बाल वीर संघटना : कुमार वयोगटातील मुलांसाठी कार्य करणारी जागतिक पातळीवरील एक संघटना.⇨ बेडन-पॉवेल ऑफ गिलवेल (१८५७-१९४१) या ब्रिटिश सैनिकी अधिकाऱ्याने १९०७ साली इंग्लंडमध्ये ह्या संघटनेची चळवळ सुरू केली. चांगल्या नागरिकत्वासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचा परिपोष मुलामुलींमध्येव्हावा हा या चळवळीचा मुख्य हेतू होता. चारित्र्य, आरोग्य, उद्दमशीलता, सेवाभाव इ. गुण मुलामुलींच्या अंगी बाणावे, या उद्देशाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले. अल्प कालावधीतच ही चळवळ जागतिक पातळीवर पोहोचली. या शतकातील एक महत्त्वाची शैक्षणिक संघटना असा तिचा गौरवपूर्ण उल्लेख अनेक शिक्षणतज्ञांनी केलेला आहे.
मुलांसाठी बालवीर संघटना (बॉय-स्काउट) आणि मुलींसाठी वीरबाला संघटना (गर्ल-गाइड) अशा भिन्न संघटना आहेत. दोन्ही संघटनांचे संस्थापक व योजक लॉर्ड बेडन-पॉवेल हेच होत. संघटनेची मूलतत्त्वे, शैक्षणिक बैठक, कार्यपद्धती व जागतिक स्वरुप हे साधारणत: सारखेच असले, तरी मुलामुलींच्या अभ्यासक्रमात जरूर तेथे फरकही केलेला आहे.
कार्यक्षम नागरिकाला आवश्यक असणारे सद्गुण, सवयी, कर्तृत्व व स्वदेशाभिमान यांचा अभाव आणि आळस व चैन यांचे प्राबल्य झाले की, राष्ट्राची अवनती होते, असे बेडन-पॉवेल म्हणत. स्वत:च्या सैनिकी आयुष्यातील अनेकविध अनुभव त्यांच्याजवळ होतेच. या संपन्न अनुभवांच्या आधारेच बालवीर संघटनेतील कार्यक्रम त्यांनी आखले. चारित्र्यसंपन्न नागरिक असतील, तरच कोणत्याही देशाला उर्जितावस्था लाभेल म्हणून त्यांनी चारित्र्याशिक्षणाची ही चळवळ सुरु केली, असे ते नेहमी म्हणत. चारित्र्य, आरोग्य, उद्यमशीलता व सेवाभाव या चतु:सूत्रीत चारित्र्यसंवर्धनाला त्यांनी पहिले स्थान दिले आहे. बालवीर संघटनेचा सर्व कार्यक्रम चतु:सूत्रीवरच आधारलेला आहे.
आघाडीवर जाऊन शत्रुपक्षाची जागा, साधने, हालाचाली, संख्या यांची टेहेळणी करून त्यासंबंधी आपल्या अधिकाऱ्यांना सर्व बित्तंबातमी देण्याकरिता जे सैनिक पुढे जातात, त्यांना ‘स्काउट’ हे नाव सैन्यात देतात. अशी धाडसाची कामे करणारी माणसे चलाख व सद्गुणी असावी लागतात. धैर्य, चिकाटी, स्वावलंबन, सावधानता, सूक्ष्म निरीक्षण, स्मरणशक्ती, माहिती बिनचूक टिपण्याची पात्रता, शारीरिक व मानसिक ताण दीर्घकालपर्यंत सहन करण्याची क्षमता व कस, प्रलोभनाला बळी न पडण्याचा खंबीरपणा, हरहुन्नरीपणा, हजरजबाबीपणा, त्यागाची तयारी, जबाबदारीची जाणीव इ. अनेक गुण आत्मसात केल्याशिवाय स्काउटचे काम यशस्वीपणे करता येणार नाही हे समजावून सांगण्यासाठी बेडन-पॉवेल यांनी एड्स टू स्काउटिंग हे पुस्तक १९०० मध्ये छापून प्रसिद्ध केले. प्रचलित शिक्षणापेक्षा वेगळा असा काही कार्यक्रम आखून द्या, अशी विनंती त्यांना करण्यात आल्यावर त्यांनी स्काउटिंग फॉर बॉईज (१९०८) या पुस्तकात आपली कल्पना विश्लेषण-विवरण करून सांगितली. या शिक्षणपद्धतीचा प्रत्यक्ष प्रयोग व्हावा म्हणून त्यांनी इंग्लंडमधील ब्राउनसी बेटावर आपल्या संघटनेचे पहिले शिबीर २५ जुलै ते ९ ऑगस्ट १९०७ या कालावधीत