भों गा: (सायरन). ध्वनीच्या साह्याने हवाई हल्ला, आग इत्यादींविषयीच्या धोक्याच्या सूचना देण्याकरिता,
तसेच कारखान्यांत कामगारांना कामाच्या वेळा माहीत होण्याकरिता वापरले जाणारे उपकरण. हवेच्या फुंकाऱ्यांनी ध्वनी निर्माण करण्याच्या प्रयोगाचे वर्णन जॉन रॉबिसन यांनी १८०१ मध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकातील एका लेखात प्रसिद्ध केले होते. या प्रयोगाच्या मांडणीत फ्रेंच अभियंते व भौतिकीविज्ञ शार्ल कान्यार द ला तूर (१७७७-१८५९) यांनी १८१९ मध्ये सुधारणा केली. या मांडणीद्वारे पाण्यातही ध्वनी निर्माण करता येतो, या त्यांच्याच शोधावरून तिला ‘सायरन’ हे नाव प्राप्त झाले. सध्याच्या स्वरूपात हे उपकरण ए. सीबेक (१८०५–४९) या शास्त्राज्ञांनी विकसित केले, सुरुवातीला ध्वनीची कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या) मोजण्यासाठी या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. सध्या भोंग्याचा उपयोग फक्त ध्वनिसंदेशनिर्मितीसाठी केला जातो.
भोंग्याचा एक प्रकार आकृतीमध्ये दाखविला आहे. (१) या मार्गातून दाबयुक्त हवा (२) या ध्वनिकोशात शिरते. कोशाच्या वरच्या बाजूस स्थाणूक (स्थिर राहणारा) हा झाकणासारखा भाग (३) बसविलेला असतो. या स्थाणूकाच्या मध्यभागी केंद्र असलेल्या स्थाणूकावरील एका वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावर छिद्रे पाडलेली असतात. स्थाणूकावर उभ्या आसाला जोडलेली (४) ही घूर्णक (आसाभोवती फिरु शकणारी) तबकडी असते. या घूर्णक तबकडीवर स्थाणूक तबकडीप्रमाणेच तंतोतंत छिद्रे पाडलेली असतात. मात्र दोहोंवरील छिद्रे सरळ एका रेषेत नसून ती तबकडीच्या पृष्ठभागाशी कोन (सु. ४५°) करीत असतात. स्थाणूक व घूर्णक यांवरील छिद्रांचा कल विरुद्ध दिशांत असतो त्यामुळे हवेचा प्रवाह या दोहोंमधून पुढे जातो तेव्हा तेथे ⇨टरबाइनासारखी क्रिया (हवेच्या प्रवाहातील उर्जेचे चक्रीय गतीत रूपांतर करणारी क्रिया) होऊन घूर्णक तबकडीचे परिभ्रमण होत राहते व तिचे परिभ्रमण करण्याकरिता घूर्णी परिबल (प्रेरणा व ती जेथे लावलेली असेल त्या बिंदूचे प्रेरणेच्या कार्यरेषेपासूनचे लंबांतर यांच्या गुणाकाराने दर्शविली जाणारी व परिभ्रमणास कारणीभूत होणारी भौतिक राशी) आवश्यक असत नाही. घूर्णकावरील छिद्र परिभ्रमण गतीमध्ये खालच्या स्थाणूकावरील छिद्राच्या बरोबर समोर येते तेव्हा त्या दोहोंमधून एक हवेचा स्पंद किंवा फुंकारा दुसऱ्या बाजूस जाऊ शकतो. याउलट स्थाणूकाची व घूर्णकाची छिद्रे जेव्हा एकमेकांसमोर येत नाहीत, तेव्हा त्यांमधून हवेचा प्रवाह जाऊ शकत नाही. अशा प्रकारे हवेच्या प्रवाहाचे एका ठराविक लयीत खंडित होणाऱ्या हवा-स्पंदात रूपांतर होते. स्पंदाची कंप्रता जर पुरेशी उच्च असेल, तर त्यापासून एक ठराविक कंप्रतेचा असा एक ध्वनि-नाद ऐकू येतो. हा ध्वनी शुद्ध नसून त्यामध्ये अनेक हरात्मक कंप्रता जर पुरेशी (मूलभूत कंप्रतेच्या म्हणजे ध्वनि-नादातील सर्वांत कमी कंप्रतेच्या पूर्णांकी पटीत असणाऱ्या कंप्रता) असतात, असे दाखविता येते. यांपैकी मूलभूत कंप्रतेचे मूल्य तबकडीवरील छिद्रसंख्या व तिची प्रती सेकंद होणारी परिभ्रमणे यांच्या गुणाकाराएवढे असते. वायुदाबामुळे घूर्णक तबकडीचे परिभ्रमण होत असून उपकरणापासून मिळणारी ध्वनिकंप्रता शेवटी वायुदाबावर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये बदल करणे सुलभ असते. घूर्णकाचे प्रती सेकंद परिभ्रमण फेरे मोजण्याकरिता उपकरणावरच (५) या फेरेगणकाची योजना केलेली असते. स्थाणूकावर व घूर्णक तबकडीवर अनेक संकेंद्री (एकच केंद्र असलेल्या) वर्तुळांत छिद्रे पाडून तबकडीचा वेग न बदलता ध्वनीच्या उच्चनीचतेत बदल करता येईल अशी रचना एच्. एल्. एफ्. फोन हेल्महोल्ट्स यांनी केली होती.
