मायकेलसन,आल्बेर्टआब्राहाम: (१९ डिसेंबर १८५२–९ मे १९३१). अमेरिकन भौतिकीविज्ञ. त्यांनी तयार केलेली अचूक प्रकाशीय उपकरणे व त्यांच्या साहाय्याने त्यांनी केलेले वर्णपटविज्ञान व मापनविज्ञान यांतील संशोधन यांकरिता मायकेलसन यांना १९०७ सालाच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. प्रकाशाच्या वेगाचे मापन व अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ⇨ एडवर्ड विल्यम्स मॉर्ली (मोर्ले) यांच्या सहकार्याने त्यांनी पृथ्वीच्या सभोवतालच्या अवकाशातील तिच्या गतीसंबंधी केलेला प्रयोग (हा प्रयोग ‘मायकेलसन – मॉर्ली प्रयोग’ या नावाने ओळखण्यात येतो) यांकरिता ते विशेष प्रसिद्ध आहेत. हा प्रयोग पुढे ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांनी मांडलेल्या ⇨सापेक्षता सिद्धांतात महत्त्वाचा ठरला.
मायकेलसन यांचा जन्म प्रशियातील (आता पोलंडमधील) शट्रेल्नो येथे झाला. लहानपणीच त्यांनी आईवडिलांबरोबर अमेरिकेस सॅनफ्रॅन्सिस्को येथे स्थलांतर केले. ॲन्नापोलिस (मेरिलँड) येथील युनायटेड स्टेट्स नेव्हल ॲकॅडेमीत शिक्षण घेऊन १८७३ मध्ये त्यांनी पदवी मिळविली. त्यानंतर दोन वर्षे वेस्ट इंडिजमध्ये समुद्रपर्यटन केल्यावर त्यांनी ॲकॅडेमीतच १८७५–७९ या काळात भौतिकीय शास्त्रांतीलनिदेशक म्हणून काम केले.त्यानंतर दोन वर्षे त्यांनी बर्लिन,हायडल्बर्ग आणि पॅरिस येथीलविद्यापीठांत भौतिकीचे शिक्षणघेतले. १८८१ मध्ये त्यांनीनाविक दलाचा राजीनामा दिला. १८८३ मध्ये अमेरिकेसपरतल्यावर क्लीव्हलँड (ओहायओ) येथील केस स्कूल ऑफॲप्लाइड सायन्स या संस्थेत तेभौतिकीचे प्राध्यापक झाले. पुढे १८९० साली ते वुस्टर (मॅसॅचू सेट्स) येथील क्लार्क विद्यापीठात प्राध्यापक झाले आणि नंतर नवीनच स्थापन झालेल्या शिकागो विद्यापीठात १८९२ मध्ये भौतिकीचे प्राध्यापक व पहिले विभाग प्रमुख झाले. पहिल्या महायुद्धात ते राखीव अधिकारी म्हणून नाविक दलात दाखल झाले. १९१८ मध्ये ते शिकागो विद्यापीठात परतले. पुढे १९२९ मध्ये पॅसाडीना येथील मौंट विल्सन वेधशाळेत काम करण्यासाठी त्यांनी शिकागो विद्यापीठातील आपल्या पदाचा राजीनामा दिला.
मायकेलसन यांचे प्रमुख कार्य प्रकाशकीसंबंधीचे आहे. प्रकाशाचा वेग अचूकपणे मोजण्यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयोग केले. १८७९ मध्ये त्यांनी जे. बी. एल्. फूको यांच्या उपकरणात सुधारणा करून प्रकाशाच्या वेगाचे अधिक विश्वसनीय मापन केले [→ प्रकाशवेग]. १८८३ मध्ये त्यांनी काढलेले २,९९,८५३ किमी./से. हे प्रकाशवेगाचे मूल्य बरीच वर्षे सर्वोत्तम मानले जाते होते. प्रकाशाच्या निरीक्षित वेगावर पृथ्वीच्या गतीचा काही परिणाम होतो की काय हे पहाण्यासाठी यूरोपमध्ये असताना त्यांनी त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारे व्यतिकरणमापक [→ व्यतिकरणमापन] हे उपकरण तयार केले. या उपकरणाचा उपयोग करून मार्ली यांच्या सहकार्याने त्यांनी १८८७ मध्ये त्यांचा प्रसिद्ध प्रयोग केला. या प्रयोगाचे मुख्य उद्दिष्ट पृथ्वी सूर्यसापेक्ष सर्वव्याप्ती ईथरामधून [→ ईथर -२] फिरत असताना ईथरामुळे प्रकाशवेगात किती फरक पडतो तो मोजून त्यावरून पृथ्वीचा ईथरसापेक्ष वेग म्हणजेच निरपेक्ष वेग मोजणे हा होता. हाच प्रयोग इतर शास्त्रज्ञांनीही सुधारणा करून व पुनःपुन्हा करून पाहिला परंतु सर्व अंतर्गत संदर्भ-व्यूहांत[→ संदर्भ-व्यूह] प्रकाश एकाच स्थिर वेगाने जातो असे आढळून आले. हा नकारार्थी प्रयोग विज्ञानाच्या इतिहासात फार महत्त्वाचा ठरला आहे. न्यूटन यांच्या अभिजात भौतिकीनुसार हे नकारार्थी उत्तर म्हणजेच प्रकाशाचा वेग व त्यात इतर कोणताही वेग मिळविला, तरी त्यांची बेरीज प्रकाशाच्या वेगाइतकीच येते हा विरोधाभास होतो. यामुळे मायकेलसन-मॉर्ली प्रयोगाच्या निष्पत्तीचे स्पष्टीकरण करण्यासाठी भौतिकीची नव्याने व अधिक परिशुद्ध पायावर उभारणी करणे आवश्यक झाले आणि ते कार्य १९०५ मध्ये आइन्स्टाइन यांनी मांडलेल्या सापेक्षता सिद्धांताद्वारे झाले.
