मॅकमिलन, एडविन मॅटिसन : (१८ सप्टेंबर १९०७ – ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. ⇨ युरेनियमोत्तर मूलद्रव्यांविषयीच्या संशोधनाकरिता ⇨ ग्लेम थीओडोर सीबॉर्ग यांच्याबरोबर मॅकमिलन यांना १९५१ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

मॅकमिलन यांचा जन्म रेडोंडो बीच (कॅलिफोर्निया) येथे झाला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भौतिकीचे शिक्षण घेऊन त्यांनी १९२८ मध्ये बी. एस्. व १९२९ मध्ये एम्. एस्. या पदव्या मिळविल्या. प्रिन्स्‌टन विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी १९३२ मध्ये संपादन केल्यानंतर दोन वर्षे त्यांनी बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात नॅशनल रिसर्च कौन्सिलचे फेलो म्हणून काम केले. १९३४ मध्ये त्याच विद्यापीठाच्या ई. ओ. लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरीत व १९३५ मध्ये भौतिकी विभागात त्यांची सहयोगी संशोधक म्हणून नियुक्ती झाली. तेथेच ते १९३५–४१ मध्ये साहाय्यक प्राध्यापक, १९४२–४६ मध्ये सहयोगी प्राध्यापक व १९४६–७३ मध्ये भौतिकीचे प्राध्यापक होते. १९७३ पासून ते गुणश्री प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी रडार व सोनार या उपकरणांच्या आणि पहिल्या अणुबाँबच्या विकासात संशोधनकार्य केले. ते १९५४–५८ मध्ये लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरीचे सहयोगी संचालक व १९५८–७३ मध्ये लॅबोरेटरीचे संचालक होते. यांखेरीज अमेरिकेच्या अणुऊर्जा मंडळाच्या सर्वसाधारण सल्लागार समितीचे सदस्य (१९५४–५८), इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाइड फिजिक्स या संस्थेच्या उच्च ऊर्जा भौतिकी समितीचे सदस्य (१९६०–६६) इ. पदांवर त्यांनी काम केले. अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून १९४७ मध्ये त्यांची निवड झाली.

अणुकेंद्रीय भंजनाचा (तुकडे होण्याच्या क्रियेचा) अभ्यास करीत असताना मॅकमिलन यांनी युरेनियम (२३९) च्या किरणोत्सर्गी क्षयाद्वारे [⟶ किरणोत्सर्ग] निर्माण होणाऱ्या नेपच्यूनियम या ९३ अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) असलेल्या आणि युरेनियमानंतरच्या पहिल्या मूलद्रव्याचा शोध १९४० मध्ये पी. एच्. आबेलसन यांच्या सहकार्याने लावला. त्याच वर्षी त्यांनी पुढील मूलद्रव्याच्या शोधास प्रारंभ केला परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे त्यात खंड पडला. त्यांच्याच संशोधनाचा आधार घेऊन सीबॉर्ग व त्यांच्या सहकाऱ्यांनी अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी उपयुक्त असलेल्या प्लुटोनियम (अणुक्रमांक ९४) या मूलद्रव्याचा १९४१ सालाच्या प्रारंभी शोध लावला.

सिंक्रोट्रॉन या नावाने ओळखण्यात येणाऱ्या ⇨ कणवेगवर्धकांच्या रचनेत उपयुक्त ठरलेल्या कलास्थैर्य या तत्त्वाचा मॅकमिलन यांनी १९४५ मध्ये विकास केला. हेच तत्त्व व्ही. आय्. वेक्सलर या रशियन भौतिकीविज्ञांनी सु. एक वर्ष अगोदरच मांडलेले होते, असे  मॅकमिलन यांना नंतर आढळून आले. सायक्लोट्रॉन या कणवेगवर्धकातील आणवीय कण समकालिक (समान अवस्थेत वा कलेत असणाऱ्या) विद्युत् स्पंदांच्या साहाय्याने सतत रुंदावत जाणाऱ्या वर्तुळात प्रवेगित होतात परंतु प्रकाशवेगाच्या १/१० पटीपेक्षा त्यांचा वेग अधिक झाल्यावर ⇨ सापेक्षता सिद्धांतानुसार त्यांचे द्रव्यमान वाढत असल्याने विद्युत् स्पंदांबरोबर ते समकालिक राहू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा वेग एका ठराविक मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही. चुंबकीय क्षेत्र वा विद्युत् स्पंदांची कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या स्पंदांची संख्या) अथवा दोन्ही बदलून योग्य परिस्थिती निर्माण केली, तर वेगवर्धकामध्ये अमर्याद वेगांपर्यंत कण विद्युत् स्पंदांबरोबर आपोआपच समकालिक राहतील, असे मॅकमिलन यांच्या प्रत्ययास आले. हे तत्त्व उपयोगात आणणाऱ्या कणवेगवर्धकाला ‘सिंक्रोट्रॉन’ हे नाव मॅकमिलन यांनीच सुचविले. त्यानंतर सातत्याने वाढत्या आकारमानाचे सिंक्रोट्रॉन जगात विविध देशांत उभारले गेले आणि त्यांच्याद्वारे कित्येक नवीन कणांचा शोध लागला व द्रव्याच्या अंतिम संरचनेसंबंधीच्या कल्पनांत मोठी क्रांती घडून आली. या कार्याबद्दल मॅकमिलन यांना वेक्सलर यांच्या समवेत १९६३ साली ‘शांततेसाठी अणू’ या पुरस्काराचा बहुमान मिळाला.

भदे, व. ग.