बारडा : महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात. बर्डा, बरडा, बार्डा आदी नावांनीही तिचा उल्लेख करतात. भिल्ल जमातीचीच ही एक पोटजमात समजली जाते. त्यांना बरडा किंवा बरडे भिल्ल असेही काही ठिकाणी म्हणतात. त्यांची वस्ती प्रामुख्याने नासिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद व धुळे या जिल्ह्यांत आढळून येते. बारडा हे नाव खालच्या प्रतीचे समजले जाते. त्यामुळे हे लोक स्वतःला भिल्ल म्हणूनच म्हणवून घेतात. त्यामुळे १९७१ च्या जनगणनेत बारडा या नावाची स्वतंत्र नोंद केलेल्या भिल्लांची संख्या महाराष्ट्रात फक्त २०८ असल्याचे आढळून आले. भिल्ल ह्या जमातीच्या अंतर्गत त्यांची गणना केल्याने त्यांची लोकसंख्या स्वतंत्र रीत्या उपलब्ध होत नाही. वस्तुतः महाराष्ट्रात बारडा भिल्लांची संख्या याहून जास्त आहे. महाराष्ट्रातील नासिक, धुळे (सिंदखेडा, साक्री व धुळे तालुका), जाळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, यांशिवाय सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व बीड या जिल्ह्यांत त्यांची वस्ती विखुरलेली आहे. त्यांची वस्ती मुख्यत्वे ग्रामीण भागात गावाच्या आजूबाजूला लहान वस्त्यांवर किंवा शेताच्या बाजूला गावाबाहेर विखुरलेली आढळते. अशा वस्त्यांना ‘भिलाट्या’ म्हणतात. भिलाट्यांत गवताच्या आणि मातीच्या भिंतींच्या लहान झोपड्या असतात.
बहुतेक बारडांना स्वतःच्या जमिनी नाहीत ते शेतमजूर म्हणून वर्षानुवर्षे काम करतात व आपला चरितार्थ चालवितात. काही ठिकाणी हे लोक शेती आणि पीक यांची राखण करण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची आढळून येते. साहजिकच बारडांमध्ये शिक्षणाचे प्रमाण फारच कमी असून शेकडा ५% लोकदेखील शिकलेले किंवा साक्षर नाहीत. हे प्रमाण स्त्रियांमध्ये फारच कमी आहे. बारडा मराठी भाषिकांच्या सानिध्यात राहत असल्यामुळे ते मराठी भाषाच बोलतात. त्यांची स्वतंत्र अशी बोलीभाषा प्रचारात नाही. बारडा स्वतःच्या जमातीची उत्पत्ती महादेवापासून झाली असे मानतात व त्यांच्या आचारविचारांवर हिंदू धर्माचा प्रभाव असून हिंदू धर्मातील हनुमान, लक्ष्मी, म्हसोबा, भैरोबा, मरीआई, अरूण इ. देवतांचीही ते पूजा करतात. तसेच मुलाच्या जन्मानंतर पाचवीला सटवीची पूजा करतात. होळी, दिवाळी, दसरा, गुढी पाडवा, पोळा, नागपंचमी इ. हिंदूंचे सण ते साजरे करतात.
बारडांमध्ये एकाच कुळात विवाह होत नाहीत. मुलामुलींचे लग्ने वयाच्या साधारणतः १५ ते २० वर्षांच्या दरम्यान होतात. घटस्फोट व विधवाविवाह यांना जमातीत मान्यता आहे. पिशाच्च, जादूटोणा, चेटूक व मंत्रतंत्र यांवर त्यांचा दृढ विश्वास असून त्यांच्यात भगताचा प्रभाव आढळतो. मृताला जाळण्याची वा पुरण्याची अशा दोन्ही प्रथा त्यांच्यात रुढ आहेत. ते तिसऱ्या, पाचव्या व दहाव्या दिवशी दुखवटा पाळतात. दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव आणि जुन्या सामाजिक रुढी व परंपरा यांमुळे सुधारलेल्या किंवा प्रगत भागात राहूनदेखील बारडांवर आधुनिकीकरणाचा प्रभाव दिसत नाही.
गारे, गोविंद
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..