भाषाशास्त्र : जीवनव्यवहार हे एक यंत्र आहे. हे यंत्र अखंडितपणे चालू आहे. त्यात कधी खरखराट होतो, कधी ते मंदावल्यासारखे वाटते, तर कधी ते शीघ्र गतीने चालते आहे अशी भावना होते. कधी ते इतके संथ आवाजहीन होते, की ते चालू असल्याचेही जाणवत नाही. पण ते कधी बंद पडत नाही. समाज आहे म्हणजेच चैतन्य आहे, व्यवहार आहे आणि सर्व काही (व्यवस्थित असो व नसो) चालू आहे. अनेक व्यक्तींचे विशिष्ट प्रकारचे, कमीअधिक नियमबद्ध वागणे, हा त्याचा प्राण.
अमुक एका यंत्रात अमुक अमुक भाग असतातच. हे त्याचे घटक. हे घटक आहेत तोवरच यंत्राचे अस्तित्व आहे.
समाजाचा मूलभूत घटक मानव व्यक्ती आहे. आपल्या मूलभूत गरजा भागण्याचे कार्य समाजाकडूनच होते, याची जाणीव असल्यामुळे तो समाजाची शिस्त पाळतो. समाजासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक प्रवृत्तींपैकी काहींत तो भाग घेतो. अन्नपाणी, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत, पण त्या काही आपोआप भागवल्या जात नाहीत. काही लोकांना त्यांच्या निर्मितीकडे लक्ष द्यावे लागते. यातूनच श्रमविभाजन, वर्गव्यवस्था इ. गोष्टी अस्तित्वात आल्या. समाज जसा जास्त जास्त प्रगत होत गेला, तसतशी वर्गव्यवस्था अधिकाधिक व्यापक व गुंतागुंतीची झाली. कामे वाढली, त्यात विविधता आली, स्पर्धा आली. पण जगातील सर्व समाजांचा विकास एकाच दिशेने झाला नाही. तो तसा का झाला नाही हे पहाण्यासाठी प्रत्येक समाजाचा इतिहास समजून घेणे आवश्यक ठरते. त्याची अर्थव्यवस्था, वर्गव्यवस्था व जीवनक्रमाला आवश्यक अशा संस्थांचे स्वरूप व कार्य का व कसे बदलत गेले, हे पहावे लागते.
हे पहायचे म्हणजे माणसाचा, समाजाचा, सामूहिक सवयींचा अभ्यास करणे आले. या ऐतिहासिक दृष्टीने करायच्या अभ्यासाची सुरूवात, ही नवी दृष्टी माणसाला प्राप्त झाल्याला फार काळ लोटलेला नाही. तिचा प्रारंभ अठराव्या शतकाची अखेर व एकोणिसाव्याची सुरूवात या दरम्यानचा आहे. इतिहास हा समाजसापेक्ष आहे. तो कळण्यासाठी एखाद्या संस्थेत क्रमशः काय घडत गेले एवढेच नव्हे तर बाह्यसंपर्काने त्याच्यावर कोणते परिणाम केले, परिवर्तन केले, क्रांती घडवून आणली, हेही पहावे लागते. कारण कोणताही समाज आजूबाजूंच्या समाजांपासून अलिप्त राहू शकत नाही.
अर्थात जे इतर सामाजिक संस्थात घडले ते भाषेतही घडले. भाषेलाही इतिहास असतो, परिवर्तन असते. मात्र हा इतिहास लिहायला पुरावा लागतो. तो जितका जुना व अखंडित तितका इतिहास अधिक पूर्ण. तो जितका प्रामाणिक तितका इतिहास अधिक विश्वासार्ह. म्हणून प्रत्येक भाषेचा, शाखेचा, कुटंबाचा इतिहास भिन्नपणे पहावा लागतो.
या इतिहासाशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शास्त्राने तो शोधून काढला ते शास्त्रच कसे जन्माला आले आणि पुढे गेले ते पहाणे.
भाषाशास्त्राचा इतिहास : दोन प्राचीन संस्कृतींना भाषेबद्दल कुतूहल होते. त्या म्हणजे ग्रीक व भारतीय. पण या दोघींचा दृष्टिकोण सर्वस्वी भिन्न होता. ग्रीकांना भाषा या एकंदर प्रकाराबद्दल व मानवी प्रवृत्तीबद्दल बौद्धिक कुतूहल होते. ऐकू येणारा ध्वनी आणि त्याने व्यक्त होणारा अर्थ याची त्यांना जाणीव होती. या दोघांचे नाते काय हा प्रश्न त्यांना पडला होता. शब्दांच्या जाती व रूपे यांची जाणीव होती. त्यामुळे व्याकरण आले. त्यांचे अनुयायी जे रोमन त्यांनी त्याचे केवळ अंधानुकरण केले.
भारतीयांची सुरूवात अशा तात्त्विक द्दष्टीने झाली नाही. त्यांच्यापुढे वेदवाङ्मय होते. ते बिनचूक उच्चार करून मुखोद्गत करणे, टिकवणे, निर्दोष स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेणे, हा त्यांचा अत्यंत व्यावहारिक द्दष्टिकोण. यज्ञसंस्था आणि धार्मिक कार्य यांना हे आवश्यक होते. त्यामुळे श्रुतिपरंपरेने हे वाङ्मय टिकून राहिले. पुढे, आपण जे पाठ करतो ते भाषिक आहे, त्यात ध्वनी आहेत, शब्ध आहेत, या शब्दांना आघात आहेत, ते प्रत्ययादी प्रक्रियांनी बनले आहेत हे कळले आणि त्यामुळे धातू, शब्दरूपे, शब्दांचा परस्परसंबंध इत्यादींतून अर्थ स्पष्ट होतो, ही जाणीव झाली आणि या जाणिवेतून भापेचे जे पृथक्करण झाले, तेच व्याकरण.
भारतीयांचा हा प्रयत्न फक्त स्वभापेसाठी (वेदभाषेसाठी) झाला. नंतर येणाऱ्या काही भांषाची व्याकरणे झाली. प्राकृतची व्याकरणे ही संस्कृतीचा नमुना डोळयासमोर ठेवून झाली. काही प्राकृत भाषांना नाटकात स्थान होते. काही भाषा काव्य व धार्मिक साहित्यांसाठी वापरल्या जात. पण या व्याकरणांनी नवे काही दिले नाही.
नंतरच्या मध्ययुगीन काळात जुन्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी ग्रंथचिकित्सा आली. टीका व भाष्ये आली पण ग्रंथ सुबोध करणे, अर्थ लावणे हा त्यांचा उद्देश होता.
पंधराव्या शतकात व्यापारानिमित्त परदेशी जाण्याचा उपक्रम युरोपात फार जोराने सुरू झाला. ख्रिस्ती धर्मगुरू धर्मप्रसारासाठी सर्वत्र जाऊ लागले. त्यामुळे परभाषा शिकण्याकडे या वर्गाचे लक्ष लागले. यातून भाषांचे नमुने गोळा करण्याचे काम काही लोकांनी हाती घेतले. ही भाषीक चळवळ पुढे येणाऱ्या तुलनात्मक अभ्यासाला उपकारक ठरली.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात संस्कृत व लॅटिन यांच्यातील काही शब्दांचे साम्य परदेशी प्रवाशांच्या लक्षात आले. करदू या जेझुइटाने फ्रेंच अकादेमीला १७६७ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात त्याता उल्लेख आहे. पण त्याचे महत्त्व जाणून ते सामान्य सिद्धांतरूपाने मांडण्याचे श्रेय कलकत्ता न्यायालयाचे सर ⇨ विल्यम जोन्स (१७४६-९४) या इंग्रज पंडितांना जाते. २ फेब्रुवारी १७८६ रोजी कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीसमोर भाषण करताना ते म्हणाले : संस्कृत भाषा कितीही प्राचीन असो, तिची घडण मात्र विलक्षण आहे. ग्रीकपेक्षा आधिक परिपूर्ण, लॅटिनपेक्षा आधिक समृद्ध असून या दोघींपेक्षाही ती आधिक संस्कारित आहे आणि तरीही क्रियापदांचे धातू आणि व्याकरणातील रूपे या दोन्ही बाबतीत ज्याचा खुलासा केवळ योगायोगाने करता येणार नाही असे त्यापेक्षाही जवळचे नाते तिचे या दोघींशी आहे, ते इतके घनिष्ठ आहे, की आता अस्तित्वात नसलेल्या कोणत्यातरी सामान्य उगमस्थानापासून त्यांचा जन्म झाला असावा, असे या तिघींचा अभ्यास करणाऱ्या भाषातज्ञाला वाटल्यावाचून रहाणार नाही.
जोन्स यांनी या संबंधात गॉथिक, केल्टिक व इराणी यांचाही उल्लेख केला आहे. या भाषांचा हा ऐतिहासिक खुलासा जोन्स यांना त्यांच्या बाह्यरूपांच्या साम्यावरून, म्हणजे तुलनात्मक निष्कर्षावरून, सुचला ही गोष्ट महत्त्वाची आहे.
तुलनात्मक अभ्यास : या तुलनात्मक पद्धतीवरील आद्य ग्रंथ ⇨ रास्मुस क्रिस्ट्यान रास्क (१७८७-१८३२) या डॅनिश अभ्यासकांचा असून तो स्कँडिनेव्हियन भाषांवर आहे (१८१४). त्याला योग्य प्रसिद्धी न मिळण्याचे कारण त्याची भाषा. शब्दसंग्रहातील साम्याला फार महत्त्व देऊ नये, कारण शब्द आयात केल्यानेही ते येईल. मात्र नियमबद्ध ध्वनिसंगती आणि व्याकरणपद्धतीतील संगती यांच्याबद्दल तसे म्हणता येणार नाही, हा महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांच्यानंतरच पाच वर्षांनी ⇨ याकोप ग्रिम (१७८५-१८६३) यांचे तुलनात्मक जर्मानिक व्याकरण प्रसिद्ध झाले. आपले लेखन आदेशात्मक नसून वर्णाणात्मक आहे, असे ते म्हणतात. त्यांनी ध्वनिनियमांचा सिद्धांत मांडला. एका भाषेतल्या ध्वनीच्या जागी दुसऱ्या भाषेत सतत तोच, तसाच किंवा एखादा वेगळा पण ठराविक ध्वनी येणे हे त्या भाषांचा एकमूलदर्शक संबंध असल्याचे एक लक्षण आहे, हा त्यांचा सिद्धांत म्हणजे ऐतिहासिक पद्धतीतील एक महत्त्वाचे मूलभूत तत्त्व होय.
या सुमाराला संस्कृतचे आकर्षण व अभ्यास बराच वाढला होता. पण तुलनात्मक अभ्यासात मात्र या भाषेचा उपयोग कोणी तोपर्यंत कोणी केला नव्हता. ते श्रेय जर्मन अभ्यासक ⇨ फ्रांट्स बोप (१७९१-१८६७) यांना जाते. १८३३ मध्ये त्यांचे संस्कृत, झेंद, ग्रीक, लॅटिन, लिथुएनियन, गॉथिक व जर्मन यांचे तुलनात्मक व्याकरण प्रसिद्ध होऊ लागले. त्याचा शेवटचा भाग १८५२ मध्ये पूर्ण झाला. नंतरच्या आवृत्तीत (१८५७, १८६८) बोप यांनी प्राचीन स्लाव्हिक, केल्टिक व अल्बेनियन यांची भर घातली.
पण या तुलनात्मक अभ्यासात बोप यांचे काही पूर्वग्रह किंवा मते आलेली आहेत. त्यांनी संस्कृतची उपयुक्तता पटवून दिली, पण तिचा पद्धतशीरपणे व बराचसा निर्दोष उपयोग मात्र ⇨ ऑग्यूस्त श्लाय्खर (१८२१-६४) यांनी केला. ते निसर्गशास्त्रांच्या अभ्यासाने प्रभावित झाले होते. त्यांनी तुलनात्मक परीक्षणातून उपलब्ध झालेले आपले निष्कर्ष पद्धतशीरपणे मांडण्याचा प्रयत्न केला व सर्वसामान्य नियम शोधून काढण्याकडे लक्ष पुरवले. भाषांच्या परस्परसंबंधाचा सिद्धांत, तुलनात्मक पद्धती आणि भाषांचे वर्गीकरण या तीन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी भाषाशास्त्राला दिल्या. पण वास्तव पुराव्याकडे पूर्ण लक्ष न देता एखादा सिद्धांत मांडण्याचा व सिद्ध करण्याचा त्यांचा आग्रह काही काळ तुलनात्मक अभ्यासाची योग्य प्रगती होण्याच्या आड आला.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून भाषाशास्त्रीय संशोधन अतिशय गतिमान झाले. ⇨ कार्ल व्हेर्नर (१८४६-९६) यांनी १८७५ मधील आपल्या एका लेखात ग्रिम यांच्या व्यंजनविकाराच्या सिद्धांताला असलेला अपवाद हा विशिष्ट परिस्थितीमुळे कसा घडून येतो, हे दाखवून ध्वनिपरिवर्तनाच्या नियमांची निरपवादता पटवून देण्यास मदत केली. अशा प्रकारची सूक्ष्म दृष्टी वापरण्यात आल्यामुळे नियम व्यक्त करण्यात काटेकोरपणा आला आणि ‘नवव्याकरणकार’ या नावाने त्या काळी ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञांनी तर ‘ध्वनिनियमांना अपवाद नसतो’, हे आपले मार्गदर्शक सूत्र बनवले (१८७६). याच सुमारास ⇨फेर्दिनां द सोस्यूर (१८५७-१९१३) यांनी आपला इंडो-यूरोपियन स्वरव्यवस्थेवरील प्रबंध प्रसिद्ध करून (१८७८) सिद्धांतनिष्ठ अभ्यासाने भाषेच्या घडणीवर लक्ष ठेवून केलेले संशोधन किती यशस्वी ठरते, याचा आदर्श नमुनाच अभ्यासकांपुढे ठेवला. वस्तुनिष्ठ पुराव्यावरून त्यांनी काढलेले तात्त्विक निष्कर्ष पूर्णपणे ग्राह्य आहेत, हे पोलिश भाषासंशोधक कुरिळोविच यांनी १९२९ मध्ये हिटाइटच्या संदर्भात दाखवून दिले.
शब्दांची रूपे आणि त्यांच्याशी संबंधित असलेले त्यांचे कार्य व अर्थ यांचा परिणाम भाषेचा उपयोग करणाऱ्या व्यक्तींच्या मनावर नकळत होतो आणि जे रूप बाह्यतः स्वतःच्या वर्गातील रूपांपेक्षा जरा वेगळे असते, त्याला बहुसंख्य रूपांच्या पंक्तीत आणून बसवणे हे बोलणाऱ्याच्या तोंडून नकळत होते. भाषेत ढवळाढवळ करणाऱ्या या मनोव्यापाराला ‘अनुकरण’ हे नाव आहे. हे तत्त्व नवव्याकरणकारांनीही ग्राह्य मानले आहे.
ज्या इंडो-यूरोपियनमुळे ऐतिहासिक भाषाशास्त्र आकार घेऊ शकले, त्याच्या दोन जगन्मान्य अभ्यासकांचा आता या ठिकाणी उल्लेख करणे योग्य ठरेल. ते म्हणजे ⇨ कार्ल ब्रुग्मान (१८४९-१९१९) व ⇨ आंत्वान मेये (१८६६-१९३६). त्यांनी लिहिलेले इंडोयूरोपियन तुलनात्मक व्याकरणातील ग्रंथ कालबाह्य होण्याची शक्यता अजून तरी दृष्टिपथात नाही. [⟶ इंडो-यूरोपियन भाषाकुटुंब].
मध्यंतरीच्या काळात ऐतिहासिक अभ्यासाला पोषक असे फार मोठे कार्य घडून आले. ऋग्वेद, अवेस्ता यांची शास्त्रशुद्ध भाषांतरे, हिटाइट, तोखारियन इ. मृत परंतु अभ्यासदृष्ट्या महत्त्वाच्या भाषाकुटुंबांचा शोध द्राविड व भारतीय-आर्य भाषा [⟶ इंडो-आर्यन भाषासमूह] यांचा शास्त्रीय अभ्यास इत्यादी. द्राविडचा अभ्यास सुरू केला बिशप ⇨ रॉबर्ट कॉल्डवेल (१८१४-९१) यांनी तर आर्य भाषांचा ⇨ जॉन बीम्स (१८३७-१९०२) यांनी. या दोन महत्त्वाच्या भाषाकुटुंबावर प्रभुत्व असलेले भाषाशास्त्रज्ञ ⇨ झ्यूल ब्लॉक (१८८०-१९५३) यांचे संशोधन भारतीयांच्या दृष्टीने अतिशय बहुमोल आहे. भारतीय-आर्य भाषांच्या पद्धतशीर अभ्यासाचा तर त्यांनी पायाच घातला.
प्रचलित भाषांचा अभ्यास : ऐतिहासिक अभ्यासाची प्रेरणा प्राचीन भाषांच्या साम्यदर्शनाने मिळाली. त्याबद्दलचा उत्साह एवढा दांडगा होता, की त्या भरात ज्या भाषा प्रत्यक्ष अस्तित्वात आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याची भिती वाटत होती. पण याची जाणीव होऊन जिवंत भाषा कुठून कुठपर्यंत कोणत्या स्वरूपात पसरल्या आहेत, याचे संशोधन करण्याची आवश्यकता भासली. या दिशेने प्रथम जर्मन व फ्रेंच या भाषाशास्त्रज्ञांनी कार्य केले. त्यांपैकी ⇨ झ्यूल झील्येराँ (१८५४-१९२६) यांचे फ्रान्सच्या भाषिक भूगोलविषयीचे कार्य (१९०२-०८) विशेष प्रसिद्ध आहे. अशा प्रकारच्या कामाला ध्वनिविचाराची उत्तम माहिती, ध्वनींतील सूक्ष्म भेदही ओळखण्याची कर्णेंद्रियांची तीव्रता, लोकांत मिसळून त्यांच्या जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची आवड या गोष्टींची जरूर असते. त्यामुळे ध्वनीची नोंद शास्त्रीय पद्धतीने होते. उच्चारभेदाच्या छटा लक्षात येतात. शिवाय कधीकधी हेही लक्षात येते, की आपणाला हव्या असणाऱ्या शब्दाऐवजी इथे वापरला जाणारा शब्द वेगळाच आहे. ‘मुलगा’ याऐवजी इथे ‘अंडोर’, ‘ल्योक’, ‘झील’, ‘पूत’ असे शब्द वापरले जातात. या अभ्यासामुळे पोटभाषांचे स्वरूप म्हणजे काय, ते कसे बनते, हे स्पष्ट होण्याला मदत झाली.
पण जगातील सर्वांत प्रचंड भाषिक पहाणी भारतात झाली. भारताचा सर्व अंगांनी अभ्यास व्हावा म्हणून ब्रिटिशांनी ज्या अनेक गोष्टी केल्या, त्यांपैकी ती एक होय. १८८६ मध्ये व्हिएन्नाला भरलेल्या प्राच्यविद्या परिषदेत सर ⇨ जॉर्ज ग्रीअर्सन (१८५१-१९४१) यांनी त्याचा मसुदा मांडला, परिषदेने त्याची शिफारस हिंदुस्थान सरकारला केली आणि ती संमत झाल्यावर १८९४ मध्ये हे काम सुरू होऊन १९२८ मध्ये ते पूर्ण झाले. त्यामुळे भारताचे भाषिक चित्र पहिल्यांदाच पण सुबोधपणे स्पष्ट झाले. तपशिलाच्या फेरफारांशिवाय फारशी भर नंतरच्या लोकांनी त्यात अजूनही घातलेली नाही, ही गोष्ट विसरून चालणार नाही.
