भित्तिशोभन : खाजगी घरे, राजप्रासाद, वाडे, सार्वजनिक स्थळे तसेच चर्च, यांसारख्या धार्मिक वास्तू इत्यादींच्या भिंती विविध प्रकारे सुशोभित करण्याची कला. ही कला जगात सर्वत्र आढळते. भित्तिशोभन हे गृहशोभनाचे एक अंग आहे. [⟶ गृहशोभन]. सौंदर्यवर्धनाबरोबरच वास्तुरचनेतील उणिवा किंवा अपुरेपणा किंवा इतर दोष दूर करून वास्तूचा अंतर्भाग आकर्षक, वेधक करणे हे भित्तिशोभनाचे सर्वसामान्य उद्दिष्ट म्हणता येईल. अनेक प्रकारच्या साधनसामग्रीने भित्तिशोधन करण्यात येते. भिंतींना दिलेल्या रंगापासून भित्तिचित्रे आणि भित्तिलेपचित्रे यांच्यापर्यंत भित्तिशोभनाच्या विविध तऱ्हा आणि माध्यमे दिसून येतात. संगमरवर, रंगीबेरंगी फरशा, दगड, चर्मपट, लाकडी चौकटी किंवा फळ्या, सॅटिन, मखमल अथवा तत्सम प्रकारचे कापड, प्लॅस्टिकच्या पातळ फळ्या, धातूंचे पत्रे, छायाचित्रे, आरसे, रंगीत, दुधी वा साध्या काचा, भित्तिपत्रे [⟶ भित्तिपत्र] इ. माध्यमांचा उपयोग करून आणि गृहशोभनाची दृष्टी ठेवून भिंती सजविण्यात येतात. भित्तिचित्रे वा भित्तिलेपचित्रे किंवा भिंतीत खचविलेल्या रंगीबेरंगी फरशा वा काचा तसेच कलात्मक कोनाडे, काचेची वा अन्य कपाटे यांसारखे प्रकार हे कायम स्वरूपाचे असतात. पण वेगवेगळ्या वेधक आकारा-प्रकारांतील आरसे, छायाचित्रे, निसर्गचित्रे, पडदे, भिंतीवर टांगण्यासाठी केलेल्या भित्तिशोभितांसारख्या (वॉल हँगिंग) कलात्मक वस्तू इ. साधनांनी भिंतीची सजावट वारंवार बदलताही येऊ शकते. अल्पकालीन आणि कायम स्वरूपाचे असे हे भित्तिशोभनाचे प्रकार हे कालमानाप्रमाणे बदलते तसेच सामाजिक व कलात्मक अभिरुचीप्रमाणे बदलणारे असतात. विशिष्ट काळात प्रचलित असलेल्या कलात्मक अभिरुचीचा ठसा भित्तिशोभनावर उमटलेला असतो.
भितींचा ⇨रंग केवळ शोभावर्धक म्हणूनच नव्हे, तर भिंतींचे रक्षण करणाराही असतो. भिंतीच्या रंगात काही काळानंतर बदलही करता येतो. चर्मपटांनी भिंतींना वेधक रीतीने मढवण्याची पद्धतही पश्चिमी देशांत प्रबोधनकाळापासून प्रचलित असल्याचे दिसते. भित्तिचित्रांची पार्श्वभूमी म्हणूनही चर्मपटांचा उपयोग केला जातो. विविध प्रकारची छायाचित्रे, विविध कलावंतांच्या चित्राकृती, तसेच विविध रंगांचे वा आकारांचे कापडी पडदे, दोन दालनांमध्ये टांगलेली लाकडी, काचेची कापडी कलात्मक नक्षीकाम केलेली आडपडदी [⟶ आडोशीपट] वा सचित्र असे लोंबते गवती पडदे यांचा भित्तिशोभनात उपयोग होतो. रंगीबेरंगी किंवा दुधी काचा, संगमरवर वा इतर प्रकारच्या फरशा यांचा वापर विशेषतः स्नानगृहांच्या भित्तिशोभनासाठी करण्यात येतो. भित्तिपत्र (वॉलपेपर) हाही अलीकडे विशेष लोकप्रिय ठरलेला भित्तिशोभनाचा प्रकार होय. यांशिवाय जपानी चिकाचे पडदे, भरतकाम केलेले वस्त्रपट, काचांचे तुकडे त्याचप्रमाणे खिळे, पत्रे व तत्सम पदार्थ यांच्या चित्रविचित्र रचना साधून केलेले ‘कोलाज’ यांचाही भित्तिशोभनासाठी उपयोग केला जातो. पशुपक्ष्यांचे मुखवटे, वाघसिंहादी पशूंची कातडी, जुनी मौलिक शस्त्रास्त्रे यांसारख्या वस्तूंनीही भिंती सजवण्याची पद्धत आहे.
पूर्वीच्या काळी दालनाच्या विभाजनासाठी लाकडी फळ्यांचा वापर करण्यात येत असे. अलीकडे त्याऐवजी चौकटीत बसविलेल्या लवचिक व झिलई दिलेल्या चकचकीत ‘व्हेनियर’चा उपयोग रूढ झाला आहे. व्हेनियर हे अक्रोड, कुंती (सॅटिनवुड) वा ब्लिच्ड ओक या वृक्षांच्या लाकडापासून तयार केलेले असतात. हादेखील एक भित्तिशोभनाचाच प्रकार मानला जातो.
त्याचप्रमाणे रोधफलकही (इंसुलेटिंग बोर्ड) बरेच प्रचारात आले आहेत. हे रोधफलक तंतूंचे बनविलेले असून ते जंतुरोधक तसेच अग्निसंरक्षक असतात. लहानमोठ्या जाडीचे व विविध आकारांचे हे रोधफलक उतरत्या कडांचे असल्यामुळे वापरताना सुलभतेने हाताळता येतात. काहींवर धातुपत्र्याचा पातळ मुलामा चढविलेला असतो, तर काहींवर फरशीसदृश चौकोन ओढलेले असतात, त्यामुळे ते वेधक दिसतात.
गवतापासून तयार केलेले पडदेही भित्तिशोभन म्हणूनच मान्यता पावलेले आहेत. विशेषतः एका विशिष्ट प्रकारच्या पिवळ्या रंगाच्या फुलझाडाच्या सालीपासून तयार केलेले हे पडदे गोफविणीने विणलेले असतात. त्यांचे रंग विविध असून कधी कधी त्यांमागे धातुसदृश अथवा अन्य चकाकणारा बेगडी कागद लावूनही त्यांच्या रूपात विविधता आणण्यात येते. एक कलापूर्ण व टिकाऊ भित्तिशोभन म्हणून लोकांच्या ते बरेच आवडीचे झाले आहे.
पूर्वी व अलीकडेही काचेचा उपयोग भित्तिशोभनाकडे करण्यात येतो. काही काचा पारदर्शक असतात, तर काही मोहक छटांच्या रंगीबेरंगी वा दुधाळ असतात, तसेच काही मुलाम्याच्या व काही उष्णतारोधकही असतात. प्रायः उष्णतारोधक, दुधाळ व रंगीत काचांचा उपयोग स्वयंपाक घरातील सौंदर्यवर्धनासाठी आणि सुंदर घडणीच्या, संगमरवरी फरशीच्या आभासात्मक काचांचा वापर स्नानगृहाची सजावट खुलविण्यासाठी करण्याची पद्धत आढळते. बारीक बारीक काचकण एखाद्या कागदावर चिकटून तयार केलेल्या काचेचा हा अभिनय प्रकार अलीकडेच उदयाला आला असून तिचा वापर बराच रूढ होत आहे. या काचेला ‘स्पन’ काच म्हणतात. मळली की ती धुता येते तसेच भिंतीवरही ती सुलभतेने चिकटविता येते. ती अतिशय चकचकीत व न विटणारी असून तिच्यामध्ये नाना रंग व आकृतीबंध यांचा वापर करून तिला कलात्मक रूप दिलेले असते.
याखेरीज अत्याधुनिक घरांमधून त्यांच्या स्थापत्य-प्रकारानुरूप विविध माध्यमे वापरून भित्तिशोभन करण्याची प्रथा दिसून येते. विशेषतः जपानी चिकाचे पडदे, बांबूच्या पातळ चिंबांचे किंवा वस्त्रपटावर विणून वा भरून केलेली भित्तिशोभिते तसेच लाकूड, काचतुकडे, भिंगे, खिळे, पत्रे, सुया अथवा रंग इत्यादींचा वापर करून सांधलेल्या रचना (कोलाज) यांचाही अंतर्भाव भित्तिशोभनातच होतो. सुशोभित नक्षीकामयुक्त छापील वस्त्र, जुनाट रेशमी सुती वस्त्रांच्या प्रतिकृती, कोरीवकामाचे प्राचीन लाकडी अवशेष, शस्त्रास्त्रे, शिल्पांकनयुक्त तांबे-पितळ-कासे यांची प्राचीन तबके यांचाही वापर आवर्जून करण्याची प्रथा हौशी लोकांत रूढ होत आहे.
