मराठी भाषा : मराठी भाषा ही मुख्यत: आज महाराष्ट्र राज्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण प्रदेशात बोलली जाते. तिच्या उत्तरेला गुजराती, राजस्थानी, भिल्ली व हिंदी; पूर्वेला हिंदी व तेलुगू; दक्षिणेला कन्नड व कोकणी या भाषा, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.

भाषिकांच्या संख्येच्या मानाने मराठी ही भारतातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. तिचा क्रम हिंदी (१३,३४,३५,३६०), तेलुगू (३,७६,६८,१३२) व बंगाली (३,३८,८८,९३९) यांच्यानंतर येतो.

भारतातील १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे एकंदर मराठी भाषिकांची संख्या ३,३२,८६,७७१ इतकी होती. त्यातले ३,०२,७८,९१३ महाराष्ट्र राज्यात असून उरलेले ३०,०७,८६८ भारताच्या इतर प्रदेशात होते. त्यांपैकी सर्वांत जास्त, म्हणजे १२,५६,६८२ मध्य प्रदेशात असून त्यानंतर अनुक्रमे पुढील येतात : कर्नाटक १०,७२,४१९; आंध्र २,८६,७३७; गुजरात २,०८,१९२; तमिळनाडू ५२, ३६३; दाद्रा-नगर हवेली ३४,११८; उत्तर प्रदेश १४,५५९; पश्चिम बंगाल १३,२८०; गोवा-दमण-दीव ११,८१३; राजस्थान ९,१८३; दिल्ली ७,५७८; आसाम ५,४९७; बिहार ५,०७४; पंजाब ४,८५३; ओरिसा २,९७०; ईशान्य सरहद्द प्रांत २४२; काश्मीर २२६; पॉंडिचेरी २०३; सिक्कीम ६१; अंदमान-निकोबार ५६; नागालँड ५१; हिमाचल प्रदेश ३०; त्रिपुरा २०; मणिपूर ६; लखदीव इ. ५.

वरील संख्येत खानदेशीचा समावेश नाही. तिच्या भाषिकांचा आकडा ४,२८,१२६ होता; पण लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या वर्गीकरणानुसार तिचा समावेश मराठी, गुजराती, हिंदी व राजस्थानी यांनी मर्यादित अशा भिल्ली भाषासमूहाबरोबर केलेला आहे.

शिक्षण, नोकरी, व्यापार इत्यादींच्या निमित्ताने परदेशात असलेल्या शेकडो मराठी भाषिकांचा यात समावेश नाही.

याशिवाय मराठीची एक पोटभाषा बोलणारे काही हजार लोक मॉरिशस बेटात आहेत.

वर्गीकरण : मराठी ही इंडो-यूरोपियनच्या भारतीय आर्य शाखेची (कोकणी व सिंहली या भाषा सोडल्यास) सर्वांत दक्षिणेकडची भाषा आहे. ग्रीअर्सन याने भारतीय आर्य भाषांचे बाह्य, आंतर व मध्य असे वर्गीकरण केलेले आहे. बाहेरच्या सर्व बाजूंनी परभाषा किंवा आंतर भाषा तसेच सागरी परिसराने वेढलेल्या त्या ‘बाह्य’ (मराठी, सिंधी, उडिया, बिहारी, बंगाली, असमिया इ.); केवळ बाह्य भाषा किंवा सागरी परिसराने वेढलेल्या त्या ‘आंतर’ (पहाडी, पश्चिम हिंदी, बांगडू, ब्रज, कनौजी, बुंदेली, पंजाबी, डोगरी, गुजराती, भिल्ली, खानदेशी, राजस्थानी इ.); केवळ आंतर भाषांनी वेढलेल्या मध्यवर्ती त्या ‘मध्य’ (पूर्व हिंदी : अवधी, बाधेली, छत्तीसगढी इ.).

मराठी ही आर्य भाषा गुजराती, राजस्थानी, भिल्ली, व हिंदी या आंतर भाषा व सागरी परिसर यांनी वेढलेली आहे. पण समुद्राच्या अडथळ्यामुळे तिचा प्रदेश बाह्य संपर्कापासून अलिप्त न रहाता परकीय प्रवासी, आक्रमक व्यापारी इत्यादींचे फार प्राचीन काळापासून लक्ष्य बनलेला आहे. त्या मानाने बंगालच्या समुद्राला लागून असलेला प्रदेश अशा संपर्कापासून बराच मुक्त होता.

पोटभाषा व बोली : मराठीच्या पोटभाषांचा पद्धतशीर अभ्यास झालेला नाही. ग्रीअर्सनने वेगवेगळ्या भागांतले नमुने गोळा करून दिल्यामुळे पोटभाषांचे पुसट चित्र आपल्याला मिळते. पण सबंध भाषिक प्रदेशाचा अभ्यास झाल्याशिवाय हे चित्र स्पष्ट होणार नाही.

पोटभाषांच्या वर्गीकरणात ध्वनी, व्याकरणप्रक्रिया व शब्दसंग्रह यांच्यातील भेदांचा विचार करावा लागतो. इतर काही मराठी बोलींतील च्या किंवा किंवा असणाऱ्या बोली निश्चितपणे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तीच गोष्ट ला (मला) याऐवजी ले (मले) किंवा का-आक (माका, घराक) यांचा उपयोग करणाऱ्या बोलींची. अशा प्रकारची वैशिष्ट्ये आणि त्यांची प्रदेशवार व्याप्ती, म्हणजे भौगोलिक मर्यादा, शोधून काढल्याशिवाय मराठीचे म्हणजेच ती ज्या पोटभाषा, बोली यांनी बनली आहे. त्यांचे स्वरूप निश्चित होणार नाही. त्याचप्रमाणे जाती, धर्म, वर्ग इ. स्पष्टपणे भिन्न असणाऱ्या समूहांच्या बोलींचे बौगोलिक सहअस्तित्व लक्षात घेणेही या बाबतीत आवश्यक आहे.

सध्यातरी किनारपट्टीतील ‘सागरी’ किंवा कोकणी मराठी, घाटाच्या पूर्वेला लागून असलेली ‘देशी’, उत्तरेकडील ‘खानदेशी’; पूर्वेकडील ‘वऱ्हाडी’ आणि साधारणत : मध्यवर्ती अशी मराठवाड्याची ‘दक्षिणी’ असे भेद नजरेत भरतात. त्यातही गोदावरीच्या दक्षिणोत्तर असलेला पैठणच्या आसपासचा भौगोलिक प्रदेश हा आजही मराठीच्या अभ्यासाचा मध्य किंवा प्रारंभबिंदू मानायला हरकत नाही.

पुण्यामुंबईकडची मराठी ती प्रमाण मराठी असे म्हणण्याचा प्रघात आहे. प्रमाण भाषेचे स्वरूप द्विविध असते : म्हणजे ग्रांथिक व सभासंमेलनातले म्हणजे बोलण्यातले शिष्ट. लिखित रूप परंपरानिष्ठ असते आणि आता ते केवळ गंभीर लेखनापुरतेच मर्यादीत राहिले आहे, तर बोलरूप प्रसंगानुरूप बदलत असते. शिवाय मुबंई व पुणे या प्रमाणेनागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर इ. महत्त्वाच्या केंद्रांतील भाषाही आता प्रमाण झालेल्या आहेत, हे लक्षात घेऊनच प्रमाण भाषेसंबंधी बोलले पाहिजे.

इतिहास : भाषेचा इतिहास म्हणजे काळाच्या ओघात भाषेत घडून आलेल्या परिवर्तनाची पद्धतशीर मांडणी. यातील काही परिवर्तने स्वाभाविकपणे घडून येतात, तर काही सामाजिक परिस्थितीमुळे. ही परिस्थिती समाजातील अंतर्गत घटनांमुळे किंवा घडामोडींमुळे निर्माण होईल किंवा बाह्य संपर्कही तिच्या मुळाशी असू शकेल.

मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे, म्हणजे ते संस्कृतचे काळाच्या ओघात विशिष्ट दिशेने परिवर्तित झालेले रूप आहे.

मूळ संस्कृत भाषा वायव्य भारतातून पूर्वेकडे व खाली दक्षिणेकडे पसरत गेली. एखादी भाषा पसरणे म्हणजे तिच्या भाषिकांनी नवनव्या प्रदेशांवर आक्रमण करणे वा इतर भाषिकांनी आपली मूळ भाषा टाकून तिचा स्वीकार करणे. संस्कृतच्या बाबतीत या दोनही गोष्टी घडल्या आहेत; एवढेच नव्हे, तर ज्या इतर भाषिकांनी तिचा स्वीकार केला, त्यांचे प्रमाण मूळ भाषिकांच्या कितीतरी पटीने जास्त आहे. आज मराठी बोलणाऱ्या लोकांत मूळ आर्यवंशीय लोकांचे वंशज जवळजवळ नाहीतच असे म्हणता येते. उत्तरेकडील डोंगराळ भागात ऑस्ट्रिक, तर पूर्व व दक्षिण भागात द्रविड निम्नस्तराचा तिच्यावर बराच परिणाम झाला असावा. ऐतिहासिक काळात राजकीय वर्चस्वामुळे सुरुवातीला मुसलमानी सत्तेखाली तुर्की, अरबी व फार्सी, तर पुढे पोर्तुगीज व इंग्रजी यांचा फार प्रभाव पडला.

इंग्रजीच्या प्रभावाची आगेकूच अजून चालू आहे. ती फार्सीप्रमाणे केवळ राज्यकर्त्यांची भाषा नसून जागतिक महत्त्वाची सांस्कृतिक प्रतिष्ठा असलेली ज्ञानभाषाही आहे. मराठीने तिच्यातून शेकडो शब्द, वाक्यप्रयोग, विचार तर घेतले आहेतच; पण शिवाय हे स्वरही उचलले आहेत. या प्रभावाचा कालखंड अजून संपलेला नाही. हा प्रभाव इतका खोलवर गेलेला आहे, की कोणताही सुशिक्षित किंवा अल्पशिक्षित माणूसही आवश्यक नसतानाही इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्याचे तुकडे, मराठी व्याकरणाप्रमाणे चालणारी इंग्रजी नामे, कर– किंवा हो– यांचे शेपूट लावून चालवलेली इंग्रजी क्रियापदे, तसेच इंग्रजी विशेषणे इत्यादींचा वापर केल्याशिवाय बोलूच शकत नाही.