अतिशय पद्धतशीर व शास्त्रीय असा अलीकडच्या काळातला या प्रकारचा अभ्यास म्हणजे न्यू इंग्लंड या भागाची अमेरिकन भाषातज्ञ हान्स कुराथ यांनी केलेली भाषिक पहाणी.
तत्त्वविचार: भाषांचा तुलनात्मक अभ्यास चालू असताना ज्याप्रमाणे प्रचलित भाषांवर विशेष लक्ष नव्हते, त्याप्रमाणेच ध्वनिरूप संकेतांनी बनलेले, सर्व मानव समाजांना अपरिहार्य असलेले, हे जे भाषा नामक विनिमयसाधन ते तत्त्वतः काय आहे, त्याचे घटक कोणते, ते विनिमयकार्य करतात म्हणजे नेमके काय होते, याकडेकोणाचे लक्ष गेले नव्हते. काही बाबतींत तरी भाषेचा अभ्यास चाकोरीतूनच चालला होता. त्यातून बाहेर पडण्याचे काम फेर्दिना द सोस्यूर यांनी केले. मुळात त्यांचे विचार म्हणजे वर्गपाठ होते. त्यांनी स्वतःते लिहून ठेवले नव्हते. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी वर्गात घेतलेल्या नोंदी एकत्र करून त्या संपादित केल्या आणि जो ग्रंथ तयार झाला, तो म्हणजे Cours de linguistique générale हा (१९१६) होय. त्यातले विवेचन हे इतके मूलगामी होते, की आजही ते सर्वमान्य व मार्गदर्शक ठरले आहे. त्यातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे: पहिली गोष्ट बोलताना काय घडते याची. दोन व्यक्ती बोलतात तेव्हा ‘अ’ ही एक व्यक्ती बोलते व ‘ब’ ही दुसरी व्यक्ती ऐकते. अच्या मेंदूत काही मानसिक गोष्टी कल्पनारूपात पण विशिष्ट ध्वनिप्रतिमांशी संलग्न स्वरूपात असतात. अमुक एक कल्पना अमुक एका ध्वनिप्रतिमेचीच आठवण करून देते. अला बोलायचे असते तेव्हा प्रथम एक मानसिक क्रिया व त्यामागून एक शारीरिक क्रिया घडून येते. अपेक्षित ध्वनिप्रतिमेशी संबंधित अशा शरीरातील अवयवांना मेंदूकडून आदेश जातो. ते योग्य ती हालचाल करून ध्वनिनिर्मिती करतात. ध्वनिलहरी अच्या तोंडाकडून बच्या कानापर्यंत पोहचतात. ही पोचण्याची क्रिया पूर्णपणे पदार्थवैज्ञानिक स्वरूपाची असते. बच्या कर्णपटलाला स्पर्श केल्यावर यातील अंतर्गत क्रिया उलट्या क्रमाने घडून येतात. प्रथम ध्वनिप्रतिमा जागृत होते आणि नंतर तिच्याशी संबद्ध कल्पना.
पण कल्पना म्हणजे भाषा नव्हे, ती मूक असते. नुसती ध्वनींची निर्मिती म्हणजे भाषा नव्हे. तो केवळ आवाज म्हणजे एक कर्णेंद्रियग्राह्य घटना झाली. ध्वनिनिर्मिती जेव्हा कल्पनेशी संबंधित म्हणजे अर्थपूर्ण असते, तेव्हाच ती भाषा. विचार व ध्वनी यांच्यातील साधा म्हणजे भाषा. कल्पना (ज्ञापित) व तिची अभिव्यक्ती (ज्ञापक) यांचे बोधचिन्ह म्हणजे भाषिक संज्ञा. तिचा अभ्यास म्हणजे भाषेचा अभ्यास.
भाषिक संज्ञा ही अकारण म्हणजे कार्यकारणभावरहित असते. ती कल्पनासूचक ध्वनींनी बनलेली असली, तरी एखादी कल्पना व ती व्यक्त करणारे ध्वनी यांत कोणताही संबंध नसतो. या संबंधाभावामुळेच हे बोधचिन्ह, संज्ञा किंवा शब्द अपरिवर्तनीय बनतो. त्यामुळेच तो परंपरागत, सामाजिक असतो त्याची मुळे पार मागे इतिहासात असतात. त्याचे (प्रत्येक शब्दाचे) मूल्य हे की, समाजविनिमयात जे असंख्य इतर शब्द असतात, त्यांनी व्यक्त केलेल्या अर्थापेक्षा त्याचा अर्थ वेगळा असतो.
प्रत्येक व्यक्ती बोलते म्हणजे तिच्या मेंदूत जो भाषिक संज्ञांचा साठा असतो, तो ती समाजमान्य पद्धतीने वापरते. हा जो साठा व ही जी पद्धत व्यक्तीजवळ अव्यक्त स्वरूपात असते, ती भाषा (langue). तिचा व्यक्तिमुखातून होणारा इंद्रियग्राह्य विनिमयक्षम आविष्कार म्हणजे भाषिक अभिव्यक्ती किंवा बोलणे (parole). भाषा हे समाजाच्या सर्व व्यक्तींच्या स्वाधीन असलेले अव्यक्त भांडार आहे. ज्या वेळेला ज्याची जरूर असेल त्यावेळी ते या भांडारातून घेऊन व्यक्त करणे म्हणजे बोलणे. भाषा सामाजिक आहे, तर बोलणे वैयक्तिक. मुळात अभ्यास होतो वा होऊ शकतो तो बोलण्याचा.
जर अभ्यास बोलण्याचा होते, तर भाषा ही एक परंपरा का म्हणायची ? – याचे उत्तर हे की भाषा आज जरी व्यक्ती बोलत असली, तरी ती तिच्या आधीच्या पिढीकडून आलेली आहे आणि जवळजवळ त्याच स्वरूपात नंतरच्या पिढीकडे जाणार आहे. हा क्रम चालूच होता, आहे व रहाणार. विशिष्ट कालबिंदूकडून भाषेकडे पाहिले तर ती एकरूप, स्थिर दिसते. पण एका विस्तृत कालखंडातल्या भाषेकडे आधीच्या टोकापासून नंतरच्या टोकापर्यंत पाहिले, तर तो एक प्रवाह आहे, परंपरा आहे, हे लक्षात येते. ती परिवर्तन पावते, हेही दिसते.
म्हणूनच भाषेचे दोन अभ्यास संभवतात. एक प्रवाहस्वरूप परिवर्तनीय, तर दुसरा स्थिर अपरिवर्तनीय. एक ऐतिहासिक, दुसरा वर्णनात्मक. या दोन अभ्यासांच्या पद्धतीही त्यामुळे भिन्न आहेत.
भाषाभ्यासाचे विविध स्तर आहेत. प्रत्येक स्तरात विविध घटक आहेत. हे घटक परस्परभिन्न आणि निश्चित स्वरूपाचे असतात, म्हणून त्यांचे वर्णन आणि व्याख्या करणे शक्य होते. त्यामुळेच त्यांच्या अंगी कार्यशक्ती आहे. क आणि ग हे वेगळे ध्वनी आपण का मानतो ? -तर ते कानाला वेगळे वाटतात, त्यांचे कार्येक्षेत्र निश्चित आहे, म्हणजेच ते एकमेकांवर आक्रमण करू शकत नाहीत, कारण त्यांची उपस्थिती म्हणजे विशिष्ट संदर्भात येण्याची मर्यादा निश्चित आह आणि त्यांचे वेगळेपण कशात आहे, ते त्यांचे वर्णन करून, निर्मिती कशी होते ते सांगून, सिद्ध करता येते.
शब्दसंग्रहातून भाषेची अर्थसंपत्ती व्यक्त होते. माणूस ज्याप्रमाणे आपल्या इंद्रियांद्वारे जगाचे ज्ञान मिळवतो, त्याचप्रमाणे आपल्या भाषेतूनही मिळवतो. भाषा त्याची जगाकडे पहाण्याची दृष्टी तयार करते. जगातली रंगांची वाटणी त्याच्या भाषेने जशी केली आहे तशीच ती आहे, असे तो समजतो. म्हणून भाषेतील अर्थघटकांचा विचार ही एक महत्त्वाची बाब आहे. बेंजामिन ली व्हॉर्फ (१८९७-१९४१) यांच्यासारख्या तत्त्वज्ञांचे लेखन या दृष्टीने मोलाचे आहे.
नवे वळण :भाषेचे बाह्य रूप आणि तिचे अंतर्गत स्वरूप याबद्दल सोस्यूर यांनी विवेचन केले. अर्थ म्हणजे भाषेचे सार आणि ध्वनिबद्ध असे तिचे रूप म्हणजे घडण. यांपैकी घडण ही इंद्रियगोचर असल्यामुळे तिचे वस्तुनिष्ठ परीक्षण करणे हे अभ्यासकाच्या जास्त आवाक्यातले आहे.
भाषेची घडण स्थिर स्वरूपात व्यक्त होते. तिचे प्रवाही स्वरूप भूतकालीन पुराव्यांवर आधारलेले असते. पण खरे तर हा भूतकालीन अभ्यासही एकाच भाषेच्या वेगवेगळ्या कालखंडांतल्या आणि वेगवेगळ्या प्रदेशांतल्या विशिष्टकालीन स्थिर रूपांच्या अभ्यासावर अवलंबून असतो. म्हणजे वर्णनात्मक अभ्यासानुसार वेगवेगळ्या काळातील रूपे निश्चित करूनच तो होऊ शकतो. रूप निश्चित करणे म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने त्याचे कार्य होण्यासाठी ते कसे घडलेले आहे, त्याचे घटक किती व कोणते, त्यांचा क्रम काय, कार्यविषयक वैशिष्ट्य काय, हे जाणून घेण्यासाठी त्याचे पृथक्करण करणे.