मायकेलसन यांनी आपल्या व्यतिकरणमापकाच्या साहाय्याने प्रकाशाच्या तरंगलांबीच्या रूपात अचूकपणे अंतर मोजता येते, असे दाखविले. यावरून त्यांनी प्रकाशाच्या एखाद्या विशिष्ट तरंगलांबीच्या अंतराचे मानक (प्रमाण) म्हणून उपयोग करावा, असे सुचविले (ही सूचना १९६० मध्ये सर्वमान्य झाली). १८९३ मध्ये त्यांनी वजने आणि मापे यांविषयीच्या आंतरराष्ट्रीय समितीच्या विनंतीवरून मानक मीटरची लांबी तप्त कॅडमियमाने उत्सर्जित केलेल्या तांबड्या प्रकाशांच्या तरंगलांबीच्या रूपात (१५,५३,१६३·५ तरंगलांब्या) मोजली. त्यांनी सोपान वर्णपटदर्शक [वर्णपट मिळविण्यासाठी सारख्याच जाडीच्या काचेच्या पट्ट्या एकावर एक ठेवून तयार केलेल्या विवर्तन जालकाचा उपयोग करणारा वर्णपटदर्शक→ विवर्तन जालक] या उपकरणाचा शोध लावला. महायुद्ध काळात त्यांनी नाविक दलास उपयुक्त अशा प्रकाशीय उपकरणासंबंधी संशोधन केले. महायुद्धानंतर त्यांनी ज्योतिषशास्त्रात रस घेण्यास सुरुवात केली. १९२० मध्ये त्यांनी आपल्या अगोदरच्या व्यतिकरणमापकाचा अधिक विकास केला आणि तो २·५४ मी. (१०० इंची) छिद्रव्यासाच्या दुर्बिणीला जोडून कांक्षी (बेटलज्यूझ किंवा आल्फा ओरिऑनिस) या ताऱ्याचा व्यास मोजला (३८,४०,००,००० किमी. सूर्याच्या व्यासाच्या ३०० पट). ताऱ्याचे आकारमान अचूक म्हणण्याइतपत मोजण्याचे हे पहिलेच उदाहरण होते. १९२३ नंतर ते परत प्रकाशवेग मोजण्याच्या कार्याकडे वळले. एक खास आठ बाजू असलेला फिरता आरसा वापरून त्यांनी २,९९, ७९८ किमी./से. हे प्रकाशवेगाचे मूल्य मिळविले. यात अधिक सुधारणा करण्यासाठी त्यांनी एक लांब निर्वात नलिका तयार केली आणि तीतून प्रकाश पुढे-मागे परावर्तित करून त्याचा एकूण मार्ग सु. १६ किमी. होईल अशी रचना करून प्रकाशवेग मोजला. तथापि त्यांच्या अंतिम चाचण्यांतील मूल्य त्यांच्या मृत्यूनंतर १९३३ मध्ये काढण्यात आले (२,९९,७७४ किमी./से.) आणि १९७० नंतर मान्य करण्यात आलेल्या मूल्यापेक्षा हे मूल्य २ किमी./सें. पेक्षाही कमी इतपत जास्त होते.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे कॉप्ली पदक (१९०७), फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटची क्रेसन व फ्रँक्लिन पदके (१९१२ व १९२३), रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे पदक (१९२३), तसेच अनेक अमेरिकन व यूरोपीयन विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या मिळाल्या. ते अमेरिकन फिजिकल सोसायटी (१९०१–०३), अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स (१९१०–११) व नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९२३–२७) या संस्थांचे अध्यक्ष होते. रॉयल सोसायटी, रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, ऑप्टिकल सोसायटी वगैरे अनेक शास्त्रीय संस्थांचे ते सदस्य होते. त्यांचे सु. ७५ शास्त्रीय निबंध आणि प्रकाशकीवरील लाइट वेव्हज अँड देअर यूझेस (१८९९–१९०३), व्हेलॉसिटी ऑफ लाइट (१९०२) व स्टडीज इन ऑप्टिक्स (१९२७) हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ते पॅसाडीना येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.
“