महार रेजिमेंट : भारतीय भूसेनेच्या पायदळ शाखेतील एक रेजिमेंट. स्थापना सप्टेंबर १९४१ मध्ये. सध्या (१९८०) या रेजिमेंटमध्ये संपूर्ण भारतातील महार जातिसदृश जवानांची भरती होते. हिच्यामध्ये पंधरा पलटणी आहेत.

महार रेजिमेंटचे विकास-टप्पे : प्राचीन हिंदू राजांच्या सैन्यात प्रसंगोपात्त क्षात्रकर्माला वंचित केलेल्यांना सैन्यात प्रवेश दिला जात असावा, असे राजनीतिप्रबंधावरून दिसते. मुसलमान राजांच्या सैन्यात महारादिकांना प्रवेश होता की नाही, हे सांगता येत नाही. मात्र कोट-किल्ल्यांच्या घडणकार्यांत महारांनी बलिदान केल्याच्या कथा प्रचलित आहेत. उदा., सायनाक कुटुंब. तसेच कोट-किल्ल्यांच्या तटबंदीबाहेरील चौक्या सांभाळण्याचे कामही त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले आहे. या दृष्टीने सायनाक, भागनाक, रामनाक इ. नावे प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महारांना भरती केले जात असे. महार किंवा त्यांच्यासारख्या जातिवर्णहीनांना मोठ्या प्रमाणावर सैन्यात भरती करण्याची परंपरा यूरोपीयांनी सुरू केली. ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रास व त्याखालोखाल मुंबई पायदळात महारांना वा तत्सम इतर जातींना मुक्त प्रवेश दिला जाई. इंग्रजांनी हिंदुस्थानाबाहेर जी आक्रमणे केली त्या कार्यात मद्रास व मुंबई सैन्याचा फार मोठा भाग होता. साम्राज्यविस्तार व हिंदुस्थानी राजांविरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांनी आपल्या सैनिकभरतीच्या धोरणात अनेकदा बदल केले. या बदलांमुळे मद्रास व मुंबईच्या सैन्यावरही परिणाम झाला. बाजारबुणगे व बिगर लढाऊ कार्यासाठी महार व तत्सम जातियांची भरती केली जाई. कोरेगाव (जिल्हा पुणे, तहसील शिरुर) येथील दुसरा बाजीराव पेशवा व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील लढाईत (१ जानेवारी १८१८) महार गोलंदाज सहाय्यकांनी लक्षणीय मर्दुमकी गाजविली. इंग्रजांनी तेथे उभ्या केलेल्या विजयस्मारक स्तंभावरील लेखात त्या महार सैनिकांची नावे दिली आहेत.

महार रेजिमेंटचे चिन्ह

पुढे काठेवाड (१८२६), मुलतान (१८४६) व दुसऱ्या आंग्ल−अफगाण युद्धात (१८८०) कंदहार येथील लढायांत आणि वेढ्यांत महार जवानांनी तलवार गाजविली. मुंबईच्या वॉडबी मार्गावरील शिलालेखात तसे नमूद केले आहे. मेजर वॉडबी हा महार सैनिकांचा अधिकारी होता. १८५८ नंतर मात्र तथाकथित हलक्या जातींच्या व्यक्तींचा भरणा करण्याविरुद्धचे धोरण ठरु   लागले. मुंबई सेनेत १८९२ सालापर्यंत १० ते ११ टक्के सैनिक मांग, रामोशी व ५ ते ६ टक्के इतर हीन जातींचे (महार, चांभार ?) भरती केले जात. ‘महाबळेश्वर समिती’ (१८९३) च्या शिफारसीप्रमाणे वरील टक्केवारीत भरीव बदल करण्यात आले. शिवाय लढाऊ-बिनलढाऊ हे एक भेदात्मक तत्त्व सैनिकभरतीला लागू करण्यात येऊ लागले. परिणामतः तथाकथित जातिवर्णहीनांची लढाऊ कामासाठी भरतीकरण्याचे थांबले. अशीच घटना उत्तर हिंदुस्थानातही घडली.