भाषेविषयी चर्चा करणारे बरेच शास्त्रज्ञ विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात पुढे आले. पण त्यापूर्वीही १८७४ मध्ये विल्यम ड्वाइट व्हिटनी यांचे पुस्तक प्रकाशित झाले होते. युरोपात मेये, ⇨ येस्पर्सन, व्हांद्रिये इत्यादींनी सामान्य भाषाशास्त्रावर महत्त्वाचे लेखन केले. आबे रूसलो, मॉरीस ग्रामों इत्यादींनी प्राथमिक स्वरूपाच्या यंत्रांच्या साहाय्याने भाषिक ध्वनींच्या सूक्ष्म अभ्यास केला. पण या क्षेत्रातली अतिशय उपयुक्त अशी कामगिरी ‘सेर्क्ल लँग्विस्तिक द प्राग’ या संस्थेची आहे. प्रसिद्ध रशियन भाषाशास्त्रज्ञ ⇨ त्रुब्येत्स्कॉई (१८९०-१९३८) हे तिचे अध्वर्यू. .ध्वनींचा भाषारचनेत उपयोग करताना त्यांचे दिसून येणारे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न हे अभ्यासक करतात. त्यांच्या या अभ्यासाला ‘ध्वनिविद्या’ (फॉनॉलॉजी) हे नाव आहे. भाषेतील ध्वनी स्पष्ट व निश्चित करण्यासाठी त्यांच्यातील भिन्नता किंवा विरोध यांवर भर देणे आवश्यक आहे. जे ध्वनी अर्थावर परिणाम करू शकतात ते महत्त्वाचे. हे भिन्नत्वदर्शनाचे कार्य करणारा भाषेतील ध्वनी म्हणजे ‘वर्ण’. म्हणजे अर्थ डोळ्यासमोर ठेवून, ध्वनींचे कार्य लक्षात घेऊन, ते स्वतंत्रपणे किंवा परिस्थितीच्या दडपणाने कसे वागतात आणि विकारयुक्त होतात, हे नीट पाहून भाषिक ध्वनिसामग्रीचा अभ्यास झाला पाहिजे. अमुक परिस्थितीत पूर्वानुमानसिद्ध ध्वनिरूप हे दुय्यम दर्जाचे ठरवून वर्गीकरणात ते तत्सदृश विशेष रूपाच्या वर्गात घातले जाते.
मुख्य ध्वनी आणि त्याची स्थानपरत्वे होणारी विकारयुक्त रूपे यांचे एकवर्गत्व आज सर्वमान्य आहे. मात्र यासाठी अर्थाचा आधार घेण्याचे कारण नाही, केवळ बाह्यरूपाच्या पद्धतशीर पृथक्करणानेच ते करता येईल, केले पाहिजे, असे अमेरिकन रचनावाद्यांचे म्हणणे.
अलीकडच्या काळात भाषेचे पृथक्करण व वर्णन या दृष्टीने अमेरिकन भाषाशास्त्रज्ञांनी अतिशय भरीव कामगिरी केलेली आहे. ⇨ एडवर्ड सपीर व विशेषत : ⇨ लेनर्ड ब्लूमफील्ड हे या नव्या युगाचे अध्वर्यूच मानले जातात. वर्णनात्मक अभ्यासाला प्रेरणा देण्यापूर्वी ब्लूमफील्ड यांनी ऐतिहासिक अभ्यासावरही प्रशंसनीय प्रभुत्व मिळवले होते. वर्णनात्मक अभ्यासात भाषेचे पृथक्करण करताना व तिचे घटक निश्चित करताना अर्थाचा आधार मुळीच न घेता हा अभ्यास व्हावा, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. नंतरच्या अभ्यासकांनी हे पथ्य पाळण्याकडे लक्ष दिले. या अभ्यासात कडक शिस्त व एकरूपता यायला हा दृष्टिकोण फार उपकारक ठरला.
भाषा ही एक पद्धत असून वर्णनात्मक निष्कर्षांची मांडणी या तत्त्वाला पोषक अशा प्रकारेच झाली पाहिजे, रूपांचा खुलासा या तत्त्वाला बाधक न होता नियमांच्या चौकटीत बसेल असाच झाला पाहिजे, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे हा अभ्यास अतिशय वास्तव, सुटसुटीत व उपयुक्त व्हायला मदत झाली. कोणतेही शास्त्र म्हणजे विशिष्ट विषयाचा पद्दतशीर अभ्यास, केवळ त्याच विषयातील सामग्रीचा आधार घेऊन अलिप्तपणे करण्यात, त्या शास्त्राची स्वायत्तता अबाधित राखायला मदत होते, यावर सर्व कटाक्ष होता. भाषेचा संबंध मानसशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, शिक्षण इ. क्षेत्रांशी येतो. तिच्या भौतिक रूपाचा अनेक यंत्रांशी, मुद्रणाशी संबंध येतो. तिचे विनिमयक्षेत्र व्यापक व प्रभावी करता येते. पण तांत्रिक प्रगतीच्या युगात तिचे शुद्ध भौतिक रूप, तिच्या मागची पद्धत, तिची यांत्रिकता यांना महत्त्व येऊ लागले आहे. यांत्रिक भाषांतर करण्यासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी होण्यासाठी भाषेचे अन्यशास्त्रनिरपेक्ष असे रूपच अधिक उपयोगी पडेल.
म्हणजेच प्रत्येक भाषिक पद्धतीची मांडणी गणिताच्या प्रमेयांप्रमाणे करता आली, दोन भाषिक पद्धतींची समीकरणे मांडता आली, तर माणसाला करावे लागणारे काम यंत्रावर सोपवता येईल. कोणत्याही कामातली सुसूत्रता शोधून काढून त्याचे यांत्रिकीकरण करणे, माणसाचे काम कमी व सोपे करणे, कामाच्या परिणामात एकरूपता आणणे हे यंत्रयुगाचे ध्येय आहे. यंत्राला माणूस व माणसाला यंत्र बनवण्याकडे चाललेली विज्ञानाची वाटचाल इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे भाषेतही चाललेली आहे, मात्र त्यासाठी भाषेची मांडणी यंत्रग्राह्य करण्याचे प्रयत्न हवेत. त्यामुळे यंत्रयुगात अत्यंत प्रगत अशा अमेरिकन समाजाकडून या प्रवृत्तीला चालना मिळावी, यात नवल नाही.
वर्णनात्मक पद्धतीचे संशोधन काटेकोरपणे करणाऱ्या हॅरिस, ब्लॉक, ट्रेगर इ. अभ्यासकांनी ब्लूमफील्ड यांच्या मार्गानेच कार्य केले आहे. या परंपरेतील विशेष प्रसिद्धी पावलेले शास्त्रज्ञ चॉम्स्की हे आहेत. भाषिक वर्णन गणिताच्या प्रमेयाप्रमाणे करताकरता त्यांनी व्याकरणाची मांडणीही या पद्धतीने करून वाक्यरचनेच्या प्रश्नाचा उकल करण्याची एक नवी रीत मांडली. या नव्या व्याकरणाने अनेकांचे कुतूहल जागृत केले. अर्थात भाषा शिकण्याच्या किंवा शिकवण्याच्या कामी ती कितपत उपयोगी पडते आणि भाषिक वर्णनात ती कितपत स्पष्टता व पूर्णता आणते, ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे.
हे सर्व असले तरी भाषा ही एक नैसर्गिक घटना असून, तांत्रिक व यांत्रिक मार्गांनी तिचे स्वरूप पूर्णपणे समजून घेता येईल आणि तिच्यावर नियंत्रण ठेवून तिला राबवून घेता येईल, ही कल्पना स्वीकारता येणार नाही. भाषेच्या अभ्यासात तिचे सामाजिक स्वरूप विसरून चालणार नाही. तिच्या सामाजिक व वैयक्तिक स्वरूपातला भेद सोस्यूर यांनी स्पष्ट केला असला, तरी तिच्या वैयक्तिक आविष्काराचे अधिष्ठान व्यक्तिबाह्य, सामाजिक, अगोचर अशा प्रमाण स्वरूपातच आहे, हे त्यांनीच दाखवून दिले आहे. भाषा ध्वनिमुद्रित होत असली, तरी ती मुळात माणूसच बोलतो आणि माणसाने ती ऐकावी यासाठीच ती ध्वनीमुद्रित होते. यंत्राने कितीही सूक्ष्म भेद टिपले, प्रयोगशाळेने त्यांची दखल घेतली, तरी शेवटी जे कर्णेंद्रियाला जाणवते, उमगते, ग्राह्य किंवा अग्राह्य वाटते, तेच वास्तव रूप. या रूपाच्या अभ्यासातून भाषाशास्त्र जन्माला आले, वाढले. ज्याप्रमाणए लेखनाने किंवा मुद्रणाने भाषेला दृश्य स्वरूपात आणले, त्याप्रमाणे ध्वनिमुद्रण आता तिला तिच्या अधिक वास्तव अशा भौतिक श्रवणगोचर रूपात जतन करून ठेवते आहे, ही गोष्ट अभ्याससामग्रीच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. ठिकठिकाणचे भाषेचे नमुने गोळा करून, ते प्रयोगशाळेत नेऊन त्यांचा स्वस्थपणे एकाग्रतेने अभ्यास करण्याची जी संधी अभ्यासकाला मिळते, तिचे महत्त्व मान्य झालेच पाहिजे.
भाषाशास्त्राचे कार्यक्षेत्र व कार्यपद्धती : जगातील भूतकालीन व वर्तमानकालीन भाषांचा अभ्यास हे भाषेच्या शास्त्रीय अभ्यासाचे क्षेत्र आहे. या अभ्यासातून मिळालेली विशिष्टभाषानिरपेक्ष तत्त्वे आणि नियम भाषेच्या प्रगत व व्यापक अभ्यासाला उपकारक ठरतात. त्यातून भाषेचे स्वरूप अधिक स्पष्ट होत जाते आणि भाषा शिक्षणासारख्या प्रवृत्तींना या शास्त्राने केलेली प्रगती मार्गदर्शक ठरते.