महत्त्वाचे टप्पे : इतर आर्यभाषांप्रमाणेच मराठीच्या वेगळेपणाची जाणीव इ. स. १००० च्या आसपास होऊ लागते. यासंबंधीचा पुरावा कोरीव लेखांतून प्रारंभकाळातले स्पष्टपणे मराठी असे काही नमुने पुढीलप्रमाणे :

(१) इ. स. १११६-१७ मध्ये कोरलेली श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येतील ही दोन वाक्ये : ‘श्रीचावुण्डराजें करवियलें’. ‘श्रीगंगराजे सुत्ताले करवियले’.

(२) भूलोकमल्ललिखित मानसोल्लास किंवा अमिलषतार्थचिन्तामणि या शके १०५१ (इ. स. ११२९) मधील ग्रंथातले दोन उतारे : ‘जेणें रसातळउणु मत्स्यरूपें वेद आणियले मनुशिवक वाणियले तो संसारसायरतरण मोह (हं) ता रावो नारायणु’. ‘जो गोपिजणे गा (?मा) यिजे बहु परि रूंपे निऱ्हांगो…’

(३) शके ११०८ (इ. स. ११८७) मधील शिलाहार अपरादित्याच्या (द्वितीय) परळ येथे सापडलेल्या लेखातील शापवचन : ‘अथ  तु जो कोणु हुवि ए शासन लोपी तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुंटुंबीआ पडें तेहाची माय गाढवें झविजे’.

(४) खानदेशामधील पाटणचा शके ११२९ (इ. स. १२०७) चा शिलालेख. या लेखातील एक वाक्य असे : ‘इयां पाटणीं जें केणें उघटे तेहाचा असि आउ जो राउला होंता ग्राहकापासी तो मढा दीन्हला…’

वरील सर्व उताऱ्यांतील मजकूर मराठीच आहे, याबद्दल शंका नाही, त्यामुळे इ. स. १००० ही ढोबळ मानाने मराठी भाषिक कालखंडाची सुरुवात मानायला हरकत नाही. प्रारंभापासून आजपर्यंतच्या या भाषिक प्रवाहाचे अभ्यासाच्या सोयीसाठी खंड पाडणे इष्ट आहे. त्याचप्रमाणे त्यामागील तत्त्व निश्चित करणेही आवश्यक आहे. सूक्ष्म आणि स्वतंत्र अभ्यासात हे काटेकोरपणे होईल. या ठिकाणी फक्त स्थूल मानाने हे शक्य आहे.

(१) प्राचीन कालखंड : (अ) कोरीव लेखांतून दिसणारे मराठीचे पूर्वप्राचीन रूप. (ब) यादवकाळात मुसलमानी सत्ता पसरू लागतानाचे महानुभाव, ज्ञानेश्वरी आणि त्यांना समकालीन असणारे उत्तरप्राचीन रूप.

(२) मध्य कालखंड : (अ) शिवपूर्व काल. मुसलमानी भाषांचा वाढता प्रभाव. (ब) शिवकाल. फार्सी वर्चस्वाची परिसीमा (क) शिवोत्तर काल. ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी, लोकवाङमयातून जिवंत भाषेचे दर्शन घडविणारा काळ.

(३) अर्वाचीन कालखंड : (अ) अव्वल इंग्रजी. मराठीचा नवा अवतार. व्याकरणे, पाठ्यपुस्तके, शब्दकोश यांचा काळ. (ब) प्रबोधनकाल. साहित्य, वैचारिक वाङमय इ. मधून दिसणारे मराठीचे प्रचलित रूप.

पूर्वप्राचीन काळातील भाषिक पुरावा कोरीव असल्यामुळे थोडी मोडतोड सोडल्यास तो मूळ स्वरूपात आपल्याला मिळतो. त्यामुळे अभ्यासद्दष्टया तो विश्वासाई आहे. उत्तरप्राचीन रूपाचे तसे नाही. त्याची मुळ रचना तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातली असली, तरी त्या काळातले कागदपत्र आपल्याकडे नाहीत. ज्या काही साहित्याच्या हस्तलिखित प्रती तयार होत होत ते टिकून राहिले, त्याचे मुळ स्वरूप नकलाकारांच्या हातून कळतनकळत इतके बदलले, की त्यातले मूळचे काय व बदलेले काय याचा अभ्यास करमे, तसेच त्यासाठी एक नवीन चिकित्सापद्धती निर्माण करणे अपरिहार्य झालेले आहे.

अर्थात नुसती अभ्याससामग्री जमवून काही होनार नाही. भाषा शास्त्राची तत्वे, भाषेच्या इतिहासाचीपद्धती आणि या अभ्यासाला उपकारक अशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ. सर्व प्रकारची माहिती असली, तरच निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष काढणे शक्य होईल.

मराठीचा वर्णनात्मक परिचय : या परिचयात पुढील विषयांचा समावेश आहे : (अ) ध्वनिविचार, (आ) रूपविचार, (इ) वाक्यविचार, (ई) शब्दसंग्रह.

(अ) ध्वनिविचार : मराठीत पुढील ध्वनी आहेत:

(१) स्वर

पूर्व मध्य पश्च
उच्च (संवृत)

मध्यम (अर्ध विवृत)

निम्न (विवृत)

 

स्वर अवधियुक्त (ऱ्हस्व किंवा दीर्घ), आघातयुक्त (मोठ्याने किंवा हळू उच्चारलेले) व अनुनासिक (नाकाच्या पोकळीतील नादासह उच्चारलेले)असू शकतात.

मराठीत स्वरांचे ऱ्हस्वदीर्धत्व त्यांच्या शब्दातील स्थानावर अवलंबून असते. स्वर अंत्यस्थानी किंवा अंत्यस्थानी एका व्यंजनापुर्वी दीर्घ असतो. इतरत्र ऱ्हस्व असतो. इथे हे लक्षात ठेवले पाहिजे, की मराठीत व्यंजनान्त शब्द अकारान्त लिहिले जातात : पान=पान्, आकार=आकार्. दीर्घ हा ललितलेखनात शब्दान्ती वर शिरोब्दू देऊन दर्शवला जातो : मुलं. पण एरवी त्याला स्वतंत्र चिन्ह नाही. फळ (फळ्), घर (घर्), इ. शब्दांतील अही दीर्घच आहे.

यांना ही दीर्घत्वदर्शक चिन्हे आहेत, तशी ती आ, ए, ॲ, ओ, ऑ यांना नाहीत. माळ-माळी, तेल –तेली, बॅट-बॅटी, जो-जोडा, जॉब-जॉबर यांत ते अनुक्रमे दीर्घ व ऱ्हस्व आहेत. तरीही अंत्यदीर्घत्वाच्या नियमामुळे कोणतीही अडचण उद्भवत नाही.

अंत्यस्थानी दोन किंवा अधिक व्यंजने आल्यास त्यांच्य़ा आधीचा स्वर आघातयुक्त ऱ्हस्व असतो : अग्र, राष्ट्र, भिंत, मुक्त इत्यादी.

लागोपाठ येणाऱ्या दोन स्वरांतला पहिला आघातयुक्त, म्हणजे जोराने उच्चारला जाणारा असल्यास, ते दोन स्वर मिळून संयुक्त स्वर निर्माण होतो. अ+इ यांत दोघांचा उच्चार सारखाच असल्यास अइ असे दोन अवयवांचे रूप मिळेल, पण अवर आघात असल्यास हे एकावयवी रूप मिळेल : वई, वैर. या नियमानुसार अनेक संयुक्त स्वर संभवतात. पण मराठीत फक्त अइ, अउ यांनाच  ही स्वतंत्र चिन्हे आहेत.

आघातरहित अनुनासिक असू शकतात व ते नंतर येऊ शकतात. अनासिक पूर्वी येते : संयम=सैंयम्. फक्त एकुणऐंशीऐंशी यात ती पूर्वी येते. अनुनासिक हा र, ल, व, श, स, ह यांच्यापूर्वी येतो : संरक्षण=सौंरक्षण, संलग्न=सौंलग्न, स्वयंवर=स्वयौंवर, संशय=सौंशय, वांशिक=वाउंशिक, संसार=सौंसार, सांसर्गिक=साउंसर्गिक, संहार=सौंहार.

मराठी वर्णमाला शिकवताना इतर चिन्हांबरोबर ऋ, ऋ, लृ, लृ, व अं, अ: ही चिन्हेही शिकवण्यात येतात. यांतील पहिली ती संस्कृतमध्ये आहेत व त्यांचे उच्चार आता अनुक्रमे रु, रू, लु असे होतात. लृ हा तर संस्कृतमध्येही नाही. अं चा उच्चार शाळेत अम्अ: चा अहा असा शिकवला जातो.

(२) व्यंजने

टीप : (१) चौकोनातील डावीकडचे ध्वनी अघोष व उजवीकडचे सघोष, तसेच वरचे शुद्ध व खालचे महाप्राणयुक्त आहेत.

(२) तोडांतून जोराने बाहेर सोडलेला श्रुतिगोचर श्वास म्हणजे महाप्राण. तो ज्या स्वरापुर्वी किंवा शुद्ध व्यंजनानंतर योतो त्या स्वराचे व व्यंजनाचे उच्चारणस्थान व प्रकार त्याच्यात दिसतात

(३) दंतमूलीय छ, उत्सव, मत्सर इ. शब्दांत युग्म रूपात सापडतो (उछ्छव, मच्छर).

(४) ङ. हा नासिक वाङमय, वाङनिश्चय इ. शब्द सोडले, तर फक्त स्ववर्गीय स्पोटकांपूर्वी येतो.

(५) म्ह, ण्ह, इ. जोडाक्षरे नसून म, ण, इत्यादींचे महाप्राणयुक्त उच्चार आहेत.

