एर्न्स्ट माख माख, एर्न्स्ट :  (१८ फेब्रुवारी १८३८–१९ फेब्रुवारी १९१६). ऑस्ट्रियन भौतिकीविज्ञ व तत्त्ववेत्ते. जन्म टुरास, चेकोस्लोव्हाकिया येथे. शिक्षण व्हिएन्ना विद्यापीठात. प्राध्यापक म्हणून आपल्या कारकीर्दीच्या अखेरच्या पर्वात ते ह्याच विद्यापीठात ‘नैसर्गिक विज्ञानांचा इतिहास आणि वैज्ञानिक उपपत्ती’ ह्या विषयाचे प्राध्यापक होते. माख हे भौतिकी आणि विज्ञानाचे तत्त्वज्ञान ह्या दोन्ही विषयांत अधिकारी होते. भौतिकीच्या अनेक शाखांतील संशोधनात त्यांनी लक्षणीय भर घातली आहे. विज्ञानाच्या तत्त्वज्ञानातील त्यांची भूमिका बर्क्ली आणि ह्यूम ह्यांच्या इंद्रियवेदनवादी मतावर आधारलेली आहे.‘व्हिएन्ना वर्तुळ’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या ⇨ तार्किक प्रत्यक्षार्थवादी गटावर त्यांच्या ह्या भूमिकेचा खोल प्रभाव पडलेला आहे. तार्किक प्रत्यक्षार्थवादी आंदोलनाशी असलेल्या ह्या संबंधामुळे ते जितके प्रसिद्ध आहेत तितकेच त्यांच्या वेदनवादी भूमिकेवर व्ही. आय्. लेनिनने आपल्या मटीरिॲ‌लिझम अँड इम्पिरिको-क्रिटिसिझम (मूळ जर्मन १९०९, इं. भा. १९३०, म. शी. जडवाद आणि अनुभववादी मीमांसा) ह्या पुस्तकात केलेल्या प्रखर हल्ल्यामुळे प्रसिद्ध आहेत. द सायन्स ऑफ मेकॅनिक्स (१८८३, इं. भा. १८९३, म. शी. यांत्रिकी–विज्ञान) आणि द ॲ‌नॅलिसिस ऑफ सेन्सेशन्स (१८८६, इं. भा. १९१४, म. शी. वेदनांचे विश्लेषण) हे त्यांचे सर्वांत अधिक प्रसिद्ध असलेले ग्रंथ होत.

माख यांच्या वेदनवादी भूमिकेचा आशय असा मांडता येईल : विश्वाविषयीचे आपले ज्ञान आपल्याला इंद्रियानुभवापासून लाभते. हा इंद्रियानुभव अतिशय मिश्र आणि अव्यवस्थित असा असतो. ज्या अंतिम घटकांमध्ये त्याचे विश्लेषण करता येते त्या घटकांना माख ‘वेदने’ (सेन्सेशन्स) म्हणतात. पिवळ्या रंगाचा पट्टा, एखादा विशिष्ट ध्वनी, (तापलेल्या तव्याला बोट लागले असता होणारा) गरम स्पर्श, तुरट चव इ. वेदनांची उदाहरणे होत. ज्यांना आपण विशिष्ट वस्तू किंवा घटना म्हणतो, उदा., हे झाड, हा दगड, ह्या पक्ष्याची चिवचिव, वीज चमकणे इ. त्या अशा अंतिम घटकाच्या किंवा वेदनांच्या बनलेल्या असतात विशिष्ट वस्तू किंवा घटना ह्या वेदनांच्या वेगवेगळ्या रचना होत.

ह्या भूमिकेवर एक आक्षेप येईल तो असा, की जेव्हा मी एखादे पिवळे फूल पहातो तेव्हा मी एक ‘सार्वजनिक’, भौतिक वस्तू पाहत असतो आणि तो पिवळा रंग म्हणजे त्या भौतिक वस्तूचा एक ‘सार्वजनिक’ गुण आहे असे आपण मानतो. ‘सार्वजनिक’ म्हणजे कुणाही व्यक्तीला तिचा अनुभव येऊ शकतो अशी वस्तू व असे तिचे गुण. उलट मला लाभणारे पिवळ्या रंगाचे वेदन हा माझा खाजगी अनुभव असतो. पण ह्या वेदनाच्या द्वारे सार्वजनिक भौतिक वस्तूच्या अंगी असलेल्या गुणाचे ज्ञान मला होते. तेव्हा वस्तू ह्याच वेदनांच्या बनलेल्या असतात, त्या वेदनांच्या रचना असतात असे मानणे गैर आहे.

ह्यावर माख ह्यांचे उत्तर असे, की खाजगी वेदने आणि त्यांच्या द्वारे ज्यांच्या स्वरूपाचे ज्ञान आपल्याला होते त्या सार्वजनिक, भौतिक वस्तू हा भेद आपल्या अनुभवात प्रतीत होत नसतो. आपल्याला फक्त वेदने लाभतात. वेदनांच्या रचनाच काय त्या आपल्यापुढे असतात. पण मी एका विशिष्ट दिशेने पाहिले असता मला जी वेदने लाभतात त्यांच्या सारखीच वेदने इतरांनाही लाभतात. केवळ ह्या अर्थाने ती सार्वजनिक असतात आणि त्यांच्याविषयी इतरांशी मी बोलू शकतो व इतर माझ्याशी बोलू शकतात. मला लाभणाऱ्या वेदनांच्या रचना एका अंगाने माझे खाजगी अनुभव असतात व दुसऱ्या अंगाने, (वरील विशिष्ट अर्थाने), सार्वजनिक वस्तू असतात.  

