मॅकिआव्हेली, निक्कोलो : (३ मे १४६९–२० जून १५२७). एक सुप्रसिद्ध राजकीय तत्त्वज्ञ, इतिहासकार, नाटककार आणि कवी. इटलीच्या राष्ट्रीय एकात्मतेचा पहिला पुरस्कर्ता आणि यूरोपियन प्रबोधनयुगाचा एक श्रेष्ठ प्रतिनिधी.
इटलीतील फ्लॉरेन्स या नगरीत एका प्रतिष्ठित कुळात त्याचा जन्म झाला परंतु घरची परिस्थिती गरिबीची होती. अभिजात लॅटीन आणि ग्रीक ग्रंथांचे अध्ययन त्या काळास अनुसरून त्याने केले होते. त्याकाळी शिक्षणात व्याकरण व साहित्यशैली यांची महती होती. त्याला पुस्तकवाचनाची, विशेषतः इतिहास, काव्य आणि इतर ललित साहित्याच्या वाचनाची हौस होती. परंतु केवळ सामान्य दैनंदिन धकाधकीच्या लोकव्यवहारापासून अलग असलेल्या विद्यापीठीय पंडित जीवनात त्याला रस नव्हता. सर्वांगीण मानवी जीवनाचे दर्शन ज्या दैनंदिन राजकीय घडामोडींमध्ये होत असते, त्यात प्रत्यक्ष अनुभव घेण्याकडे त्याचा ओढा होता. माणसांच्या प्रत्यक्ष राजकीय जीवनाच्या अभ्यासाने त्याची विचारशक्ती परंपरेच्या चक्रातून मुक्त झाली. अभिनव विचारसरणी त्याने निर्मिली. तो काव्यातही रमत असे आणि वास्तव जीवनामध्येही संपूर्ण लक्ष घालत असे. त्यातच त्याचे चिंतन सुरू असे. त्यामुळे अनुभवनिष्ठ आधुनिक राज्यशास्त्राचा पाया तो घालू शकला. त्याच्या राज्यशास्त्रावरील ग्रंथांचे यूरोपात गेल्या ५०० वर्षांत झालेले राज्यकर्ते, प्रशासक, धर्मगुरू, राजसत्तेचे आणि लोकसत्तेचे नेते, विजेते, तसेच स्पिनोझा, रूसो, कांट इ. तत्त्ववेत्ते यांनी परिशीलन केले. प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेले व्यापक सिद्धांत काढण्याचे विगमनाचे तर्कशास्त्र किंवा विज्ञानाचे तर्कशास्त्र मांडणाऱ्या फ्रान्सिस बेकनने त्याची प्रशंसा केली.
फ्लॉरेन्स या गणराज्याच्या व्यवहारात तो वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी प्रत्यक्ष भाग घेऊ लागला. त्यावेळी फ्लॉरेन्स हे स्वतंत्र नगरराज्य होते. १४८८ मध्ये या राज्याच्या शासक मंडळाचा तो सचिव बनला. त्या शासक मंडळामध्ये महत्त्वाचे पद प्राप्त होण्याकरता परंपरागत विद्यांमध्ये प्रावीण्य मिळवण्याची आवश्यकता होती. ही अट मॅकिआव्हेलीने पुरी केली होती. मॅकिआव्हेलीला दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारपद प्राप्त झाले होते. या शासक मंडळावर अंतर्गत कारभाराबरोबरच परराज्यीय संपर्क, संरक्षण आणि सैन्याचे प्रशासन अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या होत्या. परराज्यांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी मॅकिआव्हेलीवर पडली. इटली हा देश अनेक राज्यांमध्ये विभागलेला होता. त्यात गणराज्ये होती, त्याप्रमाणे हुकूमशाह्या व परंपरागत राजघराणीही राज्य चालवीत होती या सर्वांशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे राजकीय सत्तेचे व्यवहार मॅकिआव्हेली जवळून पाहू शकला. इटलीशिवाय फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इ. यूरोपातील अन्य देशांचेही प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची आणि त्यांच्याशी दळणवळण ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर पडली. फ्लॉरेन्सचा राजकीय प्रतिनिधी म्हणून मॅकिआव्हेलीने विपुल पत्रव्यवहार, विवरणे आणि वृत्तनिवेदने शासनाकडे पाठविली. ती आतापर्यंत सुरक्षितपणे ठेवलेली आढळतात. त्यांवरून राजकीय संस्था, राजकीय शक्ती आणि राजकीय कारस्थाने यांचे किती सूक्ष्म अवलोकन त्याने केले होते. याचे प्रत्यंतर मिळते. त्याने जे पाहिले व अनुभवले, त्याच्याच आधारावर वैचारिक चिंतन त्याने केले. नवीन शासनविषयक तत्त्वज्ञान रचण्यास त्याला या चिंतनाचा उपयोग झाला.
