व्हल्‌द्यीम्यिर माय्‌कोव्हस्की

माय्‌कोव्हस्की, व्हल्‌द्यीम्यिर : (१९ जुलै १८९३–१४ एप्रिल १९३०). श्रेष्ठ रशियन कवी. जन्म रशियन जॉर्जियातील बगदादी येथे. १९०६ साली त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तो त्याच्या कुटुंबियांसह मॉस्कोला आला. १९०८ साली तो बोल्शेव्हिक पक्षाचा सदस्य झाला. राजकीय कारणांसाठी त्याने अनेकवार तुरुंगवास भोगला. तरुंगात असतानाच तो कविता लिहू लागला. ‘मॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ पेंटिंग, स्कल्प्‌चर अँड आर्किटेक्चर’ (इं. अर्थ) ह्या संस्थेत त्याने १९११ मध्ये प्रवेश घेतला. तथापि १९१४ मध्ये त्याला ह्या संस्थेतून काढून टाकण्यात आले. माय्‌कोव्हस्कीने कविता लिहावयास सुरुवात केली, तेव्हा रशियन साहित्यात नवकालवादी (फ्यूचरिस्ट) प्रवृत्तींचा प्रभाव दिसू लागला होता. छंदांच्या प्रकारांत क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणणे, रशियन छंदशास्त्र्याच्या संदर्भात नव्या शक्यतांचा शोध घेणे, कवी हा कोणी द्रष्टा वा धर्मगुरू नसून तो श्रमिक आहे कारागीर आहे ही भूमिका रशियन नवकालवादी कवींची होती. काव्यात्मतेचा पारंपरिक अर्थ त्यांना मान्य नव्हता आणि म्हणूनच त्या अर्थाचे भान ठेवून तयार केलेले पारंपारिक काव्यनियमही त्यांना मान्य नव्हते. रशियन कवितेतील प्रचलित शब्दकळा दूर सारून कवितेची नवी भाषा घडविण्याचा ध्यासही त्यांनी घेतलेला होता. ‘ए स्लॅप इन द फेस ऑफ पब्‍लिक टेस्ट’ (इं. शी.) ह्या नावाने एक जाहीरनामाही त्यांनी काढला होता. ह्या नवकालवाद्यांचा प्रभाव माय्‌कोव्हस्कीवरही पडला तथापि लवकरच ह्या प्रभावाच्या पलीकडे असलेली त्याची एक स्वतंत्र कविप्रतिमा प्रस्थापित झाली.

माय्‌कोव्हस्कीच्या आरंभीच्या कवितांपैकी ‘ए क्‍लाउड इन ट्राउझर्स’ (१९१५, इं. शी.) आणि ‘द बॅक्‌बोन फ्ल्यूट’ (१९१६, इं. शी.) आणि वॉर अंड द वर्ल्ड’ (१९१६, इं. शी.) ह्या तीन रचना विशेष उल्लेखनीय होत. तसेच ‘व्हल्द्यीम्यिर माय्‌कोव्हस्की ए ट्रॅजिडी’ (प्रयोग १९१३) हे त्याचे पद्यनाटक होय. त्याच्या कवितेच्या भाषा अवघड असली, तरी ती त्याने हेतुतः वापरलेली असून तिच्यावर त्याच्या स्वतंत्र, सर्जक व्यक्तिमत्त्वाचा ठसा स्पष्टपणे उमटलेला दिसतो. तसेच वाचकाला किंवा श्रोत्याला थेट आवाहन करण्याची क्षमता तिच्यात दिसून येते.

१९१७ मध्ये रशियात झालेल्या क्रांतीचे माय्‌कोव्हस्कीने मनःपूर्वक स्वागत केले ‘ओल्ड टू रेव्हलूशन’ (१९१८, इं. शी.) आणि ‘लेफ्ट मार्च’ (१९१९, इं. शी.) सारख्या कविता लिहिल्या आणि त्यांना फार मोठी लोकप्रियता लाभली. ‘मिस्टरी बूफ’ (प्रथम प्रयोग १९२१, इं. शी.) ह्या नाट्यकृतीत त्याने श्रमिकांनी बूर्झ्वा जगताचा केलेला पराभव चित्रित केला. सोव्हिएत रशियाची कोंडी करू पाहणाऱ्या बूर्झ्या पाश्चिमात्यांना उत्तर म्हणून त्याने ‘१५,००,००,००० हे दीर्घकाव्य लिहिले (१९२०, शिर्षकात रशियातील तेव्हाच्या रहिवाशांची संख्या). १९२४ मध्ये लेनिनच्या मृत्युवर तीन हजार ओळींची एक विलापिका त्याने रचिली. १९२५ नंतर त्याने यूरोप-अमेरिकेचा दौरा केला तसेच मेक्सिको आणि क्यूबा ह्या देशांना भेटी दिल्या. ह्या प्रवासात त्याच्या मनावर झालेले संस्कार त्याने कवितांतून व्यक्तविले. अमेरिका भेटीवर त्याने लिहिलेले निबंधही (१९२६, ‘माय डिस्कव्हरी ऑफ अमेरिका’, इं. शी.) गाजले.

द बेड बग (प्रयोग १९२९, इं. भा. १९६०) आणि ‘द बाथ हाउस ’ (१९१३०, इं. शी.) ही त्याची दोन उपरोधप्रचुर नाटके त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वातली. समकालीन परिस्थितीवर आधारलेल्या ह्या नाट्यकृतींतील तीव्र उपरोधामुळे सोव्हिएत युनियनमध्येच माय्‌कोव्हस्कीविषयी काही काळ गैरसमज निर्माण झाले होते.

माय्‌कोव्हस्की यूरोपच्या दौऱ्यावर असताना, पॅरिस शहरी एका निर्वासित रशियन मुलीशी त्याची गाठ पडली व तो तिच्या प्रेमात पडला. तथापि तिने त्याला नकार दिला. सोव्हिएत रशियात त्याच्याविषयी निर्माण झालेल्या गैरसमजांमुळेही त्याचे मन अस्वस्थ होते. रशियाबाहेर प्रवास करण्याची परवानगीही त्याला मिळणे अवघड झाले होते. अशा परिस्थितीत मॉस्को येथे त्याने आत्महत्या केली. सोव्हिएत युगाचा सर्वश्रेष्ठ कवी म्हणून स्टालिनने त्याचा गौरव केला.

संदर्भ : 1. Beake, P. Ed. The Bedbug and Selected Poetry, 1962.

              2. Boleslaw, Taborski. Irans. The Life of Mayakovski, New York, 1971.

              3. Bowra, C. E. Stahlberger, L. The Symbolic System of Mayakovski, The Hague, 1965.

              4. Brown, Edward, J. Mayakovski : A Poet in the Revolution, Princeton New Jersy, 1973.

              5. Marshal, H. Ed. And Trans. Mayakovski and His Poetry, London, 1965.

कुलकर्णी, अ. र.