बॉर्दे, झ्यूल : (१३ जून १८७० – ६ एप्रिल १९६१). बेल्जियन सूक्ष्मजंतुवैज्ञानिक व प्रतिरक्षावैज्ञानिक (रोगप्रतिकारक्षमतेसंबंधीच्या विज्ञानातील तज्ञ). प्रतिरक्षाविज्ञानातील विशेष शोधांबद्दल १९१९ चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञान या विषयाच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचे पूर्ण नाव झ्यूल झां बातीस्त व्हँसां असे होते. त्यांचा जन्म स्वान्ये येथे झाला. १८९२ मध्ये ब्रूसेल्स विद्यापीठाची एम्.डी. पदवी त्यांनी मिळविली. वैद्यकीय विद्यार्थी असतानाच त्यांनी संशोधनास सुरुवात केली होती. १८९४ मध्ये बेल्जियन सरकारची शिष्यवृत्ती मिळून ते पॅरिस येथील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन कार्य करू लागले आणि तेथेच पाच वर्षांच्या काळात त्यांनी प्रतिरक्षाविज्ञानातील महत्त्वाचे शोध लावले.

पाश्चर इन्स्टिट्यूटमधील म्येच्‌न्यिकॉव्ह प्रयोगशाळेत काम करीत असताना सूक्ष्मजंतुविलयनासंबंधी (सजीवाच्या शरीरात व शरीराच्या बाहेर सूक्ष्मजंतू कोशिका-पेशी-विरघळणे वा नष्ट होणे या क्रियेसंबंधी) त्यांनी महत्त्वाचे शोध लावले. ज्या प्राण्यात प्रतिरक्षा निर्माण झाली असेल, त्या प्राण्याच्या रक्तातील रक्तरस (गोठलेल्या रक्तापासून अलग होणारा रक्तातील स्वच्छ द्रव) त्याच्या शरीरात नव्याने शिरलेल्या त्याच रोगाच्या सूक्ष्मजंतूंचा नाश करू शकतो, हे त्यांनी ⇨पटकी व ⇨प्लेग या रोगांचे सूक्ष्मजंतू वापरून सिद्ध करून दाखविले. त्यांनी ‘संरक्षण’ या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून रक्तरसातील या सूक्ष्मजंतुनाशक घटकाला ‘अलेक्झीन’ असे नाव दिले. हाच पदार्थ आज ‘पूरक’ (काँप्लिमेंट) या नावाने ओळखला जातो. सर्व सस्तन प्राण्यांच्या सामान्य रक्तरसात हा पदार्थ असल्याचे ज्ञात झाले आहे. रोगाचे सूक्ष्मजंतू जेव्हा मानवी शरीरात प्रवेश करतात तेव्हा तो रोग पूर्वी होऊन गेलेला असल्यास त्याच्या रक्तरसातील ‘पूरक’ पदार्थ बद्धावस्थेतून मुक्त होऊन नव्याने शिरलेल्या सूक्ष्मजंतूंचा नाश करतो.

इ. स. १९०१ मध्ये बॉर्दे व त्यांचे मेहुणे ऑक्ताव्ह झॅवगू यांनी पटकी प्रतिरक्षित रक्तरस, पटकीचे सूक्ष्मजंतू व पूरक पदार्थ घेऊन काही प्रयोग केले. वरील तीन पदार्थांच्या मिश्रणात त्यांनी तांबड्या कोशिका व त्यांची ⇨प्रतिपिंडे मिसळली. पूरक पदार्थ जेव्हा मुक्तावस्थेत असतो तेव्हा तो तांबड्या कोशिकांच्या भिंतींवर परिणाम करून त्यांचे विलयन करतो पण जर तो बद्धावस्थेत असेल, तर कोशिकांवर परिणाम होणार नाही, असे त्यांना आढळून आले. या परीक्षेला ‘पूरक बंधी परीक्षा’ असे नाव देण्यात आले व ती प्रयोगशाळेत सूक्ष्मजंतूंचा प्रकार ओळखण्याकरिता वापरात आली. पुढे १९०६ मध्ये याच तत्त्वावर आधारित ⇨उपदंश या रोगाच्या निदानाकरिता प्रसिद्ध झालेली ‘वासरमान परीक्षा‘ आउगुस्ट फोन वासरमान, आल्बेर्ट नाइसर व सी. ब्रुक या शास्त्रज्ञांनी शोधून काढली. वयाच्या तिसाव्या वर्षीच ख्यातनाम झालेल्या बॉर्दे यांची इन्स्टिट्यूट पाश्चर द्यू ब्राबान्त या संस्थेच्या संचालकपदावर १९०१ मध्ये नेमणूक झाली. तेथे त्यांचे संशोधन कार्य सतत चालू होते. १९०६ मध्ये ते व झॅवगू यांनी मिळून ⇨डांग्या खोकला या रोगाचे सूक्ष्मजंतू शोधून काढले. या सूक्ष्मजंतूंना ‘बॉर्दे-झॅवगू सूक्ष्मजंतू’ (आता बॉर्देटिल्ला परट्यूसिस) असे संबोधितात.

इ. स. १९०७ ते १९३५ पर्यंत बॉर्दे ब्रुसेल्स विद्यापीठाच्या सूक्ष्मजंतुविज्ञान विभागाचे प्रमुख होते. १९४० पर्यंत ते वर उल्लेखिलेल्या इन्स्टीट्यूटच्या संचालक पदावर होते. प्रतिवर्षी ते पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये प्रतिरक्षाविज्ञानावर व्याख्याने देत. १९३५ मध्ये तेथील विज्ञान मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते निवडले गेले. नोबेल पारितोषिकाशिवाय त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय मानसन्मान व उच्चतम शैक्षणिक बहुमान मिळाले होते. ते ब्रूसेल्स येथे मरण पावले.

 

भालेराव, य. त्र्यं.