बाटली : लाकूड, रबर, काच, बूच (कॉर्क) इ. पदार्थांच्या झाकणाने वा अन्य प्रकारच्या आच्छादनाने (उदा., प्लॅस्टिक, धातू) आतील वस्तू बंदिस्त करता येईल अशी सोय असलेल्या धारकपात्रास सामान्यत: बाटली असे म्हणतात. बाटली अरुंद वा रुंद तोंडाची असून ती काच, मृत्तिका (सेरॅमिक), धातू, रबर, कातडे, प्लॅस्टिक इत्यादींपासून बनविली जाते. बाटल्या मुख्यत्वे काचेच्या तयार करण्यात येतात पण अलीकडे प्लॅस्टिकाचाही बाटल्या तयार करण्यासाठी वाढत्या प्रमाणावर उपयोग करण्यात येत आहे. रुंद तोंडाच्या बाटलीला बरणी, अरुंद तोंडाच्या व डेऱ्यासारख्या मोठया बाटलीला बुधला (कारबॉय) व लहान बाटलीला कुपी व शिसी असे म्हणतात. रॉकेल, स्पिरिट वगैरे द्रव पदार्थासाठी वापरात असलेल्या काचेच्या बाटलीचा उल्लेख (विशेषत: ग्रामीण भागात) कित्येकदा शिसा म्हणून केला जातो.
प्रारंभी बाटल्यांच्या झाकणांसाठी लाकडाच्या खुंट्या वापरीत असत परंतु सतराव्या शतकात बुचांच्या (कॉर्कच्या) झाडापासून तयार करण्यात आलेली झाकणे वापरात आली. सोडावॉटर बाटलीत असलेली काचेच्या गोळीची झाकणे (बुचे) ‘कॉडस्टॉपर’ या नावाने १८७२ मध्ये वापरण्यात येऊ लागली व १८९२ मध्ये क्राउन सील ही धातवीय झाकणे वापरण्यात येऊ लागली. पुढे प्लॅस्टिक, रबर इत्यादींची झाकणे वापरात आली.
कच्चा माल : काच : सिलिका, वाळू (SiO2), सोडा ॲश (Na2CO3) व डोलोमाइट (चुना) (CaO.MgO) यांचा उपयोग बाटलीच्या काचेसाठी प्रामुख्याने करण्यात येतो. आयर्न ऑक्साइड (FeO) हे वरील कच्च्या मालात नेहमीच असते, त्यामुळे बाटलीला हिरवा रंग येतो. सिलिनियम संयुगामुळे लाल रंग येतो कोबाल्ट ऑक्साइडामुळे फिकट व वाळलेल्या गवताच्या रंगासारखा रंग येतो आर्सेनिक ट्राय-ऑक्साइडामुळे (As2O3) पिवळट हिरवा रंग येतो. कार्बन, गंधक वा सल्फेट यांच्या मिसळण्याने तयार होणाऱ्या अंबर (पिवळसर रंगाच्या) काचेमुळे आतील द्रवाचे वा पदार्थाचे प्रकाशापासून संरक्षण होते. रंगहीन काचेच्या बाटलीसाठी काचेत आयर्न ऑक्साइड ०.०६% पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. एक टक्क्याहून जास्त आयर्न ऑक्साइड असल्यास हिरवा रंग येतो, तर एक टन काचेत सु १½ किग्रॅ. क्रोमियम ऑक्साइड असल्यास पाचूसारखा हिरवा रंग येतो. त्याच प्रमाणात कोबाल्ट ऑक्साइड असल्यास निळा रंग येतो.
बाटलीच्या काचेत सोडा ॲशचे प्रमाण अल्प ठेवण्यात येते कारण त्याचे प्रमाण जास्त झाल्यास बाटलीतील द्रव्यात ते विरघळते. यासाठी चुन्याचे आणि ॲल्युमिनाचे प्रमाण वाढविल्यास सोडा ॲशच्या विरघळण्यास विरोध होतो. वैद्यकीय रसद्रव्ये (उदा., रक्तरस इ.) व इतर अतिसंवेदनशील औषधांसाठी बोरोसिलिकेट काचेच्या बाटल्या वापरतात.
उत्पादन कृती : काचेच्या व प्लॅस्टिकाच्या बाटल्या (कुप्या व बरण्या सोडून) फुंकून साच्याच्या साहाय्याने सामान्यत: तयार करतात. यासाठी आधी स्थूलाकार साचा तयार करून व त्याच्या साहाय्याने बाटली तयार करून मग ती अंतिम आकार देणाऱ्या साच्यात नेऊन तिच्यावर पुढील संस्कार केल्यावर बाटली तयार होते. ही सर्व कृती हल्ली स्वयंचलित यंत्राने अखंडपणे करतात. पृ.३७८वरील आकृतीत निर्मितीतील महत्त्वाचे टप्पे दाखविले आहेत.
