मानचिन्हकारी :(हेरल्ड्री). वंश वा कुल-चिन्ह दर्शक आकृतिबंध घडविण्याची विद्या. विशिष्ट व्यक्ती, कुटुंब, टोळ्या किंवा संस्था ह्यांची स्वतंत्र ओळख पटवण्यासाठी तसेच इतरांपासूनचे भिन्नत्व, वेगळेपण दर्शवण्यासाठी प्रतीकात्मक रुपात दृश्य चिन्हे वापरली जात. ही प्रथा साधारणपणे मध्ययुगापासून चालत आली होती. मध्ययुगीन सरदाराच्या चिलखतावरील ‘सरकोटा’वर (चिलखतावर परिधान केलेला अंगरखा) व ढालींवर अशी चिन्हे असत. सरकोटावरील चिन्हांना ‘कोट ऑफ आर्म्स’ अशी संज्ञा होती. पुढे ती व्यापक अर्थाने मानचिन्हांच्या सर्व प्रकारच्या आकृतिबंधांना उद्देशून वापरली जाऊ लागली. ढाल, तुरा व बोधवाक्य हे तिन्ही मिळून संपूर्ण कोट ऑफ आर्म्स ची सिद्धता होते. प्रतीकात्मक व ओळखनिदर्शक दृश्य चिन्हांचा नियमितपणे, पद्धतशीर व वंशपरंपरेने वापर म्हणजे मानचिन्हकारी, असे म्हणता येईल. अधिकृत कागदपत्रांची अस्सलता दर्शवण्यासाठी ही अशा चिन्हांचा वापर शिक्का वा मोहोर म्हणून केला जात असे. मानचिन्हाच्या आकृतिबंधाची चित्ररूपात पुननिर्मिती करण्याची कला, असाही या संज्ञेचा अर्थ होतो.
मानचिन्हकारीचा उगम प्रथम पश्चिम यूरोपमध्ये सु. बाराव्या शतकात झाला. मध्ययुगीन युद्धतंत्राचा अपरिहार्य भाग म्हणून चिलखताच्या वापराबरोबरच मानचिन्हाचा वापरही सुरू झाला. आमने-सामने चालणाऱ्या हातघाईच्या लढतीत, शिरस्त्राण व चिलखताने संपूर्ण मढलेला सरदार हा स्वकीय की शत्रुपक्षाचा हे ओळखू येणे कठीण असे, त्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी विशिष्ट ओळखनिदर्शक मानचिन्हे त्याच्या चिलखताच्या सरकोटावर तसेच शिरस्त्राण, ढाल आदींवर रंगवण्याची प्रथा पडली. त्यातील शस्त्रचिन्हयुक्त ढाल (एस्कचन) हा मानचिन्हकारीचा मूलभूत घटक होय. ढालीवर प्रथम ओळखनिदर्शक शस्त्रचिन्ह दर्शविणारे राजघराणे म्हणजे विल्यमचे दुसऱ्या हेन्रीचा भाऊ) होय. पहिल्या रिचर्ड राजाच्या (११८९) प्रसिद्ध शिक्क्यावरील तीन सिंहांचे चिन्ह पुढे इंग्लंडचे शस्त्रचिन्ह (आर्म्स ऑफ इंग्लंड) झाले. फ्रान्समधील शिक्क्यावरील चिन्ह (१२२३), प्रिन्स ऑफ नॉर्थ वेल्सची शस्त्रचिन्हे (१२२४), हार्प ऑफ आयर्लंड (दहावे शतक) ही काही तत्कालीन मानचिन्हे होत. पण वस्तुतः ढाली, शिरस्त्राणे आदींवर प्रतीकात्मक दृश्य चिन्हे खोदण्याची प्रथा फार प्राचीन आहे. बायबलच्या ‘जुन्या करारा’त इझ्राएलच्या बारा ज्यू टोळ्यांना प्रत्येक एकेक स्वतंत्र, प्रतीकात्मक चिन्ह असल्याचे नमून केले आहे. उदा., ज्यूडाच्या टोळीचे सिंह, तर बेंजामिनच्या टोळीचे लांडगा हे प्रतीक. भारतातही राजपूत राजांनी वापरलेल्या चिन्हांचा प्रथमावस्थेतील मानचिन्हकारी म्हणून उल्लेख करता येईल. जपानमध्ये ‘मॉन’ हे मानचिन्ह वापरात होते. तेराव्या शतकापासून अनेक सरदार व जहागीरदार मानचिन्हे वापरू लागले. त्यामुळे त्यांत बरीच वाढ व प्रगती झाली. सुरुवातीला मानचिन्ह परिधान करणारी व्यक्तीच स्वतःच्या मानचिन्हाचा आकृतिबंध ठरवीत असे व तो साधारणपणे व्यक्तिगत विशिष्ट गुणधर्म वा आयुष्यातील ठळक घटना यांचा निर्दर्शक असे. पण आकृतिबंधांत पुनरुक्ती होऊ लागल्याने, ओळख पटवताना गोंधळ माजू लागले म्हणून मानचिन्हांच्या निवडीच्या कामासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची – ‘हेरल्ड’ची–नेमणूक करण्यात येऊ लागली. मानचिन्हांच्या प्रतीकांच्या आणि रंगांच्या निवडीवर त्याचे नियंत्रण असे. मानचिन्हांचा उपयोग प्रामुख्याने लष्करी क्षेत्रात होत असे. सरदार युद्धावर जाताना ओळखनिदर्शक विशिष्ट मानचिन्हे असलेल्या ढाली, सरकोटावर मानचिन्हांचे आकृतिबंध असलेली चिलखते व ध्वज (ज्याचे पुढे ‘बॅनरेट’ ह्या हुद्यात रुपांतर झाले) वापरू लागले. नंतर शांततेच्या काळात विशिष्ट व्यक्ती, हुद्दा व वंश दाखविणारी शिक्क्यावरील मानचिन्हे प्रचलित झाली. शिक्क्यावरील कौंटुबिक मानचिन्हे अजूनही वापरात आहेत. तेराव्या ते सोळाव्या शतकांत मानचिन्हांत परिवर्तन झाले व त्यांचे मुख्य स्वरुप सामाजिक रुचिदर्शक झाले. व्यक्तीची श्रेष्ठा किंवा सभ्यता, संस्थेची प्रतिष्ठा इ. दर्शविण्याकरिता मानचिन्हांचा उपयोग होऊ लागला. सर्व प्रकारचे अलंकरण व सजावटी, मानपत्रे, थडगी, काचेची तावदाने, भिंती, भांडारे, गिरिजाघरे, भांडी इत्यादींवर मानचिन्हांचा वापर होऊ लागला. आधुनिक काळात दुसऱ्या दुसऱ्या महायुद्धात मध्ययुगीन अलंकारणचिन्हांचा उपयोग पदकांत व ओळखचिन्हांत करण्यात आला. युद्धसाहित्याची व शस्त्रास्त्रांची सार्वजनिक प्रदर्शने भरवण्यात आली. विसाव्या शतकातही एक प्रतिष्ठेची बाब म्हणून मानचिन्हांकित सरकोट घालण्याची प्रथा आहे. तसेच बऱ्याच देशांमध्ये सरकारी व लष्करी दस्तऐवज, ध्वज, शिक्के व अन्य अलंकारणातही मानचिन्हांचा वापर केलेला आढळून येतो. भारतात ब्रिटिश राजवटीत स्थानिक राजे मानचिन्हे वापरीत. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी बंदुकीच्या दारुचा शोध लागल्यावर चिलखते, ढाली यांचा वापर कमी झाला व लष्करी क्षेत्रातला मानचिन्हाकारीचा प्रभाव संपुष्टात आला. तथापि सामाजिक क्षेत्रात मानचिन्हकारीचे महत्त्व वाढू लागले. तसेच पूर्वीप्रमाणे शस्त्रचिन्हांचा वापर ओळखनिदर्शक मानचिन्हे म्हणून पुढेही चालूच राहिला. सरदार व मानकरी ह्यांची मानचिन्हे त्यांच्या लष्करी हुद्यांसह त्यांच्या वंशजांकडे वंशपरंपरेने चालत राहिली. कालांतराने नागरिकही आपल्या शिक्क्यांवर लष्करी चिन्हांचा उपयोग करू लागले. विशेषतः कारागीर, शेतकरी, धर्मगुरु इ. भिन्नभिन्न क्षेत्रांतील लोक. परिणामतः त्यावर नियंत्रण येऊन केवळ राजे वा सत्ताधारी यांच्याद्वारेच शस्त्रचिन्हे बहाल करण्याची प्रथा पंधराव्या-सोळाव्या शतकांत रुढ झाली. तिला ‘ग्रँट ऑफ आर्म्स’ हे नाव पडले.