या शास्त्राच्या दोन प्रमुख शाखा ऐतिहासिक-तुलनात्मक आणि वर्णनात्मक ह्या आहेत. यांच्या दरम्यान भाषिक भूगोल ही शाखा असून, ती एकाच भाषेच्या विविध रूपांची भौगोलिक वाटणी व स्थानिक वैशिष्ट्ये, त्याप्रमाणे पोटभाषांचे परस्परसंबंध आणि भूतकालीन भाषेचे नमुने उपलब्ध असल्यास तिच्याशी दिसून येणारे ऐतिहासिक कौटुंबिक संबंध स्पष्ट करायला मदत करते.
(अ) ऐतिहासिक अभ्यास : ऐतिहासिक अभ्यास संबंधित साम्यदर्शक भाषांच्या तुलनेवर आधारलेला असून हे साम्य ज्या मूळ भाषेमुळे आले, तिचे स्वरूप स्पष्ट करणे आणि पुनर्घटित करण्याचा प्रयत्न करणे हा त्याचा हेतू आहे.
दोन भाषांतील काही विशेष प्रकारच्या शब्दांतील साम्य नजरेला आल्यामुळे, त्यांच्यात ते कुठून आले हे कुतूहल जागृत होते. हे शब्द नातेदर्शक, शरीराचे अवयव, पाळीव पशुपक्षी, काही जनावरे व प्राणी, संख्या, वनस्पती, जीवनावश्यक गोष्टी, निसर्गघटना, रंग इ. गोष्टीसंबंधीचे असतात. हे साम्य ध्वनिविषयक असते, म्हणजे दोन भिन्नभाषिक शब्दांतले ध्वनी सारखे तरी असतात (सं. पितर, लॅ. पातेर) किंवा विशिष्ट परिस्थितीत सातत्याने एका भाषेतील ध्वनीच्या जागी दुसऱ्या भाषेत एक ठराविक ध्वनीच आढळतो (सं. पितर-इं.father सं. पद् – इं.foot सं. पञ्च-इं. five सप्त-इ. हफ्त सं. सिन्धु-इ. हिन्दु). असे मिळते ध्वनी असणे, याला ध्वनिसंगती म्हणतात. कित्येकदा या बाबतीत दिसून येणारे अपवाद विशिष्ट परिस्थितीमुळे घडून येतात.
ध्वनीसंगतीप्रमाणे रूपसंगतीदेखील मार्गदर्शक ठरते. नाम व क्रियापद यांना होणारे विकार, इतर शब्दप्रकारांचे वर्तन व कार्य, यांची तुलना करता येते. संस्कृत, इराणी, ग्रीक, लॅटिन या प्राचीन स्वरूपात उपलब्ध होणाऱ्या भाषा प्रत्ययप्रधान आहेत, म्हणजे शब्दाचे वाक्यातील कार्य त्यांना विशिष्ट प्रत्यय लागून होत. नाम हे कर्ता आहे, कर्म आहे की त्याचा वाक्यातील इतर शब्दांशी दुसरा काही संबंध आहे, हे इंडो-यूरोपियन भाषेत प्रत्ययानेच ठरते. क्रियापदाचा काळ किंवा भाव याबद्दल असेच म्हणता येईल.
इंडो-यूरोपियनचा तुलनात्मक अभ्यास करून अभ्यासकांनी त्याचे व्याकरण, ध्वविव्यवस्था व रूपव्यवस्था तर शक्य त्या प्रमाणात पुनर्घटित केली आहेच, पण त्याच्या शब्दसंग्रहावरून मूळ भाषिकांना माहित असलेले प्राणी व वनस्पती, त्यांची कुटुंबव्यवस्था व धार्मिक कल्पना इत्यादींची माहितीही मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
जुना भाषिक पुरावा लिखित स्वरूपात असतो. शिलालेखादी पुरावा जेव्हा जसा लिहिला गेला, तसाच आपल्याला मिळतो. तसे ग्रांथिक पुराव्याचे नसते. जुन्यात जुनी शाकुंतलाची प्रतही कालिदासाच्या हातची नसते. मूळ प्रतीची नक्कल होत होत ती आपल्या हाती बदललेल्या रूपातच येते. नंतरच्या प्रतींची घराणी असतात. कोणती प्रत कोणत्या घराण्याची, तिची वैशिष्ट्ये काय इ. दृष्टींना तिचा अभ्यास होऊ शकतो. याला ⇨ पाठचिकित्सा म्हणतात. या शास्त्राच्या मदतीने ग्रंथाचे जुने रूप शोधण्याचा प्रयत्न करता येतो. भाषा, प्रक्षिप्त मजकूर इ. विषय तपासता येतात.
म्हणजे कोणताही भाषिक पुरावा हाताळताना त्याचा काळ आणि त्यातल्या लेखनाची ध्वनीमूल्ये नक्की करणे इष्ट असते. हस्तलिखिताच्या बाबतीत मूळ ग्रंथ केव्हा व कुठे लिहिला गेला आणि आपल्याला मिळालेली प्रत कोणी, केव्हा, कुठे तयार केली हे लक्षात घेतले, तर अभ्यास निर्दोष होऊ शकेल. कारण प्रत तयार करणाऱ्याच्या हातून नकळत स्वतःच्या काळातली रूपे लिहिली जातात, कित्येकदा वाचन सदोष होते, तर कधी हस्तदोषही होतात.
दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखनात जी दृश्य ध्वनिचिन्हे वापरली असतील त्यांचे उच्चार निश्चित करणे. कारण भाषा बदलली तरी चिन्हे जुनीच असतात. उदा., संस्कृत ज्ञ हा द्न्य असा वाचला जातो, ज्ञानेश्वरी वाचताना त्यातील ऱ्हस्व-दीर्घ, अनुनासिक स्वर, इकडे फारसे लक्ष दिले जात नाही. केवळ च, ज इत्यादी अक्षरे लिपीत होती व हा ग्रंथ मराठीत आहे असे आपण म्हणतो, म्हणून त्याचे वाचन आपल्या सवयीप्रमाणे करायचे का ? हे प्रश्न सामान्य वाचकाला किंवा भाविकाला पडण्याचे कारण नाही. पण भाषेचा इतिहास त्यावाचून अपुरा राहील. एकाच प्रतीत करौनिया, करौनि, करोनि, करूनि इ. रूपे आली, तर ग्रंथनिर्मितीकालात त्यांतले कोणते प्रचलित होते, ते ठरवल्यावाचून तत्कालीन भाषेचे चित्र समाधानकारकपणे देता येणार नाही. मराठीसारख्या भाषेचा पुरावा हस्तलिखित पोथ्यांतून मिळत असल्यामुळे ही काळजी घेणे आवश्यक आहे. ऋ हा स्वर संस्कृत व वेदकालीन भाषेत होता. नंतर त्याचे परिवर्तन झाले. जिथे तो केवळ अनुकरणाच्या सवयीने लिहिला जाई, तिथे त्याचे वाचन रू हे होते, हे समुद्र,नरेंद्रु यांसारखे शब्द समुदृ, नरेंदृ असेही लिहिले जात, यावरून दिसते.
म्हणून भाषिक अभ्यास सुरू करण्यापूर्वी पुराव्याचा काळ, त्यातली ध्वनीव्यवस्था, रूपव्यवस्था व व्याकरण यांची काटेकोर माहिती करून नंतर तो वापरली जाणेच इष्ट असते.
(आ) अंतर्गत पुनर्घटना पद्धती : संबंधित भाषांचे अस्तित्व व भूतकालीन पुरावा यांच्यामुळे तुलनात्मक व ऐतिहासिक अभ्यास शक्य होतो. पण जिच्याबाबतीत ही साधने उपलब्ध नाहीत अशा भाषेचे काय ? तिचे भूतकावलीन रूप ठरवताच येणार नाही का ?
केवळ बोलण्यात असलेल्या भाषेचा इतिहास लिहिणे जवळजवळ अशक्य असले, तरी या गोष्टींकडे भाषाशास्त्रज्ञांनी दुर्लक्ष केलेले नाही.
कोणतीही भाषा पूर्ण नियमानुसारी व प्रमाणबद्ध नसते. त्यामुळे कित्येक वेळा अपेक्षित, म्हणजे सामान्य नियमानुसार बनलेल्या, रूपाऐवजी अगदी वेगळ्या प्रकारचे रूप आपल्याला आढळते. या अनियमितपणाचा उगम भाषेच्या भूतपूर्व घटनांत असावा, असे अनुमान इतर भाषांच्या ऐतिहासिक अभ्यासावरून करता येते.
भाषा ही प्रवाहात्मक आहे. तिच्या प्रवाहात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली जीर्ण रूपे, स्थिरप्राय रूपे व भाषेत नव्याने येऊ घातलेली रूपे नेहमीच असतात. नष्टप्राय रूपे व नवे प्रयोग यांना अपवादात्मक मानण्यात येत असते. एकाच वेळी अस्तित्त्वात असलेला समाज लक्षात घेतला, तर त्यातले सर्वांत वृद्ध स्त्री-पुरूष आणि भाषा नव्याने आत्मसात केलेली मुले यांच्यात जवळजवळ पाउणशे वर्षांचे अंतर असते. त्यांच्या बोलण्यातही फरक असतो. ध्वनीविषयक फरक पटकन जाणवणार नाहीत, पण व्याकरण व शब्दविषयक फरक मात्र लक्षात येतील.
जीर्ण व नष्टप्राय रूपे भूतकालीन स्वरूपाची जाणीव देतील, तर नव्या प्रवृत्ती पुढील परिवर्तनाची दिशा दाखवतील. अपवादही पूर्णपणे नष्ट झालेल्या प्राचीन उगमस्थानाची आठवण करून देतील.
पण या अभ्यासाचे निष्कर्ष मात्र अत्यंत मर्यादित व पूर्णपणे अनुमाननिष्ठ असतात, हे लक्षात ठेवले पाहिजे.
(इ) भाषिक कालनिर्णय : संबंधित भाषा एकमेकींपासून वेगळ्या केव्हा झाल्या, हे निश्चित करण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केला आहे.