(६) महाप्राण घर्षक ह हा स्वरापूर्वी (हा), दोन स्वरांमद्ये (आहे), घर्षक, नासिक ङ व ळ सोडून इतर सर्व शुद्ध व्यंजनांनंतर येतो. (ह) हा अघोष व्यंजनांत व स्वरानंतर विसर्ग म्हणून सापडतो.

(७) शब्दारंभी न येणाऱ्या संयुक्त व्यंजनातील आद्यवर्ण नेहमी युग्मरूप असतो. विक्रम= विक्‌क्‌रम, भक्ती भक्‌क्‌‍ती, पर्वा पर्‌र्‌वा शक्यता शक्‌क्‌यता. मात्र सामान्यरूप,अनेकवचन, याकारांत प्रत्यय इत्यादींत मूळ व्यंजनाला लागणारा थ व्यंजाप्रमाणे वागत नाही: वाडा – वाड्यात वा + ड्यात्, पुणे – पुण्याचा पु + ण्या = चा, रड्या = र +ड्या, नदी –नद्या = न +द्या, गोप्या = गो + प्या.

(८) दंतमुलीय छ, ण, ण्ह, ङ. ळ हे ध्वनी सब्दारंभी येत नाहीत.

संधी : दोन ध्यनींचा संपर्क जाल्यामुळे जो काही बदल होतो त्याला संधी म्हणतात. संस्कृत व्याकरणाचे ते महत्वाचे अंग होते. संधीचे दोन प्रकार आहेत: वाक्यांतर्गत व शब्दांतर्गत. वाक्यातील दोन शब्दांत एकाचा अंत्यवर्ण व दुसऱ्याचा आद्यवर्ण यांचा संधी तोधाक्यांतर्गत: कर्तु नेच्छसि यन्मोहास्करि ष्यस्यवशो पि तत् कर्तु न इच्छसि यत् मोहात् क रिप्यासि अवश: अपि तत्. रूपविचारात धातूला किंवा शब्दाला प्रत्यय लागताना होणारा शब्दांतर्गत : वाक्षु = वाच् +सु. मरूद्रि: = मरूत् + भि :, नद्या = नदी + आ.

मराठीत वाक्यांतर्गत संधी नाही. थोडाबहुत असला (भरभर बोलण्यात असतोच) तरी तो विचारात घेतला जात नाही. सात शेळ्या शेतात शिरल्या हे वाक्य साच्छेळ्या शेताच्छिरल्या असे बोललेजातही असेल, पण ते अपवादात्मक. मात्र बऱ्याच ठिकाणी आहे हे सहायक क्रियापद मुख्य क्रियापदात मिसळलेले दिसते: जातोय., करतोय. पण या व अशा नवप्रवृत्तींचा येथे विचार केलेला नाही.

शब्दांतर्गत संधीची ठळक उदाहरणे येथे दिली आहेत.

एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे, ती ही, की संस्कृत मराठी संधी नव्हे. अ + इ, ई = ए: राम + ईस्वर = रामेश्वर, इ. उदाहरणे मराठीत गैरलागू आहेत.

मराठीत दोन प्रकारचे संधी आहेत: स्वर स्वर आणि व्यंजन + व्यंजन.

स्वरसंधी : इ + आ = या: पी + आ = प्या, पी + आल = प्याल उ + आ = वा: जळू + आ = जळवा, सासू + आ = सास्वा ए + आ = या: दे + आ = द्या, दे + आल = द्याल ओ +आ = वा: हो + आ = व्हा, ही+ आल = व्हाल. हे सर्वसाधारण नियम आहेत. काही रुपांत आढळणारे विशिष्टनियम इथे दिलेले नाहीत.

व्यंजनसंधी : व्यंजनान्त नामांना किंवा धातूंना व्यंजनादी प्रत्यय लागताना हा होतो.

या ठिकाणी हे लक्षात ठेवले पाहिजे, की दैत्य अर्धस्फोटक च, छ, ज, झ यांच्यानंतर इ हा स्वर किंवा य हे व्यंजन आल्यास तालव्य अर्धस्फोटक मिळतो: वाच्+ ईन = वाचीन, पाज् + ईन = पाजीन. ए पूर्वी हा बदल विकल्पाने होतो, तर य पूर्वी हा बदल होऊन व लोप पावतो : भाचा, सामान्यरूप भाच्या –यातील च तालव्य असून य अनुच्चारित आहे. तालव्य अर्धस्फोटक व श् यानंतर मराठीत य हा धव्नी येत नाही: राज्य = राज्ज, अवश्य = अवश्श, माझ्या = माझा (झ तालव्य), इत्यादी.

स नंतर इ, य, श आल्यास स चा श होतो. श नंतर य चा लोप होतो: दिवस + ई = दिवशी, रास + ई = राशी, फास + ई = फाशी खिसा, सामान्यरुप खिस्या = खिश्या= खिशा, बस+ शील = बसशील = बश्शील.

क्रियापदाचे काही प्रत्यय त (वर्तमान), ल (भूत) व श यांनी सुरू होतात. त्यांचा काही धातूंच्या अंत्य व्यंजनाशी संयोग होऊन संधीचे रूप स्पष्ट होते. त्यातले तीन महत्त्वाचे हे : स+श = श (बसशील = बश्शील), ळ + ल = ळ (कळलं = कळ्‌ळं, वाळलं = वाळ्‌ळं, ट + त = टट (वाटतं = वाट्‌टं).

(अ) लेखन :मराठी भाषा देवनागरी लिपीचा वापर करते. या लिपीत बोल्याप्रमाणे लिहिले जाते असा समज आहे. तो संस्कृत भाषेपुरता खरा आहे.

लेखन काहीही असले, तरीही आपण बोलल्याप्रमाणे वाचतो. लेखन व बोलणे यांचे समीकरण आपल्या ज्ञानतंतूत तयार असते, म्हणूनच आपण कमळ, कमळे, सरबत, विष, ऋषी, क्लृप्ती, मिरवणूक, बसशिल, ब्राह्मण, इ. शब्दांचा कमळ्, कमळं, सर्वत्, वीस्, रूशी, क्लुसी, मिरौणूक (मिर्वणूक), बश्शील, ब्राम् म्हण् असे उच्चार करू शकतो.

बोलल्याप्रमाणे लिहिले जात असते, तर बाराखडी व जोडाक्षरेही शिकल्याप्रमाणए लिहिले जात असते, तर बाराखडी व जोडाक्षरेही शिकल्यानंतर शुद्धलेखन शिकवावे लागले नसते.

इथे एवढेच म्हणता येईल, की मराठीत अर्धस्फोटक च,छ, ज, झ अंत्य वर्णहे तालव्य आहेत की दंत्य ते ओळखण्याची सोय नाही, तर दीर्घ ई व ऊ, ऋ, ऋ, लृ, अ व ष ही अनावस्यक चिन्हे आहेत, महाप्राण ण, न, म, य, र, ल, यांना स्वतंत्र चिन्हे नाहीत आणि ब्राह्मण इ. शब्दांत महाप्राण व व्यंजन यांची स्थाने मागेपुढे झाली आहेत. अशीच गत पुण्याचा, काव्याचा, इ. शब्दांतील जोडाक्षरांबाबत आहे.

(आ) रूपविचार : ज्यांना आपण सामान्यपणे शब्द म्हणतो त्यांनी कार्यपरत्वे धारण केलेली रूपे, म्हणजे त्यांना होणारे विकार, यांचा खुलासा रूपविचारात मिळतो. मराठी ही लिंगवचनप्रधान भाषा आहे. साधारणत: लिंग व वचन या नामाची उपाधी मानल्या जातात. काही भाषांत त्या विशेषणालाही लागतात. पण मराठी व इतर काही भारतीय आर्यभाषांत बऱ्याच क्रियापदांनाही हा विकार होतो. संस्कृत भाषेत क्रियापदावरून पुरूष व वचन यांचा बोध होतो, लिंगबोध होत नाही: गच्छति ‘तो जातो, ती जाते, ते जाते’, पण धातुसाधिते या नियमाला अपवाद आहेत. ती कालदर्शक व लिंगवचनदर्शकही असू शकतात. उदा., ‘रात्रिर्गता मतिमतां’ वर यातील गता, किंवा ‘विचिन्तयन्सी यमनन्यमानसा तपोधनं वेत्सि न मामुपस्थितम्’ यातील विशेषणाप्रमाणे वापरलेली विचिन्तयन्ठी उपस्थितम् ही रूपे.

धातुसाधीतांनी क्रियापदांचे कार्य करण्याची ही पद्धत संस्कृतच्या पुढील उत्क्रांतीत जास्त रूढ झाली. कदाचित विविध काळ, त्यांचे असंख्य प्रत्यय यांचे ओझे दूर करून भाषेने हे सुलभीकरण घडवून आणले असावे. परिणामी क्रियापदांची रूपे व नामांची रूपे यातसाधर्म्य निर्माण झाले: कावळा उडाला-कावळी उडाली, वही संपली-वह्या संपल्या.

शब्दांचे वर्ग: मराठीच्या या रुपविचारात शब्दांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे:

(१) विकारक्षम : (अ) नाम, (आ) सर्वनाम, (इ) विशेषण, (उ) क्रियापद.

(२) अविकारक्षम : (अ) क्रियाविशेषण, (आ) अभयान्वयी अव्यय, (इ) संबंधशब्द, (रई) आश्रयशब्द, (उ) प्रत्यय व उपसर्ग, (ऊ) ध्वनिशब्द.

(१ अ.) : मराठी नामांची परंपरा काही अंशी संस्कृतला धरून आहे. नामे स्वरान्त किंवा व्यंजनान्त असतात. लिंगे तीन आहेत. एकवचन व अनेकवचन आहेत, द्विवचनाचा प्राकृत काळातच लोप झाला होता. नामाच्या मूळ रूपाला विकार होऊन जे रूप मिळते त्याला ‘सामान्यरूप‘’ हे नाव आहे. सामान्यरूपाला संबंधदर्शक प्रत्यय लागून त्याचे वाक्यातील कार्य निश्चित होते. संस्कृतमध्ये नामाची ही कार्यनिश्चिती विभक्तीने होते. मराठी नामाचे लिंग निश्चित करण्याचे कोणतेही बाह्य साधन नाही. परंतु काही नामे व विशेषणे पुढील साच्यात बसतात:

                             सरळरूप                                                      सामान्यरूप
ए. व. अ. व. ए. व. अ. व. उदाहरण
पु.– आ

स्त्री.– ई

न. -अं

-ए

-या

-ई

-या

-ई

-या

-यान्

-यान्

-यान्

कोंबडा

कोंबडी

कोंबड

याच साच्यातील विशेषणाचे सामान्यरूप मात्र सर्व लिंगांत व वचनांत एकच असते:चांगला-ली-लं/ चांगले-ल्या – ली. सर्वांचेसामान्यरूप मात्र चांगल्या.

