मक्बूल शाह : (सु. १८२०-१८७६). प्रसिद्ध काश्मीरी कवी. जन्म एका इस्लामी पीर (धर्मगुरू) कुटुंबात. वंशपरंपरेने धर्मगुरूचा वारसा मक्बूल शाहकडेही आल्याने लोक त्याला ‘पीर’ म्हणून संबोधू लागले. अनुयायांनी अर्पण केलेल्या वस्तूंवर त्याचा उदरनिर्वाह चाले. त्याने घरीच फार्सी व अरबीचे सखोल अध्ययन केले. लहानपणापासून त्याची प्रकृती बरी नव्हती आणि पुढे तर त्याला क्षयरोगही जडला. त्याच्या दत्तकपुत्राचे तसेच पत्नीचेही अकाली निधन झाले. त्यामुळे त्याच्या सबंध जीवनावर व लेखनावर अतीव दुःखाची गडद छाया पसरलेली दिसते. एका साथीच्या रोगात त्याचे वयाच्या सु. ५६ व्या वर्षी निधन झाले. त्याची कबर क्रलवारी येथे आहे.
मक्बूल शाहने काश्मीरीत विपूल व दर्जेदार काव्यलेखन केले. त्याच्या काव्यरचना पुढीलप्रमाणे होते : किस्सा-ए-इजरत सबीर-बायबलमधील एक प्रेषित जोब याच्या जीवनावरील ही एक मस्नवी (खंडकाव्य) असून ती इस्लामी दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. मुळात ती ३०१ चरणयुग्मकांची असली, तरी तिच्या छापील आवृत्तीत मात्र २८१ चरणयुग्मकेच अंतर्भूत आहेत. ग्रीस नामा-काश्मीरीतील ही आद्य उपरोधिक मस्नवी असून तीत काश्मीरी शेतकऱ्यांची उपरोधपूर्ण विनोदी व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. गुलरेझ-झिया बक्षी या फार्सी कवीच्या एक अप्रकाशित गद्यपद्यमिश्रित मस्नवीचा हा काश्मीरी अनुवाद असला, तरी मक्बूल शाहने तो चमकदार शैलीत व ‘रोमान्स’ प्रकारच्या म्हणजे सामान्यपणे कल्पनारम्य कथनपर प्रकारच्या काव्यात काश्मीरीत आणलेला आहे. मक्बूल शाहच्या सर्व कृतींत गुलरेझचे स्थान सर्वश्रेष्ठ असून त्यामुळे काश्मीरी साहित्यात मक्बूल शाहचे नाव एक उत्कृष्ट बझ्मिया मस्नविकार (प्रेम-खंडकाव्यकार) म्हणून चिरंतन झाले आहे. या काव्यात एकूण २,२०० चरणयुग्मके आणि १२७ गीते आहेत. गुलरेझच्या काश्मीरीत आजवर अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. बहार-नामा– सु. १५० चरणयुग्मकांत रचलेली काश्मीरच्या वसंत ऋतूचे वर्णन करणारी ही आद्य मस्नवी होय. पीर-नामा-सु.१४० चरणयुग्मकांची ही मस्नवी असून ती अपूर्ण आहे. साध्या भोळ्या लोकांना भूलथापा देऊन फसविणाऱ्या मुल्ला व पीर यांच्या दुष्कृत्यांवर तीत उपरोधपर विनोदी शैलीत विदारक प्रकाश टाकला आहे. मक्बूल शाहच्या वारस-पीरांनी बहुधा तिचा नंतरचा भाग नष्ट केला असावा कारण त्यात पीरांची दुष्कृत्ये उघड करून त्यांवर कठोर प्रहार केले असावेत, असे अभ्यासक मानतात. मन्सूर-नामा– ही बगदाद येथे क्रूसावर चढवलेल्या मन्सूर-अल्-हल्ला ह्या प्रख्यात सूफी संतावर रचलेली गूढवादी स्वरूपाची मस्नवी आहे. निजेभरानिवासी हसन मिस्गर याची कृती म्हणून नूर मुहंमद यांनी ती प्रसिद्ध केली तथापि ती मक्बूल शाह याचीच कृती असल्याचे एम्. यूसुफ तैंग यांनी साधार सिद्ध केले आहे. यूसुफ जुलेखा-प्रख्यात फार्सी कवी निजामी याच्या एका रोमान्सला मक्बूल शाहने दिलेले हे काश्मीरी मस्नवीचे रूप असून ती अप्रकाशित आहे. तिची एकमेव हस्तलिखित प्रत ‘काश्मीर रिसर्च डिपार्टमेंट’ च्या ग्रंथालयात पडून आहे. पहेल-नामा-मौलाना रूमीच्या फार्सी मस्नवीत कथन केलेल्या एका मेंढपाळाच्या ईश्वरी भक्तीचे वर्णन करणारी ही काश्मीरी मस्नवी.
यांव्यतिरिक्त आबनामा ही पुरामुळे ओढवलेल्या संकटांवरील, बेबूजनामा ही जुलमी राज्यकारभारावरील आणि नोअरनामा ही आगीने ओढवलेल्या संकटावरील मस्नवी प्रकारातील काव्ये मक्बूल शाहच्या नावावर सांगितली जातात तथापि ती त्याचीच असल्याचा ऐतिहासिक किंवा अन्य निर्णायक पुरावा अजून उपलब्ध नाही.
मक्बूल शाहची दैनंदिन बोलभाषेतील शब्दकळा आणि त्याची जळजळीत अभिनव शैली यांमुळे तो अत्यंत लोकप्रिय कवी ठरला. अब्दुल अहद आझाद यांनी आपल्या काश्मीरी जवान और शायरी ह्या ग्रंथात मक्बूल शाहच्या काव्याची सविस्तर चर्चा केली असून प्रा. हमदी यांनी मक्बूल शाहचे जीवन व साहित्यावर एक पुस्तिका प्रकाशित केली आहे तथापि मक्बूल शाहच्या जीवनावर व ग्रंथांवर लिहिलेला सर्वोत्कृष्ट अधिकृत ग्रंथ म्हणून एम्. यूसुफ तैंग यांच्या कुल्लियात-ए-मक्बूलचाच निर्देश करावा लागेल. या ग्रंथात मक्बूल शाहच्या सर्व काव्यरचनांचा समावेश तर आहेच, पण त्यात त्याच्या गझल, स्तोत्रे, प्रशंसागीते, शोकगीते इ. स्फुट रचनांचाही अंतर्भाव आहे.
हाजिनी, मोही-इद्दीन (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)