मालवाहू यंत्रे व वाहक साधने : इमारती, धरणे, रस्ते इत्यादींच्या बांधकामात माती, काँक्रीट वगैरे मालाची ने-आण करण्यासाठी, खाणकामात दगडी कोळसा, विविध खनिजे इत्यादींची वाहतूक करण्यासाठी तसेच बंदरे, कालवे व नद्या यांतील गाळ काढण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची मालवाहू यंत्रे व वाहक साधने वापरण्यात येतात. त्यांचे वर्णन ‘बांधकाम तंत्र’, ‘खाणकाम’ व ‘गाळ उपसणी यंत्रणा’ या नोंदींत दिलेले आहे. प्रस्तुत नोंदीत प्रामुख्याने कारखान्यांत अंतर्गत वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध मालवाहू यंत्रांची व वाहक साधनांची माहिती दिलेली आहे.
विविध कच्च्या मालापासून विनिर्मित (तयार वा पक्क्या) मालापर्यंत सर्व प्रकारच्या मालाची अंतर्गत वाहतूक–विशेषतः महोत्पादन (मोठ्या प्रमाणावरील उत्पादन) पद्धतीत–महत्त्वाची असते. या सर्व प्रकारच्या मालाच्या अंतर्गत वाहतुकीसाठी निरनिराळ्या मालवाहू यंत्रांचा वा वाहक साधनांचा वापर करतात. यामुळे कुशल आणि अकुशल कारागिरांची संख्या कमी होण्याबरोबरच शारीरिक थकवा व अपघातांचे प्रमाण कमी होत असल्याने कार्यक्षमता वाढते. तसेच मालवाहू यंत्रांनी व वाहक साधनांनी उत्पादनाच्या वेगाचे नियंत्रण करता येते व उत्पादनात भर पडून उत्पादन खर्चात बचत होते. त्यामुळे विनिर्मित माल कमी किंमतीत विकता येतो.
कच्च्या मालाचे रूपांतर विनिर्मित मालामध्ये करण्यासाठी त्यावर हाताने व यंत्राने निरनिराळ्या क्रिया-प्रक्रिया कराव्या लागतात. म्हणून अंतर्गत वाहतूक करण्याच्या मालाचे स्वरूप फक्त कच्चा माल हे नसून जसजशा प्रक्रिया त्यावर होत जातात तसतसे त्याचे स्वरूप (अवस्था) बदलत जाते म्हणून अशा अर्धनिर्मित अवस्थेतील मालाचाही त्यात अंतर्भाव होतो. तसेच क्रिया-प्रक्रियांसाठी लागणारे पूरक पदार्थ, सुटे भाग, वस्तू, हत्यारे, साधने, आवेष्टन व बांधणीसाठी लागणारा माल, अपशिष्ट व भंगार (निकामी माल) या सर्वांचा त्यात समावेश होतो.
कारखान्याचा विस्तार मोठा असल्यास त्यात निरनिराळे विभाग पाडून त्यासाठी एक किंवा बहुमजली इमारती बांधलेल्या असतात. त्यातील कार्यालय व कर्मशाला या प्रमुख होत. कार्यालयातून उत्पादनावर नियंत्रण ठेवले जाते, तर कर्मशालेत विनिर्मित मालाचे अथवा वस्तूंचे प्रत्यक्ष उत्पादन केले जाते. या व्यतिरिक्त कारखान्यात आणला जाणारा माल साठविण्यासाठी मध्यवर्ती भांडाराची इमारत व कारखान्याबाहेर बाजारपेठेत पाठवावयाचा तयार झालेला विनिर्मित माल (तयार वस्तू) रचून संग्रहित करण्यासाठी गुदामाची इमारत हे विभाग महत्त्वाचे गणले जातात. विविध विभागांच्या इमारतीत कर्मशाला विभागाचा पसारा सर्वांत मोठा असतो कारण त्यात प्रत्यक्ष उत्पादन करण्यात येते. कच्च्या मालाचे विनिर्मित मालात रूपांतर करण्यासाठी अनेक क्रिया-प्रक्रियां-गणिक कर्मशालेत अनेक उपविभाग पाडलेले असतात. अशा उपविभागांतून क्रिया-प्रक्रियांना लागणारी यंत्रे व साधने यांची मांडणी केलेली असते. उत्पादनातील कार्यानुरूप ते ते उपविभाग एकमेकांशी उत्पादनातील प्रक्रियांच्या क्रमवारीने जोडलेले असतात. अशा मांडणीचा आराखडा तयार करण्यासाठी नियोजन खात्यातील अभियंते अनुभविक व कुशल असावे लागतात. उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्रसंचातील यंत्रांची व साधनांची मांडणी सरळ किंवा वक्र रेषेत करावयाची अथवा गटागटाने कार्यानुसार करावयाची हे विनिर्मित मालावरून ठरवावे लागते. उदा., कागदाच्या उत्पादनाची कृती अखंड असल्याने मांडणी सरळ रेषेत करणे योग्य ठरते. पण एंजिनाच्या उत्पादनाची कृती खंडित असल्याने त्यातील प्रत्येक सुट्या भागाचे उत्पादन स्वतंत्र्यपणे करून नंतर त्यांची जुळणी करण्यासाठी काही मांडणी सरळ वा वक्ररेषेत आणि काही मांडणी गटाने प्रक्रियानुरूप करावी लागते. यासाठी यंत्रे व साधनांची निवडही महत्त्वाची ठरते. विनिर्मित मालाच्या (पदार्थ किंवा वस्तू) एकूण उत्पादन खर्चापैकी साधारणपणे २२ ते ६०% खर्च मालाच्या अंतर्गत ने-आणीवर होतो. म्हणून हा खर्च कमी करावयाच्या प्रयत्नांना आधुनिक काळात उद्योजक विशेष महत्त्व देऊ लागले आहेत. त्यासाठी कारखान्यातून मालवाहतुकीची समस्या सुकर करण्यासाठी खास अभियंत्यांची जरूरी भासते.
