मायनट (मिनो), जॉर्ज रिचर्ड्‌स : (२ डिसेंबर १८८५–२५ फेब्रुवारी १९५०). अमेरिकन वैद्य. मारक ⇨ पांडूरोगावरील यकृत चिकित्सेच्या शोधाबद्दल त्यांना ⇨ विल्यम् पॅरी मर्फी व ⇨ जॉर्ज हायट व्हिपल यांच्याबरोबर १९३४ चे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान या विषयातील नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. रक्तविज्ञानात मायनट यांचे विशेष महत्त्वाचे कार्य आहे.

मायनट यांचा जन्म बॉस्टन येथे झाला. त्यांनी हार्व्हर्ट कॉलेज मधून ए. बी. (१९०८) आणि हार्व्हर्ट मेडिकल स्कूलमधून एम्. डी. (१९१२) या पदव्या मिळविल्या. बॉस्टन येथील मॅसॅचूसेट्‌स जनरल हॉस्पिटलमध्ये १९१५–२३ या काळात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. त्या वेळी त्यांनी रक्तविकृतींसंबंधी संशोधन केले. हार्व्हर्ट विद्यापीठीतील कॉलिन्स पी. हटिंग्टन मेमोरियलमघ्ये प्रमुख वैद्य म्हणून (१९२२–२८), तसेच बॉस्टन येथील पीटर बेंट ब्रिगम हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सहयोगी म्हणून (१९२३–२८) त्यांनी काम केले. १९२८ नंतर मृत्युपावेतो ते विद्यापीठीत वैद्यकाचे प्राध्यापक, तसेच बॉस्टन सिटी हॉस्पिटलमधील थॉर्नडाइक मेमोरियल लॅबोरेटरीचे संचालक होते.

मायनट यांनी मर्फी यांच्याबरोबर त्या काळी असाध्य गणल्या जाणाऱ्या मारक पांडूरोगाच्या कारणांवर संशोधन केले. मारक पांडूरोगाच्या रूग्णांच्या आहारात न्यूनता असल्याची मायनट यांची खात्री झालेली होती. त्याच सुमारास व्हिपल यांनी अत्याधिक रक्तस्त्रावाने पाडूरोग उत्पन्न केलेल्या कुत्र्यांना कच्‍चे यकृत खावयास दिल्यास रोग बरा होतो, असे दाखविले होते. १९२६ मध्ये मायनट व मर्फी यांना असे आढळून आले की, मारक पांडूरोग झालेल्या मानवी रूग्णाला दररोज गोमांसातील सु. ०·२ किग्रॅ. कच्‍चे यकृत आहारातून दिल्यास रोगाला उतारा पडतो. हा उपचार ‘मायनट-मर्फी उपचार’ किंवा ‘ मायनट-मर्फी आहार’ म्हणून ओळखला जातो. असांसर्गिक रोगांच्या चिकित्सेतील हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. अमेरिकेन रसायनशास्त्रज्ञ एडविन जे. कोन यांच्याबरोबर मायनट यांनी परिणामकारक यकृत-अर्क तयार करण्यात यश मिळविले. १९४८ पर्यंत असा अर्क तोंडावाटे देणे ही पांडूरोगावरील प्रमाणभूत प्राथमिक चिकित्सा मानण्यात येत होती. त्या वर्षी यकृत-अर्कातील एक रोगनिवारक घटक अलग करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले व त्याला ब१२ जीवनसत्व असे नाव देण्यात आले [→ जीवनसत्व ब१२ ].

मायनट व त्यांच्या अनेक विद्यार्थांनी १९२६ नंतरच्या दशकात केलेल्या संशोधनामुळे नैदानिक रक्तविज्ञानाला एक नवी दिशा मिळाली. त्यामुळे रक्त-उत्पादक व रक्तनाशक इंद्रियांच्या आकारवैज्ञानिक (आकार व संरचना यांविषयीच्या विज्ञानाच्या दृष्टीने) अभ्यासाची जागा त्यांच्या कार्याच्या गतिकीय मापनाने घेतली. मायनट व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्ताधान (उपचाराचा एक भाग म्हणून रूग्णाला रक्त देणे), रक्तक्‍लथन (रक्त साखळणे), रक्तबिंबाणू (रक्तक्‍लथनाशी संबंधित असलेल्या वर्तुळाकार वा अंडाकार सूक्ष्म तबकड्या) इत्यादींविषयीच्या अभ्यासाचे प्रारंभिक कार्य केले.

विल्यम बी. कासल यांच्या सहकार्याने मायनट यांनी पॅथॉलॉजिकल फिजिऑलॉजी अँड क्‍लिनिकल डिस्क्रिप्शन ऑफ द अनिमियाज (१९३६) हा ग्रंथ लिहिला. ते ब्रुकलिन (मॅसॅचूसेट्‌स) येथे मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं.