भोवळ: स्वतःला गरगरल्यासारखे वाटणे (स्वप्रत्ययकारी भावना) किंवा परिसर आणि त्यामधील वस्तू गरगरत आहेत, असे वाटणे (वस्तुपूरक भावना) या रोगलक्षणाला ‘भोवळ’ म्हणतात. हा अनुभव पुढील कोणत्याही एका प्रकारचा असू शकतो : (१) शरीर किंवा डोके चक्रीय गतीने फिरल्यासारखे वाटणे (२) परिसर चक्रीय गतीने फिरत आहे असे वाटणे (३) दोन्ही पायांची अंगस्थिती किंवा हालचाल अस्थिर भासणे. स्वशरीराच्या अवकाशातील स्थितीबद्दलची अनिश्चिततेची जाणीव ज्यात प्रामुख्याने असते, अशा रोगलक्षणाला भोवळ म्हणतात. फक्त अस्थिरतेची भावना असणाऱ्या लक्षणाला ‘घेरी’ किंवा ‘चक्कर येणे’ म्हणतात. पुष्कळ वेळा रोगी अस्पष्ट किंवा पुसट दिसणे, अस्थिरता, मध्यलोप (मेंदूतील रक्त पुरवठ्यात झालेल्या बिघाडामुळे उत्पन्न होणारी व अल्पकाळ टिकणारी बेशुद्धी), क्षुद्रापस्मार [⟶ अपस्मार] इ. लक्षणांचे वर्णन ‘भोवळ’, ‘घेरी’, ‘चक्कर’ अशा शब्दांत करतो. यामुळे केवळ रोगलक्षणावरून रोगनिदान करणे अवघड असते. प्रस्तुत नोंदीत सुरुवातीस दिलेला ‘भोवळ’ या शब्दाचा अर्थच अभिप्रेत आहे.

शरीरस्थिती व शरीर संतुलन: भोवळ या रोगलक्षणाविषयी अधिक विवेचन करण्यापूर्वी शरीरस्थिती आणि शरीराची अवकाश व परिसर संबंधित स्थिती, तसेच शरीर संतुलन यांविषयी थोडीशी माहिती असणे आवश्यक आहे.

शरीराची संतुलित स्थिती, तसेच त्याचे परिसरीय संबंध व्यवस्थित ठेवण्याकरिता अनेक शरीरक्रियात्मक यंत्रणा कार्यान्वित असतात. यांपैकी अतिशय महत्वाच्या संत्रणांचा येथे उल्लेख केला आहे.

(१) डोळ्यातील जालपटलापासून (प्रकाशसंवेदी पटलापासून) निघणाऱ्या आवेगांचा (उत्तेजकामुळे निर्माण झालेल्या विक्षोभ तरंगांचा) नेत्र-प्रेरक-यंत्रणेद्वारे [⟶ प्रेरक तंत्र] समन्वय केला जातो आणि त्यामुळे शरीरस्थिती व शारीरिक हालचाली यांविषयीची माहिती मेंदूतील विशिष्ट क्षेत्रांना पुरविली जाते. [⟶ डोळा].

(२) कानाच्या अंतर्कर्ण भागातील सर्पिल कुहर [अर्धवर्तुळाकृती नलिका, लघुकोश व गोणिका हे भाग असलेला भाग ⟶ कान] या भागापासून निघणारे आवेग हे हालचालीतील दिशाबदल, गतिमानता (वेग वाढणे किंवा कमी होणे) आणि शरीरस्थिती यांविषयीची माहिती पुरवितात. या भागात शरीरातील स्नायू, कंडरा (अस्थींना किंवा उपास्थींना-कूर्चांना-स्नायू घट्ट बांधणारे दोरीसारखे तंतुसमूह) आणि ऊतके (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचे–पेशींचे-समूह) येथून येणाऱ्या संवेदनांचे विशिष्ट ग्राहक (अंतर्गत ग्राहक) असतात. या संवेदनांचा समन्वय करून आवेग मेंदूकडे जातात.

(३) सर्व ⇨प्रतिक्षेपी क्रिया (संवेदी ग्राहकाच्या उद्दीपनामुळे होणाऱ्या त्वरित व अनैच्छिक प्रतिक्रिया), शरीरस्थितीसंबंधीच्या व ऐच्छिक हालचाली यांकरिता स्नायू आणि सांधे यांपासून निघणारे (अंतर्गत) आवेग आवश्यक असतात, यांपैकी मानेतील संवेदना फार महत्त्वाच्या असतात. कारण त्यांवरून डोके व धडाचा इतर भाग यांमधील स्थितिजन्य संबंधाची माहिती पुरविली जाते.

या सर्व संवेदनांचा समन्वय निमस्तिष्क, मस्तिष्क, स्तंभातील नेत्र-प्रेरक-केंद्रके, श्रोतृकुहर केंद्रके व लाल केंद्रके आणि अधोमस्तिष्क गुच्छिकांमधील केंद्रके करतात [⟶ तंत्रिका तंत्र]. त्यामुळे स्थितीसंबंधीचे अनुयोजन, ताठ उभे राहणे व हालचालीवर नियंत्रण या क्रिया केल्या जातात.

याशिवाय शरीर संतुलन व शरीराचा बाह्य परिसराशी असलेला संबंध योग्य ठेवण्याकरिता काही मनो-शरीरक्रियात्मक यंत्रणांची  गरज असते.

वरील वर्णनावरून असे लक्षात येते की, शरीरस्थिती, शरीर संतुलन, शारीरिक हालचाली, गुरुत्वाकर्षणाविरुद्ध शरीराला मिळणारा आधार या सर्वांशी संबंधित असणाऱ्या अनेक यंत्रणा असून त्या अतिशय जटिल (गुंतागुंतीच्या) आहेत. या कारणामुळे भोवळ व तत्सम लक्षणाचे नक्की कारण शोधणे कठीण असते.

अनुषंगी लक्षणे: भोवळ या लक्षणाबरोबरच इतर काही लक्षणेही बहुधा आढळतात. रोगी वर्णन करताना दोलायमानता, गरगरणे, एका बाजूस ओढल्यासारखे वाटणे, जमीन किंवा भिंत तिरपी होत असल्याचे भासणे, जमीन वर किंवा खाली जात आहे असे वाटणे इ. तक्रारी सांगतो. एका बाजूस ओढल्यासारखे वाटणे हे भोवळीचे हमखास दर्शक मानले जाते. सौम्य प्रकारात घेरी येणे, अशक्तपणाची जाणीव, गोंधळणे, असुरक्षितपणाची जाणीव, अस्थिरता यांपैकी कोणतेही लक्षण असू शकते. जेव्हा चक्रीय गती अथवा गरगरण्याबरोबरच मळमळणे, उलटी होणे, घाम फुटणे आणि उभे राहण्याची असमर्थता ही लक्षणेही आढळतात तेव्हा भोवळ प्रकार गंभीर समजला जातो. या प्रकाराला ‘यथार्थ भोवळ’ म्हणतात, तर इतर प्रकार ‘आभासी भोवळ’ म्हणून ओळखले जातात.


शरीराच्या काही हालचाली अंतर्कर्णातील अर्धवर्तुळाकृती नलिकांमध्ये जोरदार उद्दीपने निर्माण करतात. अशा हालचाली ऐच्छिक असतात किंवा झोपाळ्यावर बसले असताना झोपाळ्याच्या लयबद्ध हालचालीमुळे किंवा प्रवास करताना विमान, जहाज, आगगाडी, मोटार इत्यादींच्या लयबद्ध हालचालीमुळे उत्पन्न झालेल्या असतात. अशा उद्दीपनांमुळे उत्पन्न होणारे आवेग तात्काळ मेंदूतील संबधित क्षेत्रापर्यंत पोहोचतात. तेथून प्रतिक्षेपी क्रियांद्वारे शरीरातील स्नायूंना संवेदना पोहोचतात. परिणामी शरीरस्थितीतील बदलाशी जुळवून घेण्याची क्रिया घडते. जेव्हा शरीर संतुलन क्रिया विकृत असते किंवा सवय नसलेल्या व एकाएकी उत्पन्न होणाऱ्या हालचालीशी जुळवून घेण्याची क्षमता नसते, तेव्हा घेरी किंवा भोवळ उद्‌भवते. ही क्षमता निरनिराळ्या व्यक्तींत निरनिराळी असते म्हणूनच एकाच वाहनातून प्रवास करणाऱ्यांपैकी काहींना मळमळणे, उलट्या होणे (यालाच ‘जहाज लागणे’, ‘मोटार लागते’ असा शब्दप्रयोग करतात) इ. सौम्य भोवळीची लक्षणे जाणवतात, तर काहींना काहीही त्रास होत नाही. या प्रकाराला ⇨गतिजन्य विकार अथवा हालचालजन्य अस्वस्थता म्हणतात. फार उंचीवरून (उदा., उंच इमारतीवरून वा कड्यावरून) खाली पाहिले असता काही निरोगी व्यक्तींनाही भोवळ येते.