भारतात भित्तिशोभनाची परंपरा जुनी असून राजप्रासादी वास्तू, घरे, देवालये, लेणी इत्यादींच्या भिंती कलात्मकरीतीने सजविण्याचे अनेक नमुने प्राचीन काळापासून आढळतात, तथापि भिंतीचा अंगभूत भाग म्हणून भित्तिचित्रे आणि भित्तिलेपचित्रे तयार करण्याकडे भारतीय परंपरेचा ओढा अधिक दिसून येतो. अजिंठा, बाघ, सितन्नवासल, बृहदेश्वर आणि लेपाक्षी इ. ठिकाणी असलेल्या भित्तिलेपचित्रांत मोडत असून अलीकडे त्यांचा अंतर्भाव टेंपेरा पेंटिंग म्हणून केला जातो. शेण, तांदळाचा कोंडा, वाळलेले गवत किंवा ओली माती यांचा मुलामा दगडाच्या खडबडीत पृष्ठभागावर देऊन तो नीट चिकटल्यावर व क्वचित प्रसंगी त्यावर चुन्याचा हलका हात फिरवून नैसर्गिक डिंकात भिजवलेल्या मृत्तिकारंगांनी ही चित्रे काढली असली पाहिजेत, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. वेलबुट्या किंवा इतर प्रकारचे भौमितिक रेखाटन करून भिंती सजवण्याची प्रथा भारताच्या अनेक भागांत दिसून येते [⟶ संदलाकाम]. मध्ययुगीन काळात राजस्थानमधील अनेक शाही महालांतून, तसेच मंदिरांच्या छतावर सचित्र चिनी मातीच्या विटा किंवा चमकणारा लेप देण्याची पद्धत आढळते.
इसवी सनाच्या अठराव्या शतकापासून राजस्थान, उत्तर हिंदुस्थान व हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या लहानमोठ्या राज्यांतून भित्तीशोभनाची प्रथा वाढीस लागली. राजस्थानातील मेवाड (उदयपूर), मारवाड (जोधपूर,) बिकानेर, नागौर, जैसलमीर, आंबेर-जयपूर, बुंदी, कोटा, शेखावटी इ. ठिकाणी जुन्या राजवाड्यांतून तसेच धनिकांच्या हवेल्यांतून भित्तिचित्रण विपुल प्रमाणांत असल्याचे आढळते. विशेषतः शीश-महाल किंवा शयन-गृहाच्या भिंतीवर आरशांच्या जोडीला शृंगारिक तसेच कामसूत्रादी चित्रे, आसने इ. बाबी भित्तिशोभन म्हणूनच वापरली जात, असे दिसते. अशा प्रेममंदिराच्या आतील बाजूस उठावदार बेलबुट्या, जाळी व नक्षीकाम तसेच लहान मोठे आरसे लावलेल्या कलात्मक योजनादेखील असत. उदयपूरच्या जग-मंदिरातील एका दालनात सचित्र भित्तिशोभनाचे काही नमुने होते परंतु त्यांचा आता संपूर्ण ऱ्हास झालेला दिसतो. सर्वसाधारणतः वरील राजस्थानी वास्तू पांढऱ्या रंगाच्या असून त्यांच्या आत व बाहेर सामाजिक जीवन दर्शविणाऱ्या चित्रांचा समावेश केला गेला आहे. बुंदी व कोटा या एकमेकांजवळ असलेल्या दोन्ही पूर्वीच्या संस्थानांत भित्तिचित्रणाचे व भित्तिशोभनाचे अत्यंत दुर्लभ असे नमुने दिसतात. येथील हवेल्या, किल्ले किंवा सर्वसाधारण माणसाच्या घरातूनदेखील लहानमोठ्या प्रमाणात चित्रित भिंती किंवा भिंतीच्या खालील अर्ध्या भागावर काढलेली चित्रे (वॉल डोडास) यांमध्ये शिकारीची तसेच मिरवणुकीची चित्रे आढळतात. अंबरच्या किल्ल्यात अनेकप्रकारे भित्तिशोभन साधण्यात आले आहे. दर्शनीभागाच्या सुशोभनात उठावदार वेलबुट्या, प्लॅस्टर किंवा दगड यांवर कोरून त्यावर सोन्याच्या वर्खाचे काम केलेले असते. किल्ल्याच्या आत राजा मानसिंहाच्या भोजशाळेतील एका भिंतीवर काळी शाई आणि कुंचला (स्याह-कलम) पद्धतीने रेखाटलेले कलेचे अवशेष अजूनही आहेत, तर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजा भारमलाच्या छत्रीमध्ये मखरात काढलेली विविध विषयांवरील चित्रकला भित्तिशोभनाची गाव्ही देते परंतु वातावरणाच्या प्रखरतेपासून ही चित्रे यापुढे वाचू शकणार नाहीत, असे वाटते. अंबरच्याच गलताजीनामक छत्र्यांत तसेच बैराट येथील जहांगीराच्या उद्यान-मंडपात भित्तिशोभन प्रामुख्याने पहावयास मिळते.
