माताडी : झाईरेतील बास झाईरे (लोअर झाईरे) विभागाची राजधानी व देशातील प्रमुख बंदर. लोकसंख्या १,६२,३९६ (१९७६). हे अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर काँगो (झाईरे) नदीमुखापासून आत १३० किमी. वर वसलेले आहे. देशातील प्रमुख बंदर व व्यापारकेंद्र म्हणून हे विशेष प्रसिद्ध आहे. हेन्री मार्टन स्टॅन्ली या ब्रिटिश समन्वेषकाने स्टॅन्ली या ठिकाणी १८७९ मध्ये प्रथम व्यापारठाणे उघडले. १८९० ते १९०८ दरम्यान माताडी ते किन्शासा या देशाच्या राजधानीप्रर्यंतच्या लोहमार्गाची उभारणी झाली. त्यामुळे व्यापारात वाढ होऊन शहराची प्रगती झाली. शहरापासून ४० किमी. वरील इंगा धबधब्यापासून यास वीजपुरवठा होत असून येथील बंदरापर्यंत मोठ्या सागरगामी बोटी येऊ शकतात. येथून कॉफी, पामचे पदार्थ, रबर, कापूस यांची निर्यात होते. येथील औषधे व छपाईचे साहित्य यांच्या उत्पादनास आर्थिक दृष्ट्या महत्त्व आहे. शहरात अन्य शिक्षक सुविधांबरोबरच शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयही आहे.
लिमये, दि. ह.