बांदोरहुल्ला: (लॅ. द्वाबंगा सोनेरॅशिऑइडिस कुल-सोनेरॅशिएसी). फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्वाबंगा वंशातील तीन जाती इंडोमलायातील असून त्यांपैकी ही एकच भारतात आढळते. बांदोरहुल्ला हे नाव बंगाली असून तिचे नेपाळी नाव ‘लंपातिया’ आहे व त्यापासून ‘लंपाती’ हे व्यापारी नाव आले आहे. हा सु. २४–३० मी. उंचीचा मोठा पानझडी वृक्ष असून याचा घेर २.५ ते ५.५ मी. असतो. याचा प्रसार उ. बंगाल, पूर्व हिमालय व आसाम येथे सु. ९०० मी. उंचीपर्यंत आणि अंदमान बेटात आहे. हा नद्यांच्या आणि ओहोळांच्या काठाने विशेषे करून आढळतो. पाने समोरासमोर, साधी, चिवट, आयत, १८–३५ सेंमी. लांब असतात. फुले मोठी व अग्रस्थ फुलोऱ्‍यावर [गुलुच्छावर⟶ पुष्पबंध] येतात. संवर्त पेल्यासारखा, संदले ६–८ व त्रिकोणी पाकळ्या ६–८, सुट्या व पांढऱ्‍या केसरदले अनेक व परागकोश विलोल (सहज हालणारा) किंजपुट ऊर्ध्वस्थ, त्यात ४–८ कप्पे व बीजके अनेक [⟶फूल]. बोंड चिवट, ४–८ शकलांचे व बिया अनेक. याचे लाकूड तपकिरी, मध्यम मजबूत, कठीण व हलके असून सावलीत किंवा पाण्याशी संबंध आला असताही टिकून राहते ते उत्तम दर्जाचे असते. भित्तिफलक, पडाव, होडगी, ताफे (तराफे), दांड्या, पट्ट्या, फळ्या, खोकी, सजावटी सामान, विहीरबांधणी, आगकाड्या इत्यादींसाठी ते फार चांगले असते. कापणे व रंधणे या क्रियेस ते सोपे असून त्यापासून पातळ तक्तेही (प्लायवूड) बनवितात. बंगाल व आसाममधून याचा पुरवठा होतो. निसर्गतः या वृक्षाची अभिवृद्धी (नवीन लागण) पुनर्जननामुळे होते व त्यामुळे कोठे कोठे सांघिक वाढ आढळते. तथापि बियांपासून सावलीत रोपे तयार करून नंतर पावसाच्या आरंभी इच्छित स्थळी लावतात. एक-दोन वर्षांनी जलद वाढ सुरू होते व वर्षाला सु. एक मीटरपर्यंत उंची वाढते. ५०–६० वर्षांत घेर सु. दोन मी. वाढलेला आढळतो. सु. १२५–५०० सेंमी. पाऊस असलेल्या प्रदेशात याची वाढ चांगली होते. याची फळे आंबट व खाद्य असतात. ⇨ तिवार बांदोरहुल्ल्याच्या (सोनेरॅशिएसी) कुलात समाविष्ट असून हे वृक्ष कच्छ वनश्रीत आढळतात.

 

पहा: मिटेंलीझ वनश्री.

 

संदर्भ: 1. C.S.I.R. The Wealth of India. Raw Materials. Vol. III.New Delhi, 1952.

           2. Mitra. J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

 

परांडेकर, शं. आ.