मारिया माँटेसरी

माँटेसरी, मारिया : (३१ ऑगस्ट १८७०–६ मे १९५२). प्रसिद्ध इटालियन शिक्षणतज्ञ, शारीरविज्ञ व माँटेसरी शिक्षणपद्धतीची जनक. मध्य इटलीतील क्याराव्हाले या गावी जन्म. इटली देशात सार्वजनिक शाळेत जाणारी ही पहिलीच मुलगी होती. त्यामुळे घरातील व बाहेरील लोकांच्या टीकेला लहानपणापासूनच तिला तोंड द्यावे लागले. १८९६ साली तिने रोम विद्यापीठाची वैद्यकाची पदवी मिळविली. पदवी मिळविणारी इटलीतील ती पहिलीच महिला होय. वृत्तपत्रांनी तिला सूर्यकिरण (सन रे) म्हणून गौरविले. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर रोममधील सार्वजनिक रुग्णालयातील रिकाम्या जागेसाठी झालेल्या स्पर्धेत तिने भाग घेतला आणि तीत तिला यश मिळाले. १८९७ साली यूरोप खंडात अशा मानाच्या जागी निवडलेली माँटेसरी ही पहिलीच महिला होय. १८९८ साली रोममधील मंदबुद्धीच्या मुलांच्या शाळेची ती प्रमुख झाली आणि तिच्या मनात शिक्षणकार्याविषयी कुतुहल जागृत झाले. तूरीन येथे भरलेल्या (१८९८) वैद्यकीय परिषदेत भाषण करताना तिने मतिमंद मुलांकडे समाज व डॉक्टर यांचे होणारे दुर्लक्ष हे गुन्हेगारीचे खरे कारण होय, असा विचार मांडला. तिच्या या स्पष्ट सडेतोड विधानाचा यूरोपभर परिणाम झाला. खुद्द इटलीत मंदबुद्धीच्या मुलांसाठी संस्था स्थापन झाल्या. मानसिक वैफल्य ही वैद्यकशास्त्रातील समस्या नसून ती प्रामुख्याने शैक्षणिक समस्या आहे, असे तिला वाटत असे. या दृष्टीने तिने मनोविकलांच्या शिक्षणपद्धतीचा अभ्यास केला. १८९९ मध्ये रोममधील महिला विश्वविद्यालयात आरोग्यशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून तिची नेमणूक झाली. १९०० मध्ये लंडनमधील महिला परिषदेस इटालियन महिलांची प्रतिनिधी म्हणून ती हजर होती. १९०४ साली निष्णात डॉक्टर म्हणून साऱ्या रोममध्ये तिची प्रसिद्धी झाली, तसेच रोम विद्यापीठात मानवशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून तिची नेमणूक झाली. ६ जानेवारी १९०७ रोजी माँटेसरीने रोमच्या गलिच्छ वस्तीत पहिली माँटेसरी शाळा (बालकमंदिर) सुरू केली. वैद्यकीय व्यवसायातील प्रतिष्ठा व पैसा यांचा मोह टाळून माँटेसरीने त्यानंतर शैक्षणिक कार्यास स्वतःस वाहून घेतले.

मतिमंद मुलांचा मनोविकास होण्यासाठी त्यांच्या ज्ञानेंद्रियांची संवेदनशक्ती व स्नायूंची संचलनशक्ती विकसित करणे आवश्यक आहे, असे एडुआर्ड सेग्विंन या मानसोपचारज्ञाचे मत आहे. या मताचा माँटेसरीच्या मनावर प्रभाव पडून तिने मतिमंदाच्या शिक्षणासाठी खास साहित्य तयार केले. या साहित्याच्या उपयोगाने मतिमंदांची प्रगती होत असल्याचे दिसून आले. त्यांपैकी काही मुले तर सर्वसामान्य मुलांची बरोबरी करू शकली. या अनपेक्षित यशाने भारावून जाऊन तिने रोम विद्यापीठातील सात वर्षाचा अभ्यासक्रम पुरा केला. या अभ्यासक्रमाचा उपयोग करण्यासाठी तिला योग्य संधी लाभली. मनोविकास साधणाऱ्या शिक्षणाची नवीन पद्धती तिने शोधून काढली. ती ‘माँटेसरी शिक्षण पद्धती’ या नावाने संबोधली जाते.

रोममध्ये त्या काळी गृहनिर्माण समितीने बांधलेल्या प्रत्येक घरात शिशुगृहे उघडण्याची कल्पना तिने काढली. घरात राहणाऱ्या भाडेकरूंच्या ३ ते ७ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना एकत्र करून त्यांची देखरेख शिक्षिकेवर सोपवायची व तिलाही त्याच घरात राहावयास जागा द्यावयाची, अशी ही योजना होती. ह्या समितीने बांधलेल्या घरांचे तेथे राहणाऱ्या मुलांकडून नुकसान होऊ नये. हा या योजनेचा उद्देश होता. १९०६ च्या अखेरीस समितीच्या सर्व घरात नियोजित केलेल्या शिशुगृहांचे संचालकत्व माँटेसरीकडे देण्यात आले आणि सामान्य बालकांच्या शिक्षणाला नवी दिशा देण्याची संधी माँटेसरीस मिळाली.

माँटेसरी शिक्षण पद्धतीच्या शिक्षण-प्रशिक्षणाचा पहिला वर्ग तिने १९०९ साली उघडला. माँटेसरीची शिक्षणविषयक कल्पना वस्तुनिष्ठतेवर उभारली होती. तीमध्ये जीवनशक्तीचा आविष्कार हे प्रमुख तत्त्व होते. पहिल्या जागतिक महायुद्धांनंतर तिने स्थापन केलेली इटलीतील संस्था बंद पडली. नंतर माँटेसरी अमेरिकेत गेली. तिने न्यूयॉर्क येथे माँटेसरी शिक्षक–प्रशिक्षण महाविद्यालय स्थापन केले व ते एलिनार पार्कहर्स्ट यांच्यावर सोपविले. दुसऱ्या महायुद्धापासून माँटेसरीच्या प्रवासास सुरुवात झाली. या प्रवासात तिने शिशुशिक्षण पद्धतीचे बाजारोपण केले. स्पेनला जाऊन माँटेसरीने प्रयोगशाळा व विद्यालय स्थापन केले. नव्या पद्धतीच्या प्रसारासाठी इंग्लंड, इटली, स्पेन इ. ठिकाणी तिने प्रवास केला.

शिशुशिक्षणाची ती पुरस्कर्ती होती. त्यासाठी तिने नवीन तंत्र व उद्योग शोधून काढले. मुलांचे खेळ व छंद यांवर तिचे मानसशास्त्र अवलंबून होते. अभ्यासाने मुलांना शीण न येता त्यांचा मानसिक विकास साधला जातो. असे तिचे म्हणणे होते. माँटेसरीची काही उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे (१) द ॲब्‌सॉर्बन्ट माइंड, (२) द डिस्‌कव्हरी ऑफ द चाइल्ड, (३) माँटेसरी मेथड (१९१२) (४) डॉ. माँटेसरीज ओन हँडबुक (१९१४) (५) द अँडव्हान्स्‌ड माँटेसरी मेथड (१९१७). नोर्टवाइक (हॉलंड) येथे तिचे निधन झाले.

संदर्भ : 1. Kramer, Rita, Maria Montessori : A Blography, 1976.

             2. Lillard, Paula,Montessori : A Modern Approach, 1972.

 

गोगटे, श्री. ब.