पहिल्या महायुद्धात [⟶ महायुद्ध, पहिले] सैनिकांची चणचण तीव्रतेने भासली, तरी महार जवानांना लढाऊ पलटणीत प्रवेश मिळाला नाही परंतु श्रमिक दलात मात्र भरती करण्यात आले. १९१७ साली गणपत गोविंद व रावबहाद्दूर नाईक यांच्या खटपटीमुळे महार जवानांच्याच दोन कंपन्या तैनात करण्यास ब्रिटिश सरकारने हुकूम काढला. जुलै १९१७ मध्ये महारांची १११ वी पलटण खडी झाली परंतु १९२२ साली ही पलटण विघटित करण्यात आली. त्यानंतर १९२२ ते दुसरे जागतिक महायुद्ध सुरू होईपर्यंत महारांची लढाऊ सैनिकांची भरती होण्याचे थांबले पण महार जातीच्या पुढाऱ्यांनी नेट धरल्याने प्रारंभी रुग्णसेवा पथकात त्यांची भरती सुरू झाली. सप्टेंबर १९४१ मध्ये हिंदुस्थान सरकारने बेळगाव (कर्नाटक) येथील मराठा रेजिमेंटच्या केंद्रात पहिली (ऑक्टोबर १९४१) व दुसरी (जून १९४२) अशा दोन महार पायदळ लढाऊ पलटणी खड्या केल्या. मराठा पलटणीतील अधिकारीवर्गच या नूतन महार पलटणीकडे देण्यात आला होता. युद्धाचा व्याप वाढल्याने तसेच महार जवानांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानेही त्यांच्या आणखी पलटणी उभ्या झाल्या. या पलटणींनी हिंदुस्थानचे सीमासंरक्षण केले. तसेच जपानी सैन्याविरुद्ध इंफाळ, आराकन (ब्रह्मदेश) येथील लढायांत उत्तम कामगिरी बजावली. दुसऱ्या महायुद्धाच्या [⟶ महायुद्ध, दुसरे] शेवटी वरील पायदळी पलटणींचे मध्यम ⇨मशीनगन पलटणीत रूपांतर करण्याचा निर्णय तत्कालीन सरसेनापती जनरल ⇨क्लॉड ऑकिन्लेकयांनी घेतला. तद्नुसार मद्रास रेजिमेंटच्या साहाय्याने १९४७ पर्यंत तीन पलटणींच्या मशीनगन पलटणीत रुपांतराचे काम पूर्ण झाले. १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या सीमासंरक्षणासाठी ‘पूर्व पंजाब सीमादल’ नावाच्या तीन पलटणी खड्या करण्यात आल्या. त्यांमध्ये शीख, जाट व डोग्रा यांच्या एकोणीस जातींच्या जवानांची भरती झाली. मे १९५६ मध्ये जनरल शंकरराव थोरात यांच्या सूचनेप्रमाणे महार रेजिमेंटला महार मशीनगन रेजिमेंट (सीमा) असे नाव देण्यात आले. डिसेंबर १९५९ ते ३० एप्रिल १९७० या कालात रेजिमेंटमध्ये नऊ पलटणींची (७ ते १५ क्रमांकाच्या) भर पडली. जानेवारी १९६१ मध्ये छत्रीधारी मशीनगन कंपनी उभी झाली. सप्टेंबर १९६३ मध्ये मशीनगन पलटणी रद्दबातल करण्यात आल्याने महार (मशीनगन) रेजिमेंटचे पायदळ रेजिमेंटमध्ये रूपांतर झाले.