आ.१ मध्ये विद्युत् चलित्रांच्या (मोटारींच्या) उत्पादनासाठी कर्मशालेतील उपविभागांची प्रक्रियांनुरूप केलेली मांडणी दाखविली आहे (यातील संज्ञांच्या स्पष्टीकरणासाठी ‘विद्युत् चलित्र’ ही नोंद पहावी). या उपविभागांभोवती मालवाहू हातगाड्यांनी किंवा यांत्रिक गाड्यांनी माल नेण्या-आणण्यासाठी योग्य रूंदीचे मार्ग ठेवलेले असतात.
प्रत्येक उपविभागातील अंतर्गत यंत्रांची मांडणी कच्च्या मालापासून पक्का माल किंवा सुटे भाग करण्याकरिता लागणाऱ्या यांत्रिक क्रियांवर किंवा इतर प्रक्रियांवर अवलंबून असते. यांत्रिक क्रियांना लागणारी यंत्रे, कच्चा मालाचा साठा, तसेच दोन यंत्रांवरील यांत्रिक क्रियांच्या दरम्यान साठा करावयास लागणारी जागा, मालाची वाहतूक करण्याकरिता लागणारी जागा यांचा विचार करून एक त्रिमितीय मांडणी तयार करतात. मालाच्या वाहक साधनांचा व यंत्रांचा उपयोग जास्तीत जास्त कार्यक्षमतेने करण्याच्या दृष्टीने त्रिमितीय प्रतिकृतीत फेरबदल करून यंत्रांची व वाहक साधनांची निश्चित मांडणी केली जाते. त्यानंतर कारखान्यातील संबंधित विभागात प्रत्यक्ष मांडणी केली जाते. आगपेटीच्या उत्पादनातील मांडणी उदाहरणादाखल आ.२ मध्ये दाखविली आहे.
आ.२ मध्ये आगपेटी निर्मितीच्या (अ), (आ), व (इ) या तीन स्वतंत्र रेषीय मांडण्या दाखविल्या आहेत. (अ) मांडणीत दुतोंडी झाकण तयार करण्याऱ्या स्वयंचलित यंत्रांत एक कारागीर पातळ लाकडाचे तक्ते सारीत आहे. दुसरा कारागीर यंत्रांची देखभाल करीत आहे. तिसरा कारागीर पेटीचे परीक्षण करीत आहे. (आ) मांडणीत चौथा कारागीर पेटीच्या आतील खण तयार करणाऱ्या स्वयंचलित यंत्रांची देखभाल करीत आहे. (इ) मांडणीत पाचवा कारागीर तक्ते कापून काड्या तयार करणाऱ्या यंत्राची देखभाल करीत आहे. सहावा कारागीर सुकविलेल्या काड्या वाहक पट्ट्यावर ओतत आहे. सातवा कारागीर खराब काड्या निवडून नालीमार्गात टाकीत आहे. आठवा कारागीर काड्या भरलेल्या धारक गुल लावावयाच्या यंत्रात सारीत आहे. नववा कारागीर आगपेट्यांचे परीक्षण करीत आहे. अशा प्रकारे या मांडण्यांतून अंतर्गत मालाची यांत्रिक वाहतूक वापरल्याने संपूर्ण आगपेटी कच्च्या मालापासून तयार होण्यासाठी फक्त नऊ कारागीर लागतात. यामुळे कारागिरांची एकूण संख्या कमी होते आणि यामुळेच आगपेटी अगदी स्वस्त किंमतीस विकता येते. या उदाहरणावरून मालवाहू यंत्रे व वाहक साधनांचे महत्त्व स्पष्ट होईल.
