मँगॅनाइट : (ग्रे मँगॅनीज ओअर). खनिज. स्फटिक एकनताक्ष स्फटिक लांब, प्रचिनाकार व पृष्ठावर उभ्या रेखा, पुष्कळदा जुळे स्फटिक, स्फटिकांच्या जुड्या किंवा अरीय मांडणी झालेले स्फटिक आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान]. याशिवाय कधीकधी संपुजित, स्तंभाकार, तंतुमय व झुंबराकार रूपांतही आढळते. ⇨ पाटन : (010) उत्कृष्ट. ठिसूळ. भंजन खडबडीत. कठिनता ४. वि. गु. ४·३. चमक काहीशी धातूसारखी. रंग पोलादासारखा करडा ते लोखंडाप्रमाणे काळा. कस गडद उदी ते काळसर [⟶ खनिजविज्ञान]. अपारदर्शक, रा. सं. MnO(OH). बंद नळीत तापविल्यास यातून पाणी बाहेर पडते. गरम सल्फ्यूरिक तसेच हायड्रोक्लोरिक अम्लांत हे विरघळते. याच्यात बदल होऊन पायरोल्यूसाइट बनते. कमी तापमानात बनलेल्या खनिज शिरांत हे पायरोल्यूसाइट, सिलोमेलेन, होस्मनाइट, बराइट, कॅल्साइट इ. खनिजांबरोबर आढळते. हार्ट्झ पर्वतात (जर्मनी) मँगॅनाइटाचे चांगले स्पटिक आढळतात. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, कॅनडा इ. देशांत हे आढळते. भारतामध्ये मँगॅनिजाची धातुके कच्च्या रूपातील धातू) आढळणाऱ्या बहुतेक ठिकाणी हे आढळते (उदा., आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक इ.). महाराष्ट्रात हे नागपूर व भंडारा जिल्ह्यांत सापडते. मँगॅनिजाचे गौण धातुक म्हणून तसेच स्पिगेलझेन व मँगॅनिजाच्या तर मिश्रधातू बनविताना याचा उपयोग होतो. रंगद्रव्य व रंजक म्हणूनही हे वापरतात. मँगॅनिजावरून याला मँगॅनाइट हे नाव पडले आहे.

पहा : पायरोल्यूसाइट मँगॅनीज.

सहस्त्रबुद्धे, य. शि.