भूत : (आयुर्वेद). रोगकारक अतिसूक्ष्म जीव. मनुष्यावर आक्रमण करणारे जे प्राणी आहेत, त्यातले मोठे व विषारी प्राणी सोडले, तर लहान, सूक्ष्म व अतिसूक्ष्म जीव असे तीन प्रकारचे जीव आहेत. गोलजंत, सुते इ. कृमी म्हटले जातात, ते लहान जीवांत गणले जातात. रक्तज कृमी यांपेक्षा सूक्ष्म असतात. त्यांपैकी डोळ्यांना काही दिसतात काही दिसू शकत नाहीत. ह्या अदृश्य सूक्ष्म जीवांनी रोग होतात. रक्तज, कृमिजन्य, कुष्ठ, ज्वर, राजयक्ष्मा (क्षय), डोळे येणे इ. रोग झालेल्या रोग्याचा स्पर्श झाला किंवा त्या रोग्याच्या वस्तूंशी संपर्क आला, तर संपर्कित व्यक्तीस हे रोग होतात. अशा रुग्णाच्या शय्येवर वा आसनावर बसणे, त्याची वस्त्रे, फुले इ. वस्तू घेणे, त्याने चंदन इत्यादींची उटी लावल्यास ती घेणे, त्याच्यासह जेवणे, त्याचा स्पर्श, संभोग यांमुळे तसेच त्याच्या निश्वासामुळेही त्याचा रोग दुसऱ्याला जडतो. या रोगांना औपसर्गिक रोग म्हणतात. या सूक्ष्म जीवांपेक्षाही आणखी एक जीववर्ग मानवावर आक्रमण करून रोग निर्माण करतो. त्याला भूत, ग्रह असे म्हणतात. हे अतिसूक्ष्म असतात. हे आपल्या भोवती पृथ्वीवर, आकाशात सर्व दिशांना, घरात संचार करतात. हे असंख्य आहेत, गणना संख्येत सागंण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही संख्या आली पद्म, म्हणजे एकावर तेरा शून्ये, त्याला कोटी हजार आणि दहा हजारांनी गुणावे, येणाऱ्या संख्येइतके ‘कोटीसहस्त्रायुतपद्मसंख्या’.आपल्या भोवती आहेत. ते रात्री आधिक्याने संचार करतात म्हणून त्यांना निशाचर म्हणतात, त्यांना मांस आवडते म्हणून पिशाच्च, रक्तमांस आवडते त्यांना राक्षस इ. नावे आहेत. ते मनुष्याच्या शरीरात उष्णता जशी शिरते पण दिसत नाही. आरशात आपले बिंब शिरते व प्रतिबिंब दिसते, शिरताना दिसत नाही, अशी ही भूते शरीरात शिरतात पण दिसत नाहीत. शरीरावर व्रण असेल, तर व्रणात प्रथम शिरतात पण अस्वच्छ, अपवित्र व आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे आहारविहार न पाळणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात व्रण नसला, तरी शिरतात व रोग उत्पन्न करतात. याकरिता व्रणाचे रोगी, सूतिका व इतर रोगी असलेल्या रुग्णालयात रक्षोघ्न (राक्षसनाशक) धूप (धुरी) न चुकता सकाळ–सायंकाळ द्यावा अशी शास्त्रकारांची आज्ञा आहे. घरातही तशी धुरी व देवापुढे धूप, उदबत्ती लावण्याची रूढ पद्धती आहे. व्रणाला, बाळंतिणीच्या जननावयवाला, तान्ह्या मुलाच्या सर्वांगाला धुरी देण्याचा आदेश आहे. जाती : या भूतांच्या असंख्य जाती आहेत. यांचे अधिपतीही असंख्य आहेत. त्यांचे आकार-लक्षणे नाना प्रकारांची असतात पण त्यांच्या स्वभावावरून उन्मादकर भूतांचे प्रकार आठ होतात : (१) देव, (२) दैत्य, (३) गंधर्व, (४) यक्ष, (५) पितृ, (६) भुजंग, (७) राक्षस व (८) पिशाच. यांखेरीज ओजोशन भूते चरकांनी सांगितली आहेत. यांना वरील आठांना जसे रक्तमांसादि शारीर धातू प्रिय आहेत, तसे यांना शारीर धातू प्रिय नाहीत. वरील दैत्य व भुजंग भूते चरकांनी सांगितलेली नाहीत. गुरू, वृद्ध, सिद्ध आणि महर्षी ही चार उन्मादकर भूते सांगितली आहेत. वाग्भटांनी अठरा सांगितली आहेत. साथीचे रोग : वायू, पाणी, देश व काल हे त्या त्या प्रदेशातील लोकांना समान आहेत. यांपैकी एकही दूषित झाले, तरी अनेक लोकांना एकाच वेळी एकच रोग उत्पन्न होऊ शकतो. यांपैकी एक वा अनेक भूतांनी दुष्ट झाला वा न झाला तरी अशा रोगाची साथ उत्पन्न होते. यावर स्थान त्याग हा एक उपाय सांगितला आहे. भूतजविकार : ज्वर, विषमज्वर, अपतानक (धनुर्वात), उन्माद. बालग्रह : लहान मुलांवर आक्रमण करणारी भूते १२ सांगितली आहेत. उपचार : सर्व भूतांवर होम, बली पूजा व औषधी सांगितल्या आहेत. तेल किंवा जुने तूप औषधांनी सिद्ध करून ते अभ्यंग नाकात घालावे व पोटात द्यावे. मुलांना धुरीही द्यावी. भूतविद्या हे वैद्यकाचे एक स्वतंत्र अंग आहे. त्यात तज्ञता संपादन करणाऱ्या वैद्याला भूतचिंतक म्हटले आहे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री