भाषेत सतत परिवर्तन होत असते. ते केवळ ध्वनींतच होत नाही. ध्वनी बदलल्यामुळे ध्वनिव्यवस्थेत तर होतेच, पण व्याकरणातही होते. दुसरे एक परिवर्तन अर्थघटकांत होते. संस्कृतमधील शंभर मूलभूत जीवनावश्यक शब्द घेतले आणि आज मराठीत त्या जागी मूळचे किती शब्द शिल्लक आहेत हे पाहिले, तर संस्कृत ते आधुनिक मराठी या कालखंडातील ऱ्हास दिसून येईल. हेच प्रमाण ज्ञानेश्वरीकालीन मराठीत वेगळे असेल. या काळात ऱ्हास अर्थातच कमी असेल. अशा गणिती पद्धतीने मिळणारे ऱ्हासाच्या गतीचे प्रमाण कालपट्टीवर बसवता येईल. ज्या कालबिंदूवर हे प्रमाण शून्य असेल, तो कालबिंदू या भाषांचे तेव्हा अभिन्नत्व होते, हे दाखवून देईल.
या पद्धतीत काही गोष्टी स्पष्ट नाहीत. उदा., कोणता व किती पुरावा घ्यायचा, ऱ्हास कसा ओळखायचा व ठरवायचा इत्यादी. ज्यांचा निश्चित पुरावा उपलब्ध आहे अशा भाषांवर हा प्रयोग करून, प्रयोगाचे निष्कर्ष आणि प्रत्यक्ष पुरावा ताडून पाहून या पद्धतीची ग्राह्यग्राह्यता ठरवता येईल.
(ई) भाषिक भूगोल: जिला आपण एका विस्तीर्ण क्षेत्राची भाषा समजतो, तिची त्या क्षेत्रातली रूपे किती आहेत आणि ती कसकशी पसरली आहेत या कुतूहलाने जो अभ्यास सुरू झाला, त्यापासून भाषेच्या अभ्यासकांना काही नवी माहीती व नवी तत्त्वे उपलब्ध झाली. या अभ्यासाला भाषिक भूगोल, पोटभाषांचा भूगोल किंवा पोटभाषाभ्यास अशी नावे आहेत. एखाद्या ध्वनीची, शब्दाची, रूपाची किंवा व्याकरणप्रकाराची व्याप्ती किंवा स्थानावर वाटणी कशी आहे, म्हणजेच त्याची भौगोलिक वाटणी कशी आहे, त्याची प्रत्यक्ष जागेवर पहाणी करून मिळालेली माहिती नकाशात दाखवणे, असे संबंधित नकाशे एकत्र करून त्यांची भाषेच्या परिवर्तनाच्या दृष्टीने परीक्षा करणे, हे या अभ्यासाचे स्वरूप आहे.
परिवर्तन सर्वत्र सारखे होत नाही हे खरे, पण ते दोन भागांत होत असल्यास या भागांना विभागणारी रषा नेमकी कशी जाते, या भागांच्या नक्की भौगोलिक मर्यादा काय, हे जागोजागी जाऊन, माहिती गोळा करूनच ठरवता येते. मराठी ळ च्या जागी अहिरणीत य सापडतो, हे विधान फार मोघम झाले. क्षेत्राभ्यास करून अशी भौगोलिक रेषा शोधून काढली पाहिजे, की जिच्या एका बाजूला ळ तर दुसऱ्या बाजूला त्या स्थानी य हा ध्वनी आहे.
हीच तपासणी शब्द, प्रत्यय, सामान्य रूपे इत्यादींच्या बाबतीत होऊ शकते. -ला/-ले या प्रत्ययांच्या भौगोलिक मर्यादा काय ? मुलगा-गी/झील, चेंडू यांचे प्रदेश दाखवणारी रेषा कोणती ? इत्यादी. जुन्या भाषांच्या बाबतीतही अशी तपासणी होऊ शकते. उदा., ‘पाणी’ या अर्थी पाणी-नी/जॉल/उदाक/नीरू असे ढोबळ क्षेत्रविभाजन होऊ शकते. अशी विभागणी दर्शवणारा, प्रत्येक भाषिक महत्त्वाच्या शब्दाचा किंवा प्रत्ययाचा किंवा ध्वनीचा भौगोलिक आलेख डोळ्यासमोर ठेवला, तर त्यांचा प्रवास स्पष्ट होईल.
भारतीय-आर्य भाषांच्या बाबतीत असा एक प्रयत्न झ्यूल ब्लॉक यांनी त्यांच्या Application de la Cartographie a l’ histoire de l’ indo-aryen (१९६३) या ग्रंथात केला आहे. [⟶ बोलि-भाषाविज्ञान].
(उ) वर्णनात्मक अभ्यास : ज्याला वर्णनात्मक आभ्यास हे नाव आहे, त्याचे तंत्र भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासातही लागू पडते. पण वर्णनात्मक पुरावा समकालीन, जिवंत आणि म्हणून विश्वासनीय असतो. ऐतिहासिक पुराव्याची छाननी करून तो शक्य त्या प्रमाणात ग्राह्य बनवावा लागतो. ही गोष्ट लक्षात ठेवणे इष्ट आहे.
वर्णनात्मक अभ्यासाच्या शाखा व त्यांचे तंत्र पुढीलप्रमाणे :
(१) ध्वनिविचार : ध्वनिविचार म्हणजे श्वसनक्रियेचा आधार घेऊन कंठपोकळीतून बाहेर जाणाऱ्या हवेत ध्वनीशक्ती उत्पन्न करणे आणि मग ती तोंडातून बाहेर पडेपर्यंत वाटेतील मुखावयवांचा उपयोग करून त्यांना विशिष्ट ध्वनिरूप देणे. अशा प्रकारे उत्पन्न होणारे वैशिष्ट्यपूर्ण, परस्परभिन्न ध्वनी असंख्य आहेत. दोन उच्चारांतील भेद कितीही सूक्ष्म असला, तरी तो श्रवणगोचर असल्यास ती दोन उच्चारणे म्हणजे दोन भिन्न ध्वनीच होत.
मानवाच्या मुखयंत्रातून निर्माण होणाऱ्या सर्व श्रवणगोचर ध्वनींचा भाषानिरपेक्ष अभ्यास करून त्यांचे वर्गीकरण करतो तो सामान्य ध्वनीविचार. एखाद्या विशिष्ट भाषेतील सर्व ध्वनींचाही अभ्यास अशा प्रकारे होऊ शकेल. अर्थात सामान्य ध्वनीविचारातील ध्वनींच्या तुलनेने ही संख्या बरीच मर्यादित असेल. अशा अभ्यासाला त्या भाषेचा ⇨ ध्वनिविचार असे नाव आहे.
ध्वनींचा अभ्यास यंत्रांच्या मदतीनेही करता येतो. यात ध्वनिरेखाटन, ध्वनिमुद्रण, ध्वनिचित्रण इ. गोष्टी येतात. यांत्रिक ध्वनिविचारामुळे ध्वनीचे स्वरूप अधिक स्पष्टपणे कळायला मदत होते आणि ध्वनिमुद्रक व ध्वनिप्रसारक यंत्रे अधिक कार्यक्षम बनवता येतात, हे खरे असले तरी भाषाशास्त्रज्ञाच्या दृष्टीने ध्वनिनिर्मितीत शरीरव्यापारालाच सर्वात अधिक महत्त्व द्यावे लागेल.
भाषाभ्यास करताना येणाऱ्या अडचणींपैकी एक महत्त्वाची अडचण सर्वमान्य लिपीची आहे. ती लक्षात घेऊन १८८६ मध्ये लंडन येथे ‘ इंटरनॅशनल फोनेटिक असोसिएशन ‘ ही संस्था स्थापन झाली. या संस्थेने मान्य केलेली ध्वनीलिपी फार मोलाची ठरली. तिचा वापर सर्व अभ्यासक-विशेषतः अमेरिकन-करत नसले, तरी तिने केलेले मार्गदर्शन ध्वनिलेखनाला उपयुक्त ठरले आहे.
(२) वर्णविचार : प्रत्येक भाषा काही ध्वनींचाच वापर करते. तिची ध्वनिसंख्या निश्चित असते आणि तिची स्वतःची अशी एक ध्वनिव्यवस्था असते. काही ध्वनी भिन्न असतात ( मराठी क्, ग्), तर काही पूरक व अनुमानगम्य असतात (मराठी कान, कीस, कूट यांतील पुढे, मध्यभागी व मागे जिभेचा स्पर्श होऊन होणारे तीन मृदुतालव्य क्). कोणत्याही कारणाने अनुमानगम्य असणाऱ्या साम्यदर्शक ध्वनींचा कार्यदृष्ट्या एक वर्ग करून त्यांना ‘ वर्ण ‘ ही संज्ञा देण्यात येते, अशा प्रकारे कोणत्याही भाषेचा ध्वनीचा अभ्यास करून त्यांचे वर्गीकरण करणे, याला ⇨ वर्णविचार हे नाव आहे. अनेक भाषांच्या अभ्यास करून वर्णविचारातील घटनांचे सर्वसामान्य स्वरूप समजून घेता येते.
(३) रूपविचार : कोणत्याही शब्दाचे पृथक्करण केले असता (बहुतेक भाषांत) तो एकाहून आधिक घटकांचा बनलेला आहे, असे दिसून येते. यातले काही घटक अर्थसूचक तर काही कार्यसूचक असतात. या घटकांना ‘ रूप ‘ ही संज्ञा आहे. एकाच रूपापासून झालेले अनेक शब्द व अनेक शब्दांत आढळणारे एकच रूप लक्षात घेऊन हा अभ्यास होते. रूप म्हणजे अर्थसूचक लहानात लहान घटक. उदा., घर (घ्+अ+र्) व घरं (घ्+अ+र्+अं) या दोन शब्दांतला फरक वचनाचा आहे. एकवचनानंतर अं हा प्रत्यय लागून अनेकवचन सिद्ध झाले आहे, तेव्हा या ठिकाणी तो विशिष्ट कार्यसूचक घटक झाला. घराचा व घरांचा यात दुसऱ्या शब्दांत न् या घटकाने अनेकवचन सूचित होते. घराचा दरवाजा यात आचा हा प्रत्यय दिसतो. अधिक अभ्यासानंतर असे दिसेल की, तो आ (सामान्यरूप), च् (स्वामित्व, संबंध) व आ (पुल्लिंग, एकवचन) असा बनलेला आहे.
