मल्लदेश : उत्तर भारतातील एक प्राचीन देश. प्राचीन ग्रंथांतील वेगवेगळ्या उल्लेखांनुसार मल्ल वा मल्ली लोकांच्या देशाचे स्थान पश्चिमेस तसेच पूर्वेसही असावे, असे दिसते.
(१) महाभारतातील उल्लेखांवरून हा देश म्हणजे पंजाबातील मुलतान जिल्हा (विद्यमान पाकिस्तानात) असावा. लक्ष्मणाचा पुत्र चंद्रकेतू याला रामाने हे राज्य दिल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. हा प्रदेश प्राचीन काळी ‘मालव’ या नावानेही ओळखला जात असे. महाभारतातील मालव लोक आणि अलेक्झांडरच्या इतिहासकारांनी वर्णिलेले ‘मल्ली’ लोक हे एकच असून ते या देशातील रहिवासी असावेत, असे दिसते. कनिंगहॅमच्या मते या देशाची राजधानी मूलस्थानपूर (मुलतान) होती. येथेच भगवान विष्णूने नृसिंहावतार घेऊन प्रल्हादाच्या पित्याला–हिरण्यकश्यपूला–ठार केले, अशी कथा आहे.
(२) पुराणातील काही उल्लेखांवरून बिहार राज्यातील हजारीबाग व मानभूम–पुरुलिया–(प. बंगाल) जिल्ह्यांचा प्रदेश म्हणजे प्राचीन मल्ल देश असावा, असे दिसून येते. जैन तीर्थस्थान असलेली पारसनाथ टेकडीही (प्राचीन सभेत शिखर) मल्ल देशात समाविष्ट होती. यावरूनच पारसनाथ टेकडीला मल्ल पर्वत असेही म्हटले जात होते.
(३) बौद्ध ग्रंथांतील उल्लेखांवरून बुद्धाच्या काळात मल्ल लोकांची वस्ती पावा व ⇨कुशिनारा (सांप्रत कसिया) येथे असल्याचे दिसून येते. बौद्धपूर्व काळात मल्ल जनपद होते व त्याची कुशावती म्हणजेच कुशिनारा ही राजधानी होती. तिलाच अनिरुद्धव असेही म्हटले जाई. हे ठिकाण सांप्रत उत्तर प्रदेश राज्यातील कसिया गावाजवळ (गोरखपूर जिल्हा) आहे. तेथील उत्खननांत राजवाड्यांचे अवशेष आढळले असून हे राजवाडे मल्ल राजांचे किंवा सरदारांचे असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे.
पंडित, भाग्यश्री
“