भारूड : आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक नाट्यगीत. ही रूपके महालक्ष्मी, भवानी, खंडोबा, बहिरोबा इ. देवतांचे उपासक महानुभाव, लिंगायत, नाथ इ. पंथाचे अनुयायी आधंळा, बहिरा, पांगळा इ. भिक्षेकरी ज्योतिषी, भटजी, जागत्या इ. व्यावसायिक डोंबारी, कोल्हाटी जादुगार, भांड इ. लोककलावंत दळण, कांडण, बाजार, वृश्चिकदंश इ. प्रसंग फुलवरा बांधणे, नवस करणे, हळद लावणे इ. नैमित्तिक विधी हुतुतू, टिपरी, भोवरा, पिंगा इ. खेळ एडका, कुत्रा, बैल, टिटवी इ. पशुपक्षी यांच्या वर रचलेली आहेत. अशा प्रकारची रचना ज्ञानदेव व नामदेव या एकनाथपूर्व, तशीच तुकाराम, रामदास इ. एकनाथोत्तर संतांनी केलेली असली, तरी एकनाथांचीच भारूडे एवढी लोकप्रिय झाली, की भारूडे म्हणजे एकनाथांचीच असा समज रूढ झाला. संतांच्या गाथ्यातं या प्रकारच्या रचनेत रूपके म्हटलेले आहे. त्यांना भारूड ही संज्ञा केव्हा व का दिली आणि भारूड या शब्दाची व्युत्पती काय, याचा उलगडा होत नाही. बहुरूढ ते भारूड, भराडी जातीचे लोक गातात ते भारूड, ‘ भारूंड ‘ नावाच्या द्विमुखी पक्षाप्रमाणे द्वयर्थी गीत ते भारूड अशा व्युत्पत्ती सुचविल्या गेल्या आहेत. परंतु त्यांतील कोणत्याही व्युत्पत्तीस भरीव आधार नाही. व्यवहारात भारूडाचा अर्थ कंटाळवाणी, निरर्थक बडबड असा आहे पण तोही कसा आला, ते कळत नाही.
लौकिक व्यवहारावर आध्यात्मिक वा नैतिक रूपके रचण्याची परंपरा फार प्राचीन आहे. अशी रूपके महाभारतात, भागवतात, तशीच लोकगीतांत आणि कलगीतुऱ्याच्या शाहिरीत आढळतात. ज्ञानेश्वर-नामदेवांनी रचलेली रूपके त्याच परंपरेतील. रूपकाच्या चमत्कृतीने श्रोत्यांचे लक्ष वेधायचे, त्या रूपकाचा उलगडा करण्यात त्यांना गुंतवायचे आणि अंती त्यातील आध्यात्मिक-नैतिक आशय त्यांच्या मनात उतरवायचा, हे कार्य अशी रूपके उत्कृष्टपणे करतात. संतांच्या गौळणी, विराण्या ही रचनादेखील रूपकात्मकच, परंतु ती आधात्मिक-नैतिक शिकवणीकरीता नसून भक्तीची आर्तता व्यक्त करण्याकरिता केलेली, म्हणून भारूडाहून वेगळी.
एकनाथांची भारूडे लोकप्रिय होण्याची कारणे चार: (१) विविधता, (२) नाट्यात्मता, (३) विनोद आणि (४) गेयता.
इतर संतांनी भारूडांसारखी रचना केलेली असली, तरी एकनाथांच्या एवढी विविधता त्यांत नाही. शिवाय ती संख्येनेही मोजकीच आहे. वर जी रूपकांची यादी दिली आहे, ती एकनाथांच्या भारूडांवरून. एकनाथ हे नित्यनैमित्तिक कर्म ‘विधीगौरवें शृंगारोनी’ आचारणारे आणि सांसारिकांची सुखदुःखे, इच्छा-आकांक्षा, आवडी-नावाडी इ. विषयी जिव्हाळा बाळगणारे, त्यामुळे सामान्यांच्या लौकिक जीवनाशी ते सहज समरस होत. याच लौकिक जीवनाच्या आधारे सांसारिकांना आध्यात्मिक-नैतिक शिकवण दिली, तर मनोरंजनाच्या द्वारे लोकशिक्षणाचे कार्य साधेल, हाच त्यांचा भारूडरचनेमागील हेतू दिसतो. रामायण-भागवतातील कथा सांगतानादेखील त्यांनी रूपकांचा आश्रय केला तो या हेतूनेच.
