फेअरो बेटे : डेन्मार्कच्या आधिपत्याखाली उत्तर अटलांटिक महासागरातील ज्वालामुखीजन्य बेटे. क्षेत्रफळ १,३९९ चौ. किमी. लोकसंख्या ४१,५७५ (१९७७). ही बेटे ⇨ शेटलंड बेटांच्या वायव्येस ३२० किमी. व ⇨ आइसलँडच्या आग्‍नेयीस ४०० किमी. अंतरावर असून ती ६१२६’ उ. ते ६२२४’ उ. आणि ६ १५’ प. ते ७ ४१’ प. यांदरम्यान पसरलेली आहेत. या द्वीपसमूहात अठरा मोठी बेटे (पैकी एक निर्मनुष्य) आणि चार लहान बेटे असून ती चारही निर्मनुष्य आहेत. स्ट्रम, ऑस्डर, सॅन, सूदर, व्हॉव, बॉर्द इ. बेटे मोठी आहेत. स्ट्रम बेटावरील टॉर्सहाउन ही बेटांची राजधानी आहे (लोक. ११,५८६-१९७७).

भूवर्णन : तृतीयक कालखंडात आइसलँड व स्कॉटलंड मिळून एक सलग भूभाग होता परंतु क्षरणक्रियेने आणि काही भाग खचल्याने जो भाग उरला तो म्हणजे ही बेटे होत. हिमयुगामध्ये या प्रदेशातील हिमनद्यांनी तयार केलेल्या इंग्रजी ‘यू’ आकाराच्या दऱ्या खोलवर झिजून त्यांचे लांब, चिंचोळ्या व खोल अशा किनाऱ्यात म्हणजे ‘फ्योर्ड’मध्ये रूपांतर झालेले दिसून येते. या बेटांवर कमी जाडीचा, पीट प्रकारच्या मृदेचा थर आढळतो. या बेटांच्या भूरचनेमध्ये सर्वसाधारणपणे उत्तर व पश्चिम किनारपट्टीच्या भागांत उंच पर्वत, तर दक्षिण-पूर्व भागांत खोलगट प्रदेश आढळतात. याच भागात जास्त वस्ती आहे. ऑस्डर बेटावरील स्लाइटरटिंडे (८८२ मी.) हे या द्वीपसमूहातील सर्वोच्च शिखर आहे. बेटांचे किनारे दंतुर असून वाताभिमुख बाजूस ते तीव्र उताराचे आढळतात. तसेच दोन बेटांदरम्यान अरुंद खाड्या असून त्यांमधून भरतीचे पाणी ‘वान’ किंवा ‘घोडा’ (टाइडल बोअर) निर्माण करते. भूभागाकडे अरुंद होत गेलेल्या अशा खाड्यांतील भरतीच्या पाण्याची उंची भराभर वाढते, त्याच्या उताराची दिशा बदलते व उंच लोंढ्याच्या रूपाने ते भूभागाकडे येऊ लागते. त्यालाच ‘वान’ किंवा ‘घोडा’म्हणतात. अशा खाड्यांतून नौका चालविणे कौशल्याचे असते. बेटांवर अनेक सरोवरे असून व्हॉव बेटावरील सॉरव्हॉग हे येथील सर्वांत मोठे सरोवर आहे.

येथील हवामान सागरी, सौम्य प्रकारचे असले, तरी हिवाळा वादळी स्वरूपाचा, तर उन्हाळा थंड असतो. नैर्ऋत्येकडून वाहणारे वारे थंड व धुकेमिश्रित असतात. येथील सरासरी तपमान ७से. असते. मात्र उत्तरेकडून वाहणाऱ्या उत्तर अटलांटिक उष्ण प्रवाहामुळे (गल्फ प्रवाहाचा अंतिम भाग) येथील हवामान सम असते. यामुळेच येथील बंदरे बर्फमुक्त असतात. वार्षिक सरासरी पर्जन्यवृष्टी १५२·५ सेंमी. होते. नैर्ऋत्येकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे या बेटांवर फार उंच वनस्पती वाढू शकत नाहीत परंतु वाऱ्यांपासून संरक्षित भागांत सूचिपर्णी वृक्ष, मॅपल, मौंटन ॲश इ. वनस्पतींची लागवड केली जात आहे. हरिता, गवत व पर्वतीय बॉग या नैसर्गिक वनस्पती आढळतात. जंगलांच्या अभावामुळेच येथे फारच थोडे प्राणी दृष्टीस पडतात. मात्र समुद्रपक्षी विविध प्रकारचे असून त्यांना आर्थिक दृष्ट्या महत्त्व आहे. उदा., पफिन पक्ष्यांचा अन्न म्हणून, तर आयडर बदकांचा पिसांसाठी उपयोग होतो.