विकृतींचे वर्गीकरण: भोवळ हे एक लक्षण असलेल्या विकृतींचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते.

सार्वदेहिक विकृती : (१) अतिरिक्त रक्तदाब, (२) ऊर्ध्व-स्थितिज (शरीराच्या उभ्या स्थितीत असणारा) अल्प रक्तदाब, (३) अती रक्तस्राव आणि (४) रक्तक्षय.

तंत्रिका तंत्रासंबंधीच्या विकृती: (१) मस्तिष्क बाह्यकाचे रोग: उदा., अर्बुद (नव्या कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी व शरीरक्रियेस निरुपयोगी असलेली गाठ) (२) श्रोतृकुहरापासून निमस्तिष्कापर्यंत जाणाऱ्या तंत्रिका मार्गाची विकृती : उदा., पर्याप्त अथवा बहुविध तंत्वीभवन. [⟶ तंत्रिका तंत्र].

मनोनिर्मित रोग: (१) चिंताजन्य मज्जाविकृती [⟶ चिंता], (२) उन्माद.

कर्णजन्य विकृती: (१)  संसर्ग, आघात किंवा विषबाधाजन्य अंतर्कर्णाचे रोग : यांमुळे सर्पिल कुहराच्या कार्यात बिघाड उत्पन्न होतो. काही औषधे सर्पिल कुहरावर हानिकारक परिणाम करतात. उदा., क्षयरोगाच्या उपचाराकरिता नित्य उपयोगात असणारे ॲमिनोग्लायकोसाइड गटातील स्ट्रेप्टोमायसीन हे औषध पुष्कळ वेळा दुष्परिणाम करते व तो औषधाच्या अती मात्रेमुळे होते असे नसून अल्प मात्राही काही व्यक्तीमध्ये कारणीभूत असू शकते. हा दुष्परिणाम फक्त सर्पिल कुहरापुरताच मर्यादित नसून पुष्कळ वेळा आठव्या मस्तिष्क तंत्रिकेवरही (श्रवण तंत्रिकेवरही) झालेला आढळतो. (२) मेन्येअर (पी. मेन्येअर या फ्रेंच वैद्यांच्या नावावरून ओळखण्यात येणारा) लक्षणसमूह (कानात निरनिराळ्या प्रकारच्या आवाजांची जाणीव होणे, हळूहळू वाढणारा बहिरेपणा इ. लक्षणांचा समूह).

डोळ्यासंबंधीचे रोग: (१) नेत्र स्नायू पक्षाघात (एक किंवा अधिक स्नायूंचा), (२) गतिजन्य विकार.

इतर रोग: (१) डोळा : दृष्टिदोष, स्नायूंचे असंतुलन आणि ⇨काचबिंदू.

(२) अंतर्गत संवेदनावहन तंत्रिका मार्गाची विकृती ज्यांत असते असे रोग : उदा., ⇨वल्कचर्म (निॲसीन अथवा निकोटिनिक अम्ल या जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे त्वचा, श्लेष्मकला, केंद्रीय तंत्रिका तंत्र यांवर तुष्परिणाम करणारी विकृती), चिरकारी (दीर्घकालीन) मद्यासक्ती, मारक पांडुरोग.

(३) केंद्रीय तंत्रिका तंत्राचे रोग : शरीर संतुलनाशी संबंधित असलेल्या भागाची कोणतीही विकृती.

(४) सौम्य प्रकारची मस्तिष्काच्या शुद्ध रक्तवाहिन्यांतील रक्तातील ऑक्सीजनन्यूनता: पुष्कळ वेळा सौम्य व अल्पकाळ टिकणाऱ्या भोवळीचे हे कारण असू शकते.

(५) रोहिणीकाठिण्य, चिरकारी अल्प रक्तदाब : यात भोवळीबरोबर अस्वस्थता असून तिला अती श्रम किंवा मनःस्वास्थ्य बिघाड बहुधा कारणीभूत असतात.

(६) रक्तक्षय.

(७) हृदयाचे काही रोग: प्रवेगी अलिंद-तंतुक आकुंचन (हृदयाच्या अलिंद भागातील स्नायुतंतूंचे अनियमित अतिजलद आकुंचन), महारोहिणी झडप विकृती, हृद्‍रोध (अलिंद व निलय यांमधील आकुंचनासंबंधीचा आवेगांतील बिघाड).