फ्रान्स आणि स्पेन ही राष्ट्रे आपापल्या शक्तींची संघटना करून याच कालावधीत संपन्न झाली. त्यांना यूरोपच्या नेतृत्वाची स्वप्ने पडू लागली. याच्या उलट इटलीच्या प्रदेशातील छोटी छोटी राज्ये आपसातील संघर्षाने डबघाईस येऊन जीर्ण-शीर्ण बनली. १४९९ मध्ये मिलान शहर फ्रेंचांच्या हाती पडले. १५०९ मध्ये नेपल्स स्पेनचा एक प्रांत बनला. फ्लॉरेन्सच्या गणराज्याला स्वतःचे स्वातंत्र्य टिकविण्याची आशा राहिली नाही. १५१२ मध्ये पोप दुसरा ज्यूलियस याने स्पेन व व्हेनिस यांच्याबरोबर संगनमत करून मित्रसंघ तयार केला आणि मिलानमधून फ्रान्सची हकालपट्टी केली. फ्लॉरेन्सचे नगरराज्य फ्रेंचांचे मित्र असल्यामुळे फ्रान्सच्या पराभाची झळ त्यालाही लागली. जुने मेडिची घराणे पुन्हा सत्तेवर आले. मॅकिआव्हेलीने आपल्या या नव्या स्वामीची मालकी मान्य केल्यामुळे सचिवपद गमावले आणि वर्षभर त्याला बंदिवास पतकरावा लागला. त्यानंतर मेडिची घराण्याविरुद्ध झालेल्या कटात सामील झाल्याचा वहीम त्याच्यावर आला. त्याला पकडून मेडिची सरकारने वर्षभर खूप छळले. काही कालानंतर तो निर्दोष आहे असे आढळून आल्यामुळे त्याला मुक्त करण्यात आले. यानंतर फ्लॉरेन्सपासून काही मैलांच्या अंतरावरील खेड्यातील एका लहानशा घरात तो राहिला. पुढे त्याने निर्वासिताचे जीवन स्वतःहून पतकरले.
या एकांतवासात मॅकिआव्हेलीने रोमन इतिरासकारांच्या अध्ययनास सुरुवात केली. १५१३ च्या जुलैपासून डिसेंबरपर्यंतच्या अवधीत खंड पडू न देता त्याने आपली मुख्यतम कृती राजा (द प्रिन्स) रचली. हा एकांतवास सन १५२० पर्यंत चालू होता. या वर्षांच्या अवधीत त्याने आपले चिरस्थायी ग्रंथलेखन केले. राजा याशिवाय त्याने इतिहास व राजनीती या विषयांवरील संभाषणे (द डिस्कोर्सेस) या ग्रंथाची रचना केली. त्याचप्रमाणे इतिहास व राजनीतीवर इतरही ग्रंथ लिहिले. युद्धकला हा ग्रंथ प्रसिद्ध केला. मांद्रागोला हे नाटक रचले. सोळाव्या शतकातील इटलीच्या रंगमंचकावरील सर्वसुंदर सुखांतिका म्हणून हे नाटक मान्यता पावले. फ्लॉरेन्सच्या विद्यापीठाने संशोधनाची कामे त्याच्यावर सोपवली. त्या कामांपैकीच फ्लॉदरेन्सचा इतिहास हा त्याचा ग्रंथ होय.
