मागसायसाय प्रतिष्ठान : फिलीपीन्सचा लोकप्रिय तिसरा राष्ट्राध्यक्ष रामॉन मागसायसाय (कार. १९५३ –५७) याच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९५८ मध्ये मानिला येथे स्थापन झालेले एक जगप्रसिद्ध प्रतिष्ठान. या प्रतिष्ठानची कल्पना जॉन डी रॉकफेलर या धनाढ्य व्यक्तीने रामॉन मागसायसायच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर सहा आठवड्यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कार्लोस पा गार्सीआ (कार. १९५७–६१) यांना ३० एप्रिल १९५७ रोजी कळविली आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड या संस्थेतून भरीव आर्थिक सहाय्य व सक्रिय मदत देण्याचे आश्वासन दिले. गार्सीआंनी या योजनेस प्रतिसाद दिला आणि त्यानंतर काही दिवसांतच सात समविचारी फिलिपीनी व्यक्तींचे एक विश्वस्त संस्थापक मंडळ मानिला येथे स्थापण्यात आले. (मे १९५७). फिलिपीन्स राष्ट्रकुलाचे शेवटचे अध्यक्ष आणि रामॉनचे वडील यांना अनुक्रमे या प्रतिष्ठानचे सन्मान्य अध्यक्ष व उपाध्यक्ष ही पदे स्वीकारण्यासंबंधी विनंती करण्यात आली. त्यानंतर सात सभासदांपैकी प्रत्येकी एकाची कार्यकारी विश्वस्त आणि खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. विश्वस्त सभासदांपैकी दर दोन वर्षांनी निवृत्त होणाऱ्या सभासदांच्या जागी नवीन सभासद चार वर्षांसाठी नियुक्त करण्यात येऊ लागला. या विश्वस्त मंडळाने पुरस्कारार्थींची निवड करून संस्थेच्या आर्थिक धोरणाचे नियंत्रण व व्यवस्थापन करणे, ही प्रमुख कामे अंगीकारली. पेड्रो ट्यूसान आणि पाझ मार्क्विझ बेनिटेझ या प्रसिद्ध व्यक्तींची पुढे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
फिलिपीन्स संसदेने १९५९ मध्ये रॉकफेलर ब्रदर्स फंडाने दिलेल्या रकमेच्या किंमतीएवढी जमीन मागसायसाय प्रतिष्ठानास राष्ट्रातर्फे दिली आणि प्रतिष्ठानच्या आर्थिक बाबींना करमुक्त केले. पुढे रॉकफेलर ब्रदर्स फंडाकडून कर्ज घेऊन तसेच फिलिपीन्स व इतर देशांतील व्यक्ती व संस्था यांच्या देणग्यांतून मागसायसाय केंद्राची भव्य इमारत उभारण्यात आली. त्यामुळे उत्पन्नाचे साधन वाढले. पुढे १९६८ मध्ये हे प्रतिष्ठान त्या इमारतीत हलविण्यात आले. सांपत्तिक स्थिती सुधारल्यानंतर प्रतिष्ठानने स्वतःचे स्वतंत्र ग्रंथालय तेथे थाटले आणि आशियासंबंधी माहिती देणारे संदर्भवाङ्मय आणि रामॉन मागसायसायचे सर्व कागदपत्र संग्रहीत केले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर या संस्थेतर्फे मागसायसाय तत्त्वप्रणालीशी सहमत असलेल्या विषयांवर चर्चासत्रे भरतात.
प्रतिष्ठानतर्फे पाच वर्गांतील विविध व्यक्तींना प्रतिवर्षी खालील शाखांत विशेष कर्तृत्व व कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात येतात :
(१) सरकारी सेवेत राहून लोककल्याणार्थ निस्पृहपणे कार्य करणारी व्यक्ती.
(२) सामान्य लोकांचे असामान्य स्वरूपातील एका व्यक्तीकडून घडलेले सेवाकार्य.
(३) सामूहिक नेतृत्व – मानवाच्या कल्याणार्थ वा मानवी हक्कांसाठी वा मार्गदर्शनार्थ एका व्यक्तीने केलेले नेतृत्व.
(४) वृत्तपत्रव्यवसाय (पत्रकारिता)–साहित्य आणि सर्जनशील कला यांद्वारे निर्भीडपणे लोकसेवा करणारी व्यक्ती.
(५) आंतरराष्ट्रीय सामंजस्य – भिन्न भिन्न देशांतील देवाणघेवाणद्वारे परस्परात मैत्रीचे व स्नेहाचे संबंध प्रस्थापित करणे.
पुरस्कारांची वरील वर्गवारी स्थूलमानाने केलेली असून प्रतिष्ठानचा उद्देश, रामॉन मागसायसाय यांच्या ध्येयधोरणांचा पुरस्कार करणे व त्याची तत्त्वप्रणाली जोपासणे हा आहे. त्यामुळे पुरस्कारार्थ निवडलेल्या व्यक्ती या सामान्यातील असामान्य असाव्यात, त्यांपैकी कोणाही व्यक्तीचा राजकीय वा सार्वजनिक क्षेत्रात समाजावर प्रभाव नसावा. थोडक्यात सत्ताधारी श्रेणीतील कोणाही व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येत नाही. साहजिकच प्रांजलपणे निरपेक्ष सेवाकार्य करणाऱ्या व्यक्तींचीच विश्वस्त मंडळ निवड करते.
