बारांगकिया : द. अमेरिकेमधील कोलंबिया या देशातील आटलांटीको विभागाची राजधानी, प्रमुख सागरी बंदर व शहर. लोकसंख्या ८,२५,४८७ (१९७८ अंदाज). हे मॅग्डालीना नदीकाठावर मुखापासून आत सु. १६ किमी. वर वसले असून, अंतर्गत जलवाहतुकीचे अंतिम स्थान म्हणूनही यास महत्त्व आहे. १६२९ मध्ये त्याची स्थापना झाली असली, तरी १९३० नंतरच दळणवळणाच्या सोयी व बंदराच्या सुविधा उपलब्ध होत गेल्याने त्याचा विकास घडून आला. उत्तर कोलंबियातील हे महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी केंद्र असून कापड, कागद, सिमेंट, पादत्राणे, रसायने, साबण, रंग रबरी वस्तू, सिगारेटी, मद्ये, पोलाद, काच, औषधे, चॉकोलेट ही येथील प्रमुख औद्योगिक उत्पादने होत. आसमंत सुपीक असून त्यातून कापूस, ऊस, मका, तांदूळ ही पिके आणि फळांचे उत्पादन होते. त्याचप्रमाणे येथे चुका वनस्पतीही विपुल प्रमाणात आढळते. २३० किमी. वरील सिकूको क्षेत्रातून नैसर्गिक वायू नळांनी या शहरात आणला आहे. लोहमार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग यांनी महत्त्वाच्या स्थळांशी ते जोडलेले असून देशाचा निम्म्याहून अधिक परदेशी व्यापार या बंदरातूनच चालतो. कॉफी, कापूस, खनिज तेल यांची येथून निर्यात होते. एल् प्रादो हे याचे प्रमुख उपनगर आहे. शहरात दोन विद्यापीठे आहेत.