मॉर्गन, लेविस हेन्री : (२१ नोव्हेंबर १८१८–१७ डिसेंबर १८८१). एकोणिसाव्या शतकातील एक थोर अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म न्यू इंग्लंडमध्ये सतराव्या शतकात स्थायिक झालेल्या वेल्श कुटुंबात आरोरा (न्यूयॉर्क) शहराजवळ झाला. त्यांचे प्रारंभीचे सर्व शिक्षण आरोरा शहरात झाले. त्यांनी युनियन महाविद्यालयातून पदवी घेऊन (१८४०) पुढे कायद्याची पदवी संपादन केली आणि वकिलीचा व्यवसाय सुरू केला. काही दिवस न्यायवादी (ॲटर्नी) म्हणून काम केल्यावर त्यांनी एका रेल्वे कंपनीचे संचालकपद भूषविले. त्यातून त्यांनी खूप पैसा मिळविला आणि मिशिगन रेल्वेमार्गाचे बांधकाम आणि खाणी यांत गुंतविला. साहजिकच त्यांना वकिलीत फारसे स्वारस्य वाटेना. वकिली व्यवसाय सोडून देऊन (१८६२) उर्वरित आयुष्य त्यांनी रॉचेस्टर येथे राहून मानवशास्त्राच्या विशेष संशोधन-अभ्यासाला वाहिले. एलिझाबेथ स्टील नावाच्या नात्यातील युवतीशी त्यांनी १८५१ मध्ये विवाह केला. त्यांना तीन मुले झाली.

राज्य विधिमंडळाचे सदस्य तसेच सीनेटर होण्याचा मान त्यांना मिळाला तथापि राजकारणात त्यांनी विशेष रस घेतला नाही. तसेच त्यांना कॉर्नेल विद्यापीठात मानवजातिशास्त्र (इथ्‌नॉलॉजी) विषयाचे प्रमुखपद देऊ केले होते, तेही त्यांनी नाकारले. मानवशास्त्रात संशोधन करीत असताना त्यांनी बांधकाम व्यवसायातील काही संस्थांचे प्रतिनिधित्व मात्र अखेरपर्यंत केले. 

मानवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तत्कालीन यंग मेन्स क्लब या संस्थेचे सभासदत्व स्वीकारले. प्रथम त्यांनी इरोक्वाईस या अमेरिकन इंडियनमधील सेनेका जमातीचा सर्वांगीण अभ्यास केला. या जमातीत प्रत्यक्ष जाऊन त्यांनी क्षेत्र-अभ्यास केला आणि आपले तत्संबंधीचे निष्कर्ष लीग ऑफ द हो-द-नो-साऊ-नी किंवा इरोक्वाईस (१८५१) या पुस्तकात मांडले. 

अमेरिकन इंडियन लोकांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अमेरिकन इंडियनमधील सेनेका जमातीतील नातेसंबंधांचे त्यांनी विशेष अध्ययन केले होते. आशियातील नातेसंबंध आणि नातेविषयक नावे याविषयीदेखील त्यांनी बरीच माहिती गोळा केली होती. या दोनही अभ्यासावरून त्यांनी सिस्टिम्‌स ऑफ कॉन्सँग्विनिटी अँड ॲफिनिटी ऑफ द ह्यूमन फॅमिली हा ग्रंथ प्रसिद्ध केला (१८७१). अमेरिकेतील इंडियन हे मूळ आशियातून आले, हे मत प्रथम त्यांनी मांडले. 

मॉर्गन यांचा सर्वांत अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक ग्रंथ म्हणजे एन्शन्ट सोसायटी (१८७७). हा ग्रंथ प्रामुख्याने समाजातील कुटुंबाच्या उत्क्रांतीवर भर देतो. त्याचे चार स्वतंत्र भाग त्यांनी कल्पिलेले असून त्यांत दोन उपपत्त्या मांडल्या आहेत. त्यांपैकी एक आदर्शवादी असून दुसरी भौतिकवादी आहे. हा ग्रंथ मार्क्सिस्ट साहित्यात एक अभिजात कलाकृती मानण्यात येतो. कार्ल मार्क्स आणि फ्रीड्रिख एंगेल्स हे दोघेही या ग्रंथाकडे आकृष्ट झाले. एंगेल्सने या ग्रंथावर आधारित द ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट (१८८४) नावाचा स्वतंत्र ग्रंथ लिहिला तथापि काही टीकाकार मॉर्गनचा हा ग्रंथ सदोष व त्रुटींनी भरलेला असून व्यवहारातून गेलेला आहे, असे मानतात.

मॉर्गननी ऑस्ट्रेलियन मानवजातिशास्त्रावरही लिहिले आहे. मॉर्गन हे ऑस्ट्रेलियन नातेसंबंधांवर प्रबंध लिहिणारे पहिले मानवशास्त्रज्ञ होत. त्यांनी पत्ररूपाने तेथील उत्साही अभ्यासकांना मार्गदर्शन केले आणि क्षेत्रकामाबद्दल सूचना दिल्या. 

मॉर्गननी यूरोपचा दौरा करून (१८७०–७१) डार्विन, हक्सली, मॅकलेनन, मेन वगैरे अनेक नामवंत विचारवंतांची भेट घेतली. अमेरिकेत मॉर्गन यांना बरीच प्रसिद्धी व सन्मान मिळाले. तेथील नव्याने स्थापन झालेल्या (१८७९) पुरातत्वीय संस्थेने क्षेत्र-संशोधनासाठी बहुसमावेशक कार्यक्रम द्यावा, अशी त्यांना विनंती केली. युनियन महाविद्यालयाने त्यांना सन्मान्य पदवी दिली. अमेरिकन ॲकॅडमीची अधिछात्रवृत्ती त्यांना देण्यात आली (१८६८). याशिवाय मिळालेला महत्त्वाचा सन्मान म्हणजे १८७५ मध्ये त्यांना अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस आणि सायन्स या संस्थेचे सदस्यत्व देण्यात आले. 

फ्रॅन्ट्स बोॲस या मानवशास्त्रज्ञाचा उदय होताच मॉर्गन यांच्या प्रसिद्धीस व लौकिकास गळती सुरू झाली. त्यांचा एन्शन्ट सोसायटी हा ग्रंथ तुच्छतेस पात्र ठरू लागला पण काही काळानंतर त्यांच्या संस्कृतीविषयक विचारांचे पुन्हा पुनरुज्जीवन होऊन त्यांच्या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या निघू लागल्या.

प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या अखेरच्या दिवसांत पुन्हा नावलौकिक वाढला. विसाव्या शतकात त्यांच्या ग्रंथांचा पुन्हा अभ्यास होऊ लागला. रॉचेस्टर (न्यूयॉर्क) या ठिकाणी त्यांचे निधन झाले. 

संदर्भ : 1. Resek, Carl, Lewis Henry Morgan: American Scolar, Chicago, 1960.

             2. White, Leslie A. Introduction to Morgan’s-The Indian Journals, 1859–62, Michigan, 1959.

 

 भोईटे, अनुराधा