इतिहास व राज्यव्यवस्था : हारफर्ड नकाशावर (१२८०) या बेटांची नोंद आढळते. त्यांस त्यावेळी ‘फारी बेटे’ म्हणत. या बेटांवर काही आयरिश भिक्षूंनी इ.स. ७०० च्या सुमारास वस्ती केली होती. इ.स.८०० च्या सुमारास ही बेटे व्हायकिंग टोळ्यांनी आपल्या ताब्यात घेतली. दहाव्या शतकात ओलाफ ट्रयूग्व्हेसॉन या नॉर्वेच्या राजाने येथील लोकांचे ख्रिस्तीकरण केले. तेव्हापासून या बेटांवर नॉर्वे व डेन्मार्क यांचा संयुक्त अंमल होता. येथील नॉर्वेचा अंमल १३८० पर्यंत कायम होता. चौदाव्या शतकात उद्‍भवलेल्या ‘काळा प्लेग’च्या साथीने येथील बहुसंख्य लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर नॉर्वेजियनांनी पुन्हा येथे आपल्या वसाहती वाढविल्या. १८१४ मधील कील करारानुसार ही बेटे डेन्मार्कच्या ताब्यात राहिली. दुसऱ्या महायुद्धात या बेटांचा ताबा ब्रिटिशांनी घेतला होता आणि १९४५ पर्यंत ही बेटे त्यांच्याकडेच होती. १९४६ मध्ये येथील लोकांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली परंतु ती मान्य न होऊन १९४८ मध्ये या बेटांना अंतर्गत स्वायत्तता देण्यात आली व त्यांना स्वतःचा ध्वज, चलन, भाषा इत्यादींचा उपयोग करण्याची परवानगी मिळाली. डॅनिश राज्यपाल येथील राज्यकारभार स्थानिक विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांमार्फत पाहतो. १९७३ पासून डॅनिश संसदेवर फेअरो बेटांचे दोन प्रतिनिधी पाठविले जातात.

आर्थिक व सामाजिक स्थिती : मासेमारी हाच येथील प्रमुख व्यवसाय असून याच्याशी संबंधित उद्योग आणि शेती यांवर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. बेटांवरील सरोवरांत ट्राउट मासे सापडतात. १९७४ मध्ये मासेमारीत २१% कामगार गुंतले होते व एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या २९% उत्पादन मासेमारीपासून मिळाले होते. येथे फक्त ६% जमीन लागवडीखाली असून तीवर बटाटे, भाजीपाला व मेंढ्यांसाठी गवताची लागवड केली जाते. मेंढपाळी हासुद्धा एक महत्वाचा व्यवसाय असून २०% कामकरी लोक या व्यवसायात आहेत. सूदर बेटावर दगडी कोळसा सापडतो. १९७४ मध्ये ही बेटे ‘ईईसी’ (यूरोपियन इकॉनॉमिक कम्यूनिटी) मधून बाहेर पडली. त्याचप्रमाणे १९७२ पासून ही बेटे ‘एफ्टा’ (यूरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन) ची सदस्य नाहीत. म्हणूनच १९७७ मध्ये किनाऱ्यापासून ३२० सागरी किमी.पर्यंत मासेमारी करावी, असे बंधन या बेटांवर घालण्यात आले. यामुळे यांच्या व्यापारात अस्थिरता येऊन अर्थव्यवस्था संतुलित राखण्यासाठी त्यांना डेन्मार्कवर अधिकाधिक अवलंबून राहावे लागते.

या बेटांचा व्यापार प्रामुख्याने यूरोपीय देशांशी चालतो. निर्यात डेन्मार्क, फ्रान्स, प. जर्मनी, ग्रीस, इटली, नॉर्वे, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, ग्रेट ब्रिटन, अमेरिका या देशांना तर आयात डेन्मार्क, प. जर्मनी, नॉर्वे, पोलंड, स्वीडन, ग्रेट ब्रिटन या देशांकडून होते. बहुतेक वाहतूक सागरी मार्गाने होते. फेअरो क्रोन हे येथील अधिकृत चलन आहे.

बहुसंख्य फेअरोज ल्यूथरन असून ते डॅनिश चर्चशी संबंधित आहेत. यांशिवाय येथे रोमन कॅथलिकही आहेत. फेअरोज व डॅनिश या भाषा प्रमुख आहेत. फेअरोज भाषेच्या प्राचीन वाङ्‍मयात बॅलडला मोठे स्थान होते. जोॲनीज पॅटर्सन याने फेअरोज भाषेस मान्यता मिळावी म्हणून चळवळ करून ‘होमरूल पार्टी’ची स्थापना केली (१९०६). १९१२ मध्ये प्राथमिक शाळा व चर्च यांमधून काही प्रमाणात हिच्या वापरास मान्यता देण्यात आली. १९३८ पासून मात्र ही भाषा ऐच्छिक आहे. सध्या रोजच्या व्यवहारात फेअरोज भाषा हीच प्रमुख असून शाळांतून डॅनिश भाषेचा वापर केला जातो.

फेअरो बेटांची राजधानी टॉर्सहाउन हे या बेटांवरील प्रमुख बंदर आहे. याशिवाय फ्यूग्‍लाफ्योर्डर, ट्रांगिस्व्हा, व्हेस्टमानाह्‌वान, स्कालफ्योर्डर हीदेखील महत्वाची बंदरे आहेत. येथून प्रतिदिनी डेन्मार्कशी वाहतूक चालते. व्हॉव बेटावर विमानतळ असून तेथून कोपनहेगन, बर्गेन इ. शहरांशी हवाई वाहतूक चालते. टॉर्सहाउन येथे नभोवाणी केंद्र असून आठवड्यातून सु. ४० तास कार्यक्रम ध्वनिक्षेपित केले जातात. येथे ११,७०० रेडिओ परवानाधारक होते (१९७७).

बिशप एर्‌र्लंडने १२६९ मध्ये गॉथिक कँथीड्रलच्या बांधकामास सुरुवात केली होती परंतु तो ते पूर्ण करू शकला नाही. त्या कॅथीड्रलचे अवशेष आजही किर्कजुबो येथे पाहावयास मिळतात.

डिसूझा, आ. रे. गाडे, ना. स.