इतिहास: प्राचीन काळी अनेक देशांत दगड, लाकडी ओंडके, लोखंडी पिंड व पाटे अशा अवजड मालाची ने-आण व चढउतार मनुष्य स्वतःची ताकद लावून पहार, कटावणी, नळाचे तुकडे, चाके, उतरंडी, दोरखंड व कप्प्या यांच्या साहाय्याने ओढून किंवा ढकलून करीत परंतु त्यात श्रम व वेळ जास्त खर्च होऊन अपघाताचे भय असे. विहिरीतून पाणी काढण्यासाठी रहाट व दोर वापरीत. पुढे बैलाने चालविलेली मोट व रहाटगाडगे (एका मोठ्या लाकडी चक्रावर दोरीने बांधून तयार केलेली गाडग्यांची निरंत माळ बसवून) वापरून कष्ट व वेळ वाचवीत. सुटा घन राशिमाल पोत्यांत किंवा घमेल्यांत भरून पाठीवर किंवा डोक्यावर आणि द्रव माल बादलीत वा अन्य धारकात भरून हाताने त्यांची ने-आण करीत. हत्ती, घोडा, उंट, गाढव वगैरे जनावरांच्या पाठीवरील गोण्यांत असा माल घालून त्यांची वाहतूक करीत. पुढे अशा कामासाठी बैलगाडीचा व हातगाडीचा वापर मनुष्य करू लागला. काही अवजड स्तंभांची अथवा खांबांची पायावरील उभारणी गदम (डेरिक) व दोरांच्या साहाय्याने करीत. हात फावड्याने दगडी कोळसा, रेती, माती असा माल भरण्याचे काम करीत. दरखेपेस थोडा थोडा माल किंवा एक एक वस्तू डोक्यावरून वाहून नेण्याऐवजी पुष्कळ माल किंवा अनेक वस्तू एकाच वेळी एक, दोन किंवा चार चाकी हातगाडीतून नेणे कमी श्रमात व वेळेत होऊ लागले. नंतरच्या काळात या प्रकारच्या मालवाहतूक पद्धतीत सुधारणा होऊन जनावरांचा उपयोग कमी करून मनुष्याकडून कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त मालाची वाहतूक करण्यासाठी यारी, ढकलगाडी,
मोटारगाडी वगैरे यांत्रिक वाहकांचा वापर करण्यात येऊ लागला परंतु कारखान्यातील अंतर्गत मालाची ने-आण व चढउतार करण्यासाठी त्या काळी जरी काही मालवाहक साधने निर्माण केली गेली, तरी १८०० मध्ये ईली व्हिटनी यांनी कामाच्या जागेवरच एका कारागिरापासून दुसऱ्या कारागिरापर्यंत माल हलविण्याची यांत्रिक व्यवस्था प्रथमच प्रत्यक्षात आणून बघितली. १८६० मध्ये उपरिवाही यारी कारखान्यात वापरून वरतून मालाची ने-आण सुरू करण्यात आली. १८४३ च्या सुरूवातीस धान्याचे पीठ तयार करण्याच्या गिरणीत पत्र्याच्या बादली वाहकाने चक्कीपर्यंत धान्य वाहून नेण्यास सुरूवात झाली. १९१३ साली अमेरिकेमध्ये फोर्ड मोटार कंपनीत सुट्या भागांची जुळणी करण्यासाठी अनेक प्रकारच्या मालवाहू यंत्रांची व साधनांची योजना केल्याने उत्पादनात खूपच वाढ झाली. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांच्या काळात अशा साधनात अनेक सुधारणा होऊन त्यांचा वापर बहुतेक उत्पादन कारखन्यांतून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला.आधुनिक स्वयंचलन युगात कारागिराला जागचा व हलविता त्याच्या कामाच्या जवळ यांत्रिकीकरणाने योग्य माल पुरविला जातो.
कारखान्यातील अंतर्गत मालवाहतुकीचे क्षेत्र : सामान्यतः उत्पादन प्रक्रियेत पुढील विभाग व उपविभाग क्षेत्रांत मालाची ने-आण व चढउतार करावी लागते : (१) मालभांडार : कारखान्यात आणलेला निरनिराळा माल उतरवून मध्यवर्ती व उपविभाग भांडारांतून निरनिराळ्या जागी सुटा, रचून अगर थप्पी लावून ठेवणे. या भांडारांतून नंतर तो कर्मशाळेतील उपविभागांना पुरविणे. (२) उपविभागातील यंत्रे व साधने यांच्या ठिकाणी सातत्याने माल पुरविण्याची व्यवस्था करणे.( ३) कच्च्या, अर्धनिर्मित आणि विनिर्मिती मालाचे जागजागी गणन, वजन मोजणे, प्रकारीकरण, निरीक्षण व परीक्षण (तपासणी) करणे. (४) सुटा विनिर्मिती माल आवेष्टित करण्यासाठी व बांधण्यासाठी आवेष्टने आणि भरावयाचा माल त्या त्या विभागात पुरविणे. (५) सुटे विनिर्मिती भाग संग्रह कोठीत नेऊन ठेवणे व तेथून उपजुळणी आणि पूर्ण जुळणी उपविभागांत पुरविणे. (६) उपजुळणी व पूर्ण जुळणी उपविभांगात सुट्या भागांची जुळणी करून विनिर्मित माल बांधणी विभागात पोचविणे. (७) आवेष्टन व बांधणी विभागांतील माल गुदामात नेऊन रचणे व बाजारपेठेत पाठविण्यासाठी तेथून उचलणे आणि वाहनात चढविणे. (८) कारखान्यातील मोकळ्या आगरात अपशिष्ट व भंगार माल उपविभागातून गोळा करून नेऊन टाकणे.