संस्कृतप्रमामेच नामांचे अंत्य वर्णानुसार केलेले वर्गीकरण वर्णनाच्या द्दष्टीने उपयुक्त ठरते. ते खालीलप्रमाणे होईल :

अंत्य वर्ण व्यंजन -अ -आ -इ -उ -ए -आ
पुल्लिग ×
स्त्रीलिंग ×
नपुंसलिंग × × ×

अकारान्त समजली जाणारी सर्व नामे वर्णनाच्या द्दष्टीने व्यंजनान्त आहेत: हात, जात, फळ, भक्त,पत्र इत्यादी. दीर्घ अकारान्त नामे नपुंसकलिंगात असून ती-ए किंवा –  अशी लिहिवी अकारान्त नामे नपुंसलिंगात असून ती- ए किंवा –अं अशी लिहिली जातात :

फळे- फळे, फळं, वांगे, वांगं. –वांगी.

एकारान्त नामे ही सर्व आडनावे आहेत.

ओकारान्त नामे कमी आहेत. पुल्लिंगात टाहो, खोखो अशी काही, स्त्रीलिंगात बायको हे एकच. मात्र याशिवाय ओकारान्त आडनावे (लोबो, पिंटो) व काही इंग्रजी शब्द (स्टेनो, स्टो, फोटो, फोनो, रेढिओ) आहेत. आडनावे अर्थातच संदर्भाप्रमामे पुल्लिंगी अथवा स्त्रीलिंगी असतात.

इंग्रजी नामाचे अनेकवचन किंवा सामान्यरूप करताना अडचण येते. ती फक्त व्यजंनान्त नामापुरतीच आहे. काही नामे मराठीत रूळून गेली आहेत: (स्टेशन, पोस्ट, नोट, टेबल, पेन, पेन्सील, पेपर, सोडा). पण काही बाबतींत अडचण येते. उदा., नित्य व्यवहाराच्या बस या नामाचे अनेकवचन व सामान्यरूप अजून डळमळीत आहे. कित्येक लोक इंग्रजीप्रमामेबसिस असे अनेकवचन करतात, सामान्यरूपाचा प्रश्र्न त हा प्रत्यय लावताना येतो. मधे हा प्रत्यय सहज सामान्यरूप न करताही लागतो (बसमधे), पण बस+त याचे बशीत किंवा बसेत कोणी करत नाही.

खालील तक्त्यात अंत्य वर्णानुसार नामांची तिन्हीं लिगांतील एकवचनी व अनेकवचनी मूळरूपे व सामान्यरूपे दिली आहेत. त्यावरून या विषयची सर्वसाधारण कल्पना येईल.

टीप : (१) सामान्यरूपाचे अनेकवचन न् हा प्रत्यय लावून होते. पुल्लिंगी व नपुसकलिंग यांत तो सामान्यरूपाच्या एकवचनाला लागतो, तर स्त्रीलिंगात मूळरूपाच्या अनेकवचनाला लागतो.

(२) पुल्लिंगात आकारान्त १- प्रकाराच्या नामात अनेकवचन एकारान्त होते: घोडा-घोडे. इतर सर्व ठिकाणी ते एकवचनाप्रमाणेच होते. त्याचप्रमाणे घोडा याचे सामान्यरूप अनेकवचनाला –आ हा प्रत्यय लागून होते. २- प्रकारच्या नामात ते मूळरूपाप्रमाणेच होते.

(३) स्त्रीलिंगात १- प्रकारात १ – आ सोडल्यास सर्व अनेकवचने –आ हा प्रत्यय लागून होतात. २- प्रकारच्या नामात ती मूळरूपाप्रमाणे असतात.

(४) प्राचीन, ऐतिहासिक नामे १- प्रकाराप्रमाणे चालतात, आधुनिक नामे २- प्रकाराप्रमाणे: रामाचं धनुष्य-रामचे वडील, सीतेचा दीर लक्ष्मण-सीताची म्हैस.

(५) साधारणपणे नामाच्या सामान्यरूपाला एकवचनात शून्य व अनेकवचनात –नो हा प्रत्यय लागून संबोधन सिद्ध होते: घोडा याचे सामान्यरूप ए.व. घोड्या + शून्य= घोड्या अ.व. घोड्या + न्+ नो= घोड्यांनो.

(६) सामान्य रूपातील शेवटच्या स्वरावर इतर शब्दांप्रमाणे अंत्याघात असतो.

वरील तक्त्यात काही पोटभेद, विशेष रूपे आणि अपवाद आलेले नाहीत. पण तुलना व अनुमान यांनी त्याची कल्पना येईल. शेतकरी माजा बैल-माजी बैलं म्हणते, तेव्हा तो चूक करत नाही, एक नवा प्रयोग करत असतो.  सुशिक्षित माणसेही लोकं, कागदं, दगडं असा मिश्र प्रयोग करतात. ही एक नवी प्रवृत्ती आहे.

(१ आ) सर्वनाम : वक्त्याने स्वतःबद्दल किंवा श्रोत्याबद्दल वापरलेला शब्द म्हणजे प्रथम पुरुष किंवा द्वितीय पुरुषवाचक सर्वमान: मी-आम्ही, तू-तुम्ही. ज्याला आपण तृतीय पुरुषी सर्वनाम म्हणतो ते दर्शक विशेषणही आहे. प्रथम व द्वितीय पुरुषांत लिंगानुसार रूपभेद नाही. तृतीय पुरूषात तो आहे. प्रथम व द्वितीय पुरुषांत नपुसकलिंगी प्रयोग नाही.

सामान्यरूप म्हणून –ला,-ना, ने, नी, – चा हे प्रत्यय सोडल्यास इतरत्र स्वामित्व विशेषणाच्या सामान्यरूपाचा प्रयोग होतो. खालील तक्त्यात सर्व रूपे दिली आहेत :

टीप : (१) सर्वनाम + ने हे रूप कर्मणिप्रयोगातील क्रियापदापूर्वी वापरले जाते. प्रथम आणि द्वितीय पुरुषांत –ने ऐवजी प्रत्यय शून्य असतो :तो काम करतो – त्याने काम केले, पण मी काम करतो – मी काम केले, इत्यादी.

-ने हे ग्रांथिक रूप आहे. ते काही तुरळक बोलींत वापरले जाते. बहुसंख्या लोकांच्या बोलण्यात एकवचनात –नी किंवा नं व अनेकवचनात –नी हे रूप येते: ए.व. त्यांनी किंवा त्यानं काम केलं- अ.व. त्यांनी (त्यान्नी) काम केलं.

(२)-ना हे – ला चे अनेकवचनाचे रूप आहे. प्रथम व द्वितीय पुरुषांत मात्र अनेकवचनातही –ला हाच प्रत्यय वापरण्यात येतो.

(३) स्वामित्वाविशेषणात पुल्लिंगी एकवचनी रूपेच दिली आहेत. बाकीची सामान्य नियमानुसार.

(४) संबंधी सर्वनाम जो, जी, जे, -जे, ज्या, जी, सामान्यरूप ज्या, जि, ज्या-ज्यां.

(५) प्रश्नवाचक कोण (व्यक्ती). कोण+ ने = कोणी, सामान्यरूप कोणा. काय (वस्तू). सामान्यरूप सर्व जागी कशा.

(१ इ) : विशेषण (गुणवाचक) : मराठीतील विशेषणाच्या मूळ रूपाच्या अंत्यस्थानी आ, ई, ऊ किंवा व्यंजन येत:काळा, नवा, सुखी, हट्टी, कडू, दयाळू, सुंदर, लठ्ठ.

पुल्लिंगी आकारान्त विशेषण सोडल्यास इतर सर्व विशेषमे सर्व संदर्भात रहातत: सुखी माणूस – सुखी माणसाचा सदरा – जगात पूर्णपणे सुखी कोण आहे? हट्टी मूल – हट्टी बाईचा नवरा – ते हट्टी आहेत कडू काकडी-कडू कारले सुंदर स्त्री, पक्षी, मूल इत्यादी.

पुल्लिंगी एकवचनात आकारान्त सरळरूप असणारी विशेषणे लिंग-वचनानुसार बदलतात: ए.व. पु.-काळा, स्त्री. काळी, नं. काळं अ.व. पु. काळे, स्त्री. काळ्या, न. काळी. सर्वांचे कोणत्याही लिंगाच्या, कोणत्याही वचनात असलेल्या नामाच्या सामान्यरूपापूर्वी रूप : काळ्या.

(संख्यावाचक) एक याचे रूप नामाच्या सामान्यरूपापूर्वी एका असे होते: एक शहर – एका शहरात. इतर सर्व विकारशून्य आहेत.

(क्रमवाचक) सर्व क्रमविशेषणे आकारान्त असून विकारक्षम आहेत: पहिला मुलगा, पहिल्या बायकोचा मुलगा.

(१ उ) : क्रियापद : क्रियावाचक धातूला कालदर्शक व भावदर्शक प्रत्यय लागून क्रियापदाचे रूप सिद्ध होते.  कोणत्याही क्रियापदाचे आज्ञार्थी एकवचन अथवा वर्तमानखाली त हा प्रत्यय लागण्यापूर्वीचे रूप हा ‘धातू’: कर, पळ, पी, दिसतो, पहातो, लिहितो इ. क्रियापदांत कर-, पळ-, पी-, दिस-, पहा-, लिही- हे धातू आहेत. आहे या क्रियापदाला अस-२ हा धातू देण्यात आला आहे. अस-१ म्हणजे नियमित रूपे असणारा अस-धातू. ‘भाव’ म्हणजे क्रिया घडण्याच्या काळाव्यतिरिक्त जी काही माहिती क्रियापदातून मिळते ती: सातत्य, अपूर्णता, पूर्णता, इच्छा इत्यादी.

