बिबळा : (असन, होनी हिं, बिजा गु. बियो क. हनेमर, होनेमर, बेंगा सं. बीजक, महाकुटज, पित्तसार इं. इंडियन वा मलबार वा गम किनो ट्री लॅ. टेरोकार्पस मार्सुपियम कुल-लेग्युमिनोजी).हा सु. १०-१५ मी. (क्वचित ३० मी.) उंच व १.८-२.४ मी. घेराचा पानझडी वृक्ष सामान्यपणे श्रीलंका, पाकिस्तान, भारत इ. देशांत आढळतो. भारतात गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बंगाल, बिहार, ओरिसा, कर्नाटक, कोकण, कारवार, मलबार व केरळ इ. ठिकाणी हा आढळतो. रक्तचंदन [⟶ चंदन] व बिबळा एकाच वंशातील असल्याने त्यांची अनेक लक्षणे सारखी आहेत. ह्याची साल पिवळट करडी, जाड व भेगाळ असून पाने (१५-२० सेंमी. लांब) एकाआड एक, संयुक्त व पिसांसारखी विभागलेली असतात दले ५-७ (७.५ × १३ सेंमी. लांब), जाडसर, एकाआड एक व चकचकीत असतात. फुलोरे [परिमंजरी ⟶ पुष्पबंध] फांद्यांच्या बाजूंस अथवा टोकांस मे ते जूनमध्ये येतात व त्यांवर फिकट पिवळी व लहान आणि पतंगरूप फुले [⟶ फूल] असतात शिंबा (शेंग) गोल (२.५ – ५ सेंमी. व्यासाची ) असून तिच्यावर जाडसर पंखासारखी किनार असते. बी बहिर्गोल, एक (क्वचित दोन) व लहान असते. ह्याची इतर शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजीमध्ये (शिंबावंत कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
निसर्गात नवीन झाडे बियांपासूनच येतात. बियांपासून रोपे किंवा एक वर्ष वाढ झालेल्या झाडाची शाखा लावूनही नवीन लागण करतात. रेतीचे योग्य प्रमाण असलेली निचऱ्याची व काहीशी दुमट जमीन, सु. ७५-२०० सेंमी. पाऊस आणि मध्यम सूर्यप्रकाश ह्या गोष्टी याच्या वाढीस आवश्यक असतात तथापि कर्नाटक व केरळ येथील अधिक पावसाच्या क्षेत्रांत तो खूप मोठा होतो.
ह्याचे लाकूड भारतातील उत्कृष्ट लाकडांपैकी एक असून ते मध्यभागी पिवळट पिंगट व त्यासभोवती फिकट पिवळट असते. ते कठीण, मजबूत, वजनाने मध्यम व टिकाऊ असते. त्याचा प्रमुख उपयोग घरबांधणीत सागवानाऐवजी केला जातो. आगगडीचे डबे, शिळेपाट, विजेच्या तारांचे खांब, खाणीतील आधारस्तंभ, गाड्या, शेतीची अवजारे, नावा, जहाजे, ढोल, वल्ही, हत्यारांचे दांडे, गणितीय उपकरणे, चित्रांच्या चौकटी, फण्या, खेळणी, बंदुका, कपाटे, कातीव व कोरीव काम इत्यादींसाठी ते उपयोगात आणले जाते. गुंडाळण्यास योग्य (आच्छादक) कागदाच्या निर्मितीत, तसेच जळणासही ते चांगले असते. लाकडात पिवळे रंगद्रव्य, बाष्पनशील (उडून जाणारे) तेल आणि अर्धस्थिर तेल असते.
खोडावरच्या सालीत लालसर पिंगट रंगद्रव्य असते आणि त्याचा उपयोग कधीकधी रंगविण्यास करतात. सालीवर खोलवर जखम केल्यास तीतून गर्द लाल गोंदासारखे औषधी द्रव्य पाझरते. त्याला ‘गम किनो’ असे नाव असून दर वृक्षापासून ते सु. ३४० ग्रॅ. मिळते. ते स्तंभक (आकुंचन करणारे) असल्याने अतिसार व आमांश यांत पूर्वी वापरीत ते रक्तस्त्राव, पांढरी धुपणी व दातदुखीवर उपयुक्त आहे. रंगविणे, कातडी कमाविणे, छपाई यांकरिता ते उपयुक्त असून कागद उद्योगातही वापरण्यायोग्य आहे हा गोंद काही मद्यांतही घालतात. साल स्तंभक असून दाढदुखीवर दाढेत भरतात. चुरगळलेला पाला गळवे, जखमा व त्वचारोग यांवर लावतात. पाला गुरांना उत्तम चारा असून सुपारीच्या झाडांना त्याचे उत्तम खत होते. लाकडाचा फांट [विशिष्ट प्रकारे बनविलेला काढा ⟶ औषधिकल्प] व ह्याच्या लाकडी पात्रात ठेवलेले पाणी मधुमेहावर गुणकारी असते. द. भारतात कॉफीच्या मळ्यात सावलीकरिता हे वृक्ष लावतात.
2. Dastur, J. F. Useful Plants of India and Pakistan, Bombay, 1963.
“