घेतले. तेथे बेडन-पॉवेल यांनी संघटनेचे प्रशिक्षक (स्काउट-मास्टर) म्हणून काम केले. ५-५ मुलांचा एक असे ४ संघ पाडले. मुलांच्या पैकीच एकाला त्या त्या संघाचे नायक नेमले. प्रत्येक संघाला वेगळा तंबू दिला. दिवसाचा आपापला कार्यक्रम संघांनी पार पाडावयाचा, असे ठरले. स्वयंपाक, स्वच्छता, शिक्षण यांची जबाबदारी संघावर व संघनायकावर टाकली. संघनायकाला स्वत: प्रशिक्षक शिकवीत व संघनायकाने मुलांना शिकवायचे. रात्री पहारा करावयाचा. रात्री आळीपाळीने संघांना आपले सामान घेऊन दूर जावयाचे व रात्रभर उघड्यावर राहून सकाळी परत यावयाचे. पशुपक्षी व निसर्ग यांचे निरीक्षण करणे, मैदानी व रानावनातील खेळ, होकायंत्राचा व नकाशाचा वापर इ. अनेकविध कार्यक्रम त्यांनी पार पाडले. हे शिक्षण शिबीर बालवीर संघटनेच्या इतिहासात फार महत्त्वाचे समजले जाते. ‘संघ पद्धती’ (पॅट्रोल सिस्टिम) हा शिक्षणाचा मूळ गाभा. बालवीर आणि वीरबाला संघटना या पद्धतीवरच आधारलेल्या आहेत.
या सर्व कार्यक्रमांकरिता वेगळी संस्था अथवा संघटना सुरू करावी अशी सुरुवातीस बेडन-पॉवेल यांची कल्पना नव्हती. तथापि या शिक्षणाची उपयुक्तता लोकांना व पालकांना इतकी पटली, की इंग्लंडबाहेर प्रथमत: कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत या देशांतील ब्रिटिश लोकांनी १९०८-०९ या वर्षीच आपल्या मुलांना या पद्धतीचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला. या प्रकारचे बालवीर शिक्षण १९०९ मध्येच सुरु करणारे इंग्लंडच्या व्यतिरिक्त चिली हे पहिले राष्ट्र होय. १९१० मध्ये ह्या संघटनेची चळवळ अमेरिकेत पोहोचली. याच वर्षात बेल्जियम, हॉलंड, फ्रान्स,रशिया या यूरोपीय देशांत व अर्जेंटिना, ब्राझील, या अमेरिका खंडातील देशांत या संघटनेचा प्रसार झाला. १९०९ साली लंडनमध्ये क्रिस्टल पॅलेसवर पहिला बालवीर मेळावा भरला. या मेळाव्यात स्काउट सारखाच पोषाख केलेल्या अनेक मुली हातात दंड घेऊन उभ्या होत्या. आम्ही ‘गर्ल स्काउट’ आहोत असे त्यांनी बेडन-पॉवेल यांना सांगितले. या मुलींचा उत्साह पाहून १९१० साली बेडन-पॉवेल यांनी आपल्या बहिणीच्या सहकार्यांने मुलींसाठीही वीरबाला (गर्ल गाइड) ही संघटना सुरु केली. पुढे बेडन-पॉवेल यांचा विवाह झाल्यावर या चळवळीची संपूर्ण जबाबदारी त्यांची पत्नी लेडी बेडन-पॉवेल यांनी स्वीकारली.स्काउट संघटनेप्रमाणेच गाइड संघटनेची चळवळही थोड्याच दिवसांत इंग्लंडच्या बाहेर पसरली. १९१२-१३ पर्यंत न्यूझीलंड, भारत, शांधाय, हवाई बेटे येथे गाइड पथके सुरु झाली.
बालवीर शिक्षणाची सुरुवातीची योजना ११ ते १७ या वयोगटातील मुलांसाठीच होती. या गटास ‘स्काउट’ असे म्हणतात. अनेकांच्या इच्छेवरून पुढे १९१४ साली ७ ते ११ वर्षांच्या वयोगटातील मुलांकरिता ‘कब’ (शिशुवीर) ह्या नावाने शिक्षण सुरू केले गेले. पुढे १९१६ साली १७ वर्षांच्या वरील मुलांसाठी ‘रोव्हर’ (प्रौढवीर) नावाने शिक्षण सुरु झाले. भारतातील वीरबाला संघटनेस अनुक्रमे ७ ते ११ वयोगटास ‘बुलबुल’ (बालिका), ११ ते १७ या गटास ‘गाइड’ (वीरबाला) व १७ ते २५ या गटास ‘रेंजर’ (प्रौढा) असे म्हणतात.