मराठी क्रियापदांत रूपाच्या दृष्टीने नियमित व अनियमित असे दोन वर्ग पडतात. ही अनियमित क्रियापदे अगदी मोजकी असून त्यांचा अनियमितपणा केवळ भूतकाळापुरता आहे. वाक्यरचनेच्या दृष्टीने क्रियापदांचे जे गट पडतात, त्यांची माहिती पुढे वाक्यविचारात येईल.

क्रियापदे दोन प्रकारची आहेत:शुद्ध व मिश्र. धातूला प्रत्यय लागून जे पूर्णार्थदर्शक रूप तयार होते ते शुद्ध क्रियापदाचे. पण पूर्णार्थ रूप किंवा धातूचे अर्थदृष्ट्या सापेक्ष रूप यांना अस-१ किंवा अस-२ यांचे पूर्णार्थरूप जोडून जे क्रियापद तयार होते ते मिश्र : (तो) जातो, (आंबा) पडला ही शुद्ध रूपे, तर (तो) जातो आहे, (मोहन) वाचत होता, तो आला असेल ही मिश्र रूपे.

मराठीतील बरेच क्रियाप्रकार संस्कृत धातुसाधितांवरून आल्यामुळे त्यांचे स्वरूप विशेषणात्मक आहे. त्यावरून कर्त्याच्या पुरुष व वचन यांव्यतिरिक्त त्याच्या लिंगाचाही बोध होतो. संस्कृत क्रियापद पुरुष व वचनच व्यक्त करते : अगच्छत् ‘तो-ती-ते गेला-ली-लं’, तर धातुसाधित लिंग व वचनच व्यक्त करते : गत : हे रूप पुल्लिंगी एकवचनी आहे, पण ते कोणत्याही पुरुषात लागू पडते : अहं-त्वं-असौ गतः मराठी धातुसाधित क्रियापद हे या दोन प्रकारांचे संमिश्र प्रतिबिंब आहे.

मराठीतील प्रथमभविष्य संस्कृतप्रमाणे पुरुषवचनदर्शक आहे, तर द्वितीय-भविष्यात एकच रूप असून ते लिंग, वचन किंवा पुरुष यांपैकी काहीही दाखवत नाही.

खाली अस-२ व हो- यांची वर्तमान, भूत व भविष्य यांची रूपे (होकारात्मक व नकारात्मक), नंतर बस-या नियमित धातूची रूपे व शेवटी अनियमित क्रियापदांचा तक्ता दिला आहे.

अस – २ हो –
वर्तमान 
मी आहे – मी नाही

तू आहेस – तू नाहीस

तो, ती, ते आहे – तो, ती, ते नाही

आम्ही आहो ( त ) आम्ही नाही

तुम्ही आहा ( त ) – तुम्ही नाही

ते, त्या, ती आहेत – ते त्या, ती

नाहीत.

मी होतो / ते-मी होत नाही

तू होतोस / तेस –तू होत नाहीस

तो होतो / ती होते / ते होतं –तो,

ती, ते होत नाही

आम्ही होतो – आम्ही होत नाही

तुम्ही होता – तुम्ही होत नाही

तें, त्या, ती होतात – ते, त्या, मी होत नाहीत

भूत 
मी होतो / ते – मी नव्हतो / – ते

तू होतास / तीस / तू नव्हतास / तीस

तो होता / ती / नव्हता/ ती नव्हती/

होती / ते होतं ते नव्हतं.

आम्ही होतो – आम्ही नव्हतो

तुम्ही होता – तुम्ही नव्हता

ते होते / त्या ते नव्हते / त्या

होत्या / ती होती – नव्हत्या / ती नव्हती

मी झालो / ले – मी झालो / ले नाही

तू झालास / लीस – तू झाला / ली नाहीत

तो झाला / ती झाली / ते झालं – तो

झाला नाही इ.

आम्ही झालो – आम्ही झालो नाही

तुम्ही झाला- तुम्ही झाला नाही ( त )

ते झाले / त्या – ते झाले नाहीत, इ.

झाल्या / ती झाली

भविष्य 
मी असीन – मी असणार नाही

किंवा नसीन किंवा नसणार

तू असशील – तू असणार नाहीस

किंवा नसशील किंवा नसणार

तो, ती, ते असेल – तो, ती, ते

असणार नाही, नसेल किंवा

नसणार नाही

आम्ही असू – असणार नाही किंवा

नसू किंवा नसणार

तुम्ही असाल – तुम्ही असणार नाही

किंवा नसाल किंवा नसणार

ते, त्या, ती असतील – ते, त्या, ती

असणार नाहीत किंवा नसतील

किंवा नसणार

मी होईन – मी होणार नाही

तू होशील – तू होणार नाहीस

तो, ती, ते होईल – तो, ती, ते होणार नाही

आम्ही होऊ – आम्ही होणार नाही

तुम्ही व्हाल – तुम्ही होणार नाही

ते, त्या, ती होतील – ते, त्या, ती

होणार नाहीत

बस – वर्तमान 

( धातू + कालदर्शक चिन्ह + पुरूषलिंगवचनदर्शक प्रत्यय )

एकवचन अनेकवचन
१ मी बस + त् + ओ / ए

२ तू बस + त् + ओ / ए + स

३ तो बस + त् + ओ

ती बस + त् + ए

ते बस + त् + अं

आम्ही बस + त् + ओ

तुम्ही बस + त् + आ

ते बस + त् + आत

त्या बस + त् + आत

तो बस + त् + आत

भूत 

( धातू + कालदर्शक चिन्ह + पुरूषलिंगवचनदर्शक प्रत्य )

१ मी बस + ल् + ओ / ए

२ तू बस + ल् + आ / ई + स

३ तो बस + ल् + आ

ती बस + ल् + ई

ते बस + ल् + अं

आम्ही बस + ल् + ओ

तुम्ही बस + ल् + आ ( त )

ते बस + ल् + ए

त्या बस + ल् + या

ती बस + ल् + ई

भविष्य

( धातू + कालपुरूषवचनदर्शक प्रत्यय )

१ मी बस + ईन

२ तू बस + शील

३ तो बस + एल

ती बस + एल

ते बस + एल

आम्ही बस + ऊ

तुम्ही बस + आल

ते बस + तील

त्या बस + तील

ती बस + तील

नकारार्थी रुपे: वर्तमान – कर्ता + बस + अत +‘नाही’ चे रूप : मी बसत नाही, तू बसत नाहीस, भूत – कर्ता + भूतकाळाचे रूप +‘नाही’ चे रूप : मी बसलो नाही, तू बसला नाहीस भविष्य – कर्ता + बस + णार +‘नाही’ चे रूप : मी बसणार नाही, तू बसणार नाहीस.

आज्ञार्थी रूपे : ए.व. बस + (शून्य)= बस, अ.व. बस + आ = बसा. नकारार्थी ए.व. बस + ऊ नको = बसू नको, अ.व. बस + ऊ नका = बसू नका.

एखाद्या धातूची प्रयोगानुसार होणारी एकंदर रूपे म्हणजे त्या धातूची रूपावली होय. या दृष्टीने विचार केला तर बस – या धातूची पुढील रूपे आपल्याला मिळतात.मात्र इथे हे लक्षात ठेवले पाहिजे, की धातूपासून मिळणार्‍या रूपांना दिलेली नावे अर्थवाहक असतातच असे नाही. रूप कसे बनते ते विश्लेषण करून सांगता येते. उदाहरणे देऊन त्याचा उपयोग कसा होतो ते व्यक्त करता येते. उदाहरणे देऊन त्याचा उपयोग कसा होतो ते व्यक्त करता येते. पण या सर्वांची पूर्ण कल्पना येईल असे नाव सापडेलच असे नाही.काही जुनी नावे सोयीसाठी टिकवून धरणे योग्य, पण त्यांनी दर्शवलेला अर्थ लागू पडेलच असे नाही.

रूपांबाबतही प्रमाणभाषेतसुद्धा एकवाक्यता असतेच असे नाही. या ठिकाणी आपण वापरतो तेच रूप योग्य, ही आग्रही भूमिका अनिष्ट होय, भाषेच्या शुद्ध उपयोगाचा मक्ता स्वतःकडे आहे,असे समजून दुसर्‍याच्या चुका काढण्यापेक्षा दुसरा वापरतो तेही रूप भाषेत प्रचलित आहे ही जाणीव ठेवून वागले पाहिजे.

(१) वर्तमानकाळ : मी बस- (धातू) + त् (कालदर्शक) + ओ (लिंगवचनपुरुषदर्शक)

(२) भूतकाळ : मी बस- (धातू) + ल् (कालदर्शक) + ओ (लिंगवचनपुरुषदर्शक).

(३) भविष्यकाळ : मी बस – (धातू) + ईन (कालवचन- पुरुषदर्शक).

(४) वर्तमानकाळ (अपूर्ण) : वर्तमानकाळ + अस – ची रूपे.

(५) वर्तमानकाळ (पूर्ण): भूतकाळ + अस-२ ची रूपे.

(६) भविष्यकाळ (निश्चित) १: मी बस – (धातू) + णार (कालदर्शक).

(७) भविष्यकाळ (निश्चित) २ : मी बस – (धातू) + णार + अस –२ वर्तमानकाळाची रूपे.

(८) भूतकाळ (नित्य) १ : मी बस – (धातू) + ए (वचन- पुरुषदर्शक).

(९) भूतकाळ (नित्य) २:मी बस – (धातू) + अत (वर्तमान- कालवाचक धातुसाधित) + अस – १ ची नित्य भूतकाळ १ ची रूपे.

(१०) भूतकाळ (नित्य) ३ : मी बस – (धातू) + आय  (प्रत्यय) + च (कालदर्शक) + ओ (लिंगवचनपुरुषदर्शक).

