्ह ग्रॅमर ऑफ द मॉडर्न आर्यन लॅंग्वेजीस ऑफ इंडिया : टु विट, हिंदी, पंजाबी, सिंधी, गुजराती, मराठी, ओडिया अँड बेंगॉली. ह्या ग्रंथाचे एकंदर तीन खंड असून ते अनुक्रमे १८७२, १८७५ व १८७९ या वर्षी प्रकाशित झाले (पुनर्मुद्रित आवृत्ती १९६६). पहिल्या खंडात वर्ण, दुसऱ्यात नाम व सर्वनाम आणि तिसऱ्यात क्रियापद यांचा विचार आहे. बीम्स यांनी ह्या तीन खंडात वर उल्लेखिलेल्या सात भाषांचा तुलनात्मक अभ्यास तर केला आहेच, पण तो काही अंशी ऐतिहासिक स्वरूपाचाही आहे. हा ग्रंथ लिहून बीम्स यांनी अर्वाचीन उत्तर भारतीय भाषांच्या तौलनिक भाषाशास्त्रीय अभ्यासाचा पाया घातला, असे मानले जाते.
बीम्स यांनी वरील ग्रंथांखेरीज ग्रॅमर ऑफ द बेंगॉली लॅंग्वेज (१८९१) व आउटलाइन्स ऑफ इंडियन फिलॉलॉजी (१८६७ पुनर्मुद्रित आवृत्ती १९६०) ही दोन पुस्तके लिहिली. त्यांचे इतर लेख एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ह्या संस्थेच्या प्रोसिडिंग्ज व जर्नल ऑफ लेटर्समध्ये, तसेच जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी व इंडियन अँटिकरी ह्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.
मेहेंदळे, म. अ.