मॅन्सफील्ड–१ : ग्रेट ब्रिटनच्या नॉटिंगॅमशर परगण्यातील एक औद्योगिक नगर. लोकसंख्या ९९,३४९ (१९८१). हे नॉटिंगॅम व लंडन यांच्या उत्तरेस अनुक्रमे २२ व २१९ किमी. अंतरावर माउन नदीच्या खोऱ्यात वसले आहे. सटन, कर्कबी-इन-ॲशफील्ड आणि मॅन्सफील्ड वुडहाउस यांचा या नागरी विभागात समावेश होतो. मॅन्सफील्ड वुडहाउस हे खाणकामासाठी प्रसिद्ध आहे. कोळसा खाणकाम व विणमाल निर्मिती या प्रमुख व्यवसायांबरोबरच येथे पादत्राणे, यंत्रे, रसायने, नळ, कापड, लोखंडाचे ओतकाम, अन्नप्रक्रिया इ. उद्योगधंदेही चालतात. याच्या उत्तरेस व वायव्येस सुपीक कृषिक्षेत्र आहे. जवळच वालुकाश्म व चुनखडक यांचे साठे असून सुशोभित इमारतींच्या बांधकामासाठी त्यांचा उपयोग केला जातो. याच्या पूर्वेस प्रसिद्ध ‘शेरवुड’ वन आहे. परोपकारार्थ श्रीमंतांना लुटणाऱ्या शूर व साहसी रॉबिन हुडचे (इ. स. बारावे शतक) वास्तव्य याच जंगलात असे. इंग्रजी साहित्यात रॉबिन हुडच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. नॉर्मनांच्या काळात या वनात शिकारीसाठी येणाऱ्या राजघराण्यातील लोकांचा तळ मॅन्सफील्डमध्ये असे. अलीकडे जंगलाचा बराचसा भाग शेती व सूचिपर्णी वृक्षांच्या लागवडीसाठी वापरला जातो. जवळच इतिहासपूर्वकालीन गुहा आहेत. नगरातील मध्ययुगीन चर्च, पहिल्या एलिझाबेथ राणीने स्थापन केलेली पाठशाळा (१५६१), मूट हॉल (१७५२) इ. उल्लेखनीय आहेत. मॅन्सफील्ड हे प्राचीन काळी रोमनांचे छावणीचे ठिकाण, तर मर्सिअन राजांचे निवासाचे ठिकाण होते. १८९१ मध्ये येथे नगरपालिका स्थापन करण्यात आली.

चौधरी, वसंत