हे रूप कधीही शून्य असू शकेल. आज्ञार्थी कर या शब्दात धातूला, तर अनेकवचनी हात या शब्दात नामाला तो लागला आहे. अर्थात् जरी दोन्ही ठिकाणी शून्य हे कार्यसूचक रूप आहे, तरी कार्यभिन्नत्वामुळे दोन शून्य रूपे मानावी लागतात.
(४) रूपवर्णविचार : रूपध्वनिदृष्ट्या निश्चित केलेल्या काही रूपांचा संयोग होतो, तेव्हा त्यांच्यातील ध्वनींना कित्येकदा नियमित विकार होतात. या विकारांचा अभ्यास रूपवर्णविचारात करण्यात येतो. मराठीत भूतकाळाचा रूपघटक ल् हा आहे. पण धातुच्या शेवटी ळ् असल्यास ल् च्या जागी ळ् येतो. कळ्-कळ्ळं, पीळ्-पीळ्ळं. संस्कृतसारख्या भाषांचा संधिविचार हे त्याचे एक उदाहरण आहे.
(५) वाक्यविचार : अर्थघटकांची व्यवस्थात मांडणी करून शब्द सिद्ध होतात. पण वाक्यातील शब्दांचा क्रम माहीत असल्यावाचून ते वापरणे शक्य नसते. सामान्यतः हा क्रम निश्चित असतो. ही भाषेची सामान्य शैली. पण प्रसंगानुरूप परिणाम साधण्यासाठी, भाव किंवा हेतू व्यक्त करण्यासाठी जे स्वातंत्र्य असते, तेही लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करणे इष्ट ठरते. विकारक्षम भाषांत शब्द कुठेही ठेवले तरी चालतात, ही समजूत चुकीची आहे. संस्कृत, लॅटिन इ. भाषांतही ती पूर्णांशाने खरी नाही. काव्य व साहित्य यात लेखकला स्वातंत्र्य मिळते, किंवा तडजोड करावी लागते. पण अशा पुराव्याचा भाषा वर्णनासाठी जो अभ्यास होतो, तो इतर पुराव्याअभावी. बोलभाषेत जो शब्दक्रम सामान्यपणे असतो, तो पाहूनच वाक्यरचनेचा विचार करावा लागतो.
(६) शब्दसंग्रह : कोणत्याही भाषेचा अभ्यास तिच्यातील सर्व अर्थपूर्ण घटकंचा संग्रह उपलब्ध नसल्यास व्यावहारिक दृष्टीने निरूपयोगाने म्हटला पाहिजे. या अर्थपूर्ण घटकात रूपविचारातील सर्व प्रत्यय, उपसर्ग, साधनभूत रूपे तर येतीलच पण अर्थवाहक सूर, आघात इ. गोष्टीही येतील. केवळ शब्द म्हणजे भाषा नव्हे. त्यांचा संदर्भनिष्ठ विकारयुक्त उपयोग माहीत नसेल, तर भाषेचा अभ्यास फार वरवरचा ठरेल.
वर्णनात्मक अभ्यासाचे ध्येय पुराव्याशी प्रामाणिकपणा (आहे ते दूर सारणे, नाही ते सोयीसाठी स्वीकारणे याला विरोध), सूत्रबद्धता (वर्णनविषयाची काटकसरीने मांडणी) व स्पष्टपणा हे आहे. संशोधनाने ज्ञान जितके निश्चित होते, त्या प्रमाणात वरील गुण कोणत्याही शास्त्रीय अभ्यासात स्वाभाविकपणे येतात. शास्त्राविषयाच्या अधिकाधिक पुराव्याने व त्या पुराव्याच्या सूक्ष्म अभ्यासाने संशोधनपद्धत काटेकोर बनते.
भाषा हे एक विनिमयसाधन आहे, तिला एक निश्चित पद्धत आहे, तिच्यात वेगेवेगळे स्तर आहेत, त्यांचे ठराविक घटक आहेत, घटकांचे स्वरूप व वागणे विशिष्ट प्रकारचे आहे, ही ठाम भूमिका घेऊन झालेला तिचा गेल्या अर्धशतकातील अभ्यास अतिशय फलदायी ठरला आहे. त्याची प्रेरणा सोस्यूर यांच्याकडून मिळाली, पण पुढील बरेचसे काम अमेरिकन अभ्यासकांनी केले.
भाषाशास्त्र व इतर शास्त्रे : शास्त्रांची विभागणी निसर्गशास्त्रे व सामाजिक शास्त्रे अशी दोन वर्गात करण्यात येते. त्यातली निसर्गशास्त्रे ही मानवनिरपेक्ष असून ज्या निरपवाद नियमांनी निसर्गव्यवहार होतो त्यांचा अभ्याल करणारी असतात, तर सामाजिक शास्त्रे मानवाच्या विकासाचा व प्रवृत्तींचा मागोवा घेत जाणारी. ऐतिहासिक-वर्णनात्मक अभ्यास करणारी असतात. हे लक्षात घेतले तर भाषेचा निसर्गशास्त्रांनी प्रत्यक्ष संबंध नसावा, हे उघड आहे.
भाषा आणि विज्ञान : परंतु भाषेचा सामग्री जो ध्वनी पार्थिव स्वरूपाचा असल्यामुळे त्याचा पदार्थवैज्ञानिक अभ्यास हा शास्त्रज्ञांच्या कुतूहलाचा विषय आहे. ध्वनींचा ठसा घेऊन त्याची पुन्हा निर्मिती करणे, त्यांच्या लहरींची गती वैज्ञानिक साधनाने असंख्य पटींनी वाढवून तो दूरपर्यंत पोचवणे इ. शोधांमुळे दूरध्वनी, नभोवाणी, दूरदर्शन इ. गोष्टी शक्य झाल्या आहेत. ध्वनींचे पृथक्करण करणे, त्याचे प्रामाणिक मुद्रण करणे यामुळे त्याचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. विनिमयाचे क्षेत्र वाढले आहे. म्हणजे पदार्थविज्ञानामुळे ध्वनिसामग्रीचे ज्ञान स्पष्ट झाले आहे. ध्वनीलहरींच्या चित्रणामुळे केवळ ऐकण्यामुळे होणारी संदिग्धता नष्ट झाली आहे. कारण श्रवण हे व्यक्तिनिष्ठ आहे, तर चित्रण हे वस्तुनिष्ठ. कानाला जे वेगळे वाटत नाही ते चित्रात वेगळे दिसत असले, तर वादाला जागा उरत नाही.
या मानाने इतर काही शास्त्रे भाषेला अधिक जवळची आहेत :
भाषा आणि मानसशास्त्र : भाषिक निर्मिती ही जरी शारीरिक क्रिया असली, तरी तिच्यामागे व्यक्तीचा मनोव्यापार असतो. व्यक्तीचा हेतू किंवा तिची इच्छा, गरज इत्यादींनुसार हा व्यापार संकेतबद्ध केला जातो. हे संकेतबद्ध रूप जेव्हा ध्वनीलहरींच्या स्वरूपात प्रकट होते, अपेक्षित श्रोत्याच्या कर्णेद्रियावर इष्ट तो परिणाम घडवते, त्याच्या मनात ध्वनीसंकेताशी निगडीत असणारा आशय जागृत करते, तेव्हा श्रोत्याच्या मनोव्यापाराच्या क्षेत्राला स्पर्श करते.
मनुष्याच्या मनाचा अभ्यास त्याच्या बाह्य वर्तनावरून, भिन्नभिन्न परिस्थातींत होणाऱ्या त्याच्या प्रतिक्रियांवरून करता येतो. भाषा हेही मानवी स्वभावाचे एक अतिशय महत्त्वाचे बाह्य लक्षण आहे. मनोरूग्णांच्या बोलण्यावरून, प्रश्नोत्तरांवरून, बडबडीवरून किंवा मौनावरून मनोविकारतज्ञ महत्त्वाचे निष्कर्ष काढू शकतात. अर्थात मानसशास्त्रातील काही रहस्यांवर भाषिक पुरावा महत्त्वाचा प्रकाश टाकू शकतो आणि भाषा मानसशास्त्राला उपकारक ठरू शकते.
भाषा आणि मानवशास्त्रे : भाषा ही एक सामाजिक संस्था असल्यामुळे इतर सामाजिक संस्थांशी तिचा संबंध असणे अपरिहार्य आहे. अशा संस्थांचा अभ्यास करणारी महत्त्वाची शास्त्रे म्हणजे समाजशास्त्र, मानवशास्त्र आणि विनिमयशास्त्र ही होत.
मानवाचा अभ्यास दोन प्रकारे होतो. एकात त्याची शरीरवैशिष्ट्ये, नैसर्गिक उत्क्रांती इ. सर्व मानवांना सामान्य अशा लक्षणांचा विचार होतो, तर दुसऱ्या मानवांचे विशिष्ट समूह व त्यांच्या जीवनपद्धती यांचा. मानवाचे इतर प्राण्यांहून वेगळेपण दर्शवते ती त्याची संस्कृती आणि या संस्कृतीचे स्पष्ट आणि सूक्ष्म दर्शन घडवते ती त्याची भाषा. त्याचप्रमाणे समाजाला संघटित ठेवणारी आणि त्याचा सर्व क्षेत्रांतील विनिमय शक्य करून प्रगतीचा मार्ग मोकळा ठेवणारीही भाषाच. भाषेचा नीट अभ्यास झाला, तर समाजजीवनाचे स्पष्ट आकलन होते.
