बकींगहॅम : इंग्लंडच्या बकिंगहॅम परगण्यातील इतिहासप्रसिध्द शहर आणि बाजारपेठ. लोकसंख्या ५,०७५ (१९७१ अंदाज) हे एल्झबरीच्या वायव्येस २७ किमी. वर ऊझ नदीकाठी बसले असून दळणवळणाच्या सर्व सोयी शहरात आढळतात.

सर्वप्रथम येथे रोमन वसाहत होती, असे मानतात. नॉर्मनांच्या विजयापूर्वी (१०६६) या शहरास महत्त्व होते. डोम्स डे बुकमध्ये स्वतंत्र उल्लेख असलेले हे इंग्लडंमधील एकमेव शहर होय. अँग्लो-सॅक्सन काळात ॲल्फ्रेड द ग्रेटने आपल्या काउंटीचे हे मुख्य ठिकाण केले (८८६). एडवर्ड द एल्डरने आपल्या लष्करासह एक महिना येथे तळ देऊन दोन किल्ले बांधले होते, असा उल्लेख ‘अँग्लो-सॅक्सन इतिवृत्ता’मध्ये आढळतो. तिसऱ्या एडवर्डने (१३२७-७७) येथे लोकर-व्यापारकेंद्र उभारले होते. मात्र येथील लोकर-व्यापार फ्रान्समधील कॅले येथे नेल्यामुळे या शहराची पीछेहाट होत गेली व आठव्या हेन्रीच्या काळात (१५०९-४७) छत्तीस दरिद्री गावांत याची गणना करण्यात आली. १५५४ आणि १६८४ या वर्षी शहरास सनदा मिळाल्या. १७२५ मधील प्रचंड आगीमुळे बकिंगहॅमचे अतोनात नुकसान होऊन अनेक जुन्या वास्तूंचा नाश झाला.

आसमंतातील शेतमालाची ही प्रमुख बाजारपेठ असून येथे यंत्रनिर्मिती, गालिचे विणणे, दुग्धव्यवसाय, रंगाचे व कातडी वस्तूंचे उत्पादन यांसारखे विविध उद्योग चालतात. येथे बंकिंगहॅम युनिव्हर्सिटी कॉलेज स्थापन करण्यात आले (१९७५). सर गिल्बर्ट स्कॉटने पुनर्रचना केलेले चर्च (अठरावे शतक), कॅसल हाउस, सहाव्या एडवर्डने देणगी म्हणून दिलेले ओल्ड लॅटिन स्कूल, शहराच्या वायव्येस सु. ४ किमी. वरील बंकीगहॅमच्या ड्यूकचे निवासस्थान म्हणून विख्यात असलेले स्टो हाऊस इ. ऐतिहासिक वास्तू उल्लेखनीय आहेत.

कापडी, सुलभा.