बाबल, ईसाक : (? १८९४ – १७ मार्च १९४१). रशियन कथाकार. जन्म ओडेसात, एका ज्यू कुटुंबामध्ये. हिब्रू भाषा, बायबल आणि टॅलमुड (ज्यू लोकांचा एक प्राचीन धार्मिक ग्रंथ) ह्यांचा अभ्यास घरीच केला. तसेच शाळेतील एका फ्रेंच शिक्षकाच्या प्रभावातून फ्रेंच भाषेचा उत्तम अभ्यास त्याने केला त्या भाषेत आरंभी काही कथालेखनही केले. रशियन भाषेतील अभिजात ग्रंथाचेही त्याने वाचन केले. १९१५ मध्ये बाबल पीटर्झबर्ग (आताचे लेनिनग्राड) येथे आला. तेथे विख्यात रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की ह्याचे मार्गदर्शन त्याला लाभले. बाबलच्या आरंभीच्या रशियन कथा गॉर्कीच्याच ॲनल्सनामक मासिकातून प्रसिद्ध झाल्या. गॉर्कीच्याच सूचनेनुसार, अनुभवसमृद्ध होण्यासाठी, बाबलने सात वर्षे विविध व्यवसाय केले भोवतालचे जीवनही निरखले. रेड कॅव्हल्री (१९२६, इं.भा. १९२९) हा त्याचा उल्लेखनीय कथासंग्रह होय. बाबलची कथा बंदिस्त, काटेकोर घाटाची आहे. कथाविषयातील नाट्य नेमके पकडून त्याचा कलात्मक विकास घडवून आणण्याचे त्याचे कौशल्य लक्षणीय आहे. आपल्या कथांतून त्याने ओडेसातील ज्यू जीवनाचे उपरोधगर्भ, विनोदी चित्रण केले त्याचप्रमाणे सैनिकी जीवनावरही कथा लिहिल्या. सनसेट (१९२८, इं.भा. १९६॰) आणि मारिया (१९३५) ह्या ज्यू जीवनावरील त्याच्या नाट्यकृती.
कुलकर्णी, अ. र.