बॉन विद्यापीठ : ऱ्हाईन नदीकाठावरील पश्चिम जर्मनीची राजधानी असलेल्या निसर्गसुंदर परिसरातील इतिहासप्रसिद्ध विद्यापीठ. १७७७ मध्ये कोलोनचा सरदार आर्चबिशप माक्स फ्रीड्रिख फोन क्योनिग्जएग्ग याने बॉन येथे अकादमीच्या स्वरूपात प्रस्तुत विद्यापीठ स्थापन केले. नंतर माक्स फ्रान्स याने १७८६ मध्ये अकादमीचे विद्यापीठात रूपांतर केले. पुढे हे विद्यापीठ फ्रेंच राज्यक्रांतीच्या तडाख्यात सापडल्याने काही वर्षे बंद होते. प्रशियन सम्राट तिसरा फ्रीड्रिख विल्यम याने १८ ऑक्टोबर १८१८ साली ते पुन्हा सुरू केले व त्याचेच नाव या विद्यापीठास तेव्हापासून देण्यात आले.

बॉन विद्यापीठाची १८१८-१९ च्या हिवाळ्यातील सत्रापासून ४७ विद्यार्थ्यांनिशी सुरुवात झाली. इव्हँजेलीय ईश्वरविद्या आणि कॅथलिक ईश्वरविद्या हे विषय प्रारंभी शिकविले जात. कालांतराने विधी व अर्थशास्त्र, गणित आणि नैसर्गिक विज्ञाने, वैद्यक, तत्त्वज्ञान, अवकाशविज्ञान, कृषी, प्रॉटेस्टंट ईश्वरविद्या इ. विद्याशाखा सुरू करण्यात आल्या. यांशिवाय इतरही काही संशोधन संस्था विद्यापीठाशी संलग्न आहेत. भारतीयांच्या दृष्टीने हे विद्यापीठ येथे चालणाऱ्या प्राच्यविद्या संशोधनासाठी विशेष महत्त्वाचे ठरते.

विद्यापीठविकासाच्या काळात यूरोपात अनेक सामाजिक आणि राजकीय घडामोडी झाल्या. या विद्यापीठाला फ्रेंच राज्यक्रांतीचा तडाखा तर बसलाच, शिवाय पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांची मोठी झळही सोसावी लागली.

विद्यापीठात २५,००० विद्यार्थी व सु. ८०० अध्यापक आहेत (१९७६-७७). विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध असून त्यात सु. ९,५०,००० ग्रंथ आहेत. विद्यार्थ्यांसाठी अनेक वसतिगृहे बांधण्यात आली असून व्याख्याने, चर्चासत्रे, निबंध लेखन-वाचन-चर्चा अशा स्वरूपात अभ्यास चालतो.

या विद्यापीठातील नामवंत अध्यापकांत स्वीस इतिहासकार योहानेस फोन म्यूलर (१७५२-१८०९) जर्मन साहित्यिक आउगुस्त विल्हेल्म फोन श्लेगेल (१७६७-१८४५) जर्मन लेखक व देशभक्त एर्न्‌स्ट मारिआ आर्नट (१७६९-१८६०) प्रॉटेस्टंट ईश्वरविद्यावेत्ता कार्ल इमॅन्युएल नीत्शे (१७८७-१८६८) बायबलतज्ञ फ्रेडरिक ब्लीक (१७९३-१८५९), जर्मन समाजशास्त्रज्ञ मोझेस हिस (१८१२-७५) व जर्मन वनस्पतिविज्ञ एडुआर्ट स्ट्रासबुर्गर (१८४४-१९१२) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो.

महाजन, विद्यासागर