मार्खोर : हा एक प्रकारचा रानबकरा असून याला इराणी लोकांनी मार्खोर हे नाव दिले आहे. याला हिमालायातील जंगली बकरादेखील म्हणतात. घनदाट अरण्ये आणि उंच हिमाच्छादित पर्वत यांच्यामध्ये असणाऱ्या डोंगराळ प्रदेशात हा मुख्यतः राहतो. या सीमाप्रदेशात मोठमोठे खडक व पर्वतांचे उंच कडे असून झाडाझुडपांचे प्रमाण मर्यांदित असते. हिमरेषेच्या वर हे प्राणी क्वचितच जातात. मार्खोरचा प्रसार काश्मीरमधील पीर पंजाल पर्वतापासून पश्चिमेकडे बल्टिस्तान, बलुचिस्तान, अस्तोर, हुंझा व अफगाणिस्तान या प्रदेशांत झालेला आहे. तो उत्तर पंजाबमध्ये सुध्दा आढळतो. याचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) प्लायोसीन (सु १·२ ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत भारतामध्ये आढळले आहेत.
मार्खोर हा एक आकर्षक प्राणी असून हा सामान्यतः गर्द तांबूस तपकिरी रंगाचा असतो. उंची ९५–१०० सेंमी. असते. याच्या अंगावर दाट लांब केस सतात. याला लांब दाढी आणि जवळजवळ घुडग्यापर्यंत पोहोचणारी लांब आयाळ असते. नर व मादी या दोघांनाही लांब स्क्रूप्रमाणे पिळदार शिंगे असतात. ती एकमेकांच्या बरीच जवळ असतात. शिंगाचे पीळ व दूरदूर व रूंद नागमोडी किंवा अगदी जवळजवळ घट्ट असतात. शिंगांची लांबी १००–१६५ सें. मी. असते. मेंढीप्रमाणे मार्खोरदेखील गवत, झुडपे इ. खातो. नराच्या अंगाला एक प्रकारचा उग्र वास येतो. यांचे लहान लहान कळप असून वयस्क मादी कळपाची पुढारी असते. यांचे खूर दुभंगलेले असल्यामुळे डोंगराळ प्रदेशातील चढ-उतारावर व खडकांवर यांना सहज चालता व धावता येते. यांच्या प्रजोत्पादनाचा काळ हिवाळा हा होय. गर्भावधी २१–२२ आठवडे असून मादी दर खेपेस एक किंवा दोन पिल्लांना जन्म देते. करडांना ८–११२ महिन्यांत प्रौढ दशा प्राप्त होते. या प्राण्यांची आयुर्मर्यादा १९ वर्षे असते.
मार्खोरचे दूध पौष्टीक असते. शिकारी लोकांना याची शिकार करणे फार आवडते. याच्या कातडीपासून उत्तम प्रकारचे कमावलेले कातडे तयार करतात व त्याचा अनेक वस्तू तयार करण्याकरिता उपयोग करतात. याच्या केसांपासून जाड, टिकाऊ व उबदार कापड तयार करतात.
मार्खोरच्या एकंदर पाच प्रजाती आहेत. त्यापैकी हिमालयी मार्खोर, पंजाबी मार्खोर आणि अस्तोरी मार्खोर या प्रमुख आहेत. हिमालयी मार्खोर हा सर्वांत मोठा होय. याची सरासरी १०० सेंमी. व वजन सु. शंभर किग्रॅ. असते. याला कधीकधी ‘जंगली बकऱ्यांचा राजा’ म्हणतात.
ढाहाके, शा. ल.
“