मॅमून, अल् : (१४ सप्टेंबर ७८६–९ ऑगस्ट ८३३). अब्बासी खिलाफतीतील प्रबोधनवादी सातवा खलीफा. हारून-अल्रशीदला मरजिल या इराणी वेश्येपासून (इराणी गुलाम स्त्री) बगदाद येथे झालेला मुलगा. त्याचे पूर्ण नाव अबू-अल्-अब्बास अब्द अल्लाह अल्-मॅमून. पारंपरिक पद्धतीने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हारून-अल्-रशीदने अल्-अमीन (झुबैदाचा मुलगा) या औरस पुत्राची मक्केच्या यात्रेवर असताना ८०२ मध्ये पुढील खलीफा म्हणून नियुक्ती जाहीर केली आणि अल्-मॅमूनची पूर्व भागात खोरासान (मर्व्ह) चा राज्यपाल म्हणून नेमणूक केली. हारून-अल्-रशीदच्या मृत्यूनंतर (मार्च ८०९) वडिलकीच्या हक्कानुसार अल्-अमीन बगदाद येथे खलीफा झाला तथापि दोघा सावत्र भावांत सत्तेसाठी ८११ मध्ये यादवी युद्ध झाले. त्यात बगदादचा पाडाव होऊन अल्-अमीन मरण पावला (सप्टेंबर ८१३) आणि मॅमून खलीफा झाला. परंतु इराक, सिरिया व ईजिप्त या प्रदेशांत अस्थिर स्थिती असल्यामुळे तो मर्व्ह येथेच राहू लागला. दरम्यान शिया व सुन्नी या पंथांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. अल-मॅमूनने दोन्ही पंथांत समझोता व एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला अधिक पाठिंबा मिळावा, म्हणून त्याने अली-अल्-रिझा या पैगंबरांच्या नातेवाईकास आपला भावी वारस म्हणूनही जाहीर केले व आपली मुलगी त्यास देऊन संबंध अधिक दृढतर केले. तसेच पारंपरिक काळा झेंडा टाकून देऊन नवीन हिरवा झेंडा स्वीकारला. त्यावेळी बगदादमध्ये बंड होऊने मॅमूनचा चुलता इब्राहिम यास खलीफा करण्यात आले. पुन्हा एकदा यादवी युद्धास तोंड फुटले. मॅमूनने तेही अत्यंत क्रूरपणे मोडले (८१३) आणि इतर किरकोळ बंडेही शमविली. अल्-रिझा हा मेशेद (इराण) येथे मरण पावला (ऑगस्ट ८१८), अल्-मॅमूनने आपल्या उर्वरित कारकीर्दीत राज्यातील विविध भागांत उद्भवणाऱ्या उठावांचा बंदोबस्त करून प्रशासनव्यवस्था कार्यक्षम केली वझीर व राज्यपालांवर वचक बसविला आणि केंद्रीय सत्ता बळकट करून अब्बासी साम्राज्याचा विस्तार केला. तसेच व्यापार-उदीम वाढविला. या सुमारास बगदादचे व्यापारी केंद्र म्हणून वैभव वाढले. तेथील बाजारपेठेत भारतीय मसाले. रंग आदी वस्तू विक्रीसाठी येत. इ. स. ८३० नंतर त्याने बायझंटिनवर प्रत्येक वर्षी स्वारी केली परंतु त्याला त्यात विजय मिळाला नाही. अशाच एका स्वारीत तो टार्सस येथे मरण पावला.
अल्-मॅमूनच्या प्रदीर्घ कारकीर्दीत इस्लामी जगतात अनेक वैशिष्ट्यपूर्ण व लक्षणीय घटना घडल्या. केंद्रसत्ता बळकट असतानाही त्याने विशेष मर्जीखातर ताहिर या खोरासानच्या राज्यपालाला मांडलिक स्वायत्त राज्य वंशपरंपरागत दिले. त्यामुळे पुढे खलीफाचे महत्त्व कमी होऊन वझीरांचे वर्चस्व वाढीस लागले. तथापि त्याच्या सुधारणावादी दृष्टिकोनास इतिहासात तोड नाही. त्याच्यावर ग्रीक तत्त्वज्ञान व ग्रीकांश संस्कृती यांचा प्रभाव होता. त्याने या तत्त्वज्ञानाची मुस्लिम जगाला प्रथम ओळख करून दिली. त्यासाठी त्याने वैत-उल-हिक्माह (विद्यागृह) ही संस्था स्थापून ग्रीक तत्त्वज्ञानाचे अरबीत भाषांतर करून घेतले. संस्कृत, फार्सी आदी परकीय भाषांतील वाङ्मयाचीही भाषांतरे त्याने करून घेतली. तसेच त्याने बायझंटिनमधील दुर्मिळ इस्लामी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती मिळविल्या. लोकांत विज्ञानांबद्दल आवड निर्माण केली. मुस्लिम तज्ञांची समिती नेमून ज्योतिषशास्त्राच्या अध्ययनास त्याने प्रोत्साहन दिले आणि ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासासाठी सौर वेधशाळा उभारली (८२९). ग्रीक तत्त्वज्ञानामुळे तो बुद्धिप्रामाण्यवादी बनला होता. त्याने मुतझिलाइट चळवळीला पाठिंबा दिला आणि तिची तत्त्वे आणि शिकवणीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. धार्मिक बाबतीत मानवी विवेकबुद्धीचाच निकष असावा तसेच मनुष्य हाच स्वतःच्या कृतींचा कर्ताकर्विता असतो, यांवर मुतझिलाइटवादी अनुयायांचा विश्वास होता. त्यातूनच पुढे परंपरावादी व सुधारणावादी असा संघर्ष पुढे आला. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याचे सुधारणावादी तत्त्वज्ञान मागे पडून अहमद इब्न हनबल याचे पारंपरिक हन्बली तत्त्वज्ञान पुन्हा प्रसृत झाले.
पहा : अब्बासी खिलाफत खिलाफत.
संदर्भ : 1. Bagely, F. R. C. Spuler, Bertold, Trans. The Muslim World, part I. Leiden, 1960.
2. Hitti, P. K. Makers of Arab History, London, 1968.
3. Holt, P. M. and Others, Ed. The Cambridge History of Islam, Vol.I, Cambridge, 1971.
शेख, रुक्साना
“