माव दुन : (१८९६–२७ मार्च १९८१). श्रेष्ठ चिनी कादंबरीकार. खरे नाव शन-येन-बिंग. जजियांग प्रांतातील थुङ्‌ग-स्याग येथे जन्मला. पीकींग येथील राष्ट्रीय विद्यापीठाला (पीकिंग नॅशनल युनिव्हर्सिटी) तीन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर, प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला अध्ययन सोडावे लागले. (१९१६) आणि शांघायच्या कमर्शिअल प्रेस मध्ये मुद्रितशोधक म्हणून तो काम करू लागला. तथापि लवकरच त्या संस्थेने त्याला संपादकीय स्वरूपाची कामे द्यावयास सुरुवात केली. तेथे असताना डिकिंझ, एमिल झोला. मोपासा, टॉलस्टॉय, चेकॉव्ह ह्यांसारख्या श्रेष्ठ विदेशी लेखकांचे साहित्य त्याने वाचले. १९२० मध्ये ‘द शॉर्ट स्टोरी मंथली’ (इं. शी.) ह्या मासिकाचा संपादक म्हणून तो काम करू लागला. चिनी साहित्यातील नवप्रवाहांना उत्तेजन देण्यासाठी आणि त्यांचा पुरस्कार करण्यासाठी काही तरूण चिनी लेखकांनी हे मासिक चालवावयास घेतले होते. विदेशी वाङ्‌मयीन जगाचा थोडक्यात परामर्श घेणे , आधुनिक विदेशी साहित्यिकांवर परिचयपर लेख लिहिणे, तसेच चिनी साहित्यावरही चिकित्सक स्वरूपाचे लेखन करणे, ही कामे त्याने आपल्या संपादकीय कारकीर्दीत केली. तथापि १९२३ मध्ये ‘द शॉर्ट स्टोरी मंथली’ च्या संपादकपदाचा राजीनामा देऊन तो राजकारणात शिरला. कम्युनिस्ट चळवळीचा तो एक खंबीर पुरस्कर्ता होता. त्यामुळे मार्क्सवादी विचारशिक्षणाचे केंद्र असलेल्या ‘शांघाय कॉलेज’ मध्ये त्याने काही काळ अध्यापन केले. १९२६ मध्ये चीनच्या एकीकरणासाठी सुरू झालेल्या उत्तरेकडील लष्करी मोहिमेत त्याने क्वोमिंतांगच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या (सेंट्रल इक्झिक्यूटिव्ह कमिटी) प्रचार खात्याचा सचिव म्हणून कामगिरी बजावली. क्वोमिंतांग आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात फाटाफूट झाल्यानंतर (१९२७). त्याने राजकारणाचा त्याग केला. त्यानंतर त्याने ‘द एक्लिप्स’ (१९३०) इं.शी. ही त्रिखंडात्मक कादंबरी ‘माव दुन’ (इं. अर्थ कंट्रॅडिक्शन) ह्या टोपन नावाने लिहिली. उत्तरेकडील मोहिमेच्या काळातले आणि त्यानंतरचे त्याचे अनुभव त्याला ही कादंबरी लिहिताना उपयोगी पडले. ह्या कादंबरीला फार मोठे यश लाभले. श्रेष्ठ चिनी कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. त्यानंतरच्या त्याच्या कादंबऱ्यात – सर्व इ. शी.-‘रेनबो’ (‘द शॉर्ट स्टोरी मंथली’ मधून १९२९ मध्ये क्रमशः प्रसिद्ध). ‘द ट्‌वायलाइट’ (१९३३) ह्यांसारख्या त्याच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. ‘थ्री मेन’ (१९३१ इं. शी.) आणि ‘द रोड’ (१९३२ इं. शी.) ह्या त्याच्या दोन कादंबरीका. मात्र माव दुनने  कथालेखनही केले. ‘द वाइल्ड रोझेस’ हा त्याचा एक उल्लेखनीय कथासंग्रह.

‘रेनबो’ ह्या कांदबरीत जीवनाचा अर्थ शोधणारी नायिका त्याने उभी केली आहे. तर ‘द ट्‌वायलाइट’ मध्ये १९३० ह्या वर्षातील चीनचे चित्रण आहे. त्यात दिलेले अनेक सूक्ष्म संदर्भ, वर्णिलेल्या राजकीय आर्थिक घटना पाहता, माव दुनने ह्या कादंबरीची साम्रगी गोळा करण्यासाठी घेतलेले परिश्रम लक्षात येतात. तिच्यातील सामाजिक वास्तववादी दृष्टींची मार्क्सवादी समीक्षकांकडून प्रशंसा झाली. ‘थ्री मेन’ आणि ‘द रोड’ त्यांच्या एकूण वाङ्‌मयीन कर्तृत्वाच्या तुलनेत विशेष महत्त्वाच्या नाहीत. ‘द वाइल्ड रोझेस’ ह्या कथासंग्रहातील कथातून जुन्या-नव्यांच्या संघर्षात सापडलेल्या काही स्त्रिया दिसतात.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ‘स्टोरी ऑफ द फर्स्ट स्टेज ऑफ द वॉर’, प्यूट्रिफॅक्शन, ‘मेपल लीव्हज ॲज रेड फेब्रुवारी फ्लॉवर्स’ (सर्व इं. शी.) ह्यांसारख्या कादंबऱ्या त्याने लिहिल्या. ‘बिफोर अँड आफ्टर द स्प्रिंग फेस्टिव्हल’ (इं. शी.) ह्या नावाचे एक नाटकही त्याने लिहिले आहे. त्याने लिहिलेले ललित निबंध ‘स्केचीस अँड नोटस’, ‘इंप्रेशन रिफ्लेक्शन्स अँड रेमिनिसन्सिस’ (सर्व इं. शी.) ह्यांसारख्या संग्रहात अंतर्भूत आहेत.

चीनमध्ये कम्युनिस्टांची राजवट आल्यानंतर माव दुनने अनेक वाङ्‌मयी-सांस्कृतिक समित्यांवर काम केले. १९४९ मध्ये सांस्कृतिक मंत्री म्हणूनही त्यांनी नेमणूक झाली. तथापि १९६४ मध्ये त्याला काढून टाकण्यात आले. १९७० नंतर चीनी लेखकांच्या संघटनेचे उपाध्यक्षपद त्याला मिळाले. पीकिंग येथे त्याचे निधन झाले. 

संदर्भ : Hsia, C. T. A History of Modern Chinese Fiction, 1917-1957, New Haven, 1961. 

कुलकर्णी, अ. र.