इ. स. १५२५ मध्ये इटलीवर जर्मनी व स्पेन यांचे आक्रमण सुरू झाले. फ्लॉरेन्सचे रक्षण व किल्याचा बंदोबस्त नीट आहे का नाही याची देखरेख करण्याचे काम मॅकिआव्हेलीवर सोपविले होते. इ. स. १५२७ मध्ये रोम जर्मनांच्या हाती पडले. त्यांनी आपल्या नेहमीच्या भयंकर पद्धतीने ते शहर लुटले. इटलीतील अनेक नगरे प्रतिकार न करता शत्रूच्या हाती पडले. फ्लॉरेन्स शहराने मेडिची घराण्याची हकालपट्टी करून पुन्हा गणराज्य स्थापित केले. तो धर्मपीठांचा टीकाकार होता धर्मपीठांच्या अधोगतीचे वर्णन त्याने आपल्या ग्रंथांमध्ये केले आहे तरी त्याचा अंत्यसंस्कार ख्रिश्चन धर्माप्रमाणे झाला.
राजकीय तत्त्वज्ञान : मॅकिआव्हेलीच्या राजकीय तत्त्वज्ञानाचे सार त्याच्या द प्रिन्स आणि द डिस्कोर्सेस या पुस्तकांमध्ये समावलेले आहे. राजकीय सत्ता कशी मिळवावी आणि ती सुरक्षित कशी ठेवावी, याचे तंत्र द प्रिन्स या पुस्तकात विस्ताराने मांडले आहे. राजसत्ता आणि गणसत्ता असे राज्याचे साधारण दोन प्रकार त्यात त्याने सांगितले आहेत. द डिस्कोर्सेस हे पुस्तक म्हणजे एका अर्थी इतिहासकार लिव्हीच्या रोमचा इतिहास या ग्रंथाची समीक्षा आहे. सत्ता मिळविण्याच्या आणि रक्षणाच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी राजकारणाकरता कोणते नियम लक्षात ठेवले पाहिजेत, हे तो सांगतो. त्याच्या मते हे राजकीय वर्तनाचे नियम नैतिक आदर्शाचे विवेचन करणाऱ्या नीतिशास्त्राच्या आधारे ठरविता येत नाहीत. राजकीय इतिहास आणि प्रत्यक्ष चालणाऱ्या राजकीय घडामोडी यांच्या अवलोकनातूनच हे नियम बुद्धी आकलन करू शकते. गुप्त कारस्थाने राज्यात आणि राज्याच्या बाहेर चालू असतात शत्रू मित्र होतात मित्र शत्रू होतात अचानकपणे परकीय आक्रमणे होऊ शकतात फंदफितुरी होण्याची शक्यता असते. अशा विविध गुंतागुंतीच्या मानवी व्यवहारात सत्ताधाऱ्याला संकटांवर मात करताना आदर्श नीतिमूल्यांच्या लक्ष्मणरेषेत बंदिस्त राहता येत नाही. उदा., निर्दयपणे करावी लागणारी दडपशाही कित्येक वेळा राज्यरक्षणार्थ उपयुक्त ठरते यशस्वी होते. अशा स्थितीत सत्ताधाऱ्याचे मन गोंधळले तर राज्यही गमवावे लागते. मॅकिआव्हेलीच्या दृष्टीसमोर रोमन इतिहास होता. यशस्वी राजकीय व्यवहार-नीती रोमच्या इतिहासावरून आणि त्याच्यासमोर घडत असलेल्या इटलीतील घडामोडींवरून त्याने ठरविली. पंरपरागत नैतिक मूल्यांचा संदर्भ त्याने आपल्या प्रतिपादनातून वगळल्यामुळे त्याच्या द प्रिन्स या पुस्तकाने धर्मगुरूंना आणि अन्य तत्त्वचिंतकांना धक्काच दिला. उदा., तो म्हणतो की, सत्ताधाऱ्याचा धाक वाटणे यात जशी खरी सुरक्षितता असते, तशी सत्ताधाऱ्याबद्दल आदर किंवा प्रेम वाटण्यात नसते.