हा पुरस्कार आशिया खंडातील व आशिया खंडात निःस्पृहपणे लोकसेवा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस (वंश, जात, लिंग व राष्ट्रीयत्व यांचा भेद न करता) देण्यात येतो. आशिया खंड या भौगोलिक संज्ञेत आशियातील जपानपासून इंडोनेशियापर्यंतचे सर्व देश व पश्चिमेकडे अफगाणिस्तानपासून आग्नेय आशियापर्यंतच्या सर्व प्रदेशांचा समावेश होतो.
पुरस्काराच्या उमेदवारासंबंधीची शिफारसपत्रे तज्ञ व्यक्तींकडून दर वर्षी सप्टेंबर महिन्यात मागविली जातात. कोणत्याही व्यक्तीचा पुरस्कारार्थ विचार करताना मंडळ त्या व्यक्तीची सलग पाच वर्षांची सेवा विचारात घेते.
पुरस्कार, प्रमाणपत्र आणि रामॉन मागसायसाय याची सुवर्ण पदकात्मक प्रतिमा (कोरीव लेखांकित) या स्वरूपात दिला जातो. याशिवाय वीस हजार अमेरिकन डॉलर रोख रकमेत देण्यात येतात. अनेक वेळा दोन व्यक्तींमध्ये पुरस्कार विभागला जातो. मात्र सामूहिक नेतृत्व या वर्गवारीसाठी तो कधीकधी दहा व्यक्तींमध्येही विभागला गेला आहे. एखाद्या वर्गातील योग्य व लायक उमेदवार पुरस्कारार्थ आढळला नाही, तर विश्वस्त मंडळ त्या वर्गाचा पुरस्कार जाहीर करीत नाही.
आंतरराष्ट्रीय सामंजस्य या वर्गाचे पारितोषिक सर्वसामान्यतः संस्थांना देण्यात येते उर्वरित वर्गांतील पारितोषिके त्या त्या संबंधित व्यक्तींना दिली जातात. मरणोत्तर पारितोषिक फक्त उमेदवाराची निवड झाल्यानंतर मृत्यू आल्यास देण्यात येते.
प्रत्येक पुरस्कृत उमेदवारास त्याला ज्या क्षेत्राचे बक्षीस वा पुरस्कार मिळाला आहे त्या क्षेत्रातील कामाविषयी मानिला येथे व्याख्यान देण्याची विनंती प्रतिष्ठानतर्फे करण्यात येते. असे व्याख्यान पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर साधारणतः एक आठवड्याच्या आत द्यावे लागते.
पुरस्कार दरवर्षी ३१ ऑगस्ट या ⇨ रामॉन मागसायसायच्या जन्मदिनी मानिला येथे समारंभपूर्वक देण्यात येतात. पहिले पुरस्कार १९५८ मध्ये देण्यात आले.
भारतातील खालील व्यक्तींना मागसायसाय पुरस्कार लाभले :
(१) सरकारी सेवेतील लोककल्याण कार्य : चिं. द्वा. देशमुख (१९५९).
(२) सामान्य लोक सेवा : जयप्रकाश नारायण (१९६५), एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी (१९७४), मणिभाई देसाई (१९८२) व मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटे (१९८५).
(३) सामूहिक नेतृत्व : आचार्य विनोबा भावे (१९५८), तिबेटचे दलाई लामा (१९५९), दारा खुरोडी, त्रिभुवनदास पटेल व व्ही. कूरियन (१९६३), कमलादेवी चट्टोपाध्याय (१९६६), एम्. एस्. स्वामिनाथन (१९७१), इला भट्ट (१९७७), रजनीकांत आरोळे व माबोली रजनीकांत आरोळे (१९७९), प्रमोदकरण सेठी (१९८१), चंडी प्रसाद भट्ट (१९८२).
(४) वृत्तपत्रव्यवसाय (पत्रकारिता), साहित्य व सर्जनशील कला : अभिताभ चौधरी (१९६१), सत्यजित रे (१९६७), बी. जी. वर्गीज (१९७५), शंभू मिश्रा (१९७६), गौर किशोर घोष (१९८१), अरुण शौरी (१९८२) व आर्. के. लक्ष्मण (१९८४).
(५) आंतरराष्ट्रीय सामंजस्य : मदर तेरेसा (१९६२), वेल्थी हान्सिंगर – फिशर (१९६४) व हेनिंग हाक लार्सन (१९७६). (भारताबाहेरील या तीन व्यक्तींनी भारतात केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल).
संदर्भ : 1. Europa Publication Limited, World Dictionary of Awards and Prizes, London, 1979.
2. Hodson, H. V. Ed. The International Foundation Directory, London. 1979.
देशपांडे, सु. र.
“