उपयुक्तता : कारखान्यातील मालाच्या अंतर्गत वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मालवाहू यंत्रांच्या आणि वाहक साधनांच्या बाबतीत पुढील गोष्टी विचारात घ्याव्या लागतात : (१) मालाची वाहतूक अखंड किंवा खंडित हवी. (२) मालाचे वजन, आकारमान व त्याचा आकार. (३) मालाचे स्वरूप म्हणजे धन, द्रव, वायू, तसेच सुटा किंवा राशी. (४) वाहतूक मार्ग : स्थिर किंवा बदलता, तसेच त्याची दिशा उभी, आडवी किंवा तिरकी आणि मार्ग सरळ किंवा वक्र. (५) मालाला किंवा वाहकाला द्यावयाची गती व ती कोणत्या पद्धतीने म्हणजे हाताने, गुरुत्वीय, नियंत्रित, वायवीय, निर्वात, यांत्रिक व कंपनाने द्यावी. (६) वाहतुकीच्या वेळी मालाला आधार दिलेला असावा किंवा तो लोंबता असावा.
वर्गीकरण : वरील क्षेत्रांत जी मालवाहू यंत्रे व साधने वापरतात त्यांचे वर्गीकरण त्यांच्या ने-आण, चढ-उतार व इतर हालचालींच्या क्रियांनुसार करण्यात येते. तसेच त्याच्या कार्यासाठी लागणाऱ्या शक्तीनुरूपही (हस्त, विद्युत्, द्रवीय, वायवीय, निर्वात, गुरुत्वीय व यांत्रिक) त्यांचे वर्गीकरण केले जाते.
उत्पादन कारखान्यात अथवा उद्योगात मालाची वाहतूक विविध विभागांच्या भोवतीच्या रस्त्यावरून, उपविभागांतील अंतस्थ भूमार्गावरून (पथावरून) तळाला, छताजवळील पोलादी तुळई वा रूळमार्गाने वरतून आणि प्रक्रिया यंत्रे व साधने यांच्या व्ययस्थानी अशा तीन पातळ्यांत आडव्या, उभ्या, कलत्या वा परिचक्र दिशेत करावी लागते. मालवाहतूक अखंड व खंडित अशा दोन प्रकारांची असते म्हणून येथे मालवाहू यंत्रे व वाहक साधनांचे ढोबळ वर्गीकरण पुढीलप्रमाणे केलेले आहे : (अ) पथगामी उच्चालक वाहने, (आ) उपरिवाही उच्चालक व यंत्रे, (इ) भूपृष्ठीय स्थलांतर साधने, (ई) स्वयंचलित माल प्रदान वाहक, (उ) गुरुत्वीय नियंत्रित वाहक.
(अ) पथगामी उच्चालक वाहने: यांत एक चाकी, दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व अधिक चाकी निरनिराळ्या प्रकारांच्या पोलादी वा रबरी धावांच्या हातगाड्या व यांत्रिक गाड्या असतात. आ. ३ मध्ये त्यांचे काही प्रकार दाखविले आहेत.
दुचाकी साध्या हातगाडीत सुट्या वस्तू एक कारागीर ओढून किंवा ढकलून नेतो. दुचाकी पेटी वा डबा हातगाडीत अनेक लहान सहान वस्तू वाहून नेता येतात. सरक हातगाडीत पुढचा दुचाकी भाग मागल्या दुचाकी भागात सरकवून मागल्या भागावरील फलाटवार मालाची ने-आण करता येते. चार चाकी फलाटी गाडीत अनेक वस्तू एकाच वेळी दोन कारागीर वाहून नेऊ शकतात.