(८) स्थितिज अल्प रक्तदाब : शरीरस्थितीत एकाएकी बदल झाल्यास (उदा., आडवे पडले असताना एकदम उठून उभे राहणे) प्रतिक्षेपी क्रियेने रक्तदाबात योग्य ते बदल न झाल्यामुळे सौम्य भोवळ उद्‌भवते.

(९) सूक्ष्मजंतू संसर्ग :मस्तिष्कावरणशोथ (मेंदू व मेरुरज्जू यांवरील आवरणांची दाहयुक्त सूज), मस्तिष्कशोथ (मेंदूच्या तंत्रिका ऊतकाची दाहयुक्त सूज), मस्तिष्कविद्रधी (मेंदूतील द्रव्याचे विघटन होऊन तेथे पू साचणे) या विकृतींत भोवळ हळूहळू वृद्धिंगत होते आणि पुष्कळ वेळा उत्स्फूर्तपणे उद्‌भवणारा नेत्रदोलही (वस्तूकडे पहाताना दोन्ही डोळ्यांचा असणारा नेहमीचा स्थिरपणा जाऊन डोळ्यांची लयबद्ध सूक्ष्म आंदोलने होणे हा विकारही) आढळतो.


(१०) आघात: आघातजन्य भोवळीत चक्रीय गतीचा भावना नसते. शरीरस्थितीतील बदल व श्रम अशा प्रकारच्या भोवळीची तीव्रता वाढवितात.

(११) मेंदूतील अर्बुद : अर्बुद जर स्थिति-गतिक (गतिमान अवस्थेत असताना शरीराची  स्थिती व त्याचे संतुलन यांच्याशी संबंधित असलेल्या) भागाशी संबंधित असेल, तर चक्रीय गतियुक्त भोवळ उद्‌भवते.

(१२) अर्धशिशी: प्रवेगी व पुनरावर्तित होणाऱ्या (पुन्हा पुन्हा उद्‌भवणाऱ्या) डोकेदुखीच्या पूर्वलक्षणात भोवळ संभवते.

(१३) ⇨अंतःस्रावी ग्रंथीच्या (ज्यांच्यामध्ये उत्पन्न होणारा स्राव वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम रक्तातच मिसळतो अशा ग्रंथीच्या) काही विकृतीत भोवळ हे एक लक्षण असू शकते. उदा., अवटू ग्रंथिस्रावाची न्यूनता [⟶ अवटु ग्रंथि], परावटू ग्रंथिस्रावाची न्यूनता [⟶ परावटु ग्रंथि].

(१४) मनोमज्जा विकृती : भोवळीच्या कारणांमध्ये या विकृतीचे प्रमाण सर्वाधिक असले, तरी वर दिलेले सर्व देहोत्भव रोग नसल्याची खात्री झाल्यानंतरच या कारणाकडे लक्ष देणे योग्य ठरते.

निदान: वर दिलेल्या विकृतींच्या यादीवरून हे लक्षात येते की, भोवळ या रोगलक्षणाचे निश्चित कारण शोधून काढणे अवघड असते, त्याकरिता रोग्याने वर्णिलेल्या रोगाच्या इतिहासाशिवाय संपूर्ण शारीरिक तपासणी अतिशय महत्त्वाची असते. शारीरिक तपासणीत डोळे, कान व तंत्रिका तंत्राची तपासणी करणे आवश्यक असते. एकट्या कर्णशास्त्रज्ञाच्या किंवा नेत्रविशारदाच्या तपासणीवर भोवळीच्या निदानाकरिता अवलंबून राहणे अयोग्य असते. काही  विशेष प्रयोगशालेय परीक्षा, क्ष-किरण चित्रण परीक्षा, विद्युत् मस्तिष्कालेख तपासणी (मेंदूमध्ये उद्‌भवणाऱ्या विद्युत् प्रवाहांच्या विशिष्ट उपकरणाच्या साहाय्याने काढलेल्या आलेखाची तपासणी) इत्यादींची जरूरी असते. सर्पिल कुहराच्या कार्यशीलतेसंबंधी अनेक चाचण्या उपलब्ध आहेत. यामध्ये एक सोपी परीक्षा ‘कोब्राक परीक्षा’ या नावाने ओळखतात. यामध्ये पिचकारीने बर्फाइतके थंडगार पाणी बाह्यकर्णातून कर्णपटलावर सोडतात व त्यामुळे होणाऱ्या रोग्याच्या प्रतिक्रिया अभ्यासतात. ‘ऊष्मद्रव परीक्षा’ नावाच्या परीक्षेत कानात थंड (३०° से.) आणि उष्ण (४४° से.) द्रव सोडून त्याच्या नेत्रगोलांच्या हालचालीवरील परिणामांचे निरीक्षण करतात. तापमानातील फरकामुळे अर्धवर्तुळाकृती नलिकांतील अंतर्लसीका द्रवात संनयन प्रवाह (अभिसरण प्रवाह) उत्पन्न होतात. या तीन नलिका एकमेकींशी काटकोनात जोडलेल्या असतात. [⟶ संस्थिति रक्षण कान].