घूर्णकातून जाणाऱ्या हवेच्या परिमाणावर ध्वनीची तीव्रता अवलंबून असते. लहान भोंग्याकरिता १ किग्रॅ./सेंमी.२ या दाबाची हवा, तर मोठ्या भोंग्याकरिता ५ ते १० किग्रॅ./सेंमी.२ या दाबाची हवा वापरण्यात येते. या उपकरणाच्या द्वारे उच्च तीव्रतेचे ध्वनिसंदेश प्रक्षेपित करता येतात. ४४० हर्ट्झ या मूलभूत कंप्रतेच्या ध्वनीकरिता हे उपकरण २० किलोवॉट कार्यशक्तीची ध्वनी ऊर्जा पुरवू शकते. २०० किलोहर्ट्झ या श्राव्यातीत (मानवी श्रवणक्षमतेच्या कक्षेच्या बाहेरच्या) कंप्रतेचे उच्च तीव्रतेचे ध्वनिसंदेश या उपकरणाच्या साह्याने निर्माण करता येतात.
दीपगृह व दीपनौका [⟶ दीपगृह] यांमध्ये तसेच कारखान्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे भोंगे वापरतात. या उपकरणांमधून स्थिर स्वर व एकदम स्वर निघेल, फार मोठा आवाज निघेल आणि क्रमाक्रमाने स्पष्ट असा ध्वनिप्रवाह बाहेर पडेल अशा विविध प्रकारच्या व्यवस्था करता येतात. प्रत्येक झोताच्या शेवटी विशेष प्रकारचा रेकलेला आवाज निधतो. हवा साठविलेल्या टाकीमधील संपीडित (दाब देऊन संकोचित केलेली) हवा उपकरणाला पुरवून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाते.
पोलीसदल व अग्निशामकदल यांमधील गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भोंग्यामध्ये विद्युत् चलित्राच्या (मोटरच्या) साह्याने चालविलेला केंद्रोत्सारी (ज्यातील हवेचा प्रवाह-त्रिज्येच्या दिशेने-असतो असा) भाता असतो. घूर्णकावरील अनेक फटींतून अरीय दिशेने हवा बाहेर पडत असते. घूर्णक फिरत असताना त्यावरील सर्व फटी त्यांच्याभोवती असलेल्या कक्षातील (आवरणातील) तद्नुरूप फटींवरून जातात तेव्हा विवक्षित वेळी सर्व फटी एकदम उघड्या किंवा बंद होत असतात. प्रत्येक फटीचे क्षेत्रफळ सामान्यपणे ६.४५ चौ. सेंमी. किंवा त्यापेक्षा जास्त असल्याने आणि एकाच वेळी सर्व फटी उघड्या किंवा बंद होत असल्याने अशा भोंग्यापासून निर्माण होणाऱ्या ध्वनीची तीव्रता अतिशय जास्त असते. गाडीचालकाचे या उपकरणाच्या चलित्रावर नियंत्रण असते. घूर्णकाचा वेग जसा वाढत जातो किंवा कमी होत जातो त्याप्रमाणे भोंग्यामधून सर्वांना परिचित असलेला आर्त स्वराचा ध्वनी बाहेर पडतो.
चिपळोणकर, व. त्रिं. सूर्यवंशी, वि. ल.
“