द्विशूल उच्चालक गाडी ही हरकामी असल्याने तिचा जास्त वापर भांडार, संग्रह कोठी आणि गुदाम यांच्या कामासाठी करतात. कारखान्यात आलेला माल भांडारात लावून ठेवणे, भांडारातून काढून विभागांना आणि उपविभागांना पुरविणे, उपविभागातील विनिर्मित माल संग्रह कोठीत रचून ठेवणे व तेथून नंतर तो उपजुळणी व पूर्ण जुळणी विभागांत पोचविणे, तसेच विनिर्मित सुटा माल व जुळणी विभागात पूर्ण जुळणी केलेला माल गुदामात नेऊन साठविणे अशा स्वरुपाची वाहतूक ही गाडी उत्तम प्रकारे जलद करते. द्विशूलाचा भाग उभ्या दोन खांबांवर खाली-वर योग्य तेथे सरकविण्याची योजना केलेली असते. विनिर्मित किंवा इतर माल लाकडी किंवा पत्र्याच्या पाटावर रचून ठेवलेला असतो आणि अशा पाटाखाली द्विशूल सारून यांत्रिक पद्धतीने मालासकट पाटच उचलून हव्या त्या ठिकाणी वाहून मांडणीवर (शेल्फावर) ठेवतात. द्विशूल उच्चालक गाडी एक कारागीर चालवू शकतो. ही गाडी बहुधा विद्युत् घटमालेवर चालविली जाते. कधी कधी तेलावर किंवा इंधन वायूवर चालणारे एंजिनही बसवितात. उभे खांब पुढे-मागे कलते करण्यासाठी व द्विशूल पुढे-मागे सरकविण्याकरिता, तसेच खांबांवर वर-खाली सरकविण्यासाठी द्रवीय शक्तीचा उपयोग करतात. त्यासाठी एका टाकीतील तेल (द्रव) पंपाच्या साहाय्याने नियंत्रक झडपांद्वारे पुरविले जाते. झडपांची उघडझाप हातदांड्याने करावी लागते. १,००० किग्रॅ. पासून १०,००० किग्रॅ. वजनाचा माल वाहून नेतील अशा निरनिराळ्या क्षमतेच्या या गाड्या असतात. कागदांची रिळे, तारांची वेटोळी, तेलाची पिंपे वाहून नेण्यासाठी विविध आकारांचे शूल नेहमीच्या द्विशूलाच्या ठिकाणी बसविता येतील अशी योजना केलेली असते.
कारखान्यात वापरण्यात येणाऱ्या अनुवाहनात (ट्रेलरमध्ये) पुढच्या एंजिन गाडीला (ट्रॅक्टराला) चाकांचे अनेक डबे जोडून खूपच माल एकाच खेपेत हलविता येतो. तीन चाकी गाडीत पुढच्या बाजूस एकच लहान चाक असल्याने ही गाडी हव्या त्या दिशेला जलद वळविता येणे सुकर होते. राशिमालाच्या वाहतुकीसाठी हिचा वापर करतात. यांत्रिक गाडीचा फलाट सपाट असून तो शक्य तितका जमिनीलगत असतो. त्यावर यारीच्या किंवा माणसाच्या साहाय्याने अवजड माल ठेवतात व गाडी कारागीर चालवितो. ही गाडी तेल एंजिनाने किंवा विद्युत् घटमालेने चालते. चलद्रवीय यारीने विभाग किंवा उपविभागात यंत्रांचे वगैरे अवजड भाग कप्पीने उचलून हव्या त्या ठिकाणी नेता येतात कारण हिच्या पायाला लहान चाके बसविलेली असतात. सुवाह्य हात यारी व आकडा या साधनाचे दोन पाय पसरट असून त्यांना चाके बसविलेली असतात. पायाच्या जोडावर एक उभा कमानी स्तंभ (जिब) उभारलेला असून त्याच्या तळाला दोन चाके जवळजवळ बसविलेली असतात व त्यामुळे ही यारी कोठेही सहज ओढून नेता येते. कमानी स्तंभाच्या टोकाला एक कप्पी बसविलेली असून तारदोर व आकड्याच्या साहाय्याने माल उचलला जातो. मालाच्या आकाराशी जुळते असे विविध आकारांचे पकडी आकडे किंवा चिमटे वापरतात. यारी बसविलेली गाडी ही मालमोटारीसारखी असून तिच्यात कमान स्तंभी यारी बसविलेली असून ती कोणत्याही कोनात फिरवून आणि जरूर त्या दिशेत कलती करून अवजड मालाची चढउतार हव्या त्या ठिकाणी नेऊन करतात.
(आ) उपरिवाही उच्चालक व यंत्रे: कारखान्यातील काही विभागांतून व उपविभागांतून छताजवळील एक किंवा दोन तुळ्यांवरून किंवा रूळमार्गावरून हाताने, वायवीय शक्तीने किंवा विद्युत्चलित्राने चालणारे उपरिवाही उच्चालक किंवा यंत्रे मालाची चढउतार व वाहतूक करण्यासाठी वापरतात. आ. ४ मध्ये अशी काही साधने दाखविली आहेत. यांना चाके, कप्प्या, तारदोर व आकडे बसविलेले असातात. अशी साधने विविध प्रकारची असतात. [→ उच्चालक यंत्रे].