मध्यभारतातील दोन प्रख्यात राजवाडे आजही भित्तिशोभनकलेने नटलेले आहेत. राजा बोरसिंग देवाच्या (सतरावे शतक) दतिया येथील हिंदूपद्धतीच्या राजवाड्यात दालने, छते, भिंती, दरवाजे यांवर रंगकामाचे उत्कृष्ट दर्शन घडते, तर मधुकर शाहाच्या कारकीर्दीत बांधण्यात आलेल्या ओर्छा येथील राजमहालात हिंदू वास्तुकलेची उत्तम उदाहरणे दिसतात. मालवा शैलीतील कलेने ओतप्रोत भरलेल्या या दोन्ही वास्तू भित्तिशोभनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत.
उत्तर हिंदुस्थानात हिंदू राजांनी निसर्गरम्य देखाव्यांचे पहाडी शैलीतील चित्रांनी केलेले भित्तिशोभन विलोभनीय आहे, तर हिमालयाच्या कुशीत उंच उंच अशा वैष्णव मठांतून पौराणिक वा धार्मिक चित्रे काढून केलेले भित्तिशोभन मनोवेधक वाटते. चंबा, सुजानपूर व तीरा या ठिकाणी कलाकुसरीने भरलेल्या भिंती वा दरवाजे हे भित्तिशोभनाचेच नमुने आहेत.
भित्तिशोभनाच्या इतर प्रचलित प्रकारांमध्ये पटचित्राचा अंतर्भाव होत असून कापडावर धार्मिक विषयानुरूप चित्रण करून त्याचा उपयोग देवालयात किंवा इतर धार्मिक प्रसंगी करण्याची प्रथा फार जुनी आहे. दक्षिणेत कालहस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रित वस्त्रांना भित्तिशोभनात प्रमुख स्थान आहे. आजही वैष्णव अथवा शैव विषयांवर पटचित्रे चित्रित करण्यात येतात. अशा अनेक राजस्थानी पटचित्रांचा उल्लेख करता येईल. उदयपूरजवळील नाथद्वार येथे श्रीनाथजीच्या वैष्णव मंदिरात मूर्तीच्या मागे लावण्याचा पडदा म्हणून या पटचित्राला ‘पिछवाई’ म्हणण्याचा प्रघात आहे. लघुचित्रकारांनी आपली कृष्णभक्ती व्यक्त करण्यासाठी मोठमोठ्या पिछवाया रंगविल्या आणि मंदिरांना त्या अर्पण केल्या. त्यांत श्रीनाथजींच्या आयुष्यातील प्रसंग, उदा., रासक्रीडा, गो-पालन, भोग, शरद पूर्णिमा इ. विषयांचा अंतर्भाव केला आहे. भित्तिशोभनाचा एक अत्यंत लोकप्रिय प्रकार म्हणून यांचा उपयोग आपल्या देशातच नव्हे, तर परदेशातही अधिक प्रमाणात रूढ होत आहे. हल्ली अशा पिछवाया लहान मोठे बरेच चितारे (चित्रकार) रंगवितात व आधुनिक घरातून, संस्थांच्या स्वागतकक्षांतून किंवा अतिथिगृहात लावण्याकरिता विकतात. ‘पावूजीनुं पट’ या नावाने ओळखला जाणारा आणखी एक प्रकार प्रामुख्याने शाहपूर येथे भित्तिशोभनाकरिता व चित्रकथनासाठी त्यांचा उपयोग मोठे लोक करतात. हे पट भित्तिशोभनाकरिता वापरता येतात. अहमदाबाद येथील ‘मातानी-पछडी’ हा एक पटचित्रांचा प्रकार मानवाकृती ठसे वापरून करतात. त्यांत गर्द तांबड्या रंगीत चादरीवर देवादिकांचे विशेषतः देवीचे व प्राण्यांचे चित्रण केलेले असते.
पहा : भित्तिचित्रण भित्तिलेपचित्रण.
संदर्भ :Blumenau, Lili, Creative Design in Wall Hangings, London, 1967.
जोशी, चंद्रहास अंधारे, श्रीधर
“