मंगलोर विद्यापीठ : कर्नाटकातील एक विद्यापीठ.१० सप्टेंबर १९८० रोजी मंगलोर येथे कर्नाटक विद्यापीठ अधिनियम १९८० (२५) अन्वये हे विद्यापीठ स्थापन झाले. मंगलोरपासून १८ किमी. वर असलेल्या कोनाजे येथील विंड स्विफ्ट हिलच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंतचा विद्यापीठ-परिसर ‘मंगलगंगोत्री’ नावाने ओळखला जातो. कर्नाटक विद्यापीठ अधिनियम १९७६ अन्वये विद्यापीठाचे नियमन केले जाते. पूर्वी म्हैसूर विद्यापीठाच्या सीमेत अंतर्भूत असलेल्या कोडगू , दक्षिण कानडा ह्या जिल्ह्यांचा विद्यापीठाच्या कक्षेत अंतर्भव होतो.
विद्यापीठास ४३ महाविद्यालये संलग्न आहेत. कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, शिक्षण, वैद्यक, अभियांत्रिकी या विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. कला, विज्ञान, वाणिज्य, विधी ह्या विद्याशाखांचे शैक्षणिक वर्ष दोन संत्रांत विभागले आहे. पहिले सत्र १६ जून ते १५ ऑक्टोबर व दुसरे १६ नोव्हेंबर ते ३१ मार्च. बी. एड् महाविद्यालयांत २ जुलै १५ ऑक्टोबर आणि १६ नोव्हेंबर ते ३१ मार्च अशी दोन सत्रे, तर संध्याकालीन महाविद्यालयांत १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर आणि १ फेब्रुवारी ते ३१ मे अशी दोन सत्रे असतात. एम्.ए., एम्.कॉम्. व एम्.एस्सी. या पदव्युत्तर परीक्षांसाठी १ फेब्रुवारी ते ३१ मे असे एकच सत्र असते. अध्ययनाचे माध्यम इंग्रजी आहे.
काही होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत शिष्यवृत्या दिल्या जातात. बहिःस्थरीत्या परीक्षा देण्याची विद्यापीठात तरतूद नाही. (१) बिझन्ट इव्हिनिंग कॉलेज, मंगलोर, (२) पूर्णप्रज्ञ इव्हिनिंग कॉलेज, उडूपी व (३) सेनट ऑल्सियस इव्हिनिंग कॉलेज, मंगलोर नावाची तीन संध्याकालीन महाविद्यालये विद्यापीठ-परिसरात आहेत. बहुसंख्या महाविद्यालयांत पाठनिर्देश पद्धती अस्तित्वात आहे. पदव्युत्तर विभाग तसेच शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांत चर्चासत्रे आयोजित केली जातात. पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी आणि बी.एड्. अभ्यासक्रम यांमध्ये अंतर्गत गुणांकन केले जाते. बी.एड् आणि बी. ई. या अभ्यासक्रमासाठी सत्र परीक्षा पद्धतीचा विद्यापीठाने अवलंब केला आहे.
मंगलगंगोत्री येथे विद्यापीठाची दोन वसतिगृहे आहेत. याच परिसरात विद्यापीठाचे ग्रंथालय असून त्यात ३,३८४ ग्रंथ व २०० नियतकालिके होती (१९८२-८३). विद्यापीठाचे याच वर्षाचे उत्पन्न २.४८ कोटी रु. व खर्च २.३६ कोटी रु. होता.
मिसार, म. व्यं.