प्रकार व गुणधर्म : काचेच्या बाटल्या ह्या रासायनिक दृष्टया अक्रिय (रासायनिक विक्रिया सहजी न होणाऱ्या), पारदर्शक, उच्च दृढतेच्या व बलाच्या, साठवणीत जास्त काळ टिकणाऱ्या, उघडण्यास बंद करण्यास सोप्या असतात. तसेच त्या बऱ्याच आकारांत व आकारमानांत बनविता येतात. शिवाय एकदा वापरलेल्या बाटल्या परत वापरता येणे शक्य असते. तथापि हाताळणीमुळे त्यांची उपयुक्तता व क्षमता कमी होते. कमी वजनाच्या पण जास्त बलाच्या बाटल्या दुसऱ्या महायुद्धानंतर जास्त प्रमाणात वापरात आल्या. पारदर्शकता, आकर्षकता व विविध आकार यांमुळे या बाटल्या ग्राहक पसंत करतात. शिवाय त्यांतील पदार्थ बाटलीत असतानाच तापविता येतो पण त्यांच्या फुटण्याचा (भंगुरतेचा) गुणधर्म त्यांच्या उपयुक्ततेच्या दृष्टीने मारक आहे. शिवाय जंबुपार (दृश्य वर्णपटाच्या जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरणांचे शोषण त्यांच्या पारदर्शकतेमुळे होत असल्याने आतील पदार्थ खराब होण्याची शक्यता असते.
प्लॅस्टिकांच्या बाटल्या चिवट असून त्या दाबून त्यातून द्रव पदार्थ बाहेर सहज काढता येतो. या अपारदर्शक असल्याने काचेच्या बाटल्यांवर मात करू शकत नाहीत. तसेच त्या तापविता वा निर्जंतुक करता येत नाहीत. त्या रासायनिक दृष्टया पूर्णपणे अक्रिय नसल्यामुळे आतील पदार्थांच्या वास, स्वाद, आर्द्रता इ. गुणधर्मांवर अनिष्ट परिणाम होतो.
उद्योग : बहुतेक सर्व देशांत, विशेषत: विकसित देशांत (अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान, ब्रिटन, रशिया, जर्मनी फ्रान्स इ.) काचेच्या व प्लॅस्टिकाच्या बाटल्या तयार करण्यात येतात. या बाटल्या साधारणत: अन्न, सौंदर्यप्रसाधने, रसायने, औषधे, मादक पदार्थ व पेये, दुग्धव्यवसाय इत्यादींसाठी वापरतात. काचेच्या बाटल्या तयार करण्यात अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. वातयुक्त पेयांसाठी वापरात असलेल्या बाटल्यांचे वजन इतर उपयोगांसाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्यांच्या वजनांच्या १/३ इतके कमी करण्याकडे बहुतेक कारखानदारांची प्रवृत्ती आहे. हे वजन कमी करत असताना बाटल्यांची शक्ती व टिकाऊपणा कमी न होता तसाच राहील याकडे खास लक्ष दिले जाते.
भारतात काचेच्या एकूण उत्पादनापैकी सु. ७॰% उत्पादन बरण्या, बाटल्या व तावदानी काच यांचे होते. त्यांपैकी बाटल्या व कुप्या यांचे उत्पादन सु. ६१% आहे. सर्व प्रकारच्या बाटल्यांचे १९५१ मध्ये ५०,६४०टन, १९५६ मध्ये ६२,४१३टन, १९६१ मध्ये १,१५,५१३टन, १९६५-६६ मध्ये २००००० टन व १९७८-७९ मध्ये २,५०,००० टन इतके झाले आहे. १९५८ पासून बाटल्यांच्या निर्यातीत सतत संथ पण नियमित अशी वाढ होत गेली. भारताततून काचेच्या बाटल्यांची निर्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, फिलिपीन्स, सौदी अरेबिया, इराण, सुदान, कंबोडिया, एडन, कुवेत, हाँगकाँग, थायलंड, पूर्व आफ्रिका इ. देशांना केली जाते. काचेच्या बाटल्या तयार करणारे कारखाने मुंबईत ६, हैद्राबादमध्ये 3, बंगलोरला २ तसेच नवी दिल्ली , अलेप्पी (केरळ), पुणे, कलकत्ता इ. ठिकाणी आहेत.
संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India, Industrial Products, Part IV, New Delhi, 1957.
2. Hanlon, J. F. Handbook of Packaging Engineering, New York, 1971.
3. Moody.B.E. Packaging in Glass, London, 1963.
कुलकर्णी, सतीश वि.
“