एकनाथांची भारूडे ही विलक्षण नाट्यात्मक आहेत. ती गाताना त्यांतील पात्रांची सोंगे आणली जातात आणि प्रसंगानुरूप बतावणी करण्यात येते. ‘विंचू चावला’ या भारूडाचे लक्ष्य आहे कामक्रोधाने होणारी मनोवस्था हे पण त्यात अभिनय आहे तो वृश्चिकदंशाचा. हीच गोष्ट इतर भारूडांची.
‘टवाळा आवडे विनोद’ म्हणून प्राचीन मराठी कवींनी विनोदाची काहीशी उपेक्षाच केली. एकनाथ याला अपवाद. विनोद हा टवाळांनाच नव्हे, तर सर्वसामान्यंनाही आवडतो त्यानेच जीवन सुसह्य होते, हे जाणून एकनाथांची त्याचा भरपूर उपयोग केलेला आढळतो. ‘नणंदेच कारटं किरकिर करतं । खरूज येऊ दे त्याला’, ‘फाटकेसे लुगडे तुटकीशी चोळी । शिवाया दोरा नाही’ यांसारखे संसारातील प्रसंग किंवा ‘कुत्राब्राह्मण संवाद’, ‘हिंदू-तुर्क संवाद’ यांतील सवालजबाब यांत एकनाथांच्या विनोदबुद्धीचा निर्मळ प्रत्यय येतो. या भारूडांत क्वचित अश्लील वाटेल अशी भाषा आहे पण तोही विनोदाचाच प्रकार.
भारूडांतील गेयता म्हणजे लोकसंगीतातील गेयता. ढोलकी, डमरू, तुमडी, दिमडी, टाळ, चाळ, एकतारी, तुणतुणे, वेणू यांसारख्या वाद्यांच्या साथीवर वासुदेव, गोंधळी, वाघ्या-मुरळी, डौरी, फकीर तसेच देवळात व घरात कीर्तनकार व स्त्रिया जी गीते गात, त्यांचा ताल व ढंग, त्यांची चाल व लय बरोबर पकडून एकनाथांनी भारूडे रचल्यामुळे ती लोकगायकांच्या कंठांत चपखल बसली आणि लोकप्रिय झाली. जशी आजची चित्रपटातील गीते. भारूडे ही जरी लोकशिक्षणाकरिता रचलेली असली, तरी वारकरी निरूपणात, कीर्तनात वा भजनात ती क्वचितच गायिली जातात. संतांचे अभंग हे नित्यागायनाकरिता आणि भारूडे ही क्वचित प्रसंगी करमणुकीकरिता, असाच प्रधात आहे. त्या करमणुकीतही अध्यात्माचे अनुसंधान सुटू नये, हाच भारूडरचनेचा प्रधान हेतू. सुधाकर गो. चांदजकर (मराठी संतांची भारूडे: एक विवेचक अभ्यास, १९७२) आणि कांता जगदाळे (मराठीतील भारूड वाङ्मय, १९७४) ह्यांनी भारूडांवर प्रबंध लिहिले आहेत.
संदर्भ : १. आवटे, त्र्यं. ह. संपा., गाथापंचक अर्थात् सकलसंतगाथा, पुणे, १९२३.
२. नांदापूरकर, ना. गो. एकनाथी भारूड“, श्री एकनाथदर्शन भाग १, श्री एकनाथ संशोधन मंदिर, औरंगाबाद, १९५२.
धोंड, म. वा.
“