(११) भविष्यकाळ (भूत): मी बस – (धातू) + णार (काल दर्शक) + अस – २ ची भूतकाळाची रूपे.

(१२) आज्ञार्थ: (तू) बस + शून्य, (तुम्ही) बस + आ

(१३) अनुज्ञायाचक : बस +ऊ (प्र.पु.ए.व. व अ.व.)

(१४) प्रतिपेधार्थ: (तू) बस +ऊ+नको, (तुम्ही) बस + ऊ + नका

(१५) इच्छार्थ १ : मी (मी + नी) बस + आवं

(१६) इच्छार्थ २ : तो बस + ओ, ते बस + ओत

(१७) विनंती: धातू +अत +आव

(१८) अव्यय १ : धातू +अत – बसत, वाचत (सर्वसामान्य): धातू + ईत-करीत,वाचीत (नष्टप्राय)

(१९)अव्यय १ : (द्विरुक्त) :बसतबसत, गातगात

(२०) अव्यय २: धातू + ताना – बसताना, करताना

(२१) अव्यय ३: धातू + ऊन – बसून

(२२) अव्यय ३ द्विरुक्त): बसूनबसून

(२३) क्रियानाम : धातू +णं – बसणं

(२४) सामान्यरूपवाचक १ : धातू + आय + ला साठी पुरता,  – चा – बसायला इत्यादी.

(२५) सामान्यरूपवाचक २ : धातू (भूतकालदर्शक) + ल्या  + वर, – नंतर, शिवाय, – वाचून, ला, चा, – मुळे –बसल्यावर, गेल्यामुळे इत्यादी.

(२६) सामान्यरूपवाचक २ (द्विरुक्त) : बसल्याबसल्या

(२७) अव्यय ४ : धातू + ता (द्विरुक्त) – बसताबसता

(२८) सामान्यरूपवाचक ३ : धातू + ए + पर्यंत, – तो, + स्तोवर

(२९) प्रयोजक : धातू + अव – मी (त्याला) बसवतो

(३०) शक्यार्थक :धातू + अव – मला बसवतं

क्रियापद (रूपनिष्ठ वर्गीकरण)

वर्ग                                                   धातू                                      भूतकाळ                              उदाहरणे
( अ ) नियमित भूतकाळ
१ अ बस – बस + ० + ला + प्रत्यय खालील धातू सोडून इतर सर्व
( आ ) अनियमित भूतकाळ
२ अ –

आ –

इ –

उ –

ए –

निघ –

पाहा

माग –

घे –

खा –

निघ + आ + ला + प्रत्यय

पाह + इ + ल +प्र

माग + इत + ल + प्र

घे + त + ल + प्र

खा + ल + ल + प्र

पी, भी, उड, गळ, जळ, पळ, मिळ, वी, म्हण –

रहा, वहा

बघ, सांग

घू

३ अ –

आ –

इ –

उ –

दे –

कर –

घाल –

म्हण – २

दि + ० +ल + प्र

के + ० + ल + प्र

घात + ० + ल + प्र

म्हट + ० + ल + प्र

मर

४ अ –

आ –

इ –

उ –

अस – २

जा –

ये –

हो –

होत + ० + ० + प्र

गे + ० + ल + प्र

आ + ० + ल + प्र

झा + ० + ल + प्र

(२ अ) : क्रियाविशेषण: क्रियाविशेषण हा क्रियेचे वैशिष्ट्य दाखवणारा शब्द समजला जातो. क्रिया केव्हा, कुठे व कशी होते, हे तो दाखवतो.

क्रियाविशेषणात ‘सिद्ध’(म्हणजे मूळ स्वरूपच तसे असलेले) आणि  ‘साधित’ (म्हणजे इतर शब्दांपासून बनवलेले) असे दोन प्रकार मानता येतील. याशिवाय काही शब्द असे आहेत, की त्यांचा उपयोग प्रत्यय लागल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यांना ‘धातू’ म्हणजे मूलभूत रूप म्हणणे योग्य होईल: धातू – पास – (पासून, पाशी), कड – (कडे, कडून) सिद्ध – वर, जवळ, रभर साधित-दिवसा, पहाटे. काही सिद्ध धातूंनाही प्रत्यय लागतो : वरून,जवळून.

मराठी नामाप्रमाणे क्रियापदही बहुतांशी लिंगवचनदर्शक असल्यामुळे क्रियागुणवाचक शब्दही विकारक्षम रूपात आढळतात: ती चांगली गाते, तो चांगला नाचतो. काही ठिकाणी हे रूप तटस्थ म्हणजे नपुंसकलिंगी एकवचनीही आढळते : ती चांगलं गाते.

धातू व सिद्ध क्रियाविशेषणे जास्त स्पष्ट आहेत. साधित रूपे मात्र कार्यावरूनच ओळखावी लागतात.

संस्कृतमधील पंचमी किंवा सप्तमी विभक्तीशी साधर्म्य असणारी रूपे (म्हणजेच –ऊन, -त, -ई, -आ, यांसारखे प्रत्यय लागून होणारी इतर शब्दांची रूपे) कार्यदृष्ट्या क्रियापूरकत्व दर्शवतात.

(२ आ): उभयान्वयी अव्यय: दोन नामे, वाक्ये किंवा एकवर्गीय शब्द जोडणार्यार शब्दाला ‘उभयान्वयी अव्यय’ ही संज्ञा दिली जाते. जोडणे म्हणजे एकत्र आणणे. असे एकत्र आणणे पर्याय देऊन, विरोध व्यक्त करून आणि इतर काही मार्गांनीही होऊ शकेल. काही अव्यये नामाप्रमाणेच वाक्ये जोडण्याचेही काम करतात (आणि, किंवा), तर काही केवळ वाक्येच जोडतात (परंतु, कारण). काही अव्यये जोडीने वापरली जातात (जर…… तर, जरी……..तरी). महत्वाची उभयान्वयी अव्यये पुढीलप्रमाणे : संयोजक – आणि, व (फक्त लेखनात) पर्यायदर्शक – किंवा, अथवा, नाहीतर, का, की कारणदर्शक–म्हणून, कारण संकेतदर्शक – जर…… तर विरोध, कार्याभावदर्शक – परंतु, पण, जरी……. तरी कालदर्शक – म्हणजे , की, जेव्हा……. तेव्हा प्रकार – ज्याप्रमाणे……. त्याप्रमाणे, जसा…….तसा प्रमाण – जेवढा……तेवढा, जितका…….तितका.

(२इ): संबंधशब्द: जे शब्द (किंवा प्रत्यय) जोडल्यामुळे एखाद्या शब्दाचे वाक्यातील कार्य किंवा त्याचा इतर शब्दांशी असलेला संबंध निश्चित होतो त्याला ‘संबंधशब्द’ हे नाव आहे.मराठी व्याकरणात याला ‘शब्दयोगी अव्यय’ असे म्हणतात : वर, खाली, जवळ, शिवाय, मुळे, साठी इत्यादी. हे अव्यय नामाच्या सामान्यरूपानंतर येते असे म्हटले जाते. पण ते क्रियापदाच्याही काही रूपांनंतर येते. संस्कृत विभक्तींची संख्या व कार्यक्षेत्र मर्यादित होते. सात विभक्तींतून सर्व संबंध व्यक्त होणे शक्य नव्हते. त्यामुळे काही ठिकाणी काही विभक्तींबरोबर, सहायक शब्द (मुख्यत: अव्यये) वापरण्यात येऊ लागले : गंडस्योपरि, रामेण सह, रामात् विना.मराठीने असे अव्यय जोडण्यासाठी एक निश्चित विभक्ती ठरवून टाकली आणि सामान्यरूप +शब्दयोगी अव्यय ही प्रक्रिया रूढ केली.

अशी काही अव्यये ज्या क्रियारूपानंतर येतात ती ‘क्रियापद’ या सदरात बस-या धातूच्या रूपावलीत दिली आहेत.

(२ ई) : आश्रय़शब्द: आश्रयशब्दांचे कार्य मागील शब्द आघातयुक्त व विशिष्ट अर्थच्छटायुक्त बनवणे हे आहे.  उदा., मीही येईन. यात ही हा शब्द समावेशदर्शक आहे.

इतर येणार हे खरे, पण शिवाय मी त्यात असणार, या अर्थाने. मीच येईन यातला च वर्जक आहे. इतर येणार नाहीत, फक्त मी एकटा येणार, या अर्थाचा.

(२ उ) : प्रत्यय व उपसर्ग : शब्दांच्या शेवटी जोडण्यात येणार्याथ ज्या कार्यसूचक किंवा अर्थसूचक ध्वनिरूप चिन्हांनी नवे शब्द मिळतात, त्यांस ‘प्रत्यय’ म्हणतात. प्रत्ययामुळे मिळणारा शब्द त्याचवर्गातला असेल, म्हणजे नामापासून नाम (भाजी – भाजीवाला, प्राण – प्राणी, कुंभ –कुंभार), धातूपासून धातू (बस – बसव), इ. प्रकारचा, किंवा अन्य वर्गातला, म्हणजे नामापासून विशेषण (सुख – सुखी, राग – रागीट), नामापासून धातू (फेस – फेसाळ, घाम – घामेज), धातूपासून नाम (धाव – धाव, बोल – बोली, चाव – चावा) इत्यादी.

मराठीत अशा प्रकारचे जवळजवळ २५० प्रत्यय आहेत. त्यांचा योग्य उपयोग केला, तर अनेक नवे, अर्थवाही, शंभर टक्के मराठी शब्द मिळू शकतील. केवळ नाम + हो -, कर- किंवा इतर कोणतातरी धातू ही प्रक्रिया भाषेला हानिकारक नसली, तरी तिची अन्य प्रकारची निर्मितीक्षमता वठवून टाकणारी आहे.

