बरुआ, चंद्रधर : (? सप्टेंबर १८७४- ? १९६१). आधुनिक असमिया कवी व नाटककार. जन्म जोरहाट येथे. जोरहाट येथेच त्यांचे आरंभीचे शिक्षण झाले. नंतर कलकत्ता विद्यापीठात त्यांनी बी. ए. पर्यंत शिक्षण घेतले. १९०० मध्ये वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ वकिली व्यवसायही केला परंतु त्यात त्यांचे मन रमले नाही, नंतर वकिली सोडून देऊन ते चहा-मळ्याच्या धंद्यात शिरले आणि त्यात त्यांनी चांगला पैसा व लौकिक मिळवला. काव्य व नाट्याची त्यांना विद्यार्थिदशेपासूनच आवड होती. ‘जोरहाट ड्रॅमॅटिक क्लब’ या नाट्यसंस्थेचे ते एक क्रियाशील सभासद होते. जोरहाट रंगमंचावर काही काळ ते एक कसबी नट म्हणूनही गाजले.
त्यांची पौराणिक पद्य नाटके अत्यंत लोकप्रिय ठरली. त्यांचे प्रयोग आसाममध्ये सर्वत्र यशस्वी ठरले. त्यांच्या मेघनाद वध (१९०४) व तिलोत्तमा संभव (१९२४) ह्या पद्य नाटकांवर प्रसिद्ध बंगाली साहित्यिक ⇨ मायकेल मधुसूदन दत्त यांच्या काव्यांचा प्रभाव आहे. मेघनाज वधमध्ये रावणाचा पुत्र इंद्रजीत याचा वध आणि तिलोत्तमा संभवमध्ये तिलोत्तमेच्या प्राप्तीसाठी सुंद व उपसुंद यांचा संघर्ष आणि नाश दाखविला आहे. त्यांची भाग्यपरीक्षा (प्रहसन-१९१५) व राजर्षि (१९३७) हीही उल्लेखनीय नाटके होत. तथापि त्यांच्या सर्व नाटकांत मेघनाद वध हे नाटक सर्वोत्कृष्ट मानले जाते.
विद्युत्-विकाश व कामरूपजीयारी ह्या दोन दीर्घ आख्यानपर काव्यांत त्यांनी निर्यमक रचनेचा यशस्वी प्रयोग केला तथापि ह्या दीर्घ आख्यानपर काव्यांपेक्षा त्यांचा रंजन (१९२७) हा काव्यसंग्रहच विशेष सरस आहे. या संग्रहात त्यांच्या उपरोधिक, निसर्गपर भावकविता आहेत. आपल्या उपरोधिक कवितांतून त्यांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर व परंपरांवर कठोर प्रहार केले आहेत. ‘स्मृति’ सारखी त्यांची नितान्तसुंदर प्रेमकविताही याच संग्रहात आहे. असमियातील स्वच्छंदतावादी कवितेचे ते एक प्रवर्तक मानले जातात तथापि असमिया साहित्यात कवीपेक्षा नाटककार म्हणूनच त्यांना विशेष महत्वाचे स्थान आहे.
सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) शिरोडकर, द. स. (म.)
“