शिशुवीर (कब) व बालिका (बुलबुल) यांचे वचन पुढीलप्रमाणे असते : “मी असे वचन देतो (देते), की ईश्वर आणि स्वदेश या विषयीचे माझे कर्तव्य करण्याचा, शिशुवीर व बुलबुल यांचे नियम आचरणात आणण्याचा व रोज एकतरी सत्कृत्य करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन.” शिशुवीर व बुलबुल यांचा गणवेश व पदके ही स्काउट व गाइड यांच्या पदकांपेक्षा वेगळी असतात. उजव्या हाताची पहिली दोन बोटे इंग्रजी ‘व्ही’ च्या आकारात ठेवून आणि उजव्या भुवईच्या बाजूस धरून प्रणाम करावयाचा असतो. हस्तांदोलन मात्र स्काउट व गाइड यांच्याप्रमाणेच डाव्या हाताने करावयाचे असते.
दैनंदिन जीवनात बालवीर व वीरबाला यांनी १० मूल्यांचे (नियमांचे) पालन करावे, असा प्रघात आहे. ती दहा मूल्ये पुढीलप्रमाणे : (१) विश्वासार्हता व प्रमाणिकपणा, (२) निष्ठा, (३) बंधुभाव, (४) सहकार्य, (५) सौजन्य, (६) प्राणिमात्रांविषयी आपुलकी, (७) शिस्त व आज्ञाधारकपणा, (८) धैर्य व आनंदी वृत्ती, (९) काटकसर व (१०) विचार, आचार व उच्चार यांचे पावित्र्य.
बालवीर किंवा वीरबाला होताना पुढे दिल्याप्रमाणे वचन घ्यावे लागते : “मी माझ्या शीलास स्मरून असे वचन देतो (देते), की ईश्वर व स्वदेश यांविषयीचे माझे कर्तव्य करण्याचा, इतरांच्या सदैव उपयोगी पडण्याचा व बालवीर-वीरबाला यांचे सर्व नियम (स्काउट-गाइड लॉ) आचारणात आणण्याची मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन. ”
‘तयार रहा’ (बी प्रीपेअर्ड) हे ध्येयवाक्य व तीन पाकळ्यांचे एक कमळ हा बालवीर संघटनेच्या पदकाचा प्रमुख भाग आहे. तीन बोटांचे वंदन (दिलेल्या वचनाची आठवण ठेवण्याकरिता) व डाव्या हाताने हस्तांदोलन असते. नियम, वचन, पदक, ध्येये, आचार, वंदन, हस्तांदोलन या गोष्टी सर्व राष्ट्रांतील बालवीर संघटनांत समान आहेत. गणवेशदेखील साधारणपणे सर्वत्र सारखा असतो, फक्त राष्ट्राराष्ट्रांत थोडेफार फरक आहेत.
स्काउट व गाइड यांच्या कामाच्या पद्धतीस ‘संघपद्धती’ असे म्हणतात. यामध्ये मुलामुलींना शिकावावयाची सर्व जबाबदारी संघनायक व साहाय्यक संघनायक यांच्यावर असते. संघनायक व साहाय्यक संघनायकांचे एक मंडळ असून त्यास सन्मानसभा (कोर्ट ऑफ ऑनर) म्हणतात. या सभेचा अध्यक्ष हा संघनायकांपैकीच एक असतो. पथकनायक (ट्रूपेलीडर) त्यांच्यापैकीच एक असतो.स्काउट मास्टर किंवा गाइड कॅप्टन हे या सभेत सल्लागार किंवा मार्गदर्शक म्हणून काम करतात. फक्त संथनायकांना शिकविण्याचे काम त्यांच्याकडे असते. मुलांमुलींनी आपल्या जबाबदारीवर काम करण्यास शिकणे व त्या जबाबदारीची जाणीव त्यांना देणे हे स्काउट आणि गाइड चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे ह्या सन्मानसभेला अतिशय महत्त्व आहे.
