माटर लिंक, मॉरिस : (२९ ऑगस्ट १८६२–६ मे १९४९). बेल्जियन कवी आणि नाटककार. लेखन फ्रेंचमधून. गेंट येथे जन्मला. गेंट विद्यापीठातून त्याने कायद्याची पदवी घेतली (१८८५). त्यानंतर तो पॅरिसला गेला. तेथे स्तेफान मालार्मेसारख्या फ्रेंच प्रतीकवादी कवींचा प्रभाव त्याच्यावर पडला. योरिस कार्ल यूईस्मांस ह्या फ्रेंच कादंबरीकाराचाही सहवास त्याला लाभला. यूईस्मासने फ्लेमिश गूढवादी रॉइसब्रूक (तेरावे व चौदावे शतक) ह्याच्या ग्रंथाकडे माटरलिंकचे मन वळविले. गेंटला परतल्यानंतर वकिलीपेक्षा साहित्यात तो अधिक रस घेऊ लागला.
माटरलिंकच्या आरंभीच्या साहित्यकृतींत ‘हॉटहाउस ब्लूग्स’ (१८८९, इं. शी.) ह्या काव्यसंग्रहाचा समावेश होतो. प्रतीकवादाचा त्याच्यावर असलेला प्रभाव ह्या संग्रहातील कवितांतून स्पष्टपणे प्रत्ययास येतो. ट्वेल्व्ह साँग्ज (१८९६, इं. शी.) हा त्याचा आणखी एक उल्लेखनीय काव्यसंग्रह, प्रिन्सेस मॅलिन (१८८९, इं. शी.) ही माटरलिंकची पहिली नाट्यकृती. त्यानंतर ‘द इंट्रूडर’ (१८९१, इं. शी.), ‘द ब्लाइंड’ (१८९१, इं. शी.), ‘पेलीस अँड मेलिसांदे’ (१८९३, इं. शी.). मोन्ना व्हॅन्ना (१९०२),‘द ब्लू बर्ड’ (१९०८,इं. शी.), ‘द बिट्रोदल’ (१९१८, इं. शी.) इ. त्याची नाटके प्रसिद्ध झाली. त्याचा प्रतीकवादी दृष्टिकोण त्याच्या नाट्यकृतींतूनही दिसून येतो. त्याचप्रमाणे शेक्सपिअरचे आणि इंग्रजीतील जेकोबीअन नाटककारांचे संस्कारही त्याच्या नाट्यलेखनावर झाल्याचे अनुभवास येते. माटरलिंकला, त्याच्या नाट्यलेखनामुळे, आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली.
आत्म्याची अमरता, मानवी जीवनातील दुःखांच्या संदर्भात माणसांवर असलेल्या जबाबदारीची मर्यादा ह्यांसारख्या तात्त्विक विषयांत माटरलिंकला रस होता व त्याचे प्रत्यंतर त्याने लिहिलेल्या (सर्व इं. शी.) ‘द ट्रेझर ऑफ द अंबल’ (१८९६),‘विजडम अँड डेस्टिनी’ (१८९८) ह्यांसारख्या ग्रंथांतून येते.
माटरलिंकच्या सतराव्या वाढदिवशी बेल्जियमच्या राजाने त्याला ‘काउंट’ चा दर्जा देऊन त्याचा सन्मान केला. १९११ मध्ये नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव जागतिक पातळीवर करण्यात आला. नीस येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Bithell, J. Life and Writings of Maurice Maeterlinck, London, 1913.
2. Clark, M. Maurice Maeterlinck : Poet and Philosopher, London, 1915.
3. Halls, W. D. Maurice Maeterlinck : A Study of His Life and Thought, Oxford, 1960.
देसाई, म. ग.