म्हणजे भाषा हे मानव व समाज यांच्या अभ्यासाचे एक अपरिहार्य, अविभाज्य अंग आहे हे स्पष्ट होते. अशा प्रकारे भाषेतून समाजदर्शन घडते आणि समाजाच्या अभ्यासातून भाषेचा, विशेषतः तिच्या अर्थवाही सामग्रीचा व तिच्या द्वारे होणाऱ्या जीवनदर्शनाचा प्रत्यय येतो.
भाषा आणि तत्त्वज्ञान : तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिले, तर ज्ञान व्यक्त करणारे किंवा त्याचे वाहन मानले जाणारे साधन जी भाषा, तिचाच अभ्यास होणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी ज्या संकेतांचा आणि चिन्हांचा उपयोग केला जातो, त्यामागील तत्त्व समजून घेण्यासाठी भाषिक संशोधनपद्धतीच्या पलीकडे जावे लागले. जेव्हा सांगण्यासारखे जवळ असते, तेव्हा ते प्रकट करण्याचा मार्ग शोधावा लागतो. खरे अस्तित्वात असते ते हे ज्ञान. ते कसे जमते, त्याचे पृथक्करण कसे होते, ते सर्वच्या सर्व, जसेच्या तसे सामान्य भाषेतून सांगणे कठीणच. मग त्यासाठी गणित, तर्कशास्त्र यांच्या जातीची भाषेसारखीच पण वेगळी रचना असलेली प्रकटीकरणाची संकेतपद्धती स्वीकारावी लागते. भाषेचे स्वरूप ज्ञानाच्या स्वरूपाला पूर्णपणे समीकरणात्मक असणे आवश्यक होईल. ते तसे आहे का, कितपत आहे इ. प्रश्नांना तत्त्वज्ञानाला तोंड द्यावे लागेल. प्रत्येक भाषेला तिच्या अभिव्यक्तिक्षमतेच्या मर्यादा असतात. ज्ञानदृष्ट्या प्रगत भाषांचा आशय अप्रगत भाषांत आणतानाही हे जाणवते. तर मग वैचारिक दृष्ट्या प्रगत अशा मनाला जाणवणारे सर्व काही कोणत्याही अत्यंत प्रगत अशा भाषेत आणता येईलच, असे ठामपणे सांगता येणे कठीणच. ज्ञानाची ही अनिर्वचनीयता भाषेची मर्यादा स्पष्ट करते, ज्ञानाची नव्हे.
भाषा आणि शिक्षण : सामाजिक प्रवृत्तींपैकी जिच्याशी भाषेचा अत्यंत निकटचा संबंध येतो, ती म्हणजे शिक्षण होय. सर्व ज्ञानशाखांचे माध्यम तर भाषा हे आहेच पण भाषाशिक्षणाचे, अगदी मातृभाषाशिक्षणाचेही माध्यम भाषा हेच आहे. सर्वांना एकाच प्रकारे वेगवेगळ्या शास्त्रांतले ज्ञान देणे ही शिक्षणाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते देणारी भाषा निश्चित, एकरूप, समान अर्थासाठी समान संज्ञांचा वापर करणारी असावी लागते. प्रमाणभाषा, ⇨ परिभाषा, आदेशात्मक व्याकरण इत्यादींचा उगम इथेच आहे.
पण शिक्षणखात्याने, भाषाविभागाने आणि भाषाशिक्षकांनी भाषेबाबत झालेल्या शास्त्रीय प्रगतीकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले दिसते. सर्व विद्यार्थांची मातृभाषा एकरूप नसते आणि याचे परिणाम, विशेषतः प्राथमिक शिक्षणात, गंभीर स्वरूपाचे होऊ शकतात, ही मूलभूत महत्त्वाची गोष्ट शिक्षणशास्त्रज्ञांनी कधीच लक्षात घेतलेली नाही. लिपी व ध्वनी, लेखन व बोलणे, या अगदी भिन्न गोष्टी आहेत ही गोष्टही माहीत नसल्यामुळे भाषाशिक्षण हे मृतभाषा किंवा परभाषाशिक्षणासारखे झाले आहे. भाषेचे वास्तव रूप स्पष्ट करणाऱ्या वर्णनात्मक पद्धतीचे अस्तित्वच माहीत नसल्यामुळे जुने कालबाह्य व्याकरणच पाठ्यपुस्तकातून शिकवले जाते.
कोणत्याही विषयातले ज्ञान निर्दोष स्वरूपात विद्यार्थ्याला देणे, हे काम भाषेला करावे लागते. त्यासाठी योग्य वाक्यरचना व योग्य म्हणजे निश्चित अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दांचा उपयोग करणे आवश्यक आहे. हे झाले तरच पाठ्यपुस्तकांची आणि शास्त्रविषयक पुस्तकांची गुणवत्ता वाढू शकेल. यासाठी भाषेचा शब्दसंग्रह व अभिव्यक्तिक्षमता सुधारण्याचे योजनाबद्ध कार्यक्रम हाती घ्यावे लागतील. हे शिक्षणशास्त्राचे काम आहे. एखाद्या विधानाचा अर्थ न समजणे किंवा संदिग्ध असणे, एखाद्या विधानाचे दोन भिन्न अर्थ होणे, त्यात अतिव्याप्ती किंवा अव्याप्ती असणे, विवेचनात ते योग्य जागी नसणे इ, दोष टाळण्यासाठी भाषेची एक निश्चित अर्थ व्यक्त करणारी तर्कशुद्ध शैली असावी लागते. अध्यापनासाठी व पाठ्यपुस्तके, अभ्यासग्रंथ इ. लिहिण्यासाठी ती अपरिहार्य आहे. थोडक्यात म्हणजे, निश्चित अर्थ व्यक्त करणारे शब्द, पारिभाषिक संज्ञा आणि ज्ञानविषय निःसंदिग्धपणे विद्यार्थ्यांपर्यंत नेऊन पोहचवणारी शैली यांच्याविषयी शिक्षणशास्त्रज्ञच संशोधन व योग्य मार्गदर्शन करू शकतील.
भाषाशिक्षण : अशा प्रकारची शैली निर्माण करण्याचा भाषा शिक्षण हा पाया आहे. विशेषतः मातृभाषाशिक्षण.
पण जागतिक विनिमयाच्या संदर्भात आता भाषाशिक्षणाचे महत्त्व फार वाढले आहे. परदेशांशी राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्या त्या देशाची भाषा उत्तम प्रकारे येणे आवश्यक आहे. कारण जागतिक विनिमयाची भाषा एकच असणे हे तत्त्वतः कितीही हितावह असले, तरी सद्यस्थितीत ते शक्य नाही. पण राष्ट्रसंघाने मान्यता दिलेल्या जागतिक प्रतिष्ठेच्या भाषांच्या शिक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
परभाषाशिक्षणाची परंपरा फार प्राचीन आहे आणि या शिक्षणाच्या पद्धतीचे स्वरूप सतत बदलत आलेले आहे. अगदी प्रारंभी नाम व क्रियापदांच्या रूपावल्या पाठ करून, व्याकरणाचे नियम घोकून, ग्रंथ मुखोद्गत करून, पुढे भाषांतर करून व नियम स्पष्ट करणारी उदाहरणे सोडवून एखादी परभाषा आत्मसात केली जात असे. अनेक शतके ही पद्धत चालू होती. भाषाशिक्षणाच्या पद्धतीवर खरा परिणाम घडला तो भाषाशास्त्राचा. वर्णनात्मक व्याकरणाने या बाबतीत योग्य मार्गदर्शन केले. भाषेत ध्वनींचे आणि ठराविक साच्याच्या शब्दयोजनेचे, वाक्यरचनेचे महत्त्व स्पष्ट झाले. नवी भाषा शिकणे म्हणजे नवी सवय लावून घेणे, ऐकून ध्वनी ओळखणे व अर्थ समजणे आणि तो मातृभाषिकाप्रमाणे आत्मसात करणे तसेच सतत तालीम करून त्याच्यावर प्रभुत्व मिळवणे होय. एखादी भाषा शिकणे म्हणजे आपणच तद्भाषिक होणे, हे वर्णनात्मक भाषाभ्यासाचे सूत्रवाक्य आहे. म्हणूनच शिक्षणशास्त्र व भाषाशास्त्र ही इतकी जवळ आली आहेत.
विनिमयाच्या क्षेत्रात जी तांत्रिक प्रगती झाली आहे, तिचा फायदा शिक्षणक्षेत्रालाही मिळाला आहे. प्रामाणिक ध्वनिमुद्रणाचा प्रसार इतका झाला आहे, की पुस्तकातील निर्जीव अक्षरांची जागा आता चैतन्यपूर्ण ध्वनिलहरींनी घेतली आहे. निर्जीव यंत्रांनी भाषाशिक्षणात जीव ओतला आहे. यांत्रिक प्रगतीचे भाषेशी, भाषाशिक्षणाशी, विनिमयविकासाशी जे नाते जुळले आहे, त्यामुळे अतंर व काळ यांचा अडथळा जवळजवळ नष्ट झाला आहे.
पहा : भाषा भाषांचे वर्गीकरण भाषांतर भाषाकुटुंब भाषाशिक्षण व्याकरण.
संदर्भ :
1. Bloomfield, Leonard, Language, New York, 1933.
2. Carroll, John B. The Study of Language, Cambridge, 1961.
3. Hockett, Charles F. A Course in Modern Linguistics, New York, 1958.
4. Meillet, Antoine. Introduction a’ l’ e’ tude comparative des langues indo-e’uropeennes, Paris, 1937.
5. Meillet, Antoine, Linguistique historique et linguistique ge’ ne’ rate, Paris, 1936.
6. Pedersen, Holger, Discovery of Language, Bloomington. 1962.
7. Sapir, Edward, Language, New York, 1921.
8. Saussure, Ferdinand de, Cours delinguistique ge’ ne’ rale, Paris, 1916.
9. Waterman, John T. Perspectives in Linguistics, Chicago, 1963.
कालेलकर, ना. गो.
“