त्याच्यामते राजकारणाचा मुख्य उद्देश देशाचे म्हणजे समाजाचे स्वास्थ्य व सुरक्षितता हा होय हे साध्य ज्या ज्या साधनांनी सिद्ध होईल, ती सूक्तासूक्त साधने योग्यच होत. राजकीय वर्तनाचा सामाजिक जीवनावर हितकारक परिणाम होणे, हीच त्याची कसोटी होय. राजकारण्याच्या मनातील उद्देश उदात्त आहे का नाही, हा मुद्दा गौण होय. यश आणि अपयश यांवर राजकारणी व्यक्तीच्या गुणांचे मूल्यमापन होते. ज्या गुणांच्या योगाने राजकारणी व्यक्ती यशस्वी होते, ते गुण आणि ज्या गुणांच्या योगाने राजकारणी अयशस्वी ठरतो ते गुण नव्हेत.
मॅकिआव्हेलीच्या राजनीतिशास्त्राचा एक लक्षात घेण्यासारखा मूलभूत सिद्धांत हा मनुष्याच्या स्वभावाबद्दलचा आहे. त्याच्या मते मनुष्य हा स्वभावतः अत्यंत स्वार्थी म्हणजे दुष्ट आहे. त्याच्या स्वभावातील दोष सामाजिक जीवनामध्ये कमी होतात तो स्वार्थाला अत्यंत जपणारा प्राणी आहे. परंतु त्याचा स्वार्थ सामाजिक जीवनातच सिद्ध होतो, हे त्याला कळते. स्वार्थ कसा जपावा, याचे शिक्षण त्याला सामाजिक संस्थांमध्ये मिळते म्हणून त्याला समाजाची आणि राज्याची आवश्यकता पटते. मनुष्य हा अत्यंत लोभी प्राणी आहे तो कायम असंतुष्ट असतो. त्याच्या वासना कधी तृप्त होऊ शकत नाहीत. त्याच्या वासनांच्या मुळाशी आत्मसंरक्षण किंवा जगण्याची वासना ही मूलभूत आहे. तो दूरदर्शी प्राणी नाही परंतु सामाजिक नियम पाळले नाहीत तर जीवन धोक्यात येथे हे त्याला कळते, म्हणून तो नीट वागतो सहकार्य त्याला आवश्यक वाटते. उद्योगीपणा, धैर्य, निःस्वार्थीपणा हे सद्गुण त्याला आत्मरक्षणार्थ जपावे लागतात. मनुष्य मुळात दुष्ट असला, तरी सामाजिक जीवनाशिवाय गत्यंतर नाही, हे त्याच्या ध्यानात येते म्हणून तो सद्गुण संपादित करतो. दुर्गुण हा स्वाभाविक व सद्गुण हा संपादित आहे.
व्यक्तीला सामाजिक बनविण्याचे कार्य राज्यसंस्था करते कारण माणसाच्या स्वार्थाचे साधन राज्य हे असते. सुरक्षितपणा आणि स्वास्थ्य राज्यामुळेच लाभते. जी माणसे महात्त्वाकांक्षी असतात ती शौर्याने सत्ताधारी बनतात. महत्त्व म्हणजे कीर्ती. कीर्ती ही गुणांवर अबलंबून असते. गुणाला व्हर्च्यू हा शब्द मॅकिआव्हेलीने संदिग्ध अर्थाने वापरला आहे परंतु त्याला हे म्हणायचे आहे की गुण म्हणजे शौर्यच होय. त्याच्या मनापुढे सद्गुणी म्हणजे युद्धामध्ये विजयी होणारा शूर पुरुष होय. युद्धात विजय मिळवण्याकरता दूरदृष्टी, स्वयंशिस्त, विचाराची सुसंगती, दृढ निश्चय, ध्येयाची स्पष्ट कल्पना, ताबडतोब निर्णय घेण्याची प्रवृत्ती, अथक प्रयत्नशीलता, लोकसंग्रह इ. गुण लागतात.
