मानसिंह,मायाधर : (१३ नोव्हेंबर १९०५–११ ऑक्टोबर १९७३). आधुनिक ओडिया कवी, नाटककार, निंबधकार, समीक्षक आणि शिक्षणतज्ञ. जन्म पुरी जिल्ह्यातील नंदाला नावाच्या खेड्यात. पाटणा विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम्. ए. केल्यानंतर काही वर्षे त्यांनी अध्यापन केले. १९३७ मध्ये ते इंग्लंडला गेले व तेथील डरॅम विद्यापीठातून त्यांनी ‘कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ कालिदास अँड सेक्स्पिअर’ हा प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविली. ओरिसाच्या शिक्षण खात्यात अनेक वर्षे त्यांनी महत्त्वाची विविध पदे भूषविली. संबळपूर येथील जी. एम्. कॉलेजचे (१९४८–५६) तसेच बेऱ्हमपूर येथील खाल्लिकोट कॉलेजचे ते (१९६४–६६) प्राचार्यही होते. उत्कल विद्यापीठाच्या वतीने तयार झालेल्या ओडिया विश्वकोशाचे ते प्रमुख संपादक होते (१९५६–६६). साहित्य अकादेमी, केंद्रीय हिंदी सल्लागार मंडळ तसेच उत्कल विद्यापीठाच्या अधिसभेचेही (सिनेट) ते सदस्य होते (१९४८–५६). ओरिसातील विविध नियतकालिकांचे तसेच एका दैनिकाचे कुशल संपादक म्हणूनही त्यांनी लौकिक मिळवला. १९६७ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला.
एक कवी म्हणून १९२० ते ३० ह्या काळात ते प्रसिद्धीस आले. तरुणांचे व प्रेमाचे कवी म्हणून त्यांची किर्ती झाली. ह्या काळातील त्यांच्या प्रेमकवितांचा गाजलेला संग्रह धूप (१९४८) हा होय. त्यांच्या सर्वच कविता आता अनेक खंडांत संकलित आहेत. बंगालमधील ‘सबुज दला’ च्या वळणाची कविता त्यावेळी ओडियात लिहिली जात होती ही पारंपारिक चाकोरी सोडून मानसिंहांनी नव्या वळणाची कविता लिहिली. तसेच ‘सबुज’ वळणाच्या कवितेवर त्यांनी कठोर टीका करून ओरिसाच्या मातीशी अतूट नाते असलेल्या कवितेचा हिरिरीने पुरस्कार केला. लोकशाही, व्यक्तिवाद व अंहिसा यांसारख्या मूलभूत मूल्यांचा त्यांनी आपल्या कवितेतून व गद्यातूनही प्रभावीपणे पुरस्कार केला. आशय, अभिव्यक्ती, छंदयोजना, प्रतिमा, लय इ. बाबतीत त्यांच्या कवितेने नवे वळण घेतले.
मानसिंह हे मुख्यत्वे भावकवी असून प्रेम व निसर्ग हे त्यांच्या कवितेचे प्रमुख विषय होत. कथाकाव्य, महाकाव्य, भावगीत, सुनीत, निर्यमक कल्पित काव्य, पद्यनाट्य इ. प्रकारांतील विपुल व दर्जेदार कविता त्यांनी लिहिली. हेम-शस्त्र (१९३३), हेमपुष्प (१९३५), प्रेम-शस्त्र (१९४५), अक्षत (१९४५), जीबन चिता (१९४६), कमलायन (१९४७), बापू तर्पण (१९४८), कोणार्क, माटि बाणी (१९४८), मानसिंहचयन (संकलन १९५२) इ. त्यांचे उल्लेखनीय संग्रह व काव्ये होत.
नष्टनीड (१९३९), युद्ध (१९५१), बारबाटी (१९५१), पुष्पिता (१९५३), पूजारिणी (१९५३), राजकवि ही त्यांची महत्त्वाची नाटके होत. गल्पमंजरी (१९३७) हा कथासंग्रह जीवन पथ (१९४९),जीबनी ओ प्रबंध (१९५२), साहित्य प्रभा (१९३६) हे निबंधसंग्रह पश्चिम पथिक (१९५२) हे इंग्लंड-प्रवासाचे वर्णन शिक्षा, शिक्षक ओ शिक्षायतन (१९५३) हा शिक्षणविषयक ग्रंथ कबि ओ कबिता (१९४८), ओडिया समाज ओ साहित्य (१९५१) हे समीक्षापर ग्रंथ तसेच इंग्रजीतही त्यांनी हिस्टरी ऑफ ओरिया लिटरेचर (१९६२), कालिदास अँड शेक्सपिअर, ड्रीम्स इन एज्युकेशन इ. दर्जेदार ग्रंथ लिहिले आहेत.
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)