हस्त उपरिवाही उच्चालकात कप्प्या, तारदोर किंवा साखळी व आकडा यांच्या साहाय्याने माल उचलून असे साधन हव्या त्या ठिकाणी वरच्या रूळावरून हाताने सरकवून मालाची ने-आण करतात. विद्युत् उपरिवाही व वायवीय उपरिवाही उच्चालकांत मालाची चढ-उतार विद्युत् किंवा वायवीय चलित्राने करून वरच्या रूळावरून हाताने सरकवून हव्या त्या ठिकाणी नेतात. वायवीय चलित्राला रबरी नळीवाटे वात संपीडकातील (दाबाखालील हवा पुरविणाऱ्या साधनातील) संपीडित हवा पुरवितात. उपरिवाही यारीची कक्षा २० ते ४० मी. असून तिची चाके विभागातील किंवा उपविभागातील दोन भिंतीजवळील किंवा खांबांच्या दोन रांगांवरील तुळईवर बसविलेल्या दोन रूळमार्गांवरून फिरतात. या यारीवर लंब दिशेत चालणारी दुसरी लहान गाडी फिरते. या गाडीच्या तळाला कप्प्या, तारदोर किंवा साखळ्या व आकडे बसविलेले असतात. मालाची चढउतार व वाहतूक करण्यासाठी यांची हालचाल एक कारागीर करू शकतो. त्यासाठी तो उपरिवाही यारीतील लोंबत्या डब्यात बसतो. आ. ४ मधील (३) मध्ये अशा दोन प्रकारच्या याऱ्या दाखविल्या आहेत. उजवीकडील यारीला जादा लोंबती कमान स्तंभी यारी बसविलेली असून तिचा उपयोग विभागाबाहेर उभ्या राहिलेल्या गाडीतील माल उचलून नेण्यायाठी अथवा अशा गाडीत माल आणून भरण्यासाठी केला जातो.
(इ) भूपृष्ठीय स्थलांतरण साधने: उपविभागातील एका यंत्रापासून दुसऱ्या यंत्राजवळ माल नेण्या-आणण्यासाठी किंवा ठेवण्या-घेण्यासाठी भूपृष्ठावरून हाताने सरकवून किंवा ढकलून स्थलांतरण करणारी साधने वापरतात. यांचे विविध प्रकार असून काहींना चार पाय असतात. पुढच्या दोन पायांना किंवा चारी पायांना तळचक्रिका किंवा तळगोलक बसविलेले असतात. त्यामुळे ते विनासायास हव्या त्या दिशेत जलद सरकविता येतात. आ.५ मध्ये अशा साधनांचे काही प्रकार दाखविले आहेत.
द्रवीय उच्चालनी स्थलांतरण मेजाचा माथा कारागिराच्या किंवा यंत्राच्या हव्या त्या उंचीला उचलून ठेवण्याचे कार्य त्याच्या बैठकीवरील सिलिंडरामध्ये भरलेल्या तेलावर पायटा पंपाने हवा भरून केले जाते. बैठकीच्या तळाला चार कोपऱ्यांना तळचक्रिका बसविल्याने हे मेज कोणत्याही दिशेत सरकविणे सुकर होते. सरकपेटी पन्हळी पाडलेल्या पातळ पत्र्याची केलेली असून तिचे चार पाय बाकदार असतात. यंत्रावर तयार झालेला अर्ध किंवा पूर्ण विनिर्मित माल कारागीर यात टाकतात व अकुशल कारागीर सरकपेटी सरकावून हव्या त्या ठिकाणी नेतात किंवा यांत्रिक गाडीने अथवा द्विशूल उच्चालक गाडीने त्यांची वाहतूक करतात. एकतोंडी व दुतोंडी डबे बहुकप्प्यांचेही असतात. यात वरच्या तोंडाने माल भरतात व बाजूच्या तोंडाने असा माल यंत्रजुळणीसाठी जुळणी विभागात जुळणी कारागीर हाताने काढून घेतो. अशा कारागिराच्या दोन हातांच्या कक्षेत येतील अशी अनेक डब्यांची वक्राकार मांडणी कार्यमेजावर केलेली असते. अशा डब्यांतून विनिर्मित यंत्रभाग ठेवलेले असतात. याव्यतिरिक्त सरकमेज लाकडी किंवा पोलादी पत्र्याच्या चौकोनी अथवा आयत आकाराच्या उथळ व खोल खुल्या तोंडाच्या पेट्या (खण) व सुपाच्या आकाराच्या उथळ व खोल सुपल्या माल ठेवण्यासाठी आणि नेण्या-आणण्यासाठी उपविभागातील यंत्रांजवळ, जुळणी विभागात, संग्रह कोठीत, भांडारात व गुदामात वापरतात.
(ई) स्वयंचलित मालप्रदान वाहक : कारगिरासमोर कामाच्या ठिकाणी माल पुरविण्यासाठी विद्युत् चलित्राने चालविण्यात येणारे अनेक प्रकाराचे अखंड किंवा खंडित स्वयंचलित वाहक उपविभागात व जुळणी विभागात किंवा यंत्रांना माल पुरविण्याकरिता वापरतात. आ. ६ मध्ये अशा वाहकांचे काही प्रकार दाखविले आहेत.