जागतिक बालवीर संघटनेचे कार्यालय प्रथम लंडन येथे होते. नंतर ते ओटावा (कॅनडा) येथे हलवण्यात आले व एप्रिल १९६८ पासून ते जिनीव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. जागतिक वीरबाला संघटनेचे कार्यालय मात्र आजही लंडन येथेच आहे. दर दोन वर्षांनी जागतिक स्काउट परिषदा भरतात व दर चार वर्षांनी ‘जांबोरी’ (जागतिक स्काउट-गाइड मेळावे) भरतात. ‘जांबोरी’ हे जागतिक मेळाव्यांसाठी बेडन-पॉवेल यांनी दिलेले नाव आहे. अशा प्रकारचा पहिला जागतिक मेळावा लंडन येथे १९२० साली भरला होता. भारतात १९५९ मध्ये दिल्ली ये थे जागतिक परिषद भरली होती. जागतिक गाइड संघटनेची चार केंद्रे आहेत. यांपैकी पहिले ‘अवर शॅले’ हे केंद्र स्वित्झर्लंडमध्ये अँडल्बोडन येथे १९३२ साली स्थापन झाले. त्यानंतर लंडन येथे १९३९ साली ‘अवर आर्क’ वा ‘ओलेव्ह हाउस’ हे केंद्र, मेक्सिको येथे १९५७ साली ‘अवर कॅबाना’ हे केंद्र व पुणे येथे आळंदी रस्त्यावर १९६४ साली संगम ‘चौथे केंद्र स्थापन झाले.
स्काउट व गाइड यांच्या जागतिक परिषदांना पाठविण्याच्या प्रतिनिधींची संख्या ही सर्व देशांना समान (स्काउट परिषदेसाठी ६ व गाइड परिषदेसाठी २)आहे. यांपैकी प्रत्यक्षात कितीही प्रतिनिधी उपस्थित असले, तरी मतांची संख्या मात्र सारखीच असते (स्काउट ६ आणि गाइड २). कोणत्याही राष्ट्राचा एकच प्रतिनिधी कार्यकारी मंडळावर येऊ शकतो व त्याची मुदत ६ वर्षे असते. कार्यकारी मंडळावर एकदा निवडून आलेल्या व्यक्तीस नंतर पुढील किमान एका निवडणुकीस उभे राहता येत नाही. या सर्व गोष्टींमुळे संख्येने आणि ऐश्वर्याने मोठे असलेले व लहान असलेले राष्ट्र समान पातळीवर या परिषदेत भाग घेऊ शकते.
भारतातील बालवीर संघटना : भारतातील ह्या संघटनेची सुरुवात १९०९ मध्ये जरी झाली, तरी त्यावेळी भारतीय मुलांना त्यामध्ये प्रवेश मिळत नसे म्हणून बालवीर शिक्षणाच्या धर्तीवरच काही भारतीयांनी कार्य सुरू केले. १९१६ साली मध्यवर्ती कायदेमंडळात खापर्डे यांनी एक ठराव सादर करून ‘स्काउट’ची संघटना भारतीय मुलामुलींसाठीही सुरू करावी, असे प्रतिपादन केले. लो. टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला आणि या संघटनेच्या चळवळीस चालना मिळावी म्हणून खाजगी व सरकारी पातळीवर प्रयत्न व्हावेत, असे मत व्यक्त केले. अशी संघटना भारतात सुरू झाली, तर ती आपल्याला त्रासदायक होईल, असे ब्रिटिशांना वाटत असे. १९१७ मध्ये मद्रास येथे ⇨ अँनी बेझंट यांनी अँरंडेल, व्यंकटेश्वरन यांच्या साह्याने ‘इंडियन बॉय स्काउट्स असोशिएशन’ सुरु केली. त्याच वेळी अलाहाबाद येथे मदन मोहन मालवीय यांनी ह्रदयनाथ कुंझरू व श्रीराम वाजपेयी यांच्या मदतीने ‘सेवासमिती स्काऊट असोसिएशन’ सुरु केली.