जीवनामध्ये शौर्य आणि दैव यांचा संघर्ष दिसतो. दैव हे अस्थिर, अकल्पित, चंचल आणि लहरी असते. शौर्य आणि दैव यांच्या संघर्षाचे उत्कट चित्र म्हणचे युद्ध, असे म्हणता येते.
राज्य ही एक विशिष्ट प्रकारची विवेकयुक्त संघटना असते. संपत्ती, कुटुंब आणि नागरिकाचा मान सुरक्षित ठेवणे आणि बाहेरच्या शत्रूपासून समाज सुरक्षित ठेवणे, हे राज्याचे निरंतरचे कार्य होय. जनतेची आर्थिक भरभराट होईल, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि प्रचंड संपत्तिमान, चैनी आणि ऐषारामात राहणारा वर्ग उत्पन्न होणार नाही, अशी खबरदारी घेणे हे राज्याचे निरंतरचे कार्य आहे. नागरिकांच्या विविध प्रकारच्या कौशल्यांचा, कलांचा, प्रावीण्याचा योग्य उपयोग करून घेणे हे चांगल्या शासनाचे लक्षण आहे. ज्यांना मानमान्यता पाहिजे असते, अशा गुणी माणसांचा राज्यसेवेकरता उपयोग केल्याने राज्य प्रगतिपथावर राहते, लायकीप्रमाणे दर्जा हे चांगल्या राज्याचे लक्षण होय.
अशा चांगल्या राज्याची स्थापना शूर आणि दूरदर्शी अशी एखादी व्यक्तीच करू शकते. गणराज्य हे सगळीकडे उत्पन्न होऊ शकत नाही. राजसत्ता, जनसत्ता, महाजनसत्ता वा गणसत्ता असे राज्याचे विविध आकृतिबंध असतात. हे आकृतिबंध विशिष्ट सामाजिक रचना आणि परिस्थिती यांच्यावरच अवलंबून असतात. परंतु कोणताही आकृतिबंध असो, राज्य हे कायद्याचेच असणे योग्य होय. सत्ताधाऱ्यांच्या लहरीवर कायदा अवलंबून असणे धोक्याचे होय. कायद्यात सत्ताधाऱ्याची लहर दृष्टोत्पत्तीस येता कामा नये. जनतेच्या अडचणी वेळच्या वेळी नष्ट करणे, हे कायद्याचे काम आहे. नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होईल, अशा रीतीने कायद्यांची बिनचूक ठामपणे अंमलबजावणी व्हावी लागते. सगळ्या नागरिकांचे समान हित साधणारा कायदा नागरिकाला योग्य वर्तनाचे शिक्षण देत असतो. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये अधिकाराबद्दल आदर, देशभक्ती आणि सैनिकी सद्गुण निर्माण होतात.
राज्य चालवण्याची कला आणि सैनिकी कला ह्यांच्यामध्ये विशेष साम्य असते, असे मॅकिआव्हेली मानतो. आदर्श सैनिकी रचनेचा त्याने अभ्यास केला होता. अनेक महत्त्वाचे निर्णय गुप्तपणे घेणे, अंतर्गत आणि बाह्य परिस्थितीचा सावधपणे नित्य अंदाज घेत राहणे, प्रसंगोचित डावपेच बदलत राहणे, निर्णय आणि अंमलबजावणी यांच्यामध्ये निश्चय आणि वेग असणे, कित्येक वेळा आश्चर्य वाटावे अशा तऱ्हेने पावले टाकणे, लोकांची अपेक्षा एक असते त्याच्या उलट एकदम भ्रमाचा भोपळा फुटेल असे वागणे, असे सगळे वर्तनाचे प्रकार सैनिकी कलेला जितके लागू तितकेच राजकीय शासनाच्या कलेलाही लागू आहेत. गुप्त कट राज्यास धोकादायक असतात धोके टाळण्याकरिता राज्ययंत्रणा ही प्रतिगुप्त यंत्रणा बनावी लागते. एकंदरीत राजकीय नेतृत्व आणि सैनिकी नेतृत्व यांची मूलभूत गुणसंपदा समान असते. मॅकिआव्हेलीच्या मनःश्चक्षूंपुढे असलेला आदर्श राज्यकर्ता हा रोमन गणराज्यामधील रोमन साम्राज्याची स्थापना आणि विस्तार करणाऱ्या शूरांप्रमाणे आहे.