बहुतेक मालप्रदान वाहक विद्युत्चलित्राने चालवितात. पट्टावाहकात निरंत रबरी किंवा चामड्याचा रूंद पट्टा दोन टोकांना दंडगोल पोलादी चल लाटणी बसवून त्यांवर फिरविला जातो. अशा पट्ट्यांना अंतराअंतरावर खालच्या अंगाने अचल दंडगोल किंवा शंक्वाकार लाटण्यांचा आधार दिलेला असतो. जुळणी विभागात अशा वाहकाने कारागिरांसमोर जुळणी भागांचे क्रमवार प्रदान केल्यामुळे ठराविक वेळात त्यांची जोडणी कारागिरांना नेमलेल्या ठिकाणी करावी लागते. भांडारात किंवा गुदामात जड माल नेऊन पोचविण्यासाठी फळकुटी वाहक वापरतात. यात लाकडी किंवा लोखंडी अरूंद पट्ट्या तळ दुहेरी साखळ्यांना जोडलेले असून दातेरी चक्रांनी निरंतसाखळ्या फिरविल्या जातात. लाटणी वाहकात पोलादी शिड्यांतून पोकळ लाटणी (नळीचे तुकडे) गोलक धारव्यात [→ घारवा] अंतराअंतरावर फिरती बसविलेली असतात. त्यावर माल ठेवून हाताने ढकलले की, ती हव्या त्या ठिकाणी घरंगळत जातो. चाकी वाहनात दोन रूळांवरून सरकणारे चाकाचे फलाट बसविलेले असतात व त्यावर माल ठेऊन फलाट हाताने सरकावून हव्या त्या ठिकाणी माल पुरविता येतो. आवेष्टन व बांधणी विभागांत याचा विशेष उपयोग होतो. दुहेरी साखळी दंड वाहकात दुहेरी निरंत साखळ्या दातेरी चक्रे फिरती ठेवून आडव्या दंडांवर अर्धविनिर्मित माल लोंबता अडकवून तो रंगात, द्रवात किंवा रसायनात बुचकळून त्यावर हव्या त्या प्रक्रिया करतात. गाडी वाहकात चाकाच्या उघड्या गाड्या दोन रूळांवरून हाताने सरकवून अवघड माल पोलादनिर्मिती कारखान्यात अथवा ओतशालेय पुरविण्याची योजना केलेली असते. भूपृष्ठीय रूळवाहकाच्या बाबतीत भूपृष्ठावर एक रूळ बसवून त्याच्या खोबणीतून निरंतसाखळी किंवा तारदोर फिरविला जातो. अशा रूळावरून चार चाकी फलाट गाडीतून मालाची ने-आण केली जाते. फलाटी गाड्या जोड खिळीच्या साहाय्याने तारदोरावरील ढकलपट्टीला हव्या तेव्हा जोडता किंवा सोडता येतात. आवेष्टित विनिर्मित माल या गाड्यांतून नेतात. उच्चालकी तबक वाहकात दुहेरी साखळ्यांना पंजाच्या आकाराची पोलादी तबके बसवून ती दातेरी चक्रावर फिरवून मालाची वाहतूक तळमजल्यावरून वरच्या मजल्यावर करता येते. राशिमाल पट्टावाहकात सुटा कच्चा माल (उदा., खनिज) पट्ट्यावरून वाहून नेला जातो. उच्चालकी बादली वाहकात दुहेरी साखळ्यांना पत्र्याच्या विशिष्ट आकाराच्या बादल्या ठराविक अंतरावर जोडून त्या दातेरी चाकांनी फिरविल्या जातात. या बादल्यांतून सुटा राशिमाल तळमजल्यावरून वरच्या मजल्यावर वाहून नेऊन हव्या त्या ठिकाणी बादल्या पालथ्या करून ओतला जातो. मळसूत्री वाहकात मळसूत्री दंड विद्युत् चलित्राने फिरवून नसराळी पात्रातील सुट्या चूर्णरूप राशिमालाचा हव्या त्या ठिकाणी पुरवठा करता येतो.
(उ) गुरुत्वीय नियंत्रित वाहक : यात निरनिराळ्या आकाराच्या पोलादी पत्र्यांच्या उतरंडी, पन्हळी व नाळी वापरून गुरुत्वीय पद्धतीने माल यंत्रांना किंवा साधनांना पुरविला जातो. मालाच्या प्रकारीकरणासाठी लाकडी किंवा पत्र्याचे पन्हळी किंवा सुपली घसरक वापरतात. आ. ७ मध्ये त्यांचे काही प्रकार दाखविले आहेत.