या दोन्ही संघटनांच्या शाखा अनेक प्रांतांत सुरु झालेल्या पाहून आपण लक्ष घातले नाही, तर ही संघटना इतर लोक काबीज करतील,असे ब्रिटिश सरकारला वाटले आणि त्यांनी बेडन-पॉवेल यांना १९२१ साली भारतात बोलावले. त्यांनी येऊन समझोता करून ‘बॉय स्काउट असोसिएशन’ सुरू केली. सरकारी पाठिंबा मिळाल्यामुळे झपाट्याने ही चळवळ शाळांमधून फैलावली.गव्हर्नर हे पदसिद्ध ‘चीफ स्काउट’ होऊ नयेत या मुद्यावर सेवासमिती स्काउट असोसिएशन अलग राहिली. स्काउट संघटना वाढू लागली. ‘ऑल इंडिया गर्ल-गाइड असोसिएशन’ ही संघटनाही अशीच सुरू झाली. दोन्ही संघटना कार्य करीत होत्या. १९३७ मध्ये पहिली अखिल भारतीय जांबोरी दिल्ली येथे भरली. भारतातून ६,००० स्काउट्स आले होते. त्यावेळी बेडन-पॉवेल पुन्हा भारतात आले. नंतर १९३८ साली ‘हिंदुस्थान स्काउट संघटना’ अस्तित्वात आली. सेवासमितीही या संघटनेत विलीन झाली. पुढे १९४७ मध्ये भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व स्वरुप बदलले. त्यावेळचे शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सर्व ‘स्काउट’ व ‘गाइड’ संघटनांच्या चालकांस एकत्र बोलावून एक व्यापक संघटना निर्माण करण्याविषयी प्रयत्न करण्यास सांगितले. ७ नोव्हेंबर १९५० रोजी या प्रयत्नातून ‘भारत स्काउट आणि गाइड संस्था’ निर्माण झाली. स्काउट व गाइड शिक्षणाचे एकत्रित कार्य करणारी ही जगातील पहिली संस्था होय. ही एकमेव संस्था आता शासनाच्या मान्यतेने संपूर्ण भारतात कार्य करीत आहे. दोन्ही जागतिक संस्थांची या संस्थेस मान्यता आहे. दिल्ली येथे संघटनेचे मध्यवर्ती स्काउट- गाइड कार्यालय आहे.
शिशुवीर, बुलबुल तसेच स्काउट व गाइड यांना शिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांकरिता वेगळा प्रशिक्षणक्रम असतो. भारतामध्ये भारत स्काउट – गाइड संस्थेतर्फे व तिच्या प्रादेशिक शाखांतर्फे वर्ग चालविले जातात. प्राथमिक, माध्यमिक व वुडबॅज अशा तीन दर्जाचे हे वर्ग असून ते साधारणत: दहा दिवसांचे असतात. वुडबॅज ह्या प्रशिक्षण-क्रमाचे तीन भाग आहेत: (१) तात्त्विक-यामध्ये स्काउट चळवळ व शिक्षण यांसंबंधी विचारलेल्या काही प्रश्नांची लेखी उत्तरे द्यावी लागतात. (२) प्रात्यक्षिक-हे शिक्षण प्रशिक्षणवर्गातच घ्यावे लागते. (३) मुलामुलींबरोबर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव. मध्य प्रदेशात पंचमढी येथे प्रशिक्षण स्काउट व गाइड संस्थेचे मध्यवर्ती केंद्र असून तेथे वरील प्रकारचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर वुडबॅज नावाचे गोफात अडकवलेले चिन्ह त्यांना गळ्यात घालण्याकरिता देण्यात येते. हे सर्वात उच्च दर्जाच्या शिक्षणाचे चिन्ह समजले जाते. याबरोबरच एक विशेष प्रकारचा गळ्यात अडकवण्याचा रुमाल (स्कार्फ) देण्यात येतो. जगातील सर्व स्काउट व गाइड संघटनांमध्ये मुलामुलींच्या बरोबर काम करणारे सर्व अधिकारी हे ‘स्वयंसेवक’ (व्हालंटरी वर्कर्स) हौसेने काम करणारे असतात. एवढ्या मोठ्या संस्थेने हौशी कार्यकर्ते असणारी स्काउट व-गाइड ही वैशिष्ट्यपूर्ण अशी संस्था आहे. फक्त मध्यवर्ती व प्रांतिक कार्यालयात पूर्ण वेळ,काम करणाऱ्या स्त्री-पुरुषव्यक्ती वेतन घेऊन काम करतात. आदर्श नागरिक निर्माण करण्याच्या दृष्टीने ह्या बालवीर व वीरबाला संघटनांना केवळ आजच्याच काळत नव्हे, तर भविष्यातही फार मोठे कार्यक्षेत्र उपलब्ध आहे. कालोचित बदल करून ह्या संघटनांनी त्या दिशेने वाटचाल मात्र करायला हवी.
संदर्भ : 1. Baden-Powell, Scouting for Boys, London, 1962.
2. Bezucha, R. D. Book of Scouting, New York, 1959.
3. Hazlewood, Rex, The Schoolmaster’s Guide from A To Z, London, 1960.
4. Maynard, A.M. Be Prepared, London, 1960.
५. जोशी, द. प. बालवीर चळवळ, पुणे १९४६.
नातू, मो. ना.
“