महार रेजिमेंट-केंद्रे : या रेजिमेंटमध्ये भरती झालेल्या जवानांना सैनिक शिक्षण देण्यासाठी व रेजिमेंटच्या व्यवस्थापनासाठी [भरती, पगारहिशेब, वैयक्तिक सैनिकदप्तर (पर्सोनेल रेकार्ड)] प्रथम १९४२ मध्ये कामठी (नागपूर), १९४६ अरणगाव (अहमदनगर) आणि १९४६ सालाअखेर सागर (मध्य प्रदेश) येथे रेजिमेंट-केंद्रे स्थापण्यात आली. सागर येथे पलटणींच्या अधिकाऱ्यांच्या वार्षिक सभा भरतात. त्यांमध्ये सैनिक-कार्यक्रम, शिक्षणपद्धती, गणवेष, सैनिकी कल्याण इत्यादींवर चर्चा होते व त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे शिफारसी केल्या जातात. १९४७ साली तत्कालीन मुंबई प्रांत सरकारने या केंद्राल २५,००० रूपयांचे अनुदान दिले होते.

रेजिमेंटचे लढाऊ कार्य : पहिल्या महायुद्धात महार दलांना लढाऊ कार्याची संधी मिळाली नाही परंतु दुसऱ्या महायुद्धात मात्र पठाणी टोळ्यांच्या व इतरांच्या आक्रमणापासून हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीचे संरक्षणकार्य यांनी पार पाडले तसेच इराकमध्ये अरब लुटारुंचा बीमोड केला, तर हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी सव्वालक्ष मुसलमानांना होऊ घातलेल्या पाकिस्तानकडे सुखरूप पोहोचविण्याचे कार्य त्यांनीच केले. क्वेट्टा शहरामध्ये मुसलमान दंगलखोरांना वठणीवरआणले व बलुचिस्तानातील हिंदु, शीख आणि इतर मुसलमानेतरांना भारतात यांनीच आणून सोडले. हे काम त्यांनी मानवता व निःपक्षपातीपणाने केल्याबद्दल उच्च सैनिक अधिकाऱ्यांनी व पुढाऱ्यांनी महार रेजिमेंटची प्रशंसा केली होती.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७-४८ काळात पाकिस्तानने भारताविरुदध केलेल्या युद्धात जांगारे येथील भीषण लढाईत (२४ डिसेंबर १९४७) शेकडो पाकिस्तानी सैनिकांना व पठाणी घुसखोरांना कंठस्नान घालताना एक महार लढाऊ तुकडी गारद झाली. या तुकडीचे नेते हवालदार रावू कांबळे व नाईक बारकू कांबळे होते. नौशहर, उरी, चकोथी, टिटवाल, दरास, कार्गिल येथील लढायांत महार पलटणींनी लक्षणीय वीरकार्य केले तर १९५३ मध्ये कोरिया युद्धसमाप्तीनंतर युद्धवंद्यांच्या अदलाबदलीचे अवघड व नाजूक कार्य पार पाडण्यात जनरल थोरातांना तिसऱ्या महार पलटणीचे साहाय्य मिळाले होते.

जून १९६० मध्ये बेल्जियन काँगो [⟶ काँगो प्रजासत्ताक व झाईरे] स्वतंत्र झाल्याबरोबरच तेथे यादवी युद्ध सुरू झाले. संयुक्त राष्ट्रसंघटनेने युद्ध थांबविण्यासाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघटना सेना’ निर्माण केली. त्या सेनेत महार रेजिमेंटची एक कंपनी होती. काँगोच्या कटांगा प्रांतातील लढाईमध्ये निर्भयतेने व निःपक्षपातीपणे काम केल्याबद्दल कंपनीच्या एका अधिकाऱ्याला वीरचक्र हे सैनिकी पदक देण्यात आले.

गोवा मुक्तिसंग्रामामध्ये (१९६१) याच छत्रीधारी कंपनीने भाग घेतला होता तर १९६२ साली चिनी आक्रमणाला (ऑक्टोबर-नोव्हेंबर) तोंड देण्यासाठी महार पलटणींनीच चुशूल, दौलतबेगोल्डी (लडाख व अक्साई चीन) आणि कार्मेग विभाग (ईशान्य भारत) या ठिकाणी शौर्य गाजविले होते. त्यासाठी हवालदार गोविंद कांबळे यांस ‘वीरचक्र’ मिळाले. १९६५ च्या चिनी आक्रमणाच्या वेळीही कच्छ रणातील सरदारचौकी व व्हिगोकोट येथील लढायांत महार जवानांनी तलवार गाजविली. त्याप्रसंगी हवालदार भिंगारदिवे यास वीरचक्र मिळाले. सप्टेंबर १९६५ मध्येही काश्मीरातील संबा, जोरियान, खेमकरण, अस्सल उत्तर इ. लढायांत महार पलटनींनी शौर्य प्रकट केले होते. खेमकरणच्या लढाईत महार पलटणींनी भयंकर नुकसान सोसले.