मॅकिआव्हेलीच्या मते संघर्ष हा सार्वत्रिक आणि निरंतरपणे चालणारा मानवसमाजाचा स्वभाव आहे. मानवाच्या नैसर्गिक प्रवृत्तीची ती परिणती आहे. समाजातील संघर्ष नाहीसा होऊ शकतो असा संघर्षशून्य समाज निर्माण करता येतो असे अनेक राजनीतिशास्त्रज्ञ मानतात. परंतु महत्त्वाकांक्षी उच्च वर्ग व सामान्य जनता यांच्यामध्ये संघर्ष सतत चालूच असतो. कोणत्याही राज्यात सामान्य बहुजन समाज जीविताची आणि संपत्तीची सुरक्षितता अपेक्षित करतो परंतु अल्पसंख्याक वरचे गट, वंशपरंपरागत चालत आलेली वरिष्ट घराणी, व्यापारी संघटना सामान्य जनतेवर निरंतर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतात. मॅकिआव्हेलीच्या या सामाजिक संघर्षाच्या संकल्पनेचा अधिक स्पष्ट आविष्कार म्हणजे कार्ल मार्क्सची वर्गविग्रहाची संकल्पना होय.
मॅकिआव्हेलीच्या पुढे दोन प्रकारची राज्ये होती. त्याला आदर्श म्हणून रोमचे गणराज्य दिसते आणि तो ज्या शहरात जन्मला ते भ्रष्ट फ्लॉरेन्सचे राज्य दिसते. आदर्श गणराज्यातील नागरिक हा सर्व नागरिकांच्या हिताची काळजी वाहतो आणि भ्रष्ट गणराज्यातील नागरिकांच्या हिताची काळजी वाहतो आणि भ्रष्ट गणराज्यातील नागरिक स्वतःपुरताच असतो त्यात द्वेष, मत्सर, आळस, ऐषाराम, गटबाजी, गुप्त कट इ. दुष्ट प्रवृत्ती वाढीस लागतात. केव्हा तरी एखादा शूर एकदम पुढे येतो सुव्यवस्था निर्माण करतो, असे हे उत्कर्षापकर्षाचे किंवा विकास व ऱ्हास यांचे कालचक्र सुरू राहते. सतत बदल हा वस्तुस्वभाव आहे. स्पार्टाचा ऱ्हास झाला तसा रोमचाही झाला.
संदर्भ : 1. Baron, Hans, The Crisis of the Early Italian Renaissance, 2 Vols., Princeton, 1955.
2. Bayley, Charles C. War and Society in Renaissance Florence : The De militia of Leonardo Bruni, Toronto, 1961.
3. Wood, Neal, Ed The Art of War: Mechiavelli, New York, 1965.
4. Durant, Will, The Renaissance, New York, 1953.
5. Gilbert, Allan, Trans. Machiavelli: Chief Works and Others, 3 Vols., Durham (N.C.), 1965.
6. Lerner, Max, Ed. The Prince and The Discourses, New York, 1950.
7. Tusiani, Joseph, Ed. Lust and Liberty: The Poems of Machiavelli, New York, 1963.
८. खंडकर, अरुन्धती, मॅकिआवेलीचा राजा, मुंबई, १९६३.
जोशी, लक्ष्मणशास्त्री
“