मानचिन्हकारीची निशाणी म्हणून चिलखतावरील सरकोटावर शस्त्रचिन्हांचा वापर सजावटीच्या स्वरूपात व विशिष्ट पद्धतीने केला जात असे आणि मानचिन्हाकारीची विशिष्ट परिभाषा व विशिष्ट संज्ञा वापरून त्याचे वर्णन केले जात असे. ही चिलखते एखाद्या व्यक्तीशी संबद्ध किंवा जुन्या चिलखतांच्या नमुन्यांवर आधारलेली असत.
काही वेळा एकाच ढालीवर दोन किंवा अधिक मानचिन्हांचे एकत्रीकरण झालेले दाखवीत. ह्याची कारणे म्हणजे दोन किंवा अधिक सरदारांच्या घराण्यांचे एकत्रीकरण वा एखाद्या स्त्रीची आपल्या पतीच्या मानचिन्हापेक्षा वेगळे, स्वतंत्र मानचिन्ह असण्याची इच्छा.
मानचिन्हकारीत तांत्रिक वर्णनाला विशेष महत्त्व आहे व त्यासाठी ‘ब्लेझन’ ही संज्ञा वापरली जाते. ब्लेझनचा सुरुवातीचा अर्थ ढाल, नंतर शस्त्रचिन्हयुक्त ढाल व पुढे त्याच्या मानचिन्हकारीचे वर्णन व त्यात वापरली जाणारी तांत्रिक परिभाषा, असे वेगवेगळे अर्थ उत्तरोत्तर ब्लेझनला होत गेले. मानचिन्हाच्या आकृतिबंधाचे तांत्रिक परिभाषेत केलेल वर्णन म्हणजेच ब्लेझन, असे म्हणता येईल. मानचिन्हकारीत वापरल्या जाणाऱ्या संज्ञाना निश्चित अर्थ दिलेले असतात. शाब्दिक वर्णनात कुठेही संदिग्धता निर्माण होऊन गोंधळ माजू नये, त्यामागचा उद्देश. उदा., ढाल धारण करणाऱ्या व्यक्तीच्या कडून ढालीची उजवी बाजू म्हणजे ‘डेक्स्टर साइड’ व डावी बाजू म्हणजे ‘सिनिस्टर साइड’ होय. ‘अचिव्हमेंट’ या संज्ञेत ढाल, तिच्या भोवतीचे अलंकरण, तुरा व अन्य साहाय्यक चिन्हे ही विशिष्ट रुपांत व ठराविक अर्थाने अंतर्भूत आहेत. मानचिन्हकारीत संज्ञांचे विविध प्रकार असून त्यांची संख्या विपुल आहे.