घसरी वाहकाला उतार दिलेला असून त्यावरून मालाची खोकी किंवा पिंपे घसरत वा घरंगळत हव्या त्या जागी पोहोचविली जातात. पन्हळी वाहक उतारावर बसविलेले असून त्यांवरून मालाची घसरण होते. नाळी वाहक आकारमानाने लहान असून त्याद्वारे माल यंत्रांत भरविला जातो. सर्पिल वाहक गोल जिन्यासारखा असून त्यातून वरच्या मजल्यावरील माल गुरूत्वीय व केंद्रोत्सारी नियंत्रणांनी खालच्या मजल्यावर आणला जातो. आ. ७ मध्ये पोलादी पोकळ दंडगोल लाटणी बसविलेला सर्पिल वाहक दाखविला आहे. त्यामुळे माल घरंगळत जलद पोहोचतो. पोकळ लाटण्यांऐवजी सपाट पत्र्याचा तळ असलेले सर्पिल वाहक सुटा राशिमाल अथवा लहानसहान वस्तू पोहोचविण्यासाठी वापरतात. प्रकारीकरणासाठी वापरण्यात येणारा घसरक आ.२ (१५) मध्ये दाखविला आहे.
मालवाहू यंत्रे व वाहक साधने संपूर्ण हस्तचलित, संपूर्ण शक्तिचलित आणि अंशतः हस्त व अंशतः शक्तिचलित प्रकारची तयार केली जातात.
कारखान्यात निरनिराळ्या विभाग व उपविभागांत कच्च्या, अर्धविनिर्मित आणि पूर्णविनिर्मित मालाची चढउतार व ने-आण करण्यासाठी पूर्वी मोठ्या संख्येने अकुशल कारागिरांची मदत घ्यावी लागे. माणसाची शक्ती मर्यादित असल्याने या पद्धतीत जास्त वेळ तर मोडला जाईच पण माल कामाच्या ठिकाणी वेळेवर न पोहोचल्याने विनिर्मित मालाचे उत्पादन खंडित होई. तसेच जागाही जास्त लागे. त्यामुळे खर्चाचा भार वाढून उत्पादनही घटत असे. आधुनिक मालवाहू यंत्रे व वाहक साधनांच्यामुळे कारागीर खूपच कमी लागून माल वेळेवर कामाच्या ठिकाणी स्वयंचलित पद्धतीने पोहोचू लागल्याने उत्पादनात खंड न पडता खूपच वाढ होऊ लागली.
वरील दृष्टिकोन फायद्याचा ठरल्याने अलीकडे भारतातील बहुतेक मोठे कारखानदार अशा मालवाहू साधनांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. त्यांच्या मागणीप्रमाणे अशी साधने भारतात पुढील कंपन्या तयार करतात : (१) मॅक्निल अँड बॅरी लि. कंपनी २५ प्रकारची मालवाहू साधने तयार करते (२) व्होल्टाज लि. कंपनी तेल एंजिनावर चालणाऱ्या द्विशूल उच्चालक गाड्या रशिया व ईजिप्त देशांनाही पुरविते (३) वेस्टर्न मेकॅनिकल इंडस्ट्रीज लि. कंपनीने २० टनी विशिष्ट प्रकारची ३३·५ मी. लांबीची व १०·७ मी. उंचीची यारी सिंगापूरला पुरविण्यात यश मिळविले आहे (४) गोदरेज बॉइस लि. (५) जोस्ट एंजिनियरिंग लि. (६) टॅक मशिनरी लि. (७) ब्रॅडी अँड मॉरिस एंजिनियरींग लि. (८) मार्शल अँड सन्स (९) हिंदुस्तान मोटर्स (१०) भारत अर्थ मुव्हर्स (११) टाटा एंजिनियरिंग अँड लोकोमोटिव्ह कं. (टेल्को) तसेच इतर लहानमोठे कारखाने.
भारतातील दुर्गापूर पोलाद कारखान्याने तर २५% भांडवल मालवाहू यंत्रे व वाहक साधनांसाठी खर्च केले आहे. सर्वांत उपयुक्त ठरलेल्या २ ते १० टनी द्विशूल उच्चालक गाड्यांचे उत्पादन भारतात होऊ लागले आहे.. १,००० मिमी. रूंदीच्या पट्ट्याचे दर मिनिटाला १५० मी. गती असणारे पट्टावाहकही भारतात तयार होतात. विद्युत् परिवाही उच्चालकांचे भारतातील उत्पादन १९७५ मध्ये ९,००० होते.
पहा : उच्चालक यंत्रे खाणकाम गाळ उपसणी यंत्रणा बांधकाम तंत्र यारी.
संदर्भ : 1. Apple, J.M. Plant Layout and Materials Handling, New York, 1963.
2. Baumeister, T. Marks, L. S., Ed., Standard Handbook for Mechanical Engineers, New York, 1967.
3. Booth, K. E. Chantrill, C.G. Material Handling with Industrial Trucks, London, 1962.
4. Immer, J. R. Materials Handling, New York, 1953.
5. Staniar, W., Ed., Plant Engineering Handbook, New York, 1959.
वैद्य, ज. शि. ओक, वा. रा. दीक्षित, चं. ग.
“