मार्डुक : प्राचीन बॅबिलोनियातील एक प्रमुख देव. बॅबिलन हे ह्या देवाचे मुख्य पीठ होते तसेच तेथे त्याचे एक भव्य व गगनचुंबी देवालयही होते [→ झिगुरात]. मार्डुक वा मेरोडाख हा मुळात सुमेरियन लोकांचा गौण देव होता परंतु सेमिटिक ⇨ ॲमोराइट लोकांनी बॅबिलोनियात त्यांच्या पहिल्या राजघराण्याची स्थापना केली (इ. स. पू. १८३०) तेव्हा त्यांनी मार्डुकला आपला सर्वश्रेष्ठ देव बनविले. त्यापूर्वी ऊरुक येथील स्वर्ग वा आकाशदेव अनू, एरिडू येथील जलदेव इआ आणि निप्पुर येथील पृथ्वीदेव एन्‌लिल हे बॅबिलोनियातील तीन नगरराज्यांचे तीन प्रमुख देव होते. त्यांतील एन्‌लिल हा देव विशेष सामर्थ्यशाली मानला जाई. बॅबिलनविजेत्या नव्या राजांना त्यांचा स्वतःचा सर्वश्रेष्ठ देव हवा होता म्हणून आधीच्या तीनही देवांना मार्डुकमध्ये सामावून मार्डुक हाच आपला सर्वश्रेष्ठ देव त्यांनी मानला. अकेडियन भाषेत लिहिलेल्या ‘सृजनाच्या महाकाव्यात ’ (एनुमा एलिश) मार्डुकने तैमात ह्या राक्षसीचा आणि तिचा पती किंगू याचा वध केला तैमातच्या शरीराचे दोन तुकडे करून त्यापासून पृथ्वी व आकाश तसेच किंगूच्या रक्तापासून मानवप्राणी निर्माण केले आणि विश्वाची घडी परत नीट बसविली, अशी एक पुराणकथा दिलेली असून ती प्रख्यात आहे.

यानंतरच्या दीड हजार वर्षांत मार्डुक हा बॅबिलोनियातील सर्वश्रेष्ठ देव म्हणून पूज्य मानला जात होता. त्याचा पिता इआ व माता दमकिना. इ. स. पू. सतराव्या शतकारंभी ⇨ हामुराबीने (इ. स. पू. अठरावे शतक) बॅबिलन हे मेसोपोटेमियाचे सर्वोच्च केंद्रस्थान बनविले. त्याने कोरविलेल्या प्रख्यात विधिसंहितेच्या दगडाच्या शीर्षभागी मार्डुक ह्या देवाजवळून राजा ही विधिसंहिता स्वीकारीत असल्याचे शिल्प कोरलेले आहे. हामुराबीनंतर सत्तेवर आलेल्या ⇨ कॅसाइट, ॲसिरियन [→ ॲसिरिया], खाल्डियन [→ खाल्डिया], पर्शियन आणि मॅसिडोनियन राजांनी ‘बॅबिलनचा सर्वश्रेष्ठ देव मार्डुक’ म्हणून केलेले कोरीव उल्लेख आढळतात.

यानंतरच्या काळात बॅबिलोनियातील ॲरेमाइक भाषेत मार्डुकला ‘बेल’ (म्हणजे ‘स्वामी’, ‘प्रभु’) म्हटलेले आढळते. इ. स. पू. सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात बॅबिलनचा आणि मार्डुकच्या मंदिराचा हिब्रूंनी विध्वंस केला असावा, असे काही विद्वानांचे मत आहे. पर्शियन साम्राज्याचा संस्थापक सायरस राजाने जेव्हा बॅबिलन जिंकले (इ. स. पू. ५३९) तेव्हा त्याने मार्डुकच्या श्रेष्ठतेचा आणि प्रभावाचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. इ. स. पू. ३३१ मध्ये अलेक्झांडरनं बॅबिलन जिंकले तेव्हा त्याने मार्डुकचे उद्‌ध्वस्त देवालय पुन्हा बांधून काढावे असा आदेश दिला होता परंतु ते बांधण्यापूर्वीच अलेक्झांडर मरण पावला.

पहा : बॅबिलन बॅबिलोनिया.

सुर्वे, भा. ग.