श्रवणमापकाच्या मदतीने मध्यकर्ण, सर्पिल कुहर आणि कर्णशंबुक तंत्रिका यांच्या कार्यशीलतेची माहिती मिळते. अधूनमधून साध्या नादकाट्याने (दोन शाखा असलेल्या, इंग्रजी Y अक्षरासारखा आकार असलेल्या व आपटल्यास ठराविक नाद देणाऱ्या धातूच्या साधनाने) केलेली श्रवणक्षमतेची तापासणी करताना बहिरेपणा आढळल्यास तो संवाहक प्रकारचा आहे किंवा संग्राहक प्रकारचा आहे हे ठरवणे जरूर असते. [⟶ श्रवण-१].

चिकित्सा: उपचाराकरिता मूळ रोग शोधून त्यावर इलाज करतात. तात्पुरता व थोडाफार आराम

कानामागील त्वचेवर बसविलेला ट्रान्सडर्म स्कोप

मिळण्याकरिता अथंरुणात पडून राहण्याचा सल्ला देतात आणि काही औषधे देतात. यामध्ये डायफेनहायड्रामीन (बेनाड्रिल), डायमेनहायड्रिनेट (ड्रामामीन) यांसारखी हिस्टामीनरोधके [⟶ हिस्टामीन], परफेनाझीन (फेन्टाझीन), मेक्लोझीन (बोनामीन), प्रोमेथाझीन थिओक्लेट (ॲव्होमीन) यांचा समावेश असतो.

आधुनिक अवकाश वैद्यकात गतिजन्य विकारावरील उपचारांना महत्त्व प्राप्त झाले आहे कारण अंतराळ उड्डाण करणाऱ्यांना अती वेगवर्धन आणि वजनरहित अवस्था ही दोन्ही अनुभवावी लागतात. गतिजन्य विकारावर प्रतिबंधात्मक औषधोपचार अधिक प्रभावी असतात. प्रवासापूर्वी एक तास अगोदर व लांबच्या प्रवासात दर तीन-चार तासांनी औषध घेणे हितावह असते. अलीकडे याबाबतीत एक नवीन प्रकारची औषधयोजना करतात. यामध्ये स्कोपोलामीन नावाचे औषध त्वचेतून हळूहळू रक्तप्रवाहात मिसळले जाते. याकरिता औषध ठरविक प्रमाणात चिकटपट्टीने कानाच्या मागील त्वचेशी संलग्न ठेवतात आणि तेथून ते हळूहळू त्वचेतून अभिशोषिले जाते. या पट्टीला ‘ट्रान्सडर्म-स्कोप’  म्हणतात. ही अभिशोषणाची क्रिया तीन दिवसांपर्यंत चालू असल्यामुळे दीर्घकालीन गतिजन्य विकार टळतो.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा: भोवळ हे चिन्ह निरनिराळ्या कारणांनी होते. स्त्रियांमध्ये आणि अशक्त व्यक्तीमध्ये भोवळ बहुधा रसधातूच्या क्षयामध्ये होत असते. तेव्हा प्रवाळभस्म, समुद्रफेस, दुधामधून, दूधसाखरेतून किंवा उसाच्या रसामधून जेवण झाल्याबरोबर द्यावे. भोवळ ही मज्जाधातूच्या क्षीणतेमुळेसुद्धा येते. त्या वेळेला वरील औषधे चालणार नाहीत. अशा वेळी गुळवेल सत्त्व मोरावळ्यातून चाखावे वा नारळाच्या दुघातून चाटवावे. नारळीपाक, बदाम, गुळात केलेले तिळाचे लाडू हेही खाण्याला द्यावे. महालक्ष्मी विलासगुटी रात्री झोपताना मोरावळ्यातून द्यावी. कानांत तेल घालावे. पित्ताच्या वृद्धीमुळे जर भोवळ येत असेल, तर प्रवाळ, कामदुधा, मौक्तिकपिष्टी दूध-साखरेबरोबर द्यावे. वाताचा जर संबंध असेल, तर सूतशेखर दूध-खडीसाखरेबरोबर द्यावा.