मानचिन्हाच्या आकृतिबंधात वापरल्या जाणाऱ्या रंगांना ‘टिंक्चर’ अशी संज्ञा आहे. प्रत्येक रंगाला मानचिन्हकारीत विशिष्ट संज्ञा (बव्हंशी फ्रेंच) आहे. उदा., ‘ऑर’ (सोनरी), ‘आर्जंट’ (रुपेरी), ‘ग्लूल्झ’ (तांबडा), ‘ॲझर’ (निळा), ‘सँग्विन’ (रक्तवर्ण), ‘सेबल’ (काळा) इत्यादी. ढालीच्या पृष्ठभागाला ‘क्षेत्र’ (शील्ड) म्हणतात व त्यावरच्या आकृतिबंधातल्या आकृत्यांना ‘चार्ज’ अशी संज्ञा आहे. रंग व आकार यांद्वारे प्रतीकात्मक रीत्या व्यक्त करता येईल अशी कोणतीही गोष्ट चार्ज या सदराखाली येऊ शकते. उदा., देवदेवता, राक्षस, मानव, पशुपक्षी, मानवनिर्मित तसेच नैसर्गिकवस्तू इत्यादींचे चित्रण यांचा अंतर्भाव त्यात करता येईल. काही चार्जेसनाही विशिष्ट संज्ञा आहेत त्यांच्यायोगे त्यांचे वर्णन करणे जास्त सुलभ होते. उदा., मागच्या पायावर उभे राहून पंजा उगारणाऱ्या सिंहाला ‘रॅम्पंट’ अशी संज्ञा आहे. अशा रीतीने कित्येकदा एकाच शब्दात संपूर्ण चीर्जचे वर्णन केले जाते. ढालीच्या पृष्ठभागाचे विभाजक रेषांद्वारे निरनिराळ्या विभागांत विभाजन करून ते भिन्नभिन्न रंगांद्वारे दर्शविले जाते. या विभाजक रेषांचे खूप आकार-प्रकार असून, त्यांनाही विशिष्ट संज्ञा आहेत. उदा., सरळरेषांनी केलेल्या उभ्या विभागणीला ‘पर पेल’ तर आडव्या विभागणीला ‘पर फेस’ अशा संज्ञा आहेत. ज्या रेषा साध्या सरळ नाहीत अशांनाही विशिष्ट नावे दिलेली आहेत. उदा., ‘वेव्ही’, ‘इन्डेंटेड’, ‘रेग्युली’ इत्यादी.
मानचिन्हाकारीतील रचनाबंध व कलात्मकता यांत कालमानानुसार परिवर्तने घडत गेली. प्रारंभी रचनेचे विशिष्ट नियम, परंपरा, संकेत यांमुळे निर्माण झालेला मर्यादित व संकुचित दृष्टिकोण व तदनुसार सौंदर्यकल्पना आढळतात पण कालांतराने मात्र त्यात नावीन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने नवनव्या संकल्पना, रचनाबंध यांची भर पडत गेली. त्यात तोल, सुबोधता, जोम यांसारखी गुणविशिष्ट्ये दिसू लागली. ट्यूडर घराण्याच्या काळात त्यात एक प्रकारचा अवजडपणा आला, तर एलिझाबेथ काळापासून पुन्हा साधेपणा दिसून येतो. ही मानचिन्हकारी करणारा विशिष्ट चित्रकारवर्ग प्रत्येक काळात दिसून येतो. ही मानचिन्हकारी करणारा विशिष्ट चित्रकारवर्ग प्रत्येक काळात दिसून येतो. अठराव्या शतकापासून या कलेस उतरती कळा लागली.
मानचिन्हकारीची प्रथा प्रामुख्याने इंग्लंडमध्ये असली, तरी फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन इ. देशांतही मानचिन्हकारीची समृद्ध परंपरा आढळते. त्यांत प्रामुख्याने मानचिन्हांकन पद्धती, शस्त्रचिन्हांची रचना, परिभाषा आणि मानचिन्हकारीचे नियम व उपयुक्तता इ. संदर्भांत भेद आढळून येतात.
संदर्भ : 1. Allcock, Hubert, Heraldic Design, New York, 1962.
2. Fox-Davies, A. C. A Complete Guide to Heraldry, London, 1969.
3. Wagner, A.R. Heralds and Heraldry in the Middle Ages. New York, 1956.
करंजकर, वा. व्यं. इनामदार, श्री. दे.
“