मुख्य शब्दाला प्रत्ययासारखे एक रूप आधी लागून त्याच्या अर्थाला जेव्हा विकार होतो, तेव्हा त्या शब्दपूर्व रूपाला ‘उपसर्ग’ ही संज्ञा देतात. संस्कृत क्रियाधातूंना उपसर्ग लागून त्यांच्या अर्थात कित्येकदा क्रांतिकारी बदल होत. सद् ‘बस-’ या धातूचे उदाहरण घ्या. त्याला प्र-, वि-, अव-, उद्-, आ-, नि-, इ. उपसर्ग लागून अर्थात विलक्षण फरक होतात. अशा प्रकारचे उपसर्ग, संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसे उसने घेतल्यामुळे, तिच्यात आलेले आहेत. पण मराठीत त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही. प्रसन्न व विषण्ण असे शब्द मराठीच्या दृष्टीने सिद्ध शब्दच आहेत. संस्कृत उपसर्ग मराठीत वापरण्याचे प्रयोग फारसे यशस्वी झालेले नाहीत. ज्यांना संस्कृतमध्येच निश्चित अर्थ आहे असे अनु- सारखे उपसर्ग क्वचित वापरले जातात, पण तेही संस्कृत शब्दांपूर्वी.

संस्कृतचे विशेष सहजपणे वापरले जाणारे काही उपसर्ग म्हणजे नकारवाचक अ-, अन्-, न, इ. : अजाण, अनोळखी, नकळत, नस-. हिंदी, उर्दू, फार्सी, इ. संपर्कामुळेही काही उपसर्ग आले आहेत: बिन + (नाम) + चा = बिनबुडाचा, बिनदुधाचा बिन +नाम = बिनधोक, बिनबोभाट बे + (नाम) = बेशरम, बेवारसी इत्यादी.

(२ ऊ) : ध्वनिशब्द : ध्वनिशब्द म्हणजे ज्या शब्दाच्या नादात व लहरीत तदभाषिकाला त्याची अर्थाशी जवळीक जाणवते असा शब्द. मराठी फट, सुळ, खण अशा प्रकारचा. ध्वनिशब्द हे नाव प्राधान्याने दिलेले आहे. कारण तो तापाने फणफणला, गरिबांचे तळतळाट यांसारख्या प्रयोगात फण, तळ हे ध्वनिशब्दच आहेत. पण ते कोणत्याही ध्वनीचे अनुकरण करत नाहीत. तरीही ते ऐकताच मराठी माणसाला ध्वनी व अर्थ यांतील साधर्म्याची संवेदना होते. चिवचिव, कावकाव, इ. शब्दांत जे स्पष्ट आहे ते फणफण, इ. शब्दांत परंपरासंमत आहे.

शब्दांच्या वर्गीकरणात फट, फण, सुळ इ. संकेतांना जागा नाही. त्यांचे भाषेतील अस्तित्व फट असा आवाज झाला यासारख्या विधानांतून आणि त्यांना दिलेल्या लेखनचिन्हांतून व्यक्त होते. पण मूळ स्वरूपात ते केवळ धातू आहेत. मात्र त्यांना प्रत्यय लावून किंवा त्यांची द्विरुक्ती करून आणि इतर काही प्रकारांनी त्यांना पूर्ण शब्दत्व येते. उदा., फट + कन, फट + दिशी, फट + आ + फट, गड + गड, गड + गड + आट इत्यादी. असे प्रत्यय अनेक आहेत, पण सर्वच प्रत्यय सर्वच धातूंना लागतील असे नाही. आट हा प्रत्यय द्विरुक्त धातूला लागतो: सुळ + सुळ + आट, खण + खण +आट, इत्यादी. पण फट, तर इ. धातूंना तो लागत नाही.हे धातू व त्यापासून बनणारे शब्द हे मराठी भाषेचे एक वैशिष्ट्य आहे.

(इ) वाक्यविचार : मराठी ही बर्या च अंशी ज्यात शब्दांना कार्यानुसार रूप देण्यात येते अशी, म्हणजे विकारक्षम, भाषा असल्यामुळे शब्दांच्या क्रमाला त्यात महत्व नसावे असे वाटते. पण ही कल्पना बरोबर नाही. वाक्यातील शब्दांचा क्रम परंपरेने ठरवून दिलेला आहे.हेतूपूर्वक किंवा काही परिणाम साधण्यासाठी हा क्रम काही प्रमाणात बदलता येतो. ‘तू आलास ?’ याऐवजी ‘आलास तू?’, ‘ती शाळेत गेली’ याऐवजी , ‘ती गेली शाळेत’ किंवा ‘शाळेत गेली ती’ असा क्रम सूक्ष्म अर्थच्छटा व्यक्त करण्यासाठी वापरण्यात आलेला दिसतो. हा शैलीचा एक प्रकार झाला.  आघाताचा उपयोग करूनही हे करता येते.

या ठिकाणी मात्र शैली आणि आघात विचारात न घेता सर्वसाधारण स्वरूपात आढळणार्‍या वाक्याचा विचार केला आहे. त्यासाठी मराठी आढळणार्‍या वाक्यप्रकारांचा परिचय करून घेणे इष्ट आहे.

खालील कोष्टकात ही माहिती दिली आहे. त्यावरून असे दिसून येईल, की मराठी वाक्य कर्ता (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष), कर्म (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष) व क्रियापद यांचे बनलेले असते. या सर्व प्रकारात क्रियापद हा आवश्यक घटक आहे. प्रत्यक्ष कर्ता किंवा कर्म म्हणून वापरले जाणारे नाम मूळ रूपात असते, तर अप्रत्यक्ष कर्ता किंवा कर्म हे संबंधित नामाच्या सामान्यरूपाला –ला हा प्रत्यय लागून बनते.

कर्ता                                 कर्म
अप्रत्यक्ष            प्रत्यक्ष                  अप्रत्यक्ष                      प्रत्यक्ष         क्रियापद                 वाक्यप्रचार
अकर्मक X X X X उजाडतं अकर्तृक         अकर्मक
X कोंबडा X X आरवतो प्रकर्तृक           अकर्मक
मुलाला X X X मळमळतं अप्रकर्तृक       अकर्मक
सकर्मक X गाय X गवत खाते प्रकर्तृक         प्रकर्मक
X आई बाळाला X भरवते प्रकर्तृक         अप्रकर्मक
X दुर्वास शकुंतलेला शाप देतो प्रकर्तृक                     अप्रप्रकर्मक
मांजराला X X दूध आवडतं अप्रकर्तृक      प्रकर्मक

साध्या वाक्यातील शब्दांचा क्रम वरीलप्रमाणे असतो. काही सामान्य नियम पुढीलप्रमाणे :

(१) विशेषण नामापूर्वी येते : काळी गाय गवत खाते. नाम सामान्यरूपात असले, तर विकारक्षम विशेषणही सामान्यरूपात असते: काळ्या मांजराला दूध आवडतं.

(२) क्रियाविशेषण क्रियापदापूर्वी येते : राम तिथे जाईल, राम आज (काळ) तिथे (स्थान) जाईल, राम आज (काळ) धावत (प्रकार) तिथे (स्थान) जाईल.

उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्ये सर्वसाधारणपणे आढळतात: तो बाहेर पडला आणि मी जेवायला बसलो मी त्याच्याकडे गेलो पण घराला कुलूप होतं तो आला तर मी सिनेमाला जाईन.

इंग्रजीतील विविध प्रकारचे संबंध-उपसंबंध व्यक्त करणारी वाक्ये मराठीत नाहीत हे खरे, पण ही उणीव धातुसाधित (बसत, बसवा, बसलेला, इ.), क्रियावाचक अव्यये (बसून, बसताना, बसाय – इ. ), विशेषणे (बसता, बसलेला, बसणारा, इ.) यांनी भरून काढली आहे: तो हसत बोलतो, तो पाणी पिऊन बाहेर आला, तू गेल्याशिवाय मी अभ्यास कसा करू ? गाणारा पक्षी पिंजर्य पडतो, तो बसल्या जागीच झोपी गेला, तो गेल्यावर मला एकटं वाटायला लागलं इ. वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचनांचा शोध घेऊन मराठीच्या अभिव्यक्तिक्षमतेचा आवाका तपासून पहाणे आवश्यक आहे.

प्रश्नार्थक वाक्यांसाठी आघात व प्रश्नवाचक शब्दांचा उपयोग केला जातो. हो’ किंवा ‘नाही’ हे उत्तर असणारा प्रश्न आघातानेही सिद्ध होतो: तो गेला का ? = तो गेला ? अपेक्षित उत्तर आपल्याला अनुकूल हवे असेल तर विधानानंतर तत्सूचक न हे अव्यय वापरले जाते : तो गेला न ?, यूरोपात हिवाळा कडक असतो न ? इत्यादी.

इतर ठिकाणी प्रश्नवाचक सर्वमान, विशेषण किंवा अव्यय वापरले जाते: आज कोण येणार ? तुला काय पाहिजे ? तो कोणत्या मजल्यावर रहातो ? तिला कसल्या रंगाची साडी पाहिजे ? पावसाळा केव्हा सुरू होतो ? ही बस कुठे जाते ?गांधारीला किती मुलगे होते ? तुमचं लग्न कितव्या वर्षी झालं ? इत्यादी.

नकारार्थी वाक्य ‘न’ हा उपसर्ग लावून किंवा ‘अस – २ ’ ची नकारार्थी रूपे वापरून होते. हे होताना काही रूपांत विशिष्ट फरक होतात. इथे फक्त मोजकीच उदाहरणे दिली आहेत : तो जातो – तो जात नाही, तो गेला – तो गेला नाही, तो पडेल – तो पडणार नाही, तो अभ्यास करून पास झाला – तो अभ्यास न करता (केल्याशिवाय) पास झाला, हल्ली तो इथे असतो – हल्ली तो इथे नसतो इत्यादी.

(५) शब्दसंग्रह: मूळ मराठी शब्दसंग्रह संस्कृतोद्भव आहे. अगदी प्रारंभापासून त्यात निम्नस्तरीय ऑस्ट्रिक व द्राविड भाषांतील काही शब्दांची भर पडणे अपरिहार्य होते.एखाद्या समाजाचा इतर भाषिक समाजांशी जितका घनिष्ठ संबंध येतो, त्या मानाने इतर भाषांतून घेवाण होणे शक्य असते. मराठी समाज स्थैर्यप्रिय आहे. शिवकालोत्तर मुलुखगिरीचा जमाना सुरू होईपर्यंत इतक्या प्रमाणात इतके मराठी भाषिक बाहेर गेल्याचा पुरावा नाही. यातल्या काही लोकांनी तर लहानमोठ्या प्रमाणात परप्रदेशात (दक्षिणेत व उत्तरेत) वसाहतीही केल्या.