पटवर्धन, शुभदा अ.


पशूंतील भोवळ: शरीराची संतुलित स्थिती तसेच त्याचे परिसरीय संबंध व्यवस्थित ठेवण्याकरिता अनेक शरीरक्रियात्मक यंत्रणा मनुष्यमात्राप्रमाणे पशूमध्येही कार्यान्वित असतात परंतु संवेदना अथवा जाणीव यासंबंधीच्या परीक्षा पशूमध्ये आत्मनिष्ठ असू शकत नाहीत व वस्तुनिष्ठ परीक्षांमध्ये प्रेरक तंत्र व्यवस्थित काम करीत असल्याचे गृहीत घरण्यात येते. यामुळे मनुष्यातील भोवळ या लक्षणाचे यथार्थ आकलन पशूंमध्ये होऊ शकत नाही. प्रस्तुत नोंदीतील मनुष्यामध्ये भोवळ या लक्षणात अंतर्भूत असलेल्या संवेदना जनावरामध्ये असू शकतात की काय, हे आत्मनिष्ठ लक्षणांच्या अभावी निश्चितपणे सांगता येत नाही. तथापी एकाएकी चक्कर येऊन खाली पडणे, सर्वांगाला घाम सुटणे, तोंडाला फेस येणे, संपूर्ण अगर अंशतः शुद्ध हरपणे अशी भोवळसदृश लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. अतिशय वेगवान वाहनातून प्रवास केल्यास किंवा अशा वाहनाकडे जवळून पाहिल्यास जनावराला चक्कर येते. कानाच्या अंतर्कर्ण या भागातील सर्पिल कुहराच्या कार्यात बिघाड, मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये रक्तस्राव, रक्तसंचय किंवा शोथ झाल्यास जनावराला भोवळ येते. उष्ण हवेत काम करणाऱ्या जनावरामध्ये हे रोगलक्षण आढळण्याचा अधिक संभव असतो.

कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व जातींच्या जनावरांमध्ये भोवळ हे लक्षण दिसून आले आहे. कित्येक वेळा गाडीला जुंपलेल्या घोड्यांना, बैलांना भोवळ येते. भोवळ २ ते ५ मिनिटे राहते आणि त्यांनतर जनावर हळूहळू उठून पुन्हा उभे राहते. या रोगलक्षणात स्नांयूचे असंबद्ध आकुंचन होत नाही. कुत्र्यामध्ये ओकारी व मलमूत्र विसर्जन होते. कुत्र्यामध्ये नेहमी आढळून येणाऱ्या अपस्मार या रोगामध्ये भोवळीसारखीच लक्षणे दिसून येतात परंतु त्यात स्नायू ताठरतात, झटके येतात व दातखीळ बसते आणि शुद्ध हरपते पण भोवळ आली असता जनावर शुद्धीवर असते.

खोगीराची अगर जोडलेल्या गाडीची बंधने ढिली करून जनावर मोकळे करतात आणि त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर थंड पाण्याचा हबका मारतात. अतिश्रमामुळे भोवळ आली असल्यास पुरेशी विश्रांती देतात. भोवळ-चक्कर येण्याचे निश्चित कारण (गाई. बैल, घोडे यांमध्ये ‘सरा’ हा प्रजीवजन्य रोग असल्यास) समजून आल्यास ते दूर करण्यासाठी औषधी उपाययोजना करतात. एकदा भोवळ आलेल्या जनावरास पुन्हा येईलच असे नाही परंतु वारंवार भोवळ येणारे जनावर कोणत्याही कामासाठी भरवशाचे नसल्यामुळे मारून टाकणे श्रेयस्कर ठरते.

पंडित, र. वि.

संदर्भ : 1. Beeson, P. B. McDermott, W., Ed., Textbook of Medicine, Tokyo, 1975.

            2. Berkow, R. and others, Ed., The Merck Manual, Rahway, N. J., 1977.

            3. Blood, D. C. Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1973.

            4. Datey, K. K. Shah. S. J., Ed., A. P. I. Textbook of Medicine, Bombay, 1979.