तसेच १९७१ सालच्या पाकिस्तानी आक्रमणातही [⟶ भारत-पाकिस्तान संघर्ष] महार पलटणी बांगला देश, पंजाब व काश्मीर येथील युद्धांत होत्या तर हरहरकलान, पर्वतअली, कैयान, शेजरा, ठाणपीर आणि बांगला देशात शमशेरनगर, मौलवी बाझार, सिल्हेट,

बेलोनिया व चितगाग इ. ठिकाणच्या युद्धप्रसंगी त्यांच्या पराक्रमाची वाहवा झाली होती.

महार रजिमेंटची पताका

निरनिराळ्या युद्धांत असामान्य पराक्रम केल्याबद्दल नाईक कृष्णा सोनावणे, कर्नल गुरुबक्षसिंग, नाईक अनसूयाप्रसाद (मरणोत्तर) यांना महावीर चक्र, बावीस जवान व अधिकाऱ्यांना वीरचक्र आणि मेजर जनरल व्यंकट कृष्णराव यांस परमविशिष्ट सेवापदक असे सैनिकी सन्मान मिळाले आहेत.

सैनिकी परंपरेप्रमाणे (१९४९ ते १९६१) रेजिमेंटचे पहिले कर्नल लेफ्टनंट-जनरल शंकरराव थोरात होते तर दुसरे कर्नल लेफ्टनंट जनरल कृष्णराव [⟶ राव, जन. के. व्ही. कृष्ण] हे होते.

रेजिमेंटच्या स्थापनेपासून ‘वीर शिवाजी के बालक हम’ या चरणाने रेजिमेंटचे घोषगीत गायिले-वाजविले जाई तथापि पुढे डिसेंबर १९६३ मध्ये ‘वीर शिवाजी’ या शब्दाऐवजी ‘वीर भारत’ असा बदल करण्यात आला. तसेच स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर रेजिमेंटच्या बॅजमध्ये असलेला ‘कोरेगाव’ हा शब्द आणि ‘कोरेगाव विजयस्तंभ’ ही प्रतिमा प्रदर्शित करण्याचे बंद करण्यात येऊन त्या जागी ‘यश-सिद्धी’ हा कार्यवाचक शब्द व ‘खंजीर’ हे शौर्यदर्शक प्रतीक घालण्यात आले. ‘‘ऐसा देश कभी न देखा, कभी न सुना है। देशों का सरताज, यह भारत देश हैं’’।। हे धृपद असलेले गाणे रेजिमेंटचे संचलन-गीत आहे.

तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गिरी यांच्या हस्ते रेजिमेंटला ३ फेब्रुवारी १९७० रोजी ‘राष्ट्राध्यक्ष ध्वज’ प्रदान करण्यात आला. ह्याच दिवशी पंधरावी पलटण सोडून इतर चौदा पलटणींना राष्ट्राध्यक्षांनी ‘पलटण पताका’ ही प्रदान केल्या. या शुभसमारंभानंतर पंधरावी पलटण खडी झाली होती म्हणून तिला पताका देणे शक्य झाले नव्हते.

पहा : पूना हॉर्स भारत (संरक्षणव्यवस्था) भूसेना मराठा रेजिमेंट.

संदर्भ : 1. Commandant, Mahar Regimental Centre : Regimental History of the Mahar Regiment, Sagar, 1972.

           २. आत्रे, त्रिंबक नारायण, गांव-गाडा, मुंबई, १९५९.

दीक्षित, हे. वि.