मर्सी नदी : इंग्लंडच्या वायव्य भागातील चेशर व लँकाशर परगण्यांतून वाहणारी प्रमुख नदी . लांबी ११० किमी. पश्चिम पेनाइन आल्प्समध्ये उगम पावणाऱ्या गॉयिट व टेम या दोन शीर्षप्रवाहांचा स्टॉकपोर्ट येथे संगम होतो. स्टॉकपोर्टपासून पुढे वाहणाऱ्या संयुक्त प्रवाहास ‘मर्सी नदी’ असे संबोधिले जाते. मँचेस्टरच्या दक्षिणेकडील उपनगरातून पश्चिमेस वाहत जाऊन ती आयरिश समुद्राला जाऊन मिळते. मर्सी नदीने मुखाशी २६ किमी. लांबीची व ३.२ किमी. रूंदीची नदीमुखखाडी निर्माण केली असून लिव्हरपूल हे तेथील प्रमुख बंदर आहे. टेम ही उजव्या तीरावरील, तर बॉलन व धीव्हर ह्या डाव्या तीरावरील हिच्या प्रमुख उपनद्या आहेत. मँचेस्टर, ॲम्स्टरडॅम व लिव्हरपूल या शहरांतील व्यापाराच्या दृष्टीने या नदीला विशेष महत्व आहे. जहाजबांधणी, तेलशुद्धीकरण हे नदीकाठावरील प्रमुख उद्योगधंदे आहेत. नदीचे पात्र खोल असल्याने व पाणीही भरपूर असल्याने मोठमोठी जहाजे हिच्यातून वाहतूक करू शकतात.फ्लीश्टन येथे उजवीकडून ‘मँचेस्टर शिप कॅनॉल’ च्या स्वरूपात अर्वेल नदी मर्सीला येऊन मिळते.
मर्सी नदीमुखखाडीतूनच नदीपात्राखालून रस्त्यांसाठी दोन व लोहमार्गासाठी एक बोगदा काढण्यात आलेला आहे. लिव्हरपूल व बर्कनहेड या ठिकाणांना जोडणारा मर्सी हा ग्रेट ब्रिटनमधील सर्वांत लांब (३.४३ किमी. व उपबोगद्यासह ४.६३ किमी.) बोगदा आहे. १९२५ मध्ये या बोगद्याच्या कामास सुरूवात होऊन १८ जुलै १९३४ रोजी पाचव्या जॉर्ज राजाच्या हस्ते तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्याला एकूण ७७.५ लक्ष पौंड खर्च आला. बोगद्याची रूंदी ११ मी. असून तो चौपदरी आहे. प्रतिवर्षी सु. ७५ लक्ष वाहने या बोगद्यातून ये-जा करतात. १९७१ मध्ये तयार झालेल्या २.४ किमी. लांबीच्या किंग्जवे बोगद्यामुळे लिव्हरपूल व वॉलसी ही दोन ठिकाणे एकमेकांना जोडली गेली आहेत. लोहमार्ग बोगदा १८८६ मध्येच तयार झाला आहे
चौधरी, वसंत
“