मक्टॅ गर्ट, जॉन मक्टॅ गर्ट ए लिस : (१८६६-१९२५). प्रसिद्ध ब्रिटिश चिद्वादी तत्त्ववेत्ते. जन्म लंडन येथे. शिक्षण ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे. १८९१ ते १९२३ मध्ये निवृत्त होईपर्यंत ट्रिनिटी कॉलेजचे ‘फेलो’. मक्टॅगर्ट हे हेगलेच्या तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून प्रसिद्ध असले, तरी त्यांनी स्वतंत्रपणे आपले तत्त्वज्ञान घडवून त्याची मांडणीही केली आहे. स्टडीज इन द हेगेलिअन डायालेक्टिक (१८९६, म. शी. हेगलेच्या डायालेक्टिकचे अध्ययन). स्टडीज इन हेगेलिअन कॉस्मॉलॉजी (१९०१, म. शी. हेगेलच्या विश्वस्थितिशास्त्राचे अध्ययन) आणि ए कॉमेन्टरी ऑन हेगेल्स लॉजिक (१९१०, म. शी. हेगेलच्या तर्कशास्त्रावरील भाष्य) हे त्यांचे ग्रंथ हेगेलच्या तत्त्वज्ञानावरील भाष्याच्या स्वरूपाचे आहेत. सम डॉग्माज ऑफ रिलिजन (१९०६, म. शी. काही धार्मिक सिद्धांत) ह्या ग्रंथात त्यांनी ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्व इ. धार्मिक सिद्धांतांची चिकित्सा करून स्वतःचे धार्मिक तत्त्वज्ञान विशद केले आहे. द नेचर ऑफ एक्झिस्टन्स (२ खंड, १९२१, १९२७ म. शी. अस्तित्वाचे स्वरूप) ह्या द्विखंडात्मक ग्रंथात त्यांनी स्वतःच्या तत्त्वमीमांसेची सुव्यवस्थित मांडणी करून तिचे तार्किक समर्थन केले आहे. त्यांचे काही निबंध त्यांच्या मृत्यूनंतर फिलॉसॉफिकल एसेज (१९३४, म. शी. तत्त्वज्ञानात्मक निबंध) ह्या ग्रंथात संग्रहित करण्यास आले आहेत.
हेगेलच्या तत्त्वज्ञानावरील भाष्य ह्या स्वरूपाचे मक्टॅगर्ट यांचे जे ग्रंथ आहेत त्यांच्यात हेगेलच्या सिद्धांतांचे आणि त्याने अनुसरलेल्या वैचारिक रीतीचे केवळ विवेचन करण्यात आलेले नाही, तर मक्टॅगर्ट यांना त्यांत आढळलेली संदिग्धता, चुका इत्यादिकांचेही स्पष्टीकरण करण्यात आले आहे. ⇨एफ्. एच्. ब्रॅड्ली (१८४६-१९२४) या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याप्रमाणे मक्टॅगर्ट यांना हेगेलचे अनुयायी मानता येणार नाही. त्यांनी स्वतःची अशी चिद्वादी तत्त्वमीमांसा सिद्ध केली होती. त्यांच्या मताप्रमाणे काल, अवकाश आणि भौतिक वस्तू आभासरूप आहेत आणि अंतिमतः मने किंवा आत्मे आणि त्यांच्या अनुभवाचे आशय ह्यांनाच वास्तव अस्तित्व आहे. हे आत्मे किंवा ह्या व्यक्ती, इतर व्यक्तींचा साक्षात् अनुभव घेऊ शकतात. ज्या व्यक्तींचा ते असा साक्षात् अनुभव घेतात त्यांच्याविषयी त्यांची भावना प्रेमाची असते आणि ज्या व्यक्तींचे त्यांना अप्रत्यक्ष ज्ञान असते त्यांच्याविषयीची त्यांची भावना स्नेहाची असते. तेव्हा व्यक्ती किंवा आत्मे, त्यांच्या अनुभवाचे आशय, त्यांना असलेली इतर आत्म्यांची साक्षात् दर्शने किंवा त्यांचे असलेले अप्रत्यक्ष ज्ञान आणि ह्या दर्शनांत आणि ज्ञानात अनुस्यूत असलेले प्रेमाचे किंवा स्नेहाचे संबंध असेच अंतिम वास्तवतेचे स्वरूप आहे. परंतु आपण इतर आत्म्यांचे जे भ्रांत दर्शन घेतो, त्यामुळे आपल्याला काल, अवकाश व भौतिक वस्तू असल्यासारख्या भासतात. ह्या आभासात्मक भौतिक विश्वाच्या चौकटीत आत्मा अमर असतो आणि तो एकामागून एक भिन्न आभासात्मक देह धारण करतो असे मक्टॅगर्ट मानतात म्हणजे ⇨पुनर्जन्म मानतात. मक्टॅगर्ट ईश्वर मानत नाहीत. म्हणजे सर्व आत्मे ज्याच्यात समाविष्ट आहेत आणि तरीही एक विशिष्ट आत्मा असे ज्याचे स्वरूप आहे असा परमात्मा ते मानत नाहीत. ‘अस्तित्वाचे स्वरूप’ हा मक्टॅगर्ट यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्याच्यात आपले तत्त्वमीमांसीय सिद्धांत निगामी पद्वतीने सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ह्यासाठी पुढील दोन आधारविधाने ते स्वयंसिद्ध म्हणून स्वीकारतातः ‘काहीतरी अस्तित्वात आहे’ आणि ‘जे अस्तित्वात आहे त्याचे भाग असतात.’ ह्या दोन आधारविधानांपासून केवळ तार्किक अनुमानाने वर मांडलेले आपले तत्त्वमीमांसीय सिद्धांत निष्पन्न करण्याचा ते यत्न करतात. हे साधण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी तत्त्वमीमांसेतील अनेक समस्यांचे, विशेषतः कालाच्या स्वरूपाचे, जे विवेचन केले आहे. त्याच्यात ह्या ग्रंथाचे बरेचसे महत्त्व सामावलेले आहे. ⇨सी.डी. ब्रॉड यांच्यासारख्या ख्यातनाम तत्त्ववेत्त्याने त्याच्यावर भाष्य लिहिले आहे, यावरून त्याची गुणवत्ता स्पष्ट होते.
संदर्भ : Broad, C.D. Examination of McTaggart’s Philosophy, 2 Vols., Cambridge, 1933. 1938.
रेगे, मे. पुं.