मलकाणी, मंघाराम उधाराम : (२४ डिसेंबर १८९६—१ डिसेंबर १९८०). प्रख्यात सिंधी एकांकिकाकार, नाटककार, नट, दिग्दर्शक, साहित्येतिहासकार व समीक्षक. जन्म हैदराबाद (सिंध) येथे. शिक्षण डी. जे. सिंध कॉलेज कराची तसेच मुंबई येथे. मुंबईच्या जयहिंद कॉलेजात दीर्घकाळ इंग्रजीचे प्राध्यापक व विभाग प्रमुख. मुंबई विद्यापीठाने सिंधी व इंग्रजी या दोन्ही विषयांच्या अभ्यास मंडळांवर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली होती.साहित्य अकादेमीचेही ते सदस्य होते. सिंधी साहित्य मंडळाचे तर ते अनेक वर्षे प्रेरणास्थान व अध्यक्ष होते. १९७२ मध्ये त्यांना साहित्य अकादेमीची अधिछात्रवृत्तीही मिळाली. इंग्रजीचे नाणावलेले प्राध्यापक म्हणूनही त्यांचा लौकिक होता.
बालपणापासूनच मलकाणी यांना नाटकांची विशेष आवड होती. कराची येथील डी. जे. सिंध कॉलेजमध्ये विद्यार्थी असतानाच ते तेथील हौशी नाटक मंडळाच्या सर्वच कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होत. १९२३ साली सिंधमध्ये ‘रवींद्रनाथ लिटररी अँड ड्रॅमॅटिक क्लब’ची स्थापना झाली. उद्घाटनास टागोर आले होते. टागोरांच्या चित्रांगदा मधील काही प्रसंग या वेळी रंगभूमीवर सादर केले गेले. यामध्ये नायिकेची भूमिका स्वतः मलकाणींनी केली होती आणि ती टागोरांना आवडलीही होती.
मलकाणी यांच्या वाङ्मयीन कार्याची सुरूवात भाषांतराने झाली. गूंगी कुआंरि ऐं बनदेवी (१९२४, म. शी. मुकी नवरी आणि वनदेवी) या शीर्षकाने त्यांनी काही बंगाली कथा सिंधीत भाषांतरित केल्या आहेत. त्यांनी काही पाश्चात्य नाटकांची सिंधीत भाषांतरे केली. १९२६ मध्ये नॉव्लॉक यांच्या किस्मत (१९११) या नाटकाचे किस्मत (म. शी. नियति) याच नावाने; १९२९ मध्ये शेक्सपिअरच्या एका नाटकाचे दिलसोजु दास्तानु (म. शी. हृदयस्पर्शी करुण कहाणी) आणि १९३० मध्ये झँग्विलच्या द मेल्टिंग पॉट (१९०८) या नाटकाचे एकताजो आलापु (म. शी. एकतेचा सूर) ह्या नावाने त्यांनी भाषांतरे केली.
भाषांतरांनंतर मलकाणी स्वतंत्र नाट्यलेखनाकडे वळले. त्यांचे पहिले स्वतंत्र सिंधी नाटक खिनजी खता (१९३०, म. शी. क्षणिक स्खलन) हे असून त्याला पारितोषिकही मिळाले. याच वर्षी त्यांनी अनारकली हे ऐतिहासिक नाटक लिहून रंगभूमीवर आणले. हे त्यांचे नाटक खूपच गाजले व त्याला लोकप्रियताही लाभली.
मिर्झा ⇨ कलीच बेग (१८५३−१९२९) ह्यांनी सिंधी भाषकांना एकांकिकांचा परिचय करून दिलाच होता. मलकाणी यांनी एकांकिकाप्रयोगांचे अनेकविध व प्रभावी सामर्थ्य ओळखले आणि आपले लक्ष नाटकांकडून एकांकिकांकडे वळवले. पाप जोकी तो (पापकृत्य) या आपल्या पहिल्या एकांकिकेतून त्यांनी तारूण्यातील आंधळ्या प्रेमाचे परिणाम चित्रित केले. त्यांची ही एकांकिका फारच यशस्वी ठरली त्यानंतर त्यांनी अनेक एकांकिका लिहिल्या. त्यांचे संग्रह असे : पंज नंढा नाटक (१९३७, पाच छोटी नाटके), पंगती पर्दा (१९३८, चार एकांकिकांचा संग्रह, म. शी. पंक्तिप्रपंच), फाळणीनंतरचा जीवन चहचिटा (१९५७, जीवनाची क्षणचित्रे) हा एकांकिकासंग्रह उल्लेखनीय होय. नंतर १९६३ मध्ये त्यांचा सुडखबीता प्या टिम्कनि (काजवे चमचमताहेत) हा एकांकिकासंग्रह प्रसिद्ध झाला.
मलकाणींच्या एकांकिकांतून एक निर्भय व तळमळीचा समाजसुधारक म्हणून त्यांची ठळक प्रतिमा उभी राहते. विविध प्रकृतींच्या व्यक्ती, त्यांचा परस्परांशी कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय पातळीवर येणारा संपर्क, त्यांतून निर्माण होणारा विसंवाद, त्यातून संघर्ष व कटुता या सर्वांचे तलस्पर्शी मार्मिक चित्रण करून आपल्या परीने या सर्वांची उकल अतिशय रंजक व कालात्मक रीतीने करण्याचा प्रयत्न ते आपल्या एकांकिकांतून करतात.
मलकाणींची प्रतिभा केवळ नाट्यक्षेत्रापुरतीच मर्यादित राहिली नाही. रवींद्रांच्या गार्डनर आणि गीतांजलीतील निवडक कवितांचाही त्यांनी अनुक्रमे प्रीतिजा गीत (१९४०, प्रेमगीते) आणि गीतांजलि (१९४२) ह्या नावाने सिंधीत पद्यानुवाद केला आहे. अदबी उसूल (१९५०, साहित्यसमीक्षा-तत्त्वे) हा त्यांचा चिंतनपर असा दर्जेदार समीक्षाग्रंथ होय. पछिमी यात्रा (१९६३, पश्चिमी देशांचा प्रवास) हे त्यांचे हृद्य प्रवासवर्णन असून सिंधी नसुर जी तारीख : १९४७ ताई (१९६८, सिंधी गद्यसाहित्याचा हतिहास : १९४७ पर्यंत) हा त्यांचा साहित्य अकादेमी पुरस्कारप्राप्त दर्जेदार सिंधी साहित्येतिहास ग्रंथ होय. आपल्या आयुष्यातील आठवणींचे संकलनही साहित्यकारनिजूं सिमिर्त्यू (१९७९, साहित्यिकांची स्मृतिचित्रे) त्यांनी प्रसिद्ध केले.
सिंधीशिवाय त्यांनी इंग्रजी भाषेतूनही काही कविता आणि अनेक समीक्षापर लेख लिहिले. सातत्याने सु. साठ वर्षे विविध प्रकारांतील दर्जेदार विपुल लेखन, अभियन, दिग्दर्शन व अध्यापन यांमध्ये आपला कायम ठसा मलकाणींनी उमटवला. सिंधी साहित्यात त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
वाधवाणी, यशोधरा (इं.); झा, अपर्णा (म.)