यापूर्वीही दक्षिण व उत्तर यांच्याशी मराठीचा अनेक शतकांपासून संबंध होता, पण तो धार्मिक स्वरूपाचा होता. तीर्थयात्रा व अध्ययन हे त्याचे मूळ हेतू. पण ही प्रवृत्ती इतकी अखंड व मोठ्या प्रमाणावरची होती, की त्याचा भाषेवर व काही सांस्कृतिक तपशिलांवर परिणाम होणे अटळ होते. गोडसे भटजींप्रमाणे जर पूर्वकालीन यात्रेकरून व प्रवासी यांनी स्वतःचे अनुभव लिहिले असते आणि ते आपल्यापर्यंत आले असते, तर बाह्य संपर्काचा भाषेवर पडलेला प्रभाव स्पष्ट झाला असता.

एक गोष्ट मात्र निश्चित. यात्रा, धर्मकार्य, श्राद्ध, सण, व्रते, विवाहादी संस्कार, तिथी, मुहूर्त इ. अनेक कारणांनी धार्मिक वाङ्मयाशी मराठी समाजात सतत संबंध राहिला आणि ही धार्मिक कार्ये करणारे संस्कृतज्ञ असल्यामुळे संस्कृत आवश्यक शब्दांचा परिचय कायम राहिला आणि वापर कधीही बंद पडला नाही.सामान्य व्यवहारात ध्वनिपरिवर्तन होऊन शब्दांची जी नवी प्राकृत रूपे आली त्याबरोबर ही संस्कृत रूपेही अनेक क्षेत्रांत चालू राहिली. शब्द-साद, क्षेत्र-शेत, पत्र-पात, कर्म-काम, दिवस – दीस , रात्र –रात, हस्त – हात, शिक्षण – शिकणे, रक्षण – राखण, पक्षी – पाख (रू), यात्रा – जत्रा, राजा – राव, आज्ञा – आण, ज्ञान – जाण, अशा शेकडो जोड्या तयार झाल्या आणि शब्दच्छटा व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ लागला. मूळ भाषेचे अशा प्रकारे घेतलेले ऋण फ्रेंच भाषेतही दिसून येते. अनेक शतके शिक्षण, न्याय, धर्मकार्य इ. क्षेत्रांत अभिजात लॅटिनच वापरली जात असल्यामुळे तिचा प्रभाव सामान्य जनजीवनावर पडणे ओघानेच आले.

संस्कृतशी असलेले हे सांस्कृतिक नाते भाषिक दृष्ट्या उपकारक ठरले आहे. आजही त्याचे महत्व कमी झालेले नाही. संस्कृतवर होणारी टीका ही तिच्या अतिरेकी व विवेकशून्य वापरामुळे होते. पण नवशब्दनिर्मितीत तिचा वाटा मोलाचा आहे हे नाकारता येणार नाही.

निम्नस्तर, परप्रांतांशी संपर्क आणि संस्कृतचा वारसा ही सर्व स्वाभाविक कारणे झाली. पण काळाच्या ओघात ऐतिहासिक कारणांनी परभाषांशी जो संपर्क घडून आला तो बहुतांशी आक्रमण व संघर्ष या स्वरूपांचा होता. अर्थात मराठीचा संबंध तिच्या प्रारंभानंतरच्या घटनांशीच असणार हे उघड आहे. अशा या घटनांत मुसलमानी आक्रमण, यूरोपातील दर्यावर्दी राष्ट्रांचा आधी व्यापार व नंतर राजकारण यांमुळे घडलेला संपर्क या महत्वाच्या होत.

मुसलमानी सत्तेमुळे तुर्की, फार्सी व अरबी यांचा प्रभाव भारतीय भाषांवर पडला. त्यामुळे राज्यकारभार, सैन्यव्यवस्था इ. विषयांतले शब्द ते आलेच पण पोशाख, राजदरबार, पत्रव्यवहार इ. विषयही त्यातून सुटले नाहीत. मराठीत आज दोनतीन हजार फार्सी-अरबी शब्द आहेत : जमीन, हवा, महसूल, कागद, फौजदार, जिल्हा, तालुका, हुकूम, जबरदस्त, अखेर, खबर, पुलाव, बिर्यानी, दारू, तमाशा, दगा, खून, इसम, सरदार, दाद, बाग इ. शेकडो नित्य व्यवहारातले आणि परिचयाचे शब्द या मार्गाने आलेले आहेत.

पगार, जुगार, चावी, पाव, खमीस, रोटी, काडतूस, पलटण, पाटलूण, पैसा, पिस्तूल, मेज, मिस्त्री इ. अनेक शब्द फ्रेंच-पोर्तुगीजमधले आहेत.

इंग्रजी शब्दांची मोजदाद करणे कठीण काम आहे. मास्तर, डॉक्टर, स्टेशन, कॉलेज, प्रोफेसर, पेन, पेन्सिल, सायकल, कोट, पँट, ब्लाउज, बूट, इंजीन, मोटार, ड्रायव्हर, टेनिस, क्रिकेट, फूटबॉल, मॅच, आइस्क्रीम, मटण, बिअर, व्हिस्की इ. असंख्य शब्द नित्य वापरातले आहेत, तर सुशिक्षित माणसाचे बोलणे पुष्कळदा इंग्रजी नामांना व क्रियापदांना कर-, हो-यांची रूपे लावून होते, हे दूरदर्शन व आकाशवाणी यांवरील मुलाखती, परिसंवाद, भाषणे यांतून स्पष्ट दिसून येते. मराठीत यांतीन अनेक शब्दांना योग्य प्रतिशब्द असले, तरीही ते वापरले जात नाहीत. त्यामुळे असे शब्द हाही मराठीचाच एक भाग आहे, हे मानावे लागते.

मराठी भाषेत अलिकडे आलेल्या व येत असलेल्या हिंदी शब्दांचे मूळ त्या भाषेला संपर्कभाषा म्हणून प्राप्त झालेल्या स्थानात, त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटांच्या लोकप्रियतेत आहे. हिंदी शब्द येतो तो मराठी शब्दाची जागा घेण्यासाठी. त्यामुळे हे परिवर्तन किंवा प्रवृत्ती ही अनावश्यक मानावी लागते: स्वर्गीय, दर्शक, निर्वाचन, संविधान, स्वास्थ्य यांसारखे अनेक शब्द आता ऐकण्यात येतात.

विनिमयाची पोकळी भरून काढण्यासाठी घेतलेला किंवा तयार केलेला शब्द ही भाषेची गरज आहे. पण पूर्वीपासून असलेले शब्द हुसकावून त्या जागी नवे आणणे अनावश्यक, दुर्बोधता निर्माण करणारे व विनिमयव्यवहाराला घातक आहे. अनेक लेखक स्वतःच्या लहरीनुसार नवनवे शब्द वापरत असतात. सरकारी कारभारासाठी सुचवले गेलेले अनेक शब्दही तसेच आहेत. त्यामुळे पुष्कळदा लोक रूढ व परिचित इंग्रजी शब्दच वापरतात.

या नव्या शब्दांमुळे कोश फुगीर दिसला, तरी भाषिक व्यवहाराच्या दृष्टीने तो केवळ आभास आहे.

समारोप : भाषेचे खरे दर्शन ती प्रत्यक्ष व्यवहारात कशी वापरली जाते यावरून होते. हा व्यवहार बोलण्यातला किंवा लिहिण्यातला असेल. बोलण्यातला व्यवहार स्वाभाविक असतो. लेखन मात्र हेतुपूर्वक असते आणि भाषेचा जाणीवपूर्वक वापर त्यात असतो. लेखनातही चिंतनपर, शास्त्रीय, तांत्रिक लेखन ललितलेखनापेक्षा वेगळे असते. शास्त्रीय लेखनाची भाषा सामान्यतः एकरूप असते. दोन लेखकांत फरक जाणवेल तो अशा विषयांना लागणारी अभ्यासाची आणि अभ्यासकांची दीर्घ परंपरा आपल्याकडे नाही, हे त्याचे कारण आहे. परस्परविनिमयाचा आणि एकजुटीने काम करण्याचा अभाव आहे. प्राचीन काळी काव्य, व्याकरण, अध्यात्म अशा विषयांत जी शिस्त, प्रमाणानुसार चालण्याची बुद्धी, एकत्र येऊन चर्चा किंवा वादविवाद करण्याची परंपरा दिसून येत असे, ती आज नष्ट झाली आहे. त्याचा परिणाम भाषेवर घडून ती विस्कळीत झाली आहे.

याउलट ललितलेखन मात्र अधिक वास्तव व प्रामाणिक होऊ लागले आहे. आपल्या बहुरंगी, बहुढंगी समाजाचे, व्यक्तिमनाचे त्यात प्रतिबिंब उमटत असल्यामुळे मराठी भाषेचे सर्वांगीण यथातथ्य दर्शन प्रभावीपणे त्यातून घडते. मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल आशा बाळगण्याइतके ते लेखन जिवंत आहे, ही निश्चित समाधानाची गोष्ट आहे.

संदर्भ : 1. Beams, John, A Comparative Grammar of the Modern Aryan Languages of India, London, 1872, 1875, 1879.

2. Bhandarkar, R. G. Wilson Philological Lectures (1877), Bombay, 1914.

3. Bloch, Jules, La formation de la langue marathe, Paris, 1920.

4. Grierson, George, A Linguistic Survey of India, Vol. VII, Calcutta, 1905.

5. Kalelkar, N. G. Marathi (A Monograph), New Delhi, 1965.

६. कालेलकर, ना. गो. ध्वनिविचार, पुणे, १९५५.

७. कालेलकर, ना. गो. भाषा : इतिहास आणि भूगोल, मुंबई, १९६४.

८. कालेलकर, ना. गो. मराठी : शब्दकोश परिचय पुस्तिका, पुणे, १९७४.

कालेलकर, ना. गो.