वेदनांच्या ह्या रचना किंवा व्यूह हा विज्ञानांचा विषय होय. ही विज्ञानाची कच्ची सामग्री. वेदने आणि त्यांचे परस्परसंबंध हा सर्व विज्ञानांचा समान विषय असल्यामुळे तत्त्वतः विज्ञान एकच आहे. आपण केवळ सोयीसाठी भौतिकी, रसायनशास्त्र, मानसशास्त्र असे भेद करतो आणि भिन्न विज्ञाने आहेत असे मानतो. उदा., माझी पिवळ्या रंगाची वेदने माझा एक अनुभव असतो आणि ह्या दृष्टीने तो मानसशास्त्राचा विषय असतो. माझा डोळा, मेंदू आणि मज्जातंतू ह्यांत घडणाऱ्या घटनांशी ही वेदने संबंधित असतात म्हणून ती शरीरक्रियाविज्ञानाचा विषय ठरतात, विशिष्ट तरंगलांबीच्या प्रकाशलहरींशी पिवळा रंग संबंधित असतो म्हणून ती वेदने भौतिकीचा विषय ठरतात. तेव्हा भिन्न विज्ञानांचे भिन्न, एकमेकांपासून अलग असे विषय नसतात. एकाच विषयाचा–वेदने आणि त्यांचे संबंध ह्यांचा –सर्व विज्ञाने अभ्यास करतात आणि म्हणून अखेरीस विज्ञान एकच असते. भौतिक वस्तू आणि मानसिक घटना ह्या दोहोंचे विश्लेषण वेदनांमध्ये करता येते आणि वेदने हाच सर्व विज्ञानांचा विषय असल्यामुळे विज्ञान एकच आहे ह्या मागच्या मताचा अनुवाद पुढे ⇨ बर्ट्रंड रसेल (१८७२–१९७०) ह्यांनी प्रतिपादिलेल्या ‘न्यूट्रल मोनिझम’मध्ये केलेला आढळतो. तार्किक प्रत्यक्षार्थवाद्यांनी ‘विज्ञानाच्या एकत्वाचा सिद्धांत’ स्वीकारला होता.

वेदनांचे आणि त्यांच्या परस्परसंबंधांचे वर्णन करणे हे विज्ञानाचे उद्दिष्ट असते. वैज्ञानिक नियम म्हणजे वेदने आणि त्यांचा क्रम ह्यांची थोडक्यात, सारांशाने करण्यात येणारी वर्णने होत. वैज्ञानिक नियम सामान्य असतात. ह्याचा अर्थ असा, की वेदनांच्या परस्परसंबंधांचे संपूर्ण वर्णन ते करीत नाहीत. पण त्यांच्या साहाय्याने पुढे कोणती वेदने आपल्याला लाभतील, त्यांचा क्रम काय असेल ह्यांचे निदान करता येते. तेव्हा ज्याचा इंद्रियानुभवात प्रत्यय घेता येत नाही अशा गृहीतकाला विज्ञानात स्थान नसते. ज्यांचे साक्षात् निरीक्षण करता येत नाही अशा वस्तू आणि घटना ह्यांच्या संकल्पना वैज्ञानिक उपपत्तीमध्ये करण्यात येतात ही गोष्ट खरी आहे. उदा., इलेक्ट्रॉन, प्रकाशलहरी इत्यादी. पण ह्या निरीक्षणातील संकल्पना निसर्गात काय घडत असते ह्याचे यथार्थ चित्र आपल्यापुढे उभे करतात असे मानणे गैर आहे. ह्या संकल्पना म्हणजे केवळ अवजारे असतात आणि वेदनांचे प्राक्कथन (प्रेडिक्शन), निदान करण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येत असतो. ह्याहून अधिक तथ्य त्यांच्या ठिकाणी नसते. वेदनांचे असे यशस्वीपणे वर्णन आणि प्राक्कथन करणाऱ्या वैज्ञानिक उपपत्तीकडून नैसर्गिक घटनांचे स्पष्टीकरणही होत असते. ज्याच्या साहाय्याने नैसर्गिक घटनांचे प्राक्कथन करता येईल असे त्यांचे वर्णन करणे म्हणजेच त्यांचे स्पष्टीकरण करणे होय. ह्याहून वेगळे असे नैसर्गिक घटनांचे स्पष्टीकरण असू शकत नाही.  

विज्ञानाच्या तत्त्वज्ञानातील माख ह्यांची ही भूमिका बरीच प्रभावशाली ठरली असली तरी ती विवाद्यही आहे.  

माख यांचे सर्व लेखन जर्मनमध्ये असून त्यांच्या बहुतांश लेखनाचा इंग्रजीत अनुवाद झाला आहे. त्यांचे इतर काही इंग्रजीत भाषांतरित ग्रंथ पुढीलप्रमाणे : हिस्टरी अँड रूट ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द कॉन्झर्व्हेशन ऑफ एनर्जी (१८७२, इं. भा. १९११), पॉप्युलर सायंटिफिक लेक्चर्स (जर्मन व इं. भा. १८९४), स्पेस अँड जॉमेट्री (१९०१ ते १९०३, इं. भा. १९०६), द प्रिन्सिपल्स ऑफ फिझिकल ऑप्टिक्स (१९२१, इं. भा. १९२६).  

पहा : विज्ञानाचे तत्वज्ञान.  

संदर्भ : Frank, Philipp, Modern Science and its Philosophy, Cambridge, Mass., 1949.

 

रेगे, मे. पुं.