बिदनूर : (बेदनूर). कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध स्थळ. येथे एक पडीक अवस्थेतील भूईकोट किल्ला आहे. शिमोग्याच्या पश्चिमेस ९६ किमी.वर अविनहळ्ळीपासून वायव्येस सु. २५ किमी.वर तो वसला आहे. सध्या ह्या किल्ल्यात सुस्थितीत अशा फारशा वास्तू नाहीत. केळदि संस्थानची ही काही काळ राजधानी असल्याने जुन्या वास्तूंचे विविध अवशेष येथे इतस्ततः विखुरलेले दिसतात. शिवकालात येथील शिवप्पा नायक याने आदिलशाहीशी पुष्कळ वर्षे झगडा चालविला होता. शेवटी तो किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात जाऊन शिवप्पा नायक आदिलशाहीचा मांडलिक बनला. छत्रपती राजाराम पन्हाळ्याहून जिंजीस जाताना केळदि राज्याच्या चन्नम्माजी राणीने औरंगजेबाचे शत्रुत्व पत्करून त्यास बहुमोल सहकार्य दिले. त्याबद्दल औरंगजेबाने पुढे हिला पुष्कळ त्रासही दिला. हैदर अली सत्ताधारी बनल्यावर त्याने हे राज्य बुडवून (१७६२) आपल्या राज्यास जोडले आणि त्या वेळची केळदि राणी वीरम्माजी हिला तुरुंगात टाकले. पुढे लवकरच येथील केळदि नायकांचे राज्य संपुष्टात आले (१९ जानेवारी १७६३). टिपूनंतर हा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला. या घराण्याविषयीची माहिती शिवतत्त्व-रत्नाकर (संस्कृत) व केळदि-नृप-विजय (कन्नड) या दोन ग्रंथांत मुख्यतः आढळते.